Monday, January 30, 2023

दासबोध सांगे


 
समर्थ रामदास स्‍वामींच्‍या दासबोधावर आधारित काव्‍य
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

।। श्री ।।

दासबोध सांगे

श्री समर्थ रामदासस्‍वामींची भूपाळी

प्रभातकाली रामदास हो जाग सहज येते
सज्‍ज्‍नगडची वायुलहर मम अंगावर येते। धृ.
कणाकणाने पुलकित काया झरती अश्रुसरी
त्रयोदशाक्षरी मंत्र आतुनी कोणी उच्‍चारी
माळ न हाती श्‍वासोच्‍छ्वासा संथ गती मिळते। १
रघुपतिराघव प्रेमे आळव जा रंगुनि भजनी
धन्‍य गायनी कळा आपुली गर्जतसे वाणी
मनोबोधचिंतनी चालता वृत्‍ती पालटते। २
निजशिष्‍याच्‍या कल्‍याणाची कळकळ तुम्‍हांसी
प्रसंग पडता हात देउनी सावरता त्‍यासी
आत्‍मारामी  प्रत्‍यय येता अंतरि गलबलते। ३
शुकासारखी विरक्ति अंगी ज्ञान वसिष्‍ठाचे
आदिकवीचे कवित्‍व जवळी बळ अध्‍यात्‍माचे
समर्थ स्‍वामी म्‍हणता म्‍हणता मानस गहिवरते। ४
भावभक्तिने कर पारायण मीच दासबोध
आत्‍मारामहि स्‍वरूप माझे स्‍वामी संबोध
कोठुनि येती वच हे कानी काही नच कळते। ५
भव्‍य भाळ तेजस्‍वी दृष्‍टी कांती लखलखती
विशाल छाती गंभीर वाणी घवघवीत मूर्ती
ग्रंथातुनि तर आशीर्वच मधु मिळती आम्‍हांते। ६
अजपाजप चालला कधीचा आपण दाखविले
स्‍थलकालांचे बंधन तुटले गुरुदर्शन घडले
श्रीरामाचा कंठ दाटला, ये हृदयी भरते।७

--oo00oo--

श्री दासबोधाची भूपाळी

येई दासबोधा अंतरी सोऽहं  घमघमला
कृपा राघवाची स्‍वागता शुद्ध स्‍वर लागला ।

तुझ्या प्रसादे होता सावध कोऽहं हे कळले
नाम दिलेसी त्‍या तेजाने तिमिरहि मावळले
त्रयोदशाक्षरि मंत्र आवडे परमार्थी आगळा। १

एकांताची ओढ लागली मिटली नयनदले
जनांत असुनी शांतिगृहाच्‍या सौख्‍या अनुभविले
भक्तिकमळ उमलले पाहुनी ज्ञानभास्‍कराला। २

गुरुशिष्‍यांच्‍या संवादाची रुचीच ही वेगळी
प्रमेय आले रुचीस येथे प्रज्ञा टवटवली
उत्‍साहाचा चैतन्‍याचा निर्झर झुळझुळला। ३

शिवथर घळ प्रत्‍येक मानसी सदैव असलेली
तुझ्या वाचने साधकास ती पुरती जाणवली
जो तो साधक डोळे मिटुनी अंतरंगि वळला। ४

अखंड चाले सोऽहं  सोऽहं  रामदास वदले
श्‍वासाला त्‍या भूदेवाने नाम जोडुनी दिले
अनुभव घेता साधक ऐसा कण कण मोहरला। ५

प्रपंच परमार्थांचे नाते उमाशंकरांचे
परस्‍पराविण जगी न भागे पळभर कोणाचे
गृहस्‍थाश्रमी सहज पांघरे विरक्ति शालीला। ६

अक्षर अक्षर ठसो मनावर ऐकावी प्रार्थना
धार लाव प्रज्ञेला अमुच्‍या बळ दे गा चिंतना
श्रीरामाचा अजुनि जिव्‍हाळा ध्‍यानि न का आला? ७

--oo00oo--

श्रीराम समर्थ

दासबोधा, बोल आता
बोल माझ्याशी । धृ.
मज सांग बा संदेश
कानी येवो उपदेश
आचरू कसा रे तत्‍वासी? १
उकल रे अंतरंग
भक्तिलागी येवो रंग
कर प्रेमळ हितगुज माझ्याशी। २
रामदास ग्रंथरूप
नांदताहे सुखरूप
करु सुखे सुखे संवादासी। ३
हारपवी देहभान
हाती येवो आत्‍मज्ञान
ही विनंति अक्षरब्रह्मासी। ४


--oo00oo--
ग्रंथराज श्रीदासबोध!
त्याला केलेली ही प्रार्थना! 
समर्थांचे स्‍वत:सिद्ध रूप म्‍हणजे दासबोध!  देहबुद्धि जाता जात नाही! आत्‍मबुद्धि येता येत नाही! 
कान बधिर झालेले! डोळे अंधत्‍व पावलेले! रसनेला नामात रस वाटेना! 
विषयाच्‍या मृगजळामागे मनरूपी हरिणाचे ऊर फुटेतो धावणे थांबता थांबेना!
श्री दासबोध रामदासांचा जीवनवेद! 
कसा काय कळणार आपल्‍याला?
सद्गुरुकृपा झाली पाहिजे! 
गुरुकिल्‍ली मिळाली की अक्षयसुखाचे भांडार खुललेच समजावे! 

ग्रंथा नाम दासबोध। गुरुशिष्‍यांचा संवाद। येथ बोलिला विशद भक्तिमार्ग। 
भक्तिचेनि योगे देव। निश्‍चयें पावती मानव। ऐसा आहे अभिप्राव। इये ग्रंथी।। 

चला शिवथर घळीला

दासबोधाची गंगा झुळझुळते
ती शिवथर घळ मज बोलविते! धृ.
निसर्गनिर्मित गुहा मनोहर
पाणलोट कोसळे खोलवर
मन कधीच जाउनि पोचते ! १
एकान्‍ताची महती पटते
अवघ्‍या आधी कळे वाटते
जळ नयनांतुनि ह्या ओघळते! २
निर्मळ पाणी पुरवित पाझर
इथे साधना दुधात साखर
मन अभ्‍यासाला आतुरते। ३
कडे कपारे दरे दर्कुटे
पाहो जाता भयचि वाटते
परि ओढ अनामिक ओढते! ४
सुंदर मठ हा खचितचि सुंदर
समर्थ स्‍मरता येतो गहिवर
“मी दासबोध” ही खूण पटे! ५
--oo00oo--

गीता ऐकावी ती अर्जुन होऊन! 
तसं दासबोध ऐकायचा, उतरवून काढायचा पुन:पुन्‍हा वाचायचा, त्‍याची पारायणं करायची ते समर्थशिष्‍य कल्‍याण होऊनच! 
त्‍याशिवाय आत्‍मज्ञान होणार नाही ! 
आत सुरु असलेला अजपाजप जाणवणार नाही!
कामक्रोध निवळणार नाहीत! 
चिंतनाला चालना मिळणार नाही!
इतका काळ चोरला गेलेला थोरला देव दिसणार नाही!

समर्थांना कवीश्‍वर म्‍हणून वंदन करू या!

आता वंदू कवीश्‍वर। जे शब्‍दसृष्‍टीचे ईश्‍वर। ना तरी हे परमेश्‍वर। वेदावतारी।।

अरे दासबोध वाचा
अरे दासबोध वाचा,
आनंदाने नाचा, नाचा! धृ.
दासबोध बालबोध
दासबोध प्रौढबोध
म्‍हणा रामनाम मुखे
मार्ग चाला अध्‍यात्‍माचा! १
नित्‍य सावध असावे
दक्ष साधनी असावे
जनी राघव पाहावा
ऐसा सांगावा दासाचा! २
अरे उद्योग्‍याचे घरी
ऋद्धि सिद्धि पाणी भरी
अरे सावध, सावध
नाश होय आयुष्‍याचा! ३
ज्ञान विज्ञानासहित
तत्‍व दृष्‍टांतासहित
आत्‍माराम ध्‍याता ध्‍याता
मांड मांडा प्रपंचाचा! ४
देव थोरला थोरला
आहे अंतरी भरला
अरे नित्‍यनेमे घ्‍यावा
ध्‍यास सोऽहं  भजनाचा! ५
--oo00oo--

श्रीसमर्थांचे विचारधन! तो हा ग्रंथ दासबोध! बहुमोल ठेवा!  आत्‍मविश्‍वासाची प्रेरणा देणारा! लोकांना संघटित करणारा! उद्योगी बनविणारा! प्राणवान सामर्थ्‍यशाली नित्‍यनूतन असा! 
जेव्‍हा जेव्‍हा दासबोध वाचाल तेव्‍हा तेव्‍हा तोच तुमचे अधिक वाचन करील! हाती आलेला दासबोध सोडू नका!  जीवनाचा मार्गदीप आहे तो! 
नाना धोके देहबुद्धीचे। नाना किंत संदेहाचे 
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ।। 
ऐसी याची फलश्रुती। श्रवणे चुके अधोगती 
मनास होय विश्रांती। समाधान।। 

सद्गुरु सांगे – शिष्‍य लिहितसे

सद्गुरु सांगे – शिष्‍य लिहितसे
अक्षर अक्षर अंतरी ठसे ! धृ.
वदन उजळते विचार स्‍फुरता
कविता झरते जैसी सरिता
वातावरणहि शांत शांत से! १
ती सावधता ती तत्‍परता
ती उत्‍सुकता ती शालिनता
घळीत अजुनी वास करितसे! २
अंबरि जैसे हो घनगर्जन
बोल घुमत हे गाभा-यातुन
नयनांपुढती चित्र येतसे! ३
ज्‍योत ज्‍योतिने जशि लागावी
परंपरा ही पुढेच जावी
समर्थांस मी हे प्रार्थितसे! ४
शब्‍द न मिथ्‍या येथ प्रचीती
सद्धर्मासह नांदे नीती
सत् चित् आनंदचि की विलसे! ५
मंदिरपण लाभले घळीला
ग्रंथ जसा ये आकाराला
चिंतन स्‍फुरले गोड गोडसे! ६
दासबोध हा प्रबोध आहे
प्रबंध आहे प्रसाद आहे
अजून जपते चित्‍त कवडसे! ७
--oo00oo--

शिवथर घळ!
दासबोध येथे सांगितला गेला – लिहिला गेला.  साधकाने तिथे जाऊन दासबोध अभ्‍यासावा – हे तर खरेच. पण खरं सांगायचं तर आपलं मनच शिवथर घळ नाही का?  त्‍या भावनेतून ग्रंथ वाचला – ऐकला तर अधिकस्‍याधिकं फलम्। 
तो आनंद घ्‍या आणि द्या! 

दर्शन द्या हो स्‍वामी

कळवळून हाका कितिदा मारू स्‍वामी
मज अज्ञ अपत्‍या दर्शन द्या हो स्‍वामी! धृ.
ते श्‍लोक मनाचे अमोल गमतो ठेवा
करुणाष्‍टक कैसे वेड लाविते जीवा
मन सज्‍जनगड हे याच राहाया धामी! १
अचपळ परि मन हे अंत न याचा लागे
नावरे कदा हे भलते सलते मागे
चुचकारुन त्‍याला अंतरि वळवा स्‍वामी! २
रघुनाथ कधीचा भावभुकेला आहे
हृदयीच राहुनी धारिष्‍ट्याला पाहे
वाढण्‍या आत्‍मबळ रहा पाठिशी स्‍वामी! ३
बाल्‍यात वाहिली चिंता ह्या विश्‍वाची
का ध्‍यानि न घेता अगतिकता भक्‍ताची
मी अनन्‍यभावे शरण येतसे स्‍वामी! ४
यत्‍न तो देव, पुरुषार्थच जीवन आहे
आलस्‍य दैत्‍य, भित्रेपण मृत्‍यू आहे
ग्रंथातुनि अपुल्‍या बोला मजशी स्‍वामी! ५

--oo00oo--

स्‍वामी निर्दय नाहीत!
दिनाचा मवाळू मनाचा मवाळू! 
स्‍नेहाळू कृपाळू जगी दासपाळू! ! 
असे त्‍यांनी आपल्‍या समर्थांचे – श्रीरामाचे वर्णन केले.  स्‍वत: ते तसेच आहेत. वर्णन करताना त्‍यांच्‍या पुढे आद्य रामदास मारुतिराय आहे – आपल्‍यापुढे समर्थ रामदास असू द्यात. 

नसे अंतरी काम नाना विकारी। 
उदासीन तो तापसी ब्रह्मचारी ।। 
निवाला मनीं लेश नाही तमाचा। 
जगीं धन्‍य तो दास सर्वोत्‍तमाचा।। 

आत्‍मविश्‍वास जागृत करणारा, संघटना बांधणारा, त्‍यांचा अलख आपणही गाजवू या 

जय जय रघुवीर समर्थ! 
जय जय रघुवीर समर्थ
दासबोध वाचू, मनोबोध वाचू
आत्‍माराम वाचू, आनंदाने नाचू
मंत्र घोकू दिनरात
जय जय रघुवीर समर्थ! १
तो राम कुठे?  तो राम इथे
येत ना जात ना कधी कुठे
चिंतन करु दिनरात
जय जय रघुवीर समर्थ! २
त्‍या पाहा जरा, तो आत खरा
तुम्‍ही त्‍वरा करा भवसिंधु तरा
दर्शन दे रघुनाथ
जय जय रघुवीर समर्थ! ३
हडबडू नका, गडबडू नका
कुणी रडू नका, कुणी कुढू नका
अंतरी प्रेरणा होत
जय जय रघुवीर समर्थ! ४
वणवण हिंडू जनजन शोधू
जनजन शोधू मग करु बोधू
आधार मंत्र हा देत
जय जय रघुवीर समर्थ! ५

--oo00oo--

या मंत्राच्‍या उच्‍चारानेच आपण ताठपणे उभे राहू, धीर धरू, गडबडणार नाही. 
नित्‍य जवळच असून कृपाळूपणे अल्‍पधारिष्‍ट पाहाणा-या समर्थांची अनुभूती येईल. 
आनंदाचा दाता कधी दासाची उपेक्षा करील?  
सदा सर्वदा देव सन्‍नीध आहे 
कृपाळूपणे अल्‍प धारिष्‍ट पाहे 
सुखानंद आनंद कैवल्‍यदानी 
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। 

जय जय रघुवीर समर्थ  
  

दासाचा बोध तो दासबोध

दासाचा बोध तो दासबोध!  धृ.
रामाचा दास तो रामदास
देही उदास तो रामदास
भक्‍तीचा दास तो दासबोध! १
नाम जिथे श्रीराम तिथे
श्रीराम जिथे मन रमे तिथे
मनपण नुरवी तो दासबोध! २
श्रवण करा मग पठण करा
पठण करा मग मनन करा
देवाचा शोध तो दासबोध! ३
ध्‍यास धरा अभ्‍यास करा
अभ्‍यास करा मग कृती करा
एकरूपता दासबोध! ४
राम करी हे ध्‍यानि धरा
ध्‍यानि धरा हा बोध खरा
तोल राखि तो दासबोध! ५
मनन करा परमार्थ कळे
परमार्थ कळे मन आत वळे
अशी मुरड तो दासबोध! ६
गंगोदक नित प्राशावे
प्राशावे ते पचवावे
पालट जो तो दासबोध! ७

--oo00oo--
समर्थ रामदासस्‍वामी यांचे छोटे नाव ‘दास’! 
दासाचा बोध तो दासबोध! 
“श्रीसमर्थांचे पंचविध दर्शन” या बालस्‍वामी लिखित पुस्‍तकात हे वाचनात आले आणि वरील कविता स्‍फुरली! 
गात गात लिहिली गेली – लिहिता लिहिता गाइली गेली! 
श्रीसमर्थांचीच कृपा!

नरदेह

हा धन्‍य धन्‍य नरदेह
हा श्रीरामाचे गेह! धृ.
साधन सुंदर
भजनी तत्‍पर
घालवीत संदेह!
श्‍वासासंगे
भजनहि रंगे
भाविक नि:संदेह!
देह नसे मी
तोच तोच मी
ठरवि ज्ञान प्रमेय!
जरी अशाश्‍वत
जोडी शाश्‍वत
नकाच मानू हेय!
दैवी देणे
स्‍वच्‍छ राखणे
स्‍वास्‍थ्‍य हेच सौंदर्य!

--oo00oo--
सांग नरदेह जोडले। आणि परमार्थबुद्धी विसरले 
ते मूर्ख कैसे भ्रमले। मायाजाळी।। 

देवप्राप्‍ती केवळ नरदेहामुळेच होते! विचार करण्‍याची शक्‍ती आहे! स्‍वयंनियंत्रित, स्‍वयंचलित आहे! 
पुरुषोत्‍तमाला यातच राहायला आवडते ना! देह आतील आत्‍मारामासाठी आहे! 
देह परमार्थी लाविले। तरीच याचें सार्थक झाले
नाही तरी हे व्‍यर्थचि गेले। नाना आघाते मृत्‍युपंथे।। 
समर्थांचे सांगणे तर असे 
नरदेहाचे उचित। काही करावे आत्‍महित। 
यथानुशक्‍ती चित्‍त वित्‍त। सर्वोत्‍तमी लावावे।।  
विवेक हवा, विचार हवा, वैराग्‍य हवे 

समाज राम

घे घे ध्‍यानी समाज राम
सेवा कर तू हो निष्‍काम! ध्रु
विसरुन मी पण
घडवित जीवन
समष्‍टीत बघणे श्रीराम! १
मधुर बोलुनी
सुखद हासुनी
तोषवीत जा आत्‍माराम! २
देह विसरशील
सदेव होशिल
आत्‍मबल तुला पुरवी राम! ३
कर्मि कुशलता
ती समरसता
बनवी जीवन मंगलधाम! ४
जनि विचरावे
अवलोकावे
परीक्षवंता दिसतो राम! ५
जा सामोरा
श्री रघुवीरा
अद्वयानुभव दे श्रीराम! ६

--oo00oo--

माणसाला अतिमानव बनता येते.  यासाठी स्‍वस्‍वरूपाचे यथार्थ ज्ञान व्‍हायला हवे. हृदयातील ईश्‍वर दिसायला हवा.  आत्‍मज्ञानाने जीवन धन्‍य होते. अंगी दैवी गुण प्रकटू लागतात.  समाजाचे व स्‍वत:चे कल्‍याण साधता येते.  

समाजच राम हे ध्‍यानी घेऊन तसे वावरायचे आहे.  त्‍या रामाचे दास बनायचे आहे.  

अंतर्यामी स्‍वस्‍वरूपाचे स्थिर अनुसंधान आणि देहाने दीनांची सेवा म्‍हणजेच निरोगी भारतीय अध्‍यात्‍म होय. 
विनवणी

रामदासा अंतरि भरुनि होss
मज दासबोध शिकवा! धृ.
बोधाचे श्रवण घडावे
श्रवणावर मनन घडावे
तत्‍वार्थ मनी ठसवा! १
श्रीरामनाम मुखि यावे
जनि असुनी विजन गमावे
मज रामभक्‍त बनवा! २
मम विचार उच्‍च बनावे
मम मानस उन्‍नत व्‍हावे
ध्‍यानास त्‍वरित बसवा! ३
‘मी कोण’ सहज उमजावे
‘तो मी’ हे पूर्ण कळावे
मन आत आत वळवा! ४
“यत्‍न तो देव” समजावे
फळि उदासीन मन व्‍हावे
निजरूप मला दावा! ५

--oo00oo--

समर्थ जितके प्रकट होतात – ति‍तके लपूनही राहतात! 
त्‍यांनी समजावून सांगितलेले समजलेसे वाटते आणि थोडा वेळ गेला की पुन्‍हा काही कळेना होते – मराची उच्‍च अवस्‍था सतत टिकत नाही.  नुसते श्रवण काय कामाचे?  त्‍यावर मनन हवे! 
नामाची सतत धार आत्‍मारामावर धरायला हवी! 
शिवोsहम्! शिवोsहम्!
ध्‍यानाला बसता आले पाहिजे.  विकास आतून व्‍हायला हवा – म्‍हणून सद्गुरु समर्थांचे पाय धरायचे त्‍यांना पुन्‍हा पुन्‍हा विनवायचे।     

तुला म्‍हणून सांगतो

तुला म्‍हणून सांगतो
तुझ्यात राम पाही तू !  धृ.
चिंतनी बुडून जा
कीर्तनी रमून जा
तुझीच भेट घेइ तू ! १
विषयसंग सोड रे
विवेक हाच जोड रे
सुजाण स्‍वस्थ होइ तू ! २
मीपणा नको नको
विभक्‍तता नको नको
सत्‍यशोध घेइ तू ! ३
व्‍यर्थ काय धावसी?
वाद काय मांडसी?
गुरूस शरण जाइ तू ! ४
यत्‍न देव मान रे
सकलसौख्‍य त्‍याग रे
विरक्‍त शूर होई तू ! ५
दिसेच ना कळेच ना
तुटेच ना ढळेच ना
तत्‍व तेच जाण तू ! ६
स्‍वये स्‍वत:स पाहणे
आत आत पोचणे
अद्वयत्‍व साध तू ! ७

--oo00oo—

वाट चालत राहिल्‍याशिवाय मुक्‍कामाचे ठिकाण येणार कसे? घासामागून घास घेत राहिल्‍याशिवाय भूक भागणार कशी?  
चिंतनाने चिंतन साधणार! ध्‍यानाने ध्‍यान जमणार!

केल्‍याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे यत्‍न तो देव जाणावा. 
 
तो हा दासबोध
इंद्रियांचे दमन
वेदांचे मंथन
मनाचे नमनss
दासबोध!  तो हा दासबोध!
धर्माचे कथन
प्रेमाचे वचन
भवभयहरण ss
दासबोध!  तो हा दासबोध!
रामाचे भजन
गुरूचे दर्शन
आत्‍म्‍याचे भोजन ss
दासबोध!  तो हा दासबोध!
श्रवणाचे श्रवण
स्‍मरणाचे स्‍मरण
अरूपाचे वर्णन ss
दासबोध!  तो हा दासबोध!
दोषांचे त्‍यजन
गुणांचे ग्रहण
विवेकाचे मंडन ss
दासबोध!  तो हा दासबोध!
--oo00oo--
प्राणीमात्रांच्‍या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करणेचे सामर्थ्‍य श्रीमत् दासबोध या एका ग्रंथामधे आहे. 
अध्‍यात्‍म प्रत्‍यक्ष्‍ा जीवनात आणण्‍याची आचारसंहिता या ग्रंथात सापडेल. या ग्रंथाची शिकवण जीवनाचे नैराश्‍य घालवून चैतन्‍य निर्माण करणारी आहे.  
कृपासिंधु उचंबळला । परमार्थरूप ग्रंथ केला। 
तो कल्‍प कोटी आला । उपेगासी।। 
श्रवण करिता दासबोध । तात्‍काळ उपतिष्‍ठे प्रबोध। 
तुटे संसार संबंध। मननमात्रें ।। 
दासबोधी समर्थ निवास । ग्रंथी वरदान निजध्‍यास। 
निजध्‍यासेंचि प्रत्‍ययास । येत ग्रंथस्‍वरूपें।। - रामसोहळा – मेरुस्‍वामी 
शिकवितो दासबोध सेवा !

शिकवितो दासबोध सेवा ! धृ.

प्रत्‍येक गृह मंदिर व्‍हावे
मातृपितृपद सेवित जावे
अंतरि राम पहावा ! १

उदात्‍त उन्‍नत जीवन व्‍हावे
गोमातेचे पूजन व्‍हावे
गोरस मधुमेवा ! २

सज्‍जनरक्षण खलनिर्दालन
संवादातुन विचारमंथन
अमोल दे ठेवा ! ३

प्रपंच जोडे परमार्थाशी
साधकास नित हित उपदेशी
सद्गुरु हा बरवा ! ४

बलसंवर्धन गुणसंवर्धन
व्‍यक्‍ती व्‍यक्‍ती देतो जोडुन
सूत्रधार हा नवा ! ५

हा यत्‍नांचा महिमा गातो
संस्‍कारांची शिकवण देतो
आवाहन करि शिवा ! ६

संयमात सुख आहे आहे
वैराग्‍यातच वैभव आहे
संजीवक जीवा ! ७

--oo00oo--
विवेक हा

सुजन वदती विवेक हा! धृ.

सात्विक आवड
विषयी नावड
अचला मती – विवेक हा! १

नरतनु साधन
म्‍हणुन उपासन
नित दक्षता – विवेक हा! २

जाणे अंतर
साक्षी ईश्‍वर
रमत रामी विवेक हा! ३

श्रवणे मनने
भगवद् भजने
करि येतसे विवेक हा! ४

द्वंद्व न उरले
किल्मिष गेले
ऐसे करी विवेक हा! ५

--oo00oo--

चांगल्‍याची निवड हा विवेक! 
विवेक म्‍हणजे संमजसपणा! 
भौतिक वा जड असला तरी देह कमी महत्‍वाचा नाही हे समजणे देखील विवेकच आहे! 
हा विवेक मिळवावा लागतो! 
श्रवण, मनन, चित्‍तशुद्धी आणि प्रार्थना यांचे सुफल म्‍हणजे विवेक! 
अशा विवेकी माणसाचा प्रपंच नेटका होतो. 


स्‍मरा रामनाम

दासबोध सांगे स्‍मरा रामनाम!
स्‍मरा रामनाम! स्‍मरा रामनाम! धृ.
नाम घेता वाटचाली
यज्ञ पावलोपावली
न लगे द्याया दाम ! १
नामी वसते देवत्‍व
वाचे स्‍फुरवी कवित्‍व
जीवन हो सुखधाम ! २
येता जाता घोकावे
नामस्‍मरणे हरखावे
शुद्ध स्‍वरूप नाम ! ३
कष्‍ट न कसले देहाला
नाम जोडता श्‍वासाला
वर्मबीज प्रभुनाम ! ४
नामच वैभव रामाचे
नामच आलय शांतीचे
अधनाचे धन नाम ! ५
पातक राशी जळतात
स्‍वकर्म कुसुमे फुलतात
नाम जपावे अविराम ! ६
सोयर नाही सुतकहि नाही
स्‍थलकालांचे बंधन नाही
कसेहि करुनी घ्‍या नाम ! ७
तीर्थक्षेत्रे नामात
पूजाद्रव्‍ये नामात
शिवहि घेतसे नाम ! ८
--oo00oo--
जे निरंतर नाम स्‍मरते तेच पुण्‍य शरीर ! मनाला आत वळवून नाम शाश्‍वताकडे, अनंताकडे नेते! हीच उपासना ! 
सत्‍कर्मयोगे वय घालवावे जनांना भजनमार्गाला लावून सर्वांमुखी मंगल बोलवावे !   
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम !
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! ध्रु.
वदे वैखरी
उठवित लहरी
सोऽहं  वेणु काढितो स्‍वरु
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! १
देह नव्‍हे मी
तो मी तो मी
निळा अंबरी निळा अंतरी
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! २
प्रेमच उसळे
गान स्‍फुरले
सात्विक भावा उधाण आणत
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! ३
मनपण सरले
नमनच घडले
तनुचा कणकण गाई हर्षुन
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! ४
विवेक जागे
ज्ञानच सांगे
स्‍फुरण अलौकिक स्‍फुरवी नाम
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! ५
असेनहि जनी
असलो विजनी
रामच घेई आतुनि नाम
श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! श्रीराम ! ६
--oo00oo--
नाम घेण्‍याचा सपाटा सुरु ठेवावा !  म्‍हणण्‍याची लय वाढवावी !
वैखरीने वारंवार उच्‍चारले गेलेले नाम अजपाजपात रूपांतरित कधी झाले – आपले आपल्‍यालाच कळत नाही. 
सहज समाधि साधण्‍याला, मनाचे अ-मन होण्‍याला नाम हेच नामी औषध!

सुखालागिं आरण्‍य सेवीत जावे!

सेविणे अखंड एकांत! ध्रु.
ध्‍यान धरावे
मन मुरडावे
सतत आत आत! १

यत्‍न करावा
राम स्‍मरावा
सोऽहं  भावात! २

अभ्‍यासावे
प्रसन्‍न व्‍हावे
कोडी सुटतात! ३

कळते आधी
जमे समाधी
बरवा एकांत! ४

नित एकांती
होइल स्‍फूर्ती
राम दिसे आत! ५

--oo00oo--

एकांत ही देहाची अवस्‍था नसून मनाची स्थिती आहे!  जनात राहून विजनी जाता येते! 
एकांतात विवेक साह्याला धावेल!  यत्‍नाला योग्‍य दिशा सापडेल!  समाधान होईल!  नवनवे स्‍फुरत जाईल! 
खरे वैराग्‍य अंगी बाणेल! प्रचीती येईल!  मन त्‍वरेने एकाग्र होईल!  हीच सद्गुरुकृपा!  भवभय पळून जाईल! 
उत्‍तम साधना हातून घडेल!  

भाग्‍याला काय उणे?

भाग्‍याला काय उणे?
यत्‍न करी यत्‍न करी! धृ.

कर विचार काय सार
सोडुनि दे जे असार
शुद्ध बुद्ध होशि तरी! १

जरि विकार करि प्रहार
कर विवेक घे न हार
दक्ष राहि नित्‍य तू अंतरी! २

बोलत जा वचन असे
हृदया जे सुखवितसे
मधुर मधुर भाव वसो अक्षरी! ३

तू विषण्‍ण जग विषण्‍ण
तू प्रसन्‍न जग प्रसन्‍न
बिंब प्रतिबिंब भाव जाण तरी! ४

मी पणास विसर त्‍वरे
प्रेमभाव त्‍यास पुरे
सर्वात्‍मक होइ नरा निमिष तरी! ५

वचन जसे वाग तसे
संगति सुख देत असे
नीतीने न्‍यायाने वाग तरी! ६

होउ नको देहदास
होइ होइ रामदास
सार्थक नरजन्‍माचे खचित तरी! ७


--oo00oo--
अध्‍यात्‍म प्राण बोधाचा!

अध्‍यात्‍म प्राण बोधाचा! ध्रु.

ओवी ओवी वाचत असता
अर्थ अंतरी प्रवेश करता
परेत विरते वाचा! १

नरदेहाचे महत्‍व कळते
आत्‍मारामा बघू वाटते
नाश होय दु:खाचा! २

आनंद द्यावा आनंद घ्‍यावा
पुढे मागुती राम दिसावा
ध्‍यास जडे ज्ञानाचा! ३

यंत्र विलक्षण नरतनु आहे
परमार्थाचे साधन आहे
अनुभव एकांताचा! ४

विवेक जागे येत विरक्‍ती
यत्‍न करत ते सदेव ठरती
आशय साहित्‍याचा! ५

विचार नाही – यत्‍नहि नाही
समाज म्‍हणुनी मागे राही
बिंदु घटक सिंधूचा! ६

“उपासना” ही विद्या मोठी
न करी त्‍याची बुद्धी कोती
मी केवळ रामाचा! ७

--oo00oo--






रामदास कुलगुरु

रामदास कुलगुरु आम्‍ही विद्यार्थी त्‍यांचे! ध्रु.  
विद्यार्थी त्‍यांचे

निर्भय होऊ समर्थ होऊ
संघटनेचे सैनिक होऊ
उत्‍कटतेने पाठ गिरवु लोकसंग्रहाचे! १

साक्षेपे गुण जोडत जाऊ
आत्‍मारामा अंतरि पाहू
आमंत्रण घेऊ सदैवच आम्‍ही साहसाचे! २

परोपकारी देह झिजावा
यत्‍नदेव यत्‍ने पूजावा
दिवसा रात्री घोकत राहू नाम राघवाचे! ३

क्षात्रत्‍वाचे अंतरि स्‍पंदन
ब्रह्म तेजही टाकी भारून
पुण्‍यालाही देउ पाठबळ परम प्रतापाचे! ४

परोपरीचे जन मिळवावे
एक विचारे त्‍यां भारावे
शिवशक्‍तींचे मंगल मीलन स्‍वप्‍न साधंकांचे! ५

--oo00oo--








दास डोंगरी राहतो

दास डोंगरी राहतो
गाणे रामाचे गातो! धृ.

एकांती चिंतन करतो
नभास नेत्री साठवतो
भिक्षेचे परि निमित्‍त करुनी
जनाजनांते पारखतो! १

सर्वत्राची चिंता वाहे
अंतरात रामाते पाहे
हनुमंताच्‍या स्‍थापुनि मूर्ती
बलोपासना चालवितो! २

रामा रामा बाहतसे
वत्‍सासम मग स्‍फुंदतसे
‘धन्‍य गायनी कळा’ दाखवित
श्रीरामाते आळवितो! ३

शक्‍तीसंगे युक्ति हवी
राघवचरणी भक्ति हवी
रामराज्‍य अवतरण्‍या भूवर
यत्‍नांचा गिरि उंचवितो! ४


--oo00oo--




आत्‍माराम

जाणुनि घ्‍यावा आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम!
ध्‍यावा गावा आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम! ध्रु.

जरी दिसेना अनुभवास ये
एकरूप हे तत्‍वच आहे
देहोदेही राही अनाम! राही अनाम! राही अनाम! १

सर्व ठिकाणी तरी वेगळा
वर्णविती ना अगाध लीला
आत पाहता दिसेल राम! दिसेल राम! दिसेल राम! २

ओळख होते ध्‍याना बसता
नाते जुळते ध्‍यान लागता
श्‍वासासंगे घ्‍यावे नाम! घ्‍यावे नाम! घ्‍यावे नाम! ३

अनुसंधानी ऐसी गोडी
उपमा द्याया सुधा थोकडी
उपासना ही आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम! ४

जनी जनार्दन आत्‍माराम
हृदि नारायण आत्‍माराम
स्‍थावर जंगम आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम! ५

प्रेमघास हा घ्‍यावा ध्‍यावा
दासबोध हा मनी धरावा
रामदास हा आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम! ६

क्रिया पालटवि हा ग्रंथ
तारक बोधक हा ग्रंथ
स्‍वरूपमय हा आत्‍माराम! आत्‍माराम! आत्‍माराम! ७


--oo00oo--
थोर पुरुषांच्या कार्याला एक नाही अनेक अंगे असतात.  त्यापैकी काही अंगे तात्‍पुरती असतात.  समर्थांची दासबोध ही कृती सर्वकाली, सर्व ठिकाणी, सर्व लोकांना दिव्‍य जीवनाचा आदर्श दाखविणारी शाश्‍वत दीपिका आहे.  मानवी जीवन सर्व ठिकाणी अनेक बाजूंनी अपूर्ण आढळते.  पण मानव देहामध्‍ये दिव्‍य किंवा ईश्‍वरी जीवन जगण्‍याची शक्‍ती वास करते असाही प्रत्‍यक्ष अनुभव येतो म्‍हणून मानव देह मिळाला असता अंतरातील ईश्‍वर शक्‍ती जागी करून दिव्‍य जीवन संपादन करण्‍याचा अट्टाहास करावा असा दासबोधाचा प्रधान संदेश आहे.

मी देहच आहे या दृढ भावनेने सामान्‍य माणूस जीवन जगतो.  ‘मी व माझे’ या भावना प्रकट होतात – त्‍यांच्‍या पायी जीवन स्‍वार्थी आणि आकुंचित बनते.  अंतरी व बाहेरी संघर्ष व स्‍पर्धा असल्‍यामुळे व्‍यक्‍तीला व समाजाला समाधान लाभत नाही.  मी आत्‍माच आहे या भावनेने माणूस जीवन जगू लागला तर त्‍याचे जीवन आत बाहेर निराळे बनते.  ‘तू व तुझे’ कल्‍पना प्रगट होतात – त्‍यांचा परिणाम होऊन त्‍या माणसाचे जीवन अति नि:स्‍वार्थी, विशाल बनते.  ज्‍यांच्‍याशी त्‍याचा संबंध येतो त्‍यांच्‍या जीवनात देखील त्‍या समाधानाचे कमी अधिक प्रतिबिंब उमटते.  स्‍वत: समाधानी होऊन जगाला जास्‍तीत जास्‍त समाधान देणारे जीवन खरे दिव्‍य जीवन होय -  ज्‍या पुरुषाला दिव्‍य जीवन लाभते त्‍याने स्‍वत: आपण होऊन सामान्‍य जनसमुदायात उतरावे – बहुजन समाजाला दिव्‍य जीवन भोगण्‍यास हळुहळू शिकवून पात्र करावे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.  प्रपंचाच्‍या मर्यादा न सोडता परमार्थाची साधना करावी असे दासबोधात प्रतिपादिले आहे.

स्‍वत: अतिमानव असून त्‍यांच्‍या ठिकाणी प्रकर्षाने वावरणारी सामान्‍य माणसाच्‍या उत्‍कर्षाची तळमळ पाहिली की मन प्रेमादराने भरून येते आणि नकळत त्‍यांना वंदन घडते.

‘श्रीराम’ मजला बोलवी!

आज स्‍फुरते भैरवी
श्रीराम मजला बोलवी! ध्रु.
का दु:ख हो? का शोक हो?
का मोह हो?  अज्ञान हो
परमार्थ का कधि कष्‍टवी! १
ना येत ना, ना जात ना
भुलविताती कल्‍पना
समजा कृपा ही शांभवी! २
तनु येतसे, तनु जातसे
चैतन्‍य ना कधि जातसे
अक्षय्य संकटि वैभवी! ३
मज निमंत्रण पोचले
वळत तिकडे पाउले
सूक्ष्‍म पथ मज खूणवी! ४
अन्‍न नाही उदक नाही
बंध ना निर्बंध काही
योग श्रीहरि साधवी! ५

--oo00oo--

अरे रडायला काय झालं?  इतके दिवस परमार्थ ऐकलात त्‍याचं हेच का फळ? 

शरीर जात असलं तरी मी जगदाकार झालो आहे ना!  उगीच रडारड करू नका.  समर्थ पुढे म्‍हणतात माझा ग्रंथ नीट वाचा.  त्‍याचं चिंतन अन मनन करा.  त्‍यानं तुम्‍हा संगळ्यांचं कल्‍याण होईल.  

माझी काया गेली खरें। परि मी आहे जगदाकारें। 
ऐका स्‍वहित उत्‍तरें। सांगेन ती ।। 
नका करू खटपट। पहा माझा ग्रंथ नीट। 
तेणे सायुज्‍याची वाट। ठायी पडे।। 

आरति दासबोधाची
आरति गाऊ दासबोधा
लागु या देवाच्‍या शोधा! ध्रु.

ग्रंथ हा भावभरे वाचू
आणखी आनंदे नाचू
मेळवू सात्विकशा मोदा! १

शिष्‍य जो नामें कल्‍याण
तयाचे झाले कल्‍याण
आपणू रामाच्‍या पंथा! २

दोष ते सगळे झटकावे
सद्गुणा बुद्ध्या जोडावे
मग कुणी निंदा वा वंदा! ३

समर्था ग्रंथातच पाहू
तयासी आत्‍मत्‍वें ध्‍याऊ
ऐकु या प्रेमळ संवादा! ४

मूर्ख तो चातुर्ये नटला
बद्ध तो सिद्ध झणीं झाला
अनुभव नव्‍हेच हा साधा! ५

पाठिशी असता श्रीस्‍वामी
साधका कुठले काय कमी?
मेळवू त्‍या दिव्‍यानंदा! ६

प्राकृतीं हा तर ऋग्‍वेद
संपवी निमिषार्धी खेद
राम हा वंदी स्‍वामिपदा! ७
--oo00oo--



दासबोध हा मुख्‍यत: भक्तिज्ञान वैराग्‍याचा ग्रंथ आहे.  
भक्‍तीचेनि योगें देव। निश्‍चयें पावती मानव।।  हा या ग्रंथाचा अभिप्राय आहे. 

मुख्‍यभक्‍तीचा निश्‍चय, आत्‍मस्थितीचा निश्‍चय, शुद्ध ज्ञानाचा निश्‍चय, शुद्ध उपदेशाचा निश्‍चय, सायुज्‍यमुक्‍तीचा निश्‍चय, मोक्षप्राप्‍तीचा निश्‍चय, शुद्ध स्‍वरूपाचा निश्‍चय, अलिप्‍तपणाचा निश्‍चय, मुख्‍य भक्‍ताचा निश्‍चय, जीवाशिवांचा निश्‍चय, मुख्‍य ब्रह्माचा निश्‍चय, नाना मतांचा निश्‍चय, 

आपण कोण हा निश्‍चय येथे बोलिला असे 

म्‍हणजे हा निश्‍चयात्‍मक ज्ञानभक्‍तीचा ग्रंथ आहे. श्रीसमर्थ प्रतिज्ञापूर्वक सांगतात की, ह्या गंथाच्‍या वाचनाने अज्ञान दु:ख व भ्रांति जाऊन वैराग्‍य तत्‍काळ अंगी बाणेल व विवेक प्राप्‍त होईल.  

चातुर्य कळे यथायोग्‍य। विवेकसहित। 

बद्ध मुमुक्षु होतील.  मूर्ख दक्ष होतील.  भक्तिमार्गे मोक्ष पावतील, अंगचे नाना दोष जाऊन पतित पावन होतील. देहबुद्धीचे धोके जाऊन व संदेहाचे किंतु जाऊन संसाराचे उद्वेग नष्‍ट होतील.  

श्रवणें चुके अधोगति। मनास होय विश्रांति। समाधान।।  

आळशी, बद्ध, मूर्ख, अभक्‍त व पतित ह्यांच्‍यात सुधारणा होऊन ते भक्तिमार्गाला लागून उद्धरावेत अशा परम कारुणिक बुद्धीने समर्थांनी हा ग्रंथ लिहिला आहे. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।। 




  

Saturday, January 28, 2023

विकासार्थ संयम आहे विकासार्थ बंधन आहे!

विकासार्थ संयम आहे
विकासार्थ बंधन आहे!ध्रु.

वृक्ष वाढतो आकाशी
परी बांधला धरतीशी
मुळांविना जीवन त्याचे
असंभाव्य आहे!१ 

नदी बांधली तीरांनी
सागरास मिळते म्हणुनी
गंभीरता गति लाभूनी
पुढे पुढे वाहे!२

व्यक्ति ही समाजासाठी
पोषणार्थ असते सृष्टी
वृक्ष, मेघ निर्झर वारे -
त्यांत देव राहे!३

संयमात वसते शिस्त
संयमात पाही प्रीत
खूण हीच मानव्याची
भाग्यवंत लाहे! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(उपनयन संस्कार गीतावली मधील हे काव्य.  व्रत म्हणजे नियम. व्रतबंध म्हणजे नियमाला बांधून घेणे. अभ्यास करण्याकरता हे नियम पाळायचे. विकास साधण्यासाठी बंधन पत्करायचे. ब्रह्मप्राप्ती व्हावी यासाठी या बंधनांचा अंगीकार करायचा.

Thursday, January 26, 2023

अवधूता दत्ता, दत्ता अवधूता - भावे मी स्मरतो - भूपाळी गातो!

अवधूता दत्ता, दत्ता अवधूता -
भावे मी स्मरतो - भूपाळी गातो!ध्रु.
 
अंतरि मम यावे - दयाळा 
प्रेमे शिकवावे 
गुरुमाऊली, चरणाजवळी, स्थान सान मागतो!१

अजाण बालक मी - सद्गुरो 
चरणी विनम्र मी 
लावी मज हृदयी कृपाळा कृपादान मागतो!२ 

सत्य नि शिव सुंदर, प्रभो हे 
एकत्रित सुंदर 
दर्शन सुख द्यावे त्रिमुर्ते बालहट्ट धरतो!३
 
लाव भस्म भाळी, सद्गुरो 
काम दुष्ट जाळी
भावभक्ति बहरो माउली स्तवन तुझे गातो!४

सोऽहं शिकव मला, कृपाळा 
ध्याना बसव मला 
अचपळ मन माझे आवरी, शरण शरण येतो!५ 

अवघड डोंगर घाट, सद्गुरो
कोण दाखविल वाट? 
बावरतो, थकतो भीक मी ज्ञानाची मागतो!६ 

कमंडलूतिल जल याचितो
भरु दे मम ओंजळ 
तृषार्त श्रीराम जीवना आसुसला होतो!७  

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.८.१९७६

Monday, January 23, 2023

अकस्मात होणार होऊन गेले!


काळानळाची चाहूल नव्हती
हुरहूर कसली नव्हतीच चित्ती
कृतांते सतीचे सौभाग्य लुटले 
अकस्मात होणार होऊन गेले!१

शिकारीस राजे मोदे निघाले
दैवेच त्यांना भुलवून नेले
अश्वामुळे संकट ओढवीले
अकस्मात होणार होऊन गेले!२

कर्नाटकप्रांति हे सर्व झाले
कृतांतापुढे ना कुणाचेच चाले
पित्याने शिवाच्या जगा सोडियेले
अकस्मात होणार होऊन गेले!३

जी ठेच अश्वा, ती ठेच भाग्या
जी ठेच ताता, ती ठेच पुत्रा
अखेरीस मृत्यू - तिथे सर्व हरले
अकस्मात होणार होऊन गेले!४

अता कौतुकाते पिता येथ नाही
विसाव्यास आधार खंबीर नाही
कळे ना मना दैव का व्यर्थ रुसले?
अकस्मात होणार होऊन गेले!५

पुढे काय आहे कुणा कल्पना ना
मनी रंगवी मर्त्य ते बेत नाना
परी कालवाते असे लोळवीले
अकस्मात होणार होऊन गेले!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, January 22, 2023

भगवंताची किमया कैसी चोची आधी चारा

भगवंताची किमया कैसी 
चोची आधी चारा 
कष्ट करित जा लाभे अंती 
अन्न नि वस्त्र निवारा! १

हवे हवे हव्यास नसो 
मी माझे हा स्वार्थ नसो 
घेतलेस तू जन्मापासुन 
दे तर थोडे इतरां! २

चिंतेचा का भार शिरी 
भय का बैसे तुझ्या उरी 
देवावर विश्वास ठेव रे 
तो सगळे करणारा! ३

साधा कपडा नेसावा रे 
बरी झोपडी रहावया रे 
गरजा अपुल्या थोड्या करता 
सुख शांती ये दारा! ४

सन्मार्गाचा पैसा लक्ष्मी
सत्पक्षाला वश हो लक्ष्मी 
मृगजळ भुलवी सावध राही 
वंदन करि दातारा! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०१.१९८९

मोह निसरडी वाट - मोहना सावर रे तू मला!

मोह निसरडी वाट  - 
मोहना सावर रे तू मला!ध्रु.

नेमा बसवी, ध्यानी रमवी 
गीतापाठहि प्रेमे शिकवी 
आई तू या मुला!१ 

अवघड सोपे होउन जाते 
किमया केवळ तुजला जमते 
पवन उमलवी फुला!२ 

तुझ्या कृपेच्या वर्षावाने 
घरात घडती गंगास्नाने 
तुला न गंगाजला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.१२.२००९

उजळणी करु या गीतेची!

उजळणी करु या गीतेची!ध्रु.

आपआपले कार्य करावे 
सदासर्वदा त्यास स्मरावे 
जाणिव राखू काळाची!१

व्यवसायावर प्रेम करावे 
समाजजीवन सुरळित व्हावे 
उकल मग सर्व समस्यांची!२

स्वराज्य ध्यासच श्री टिळकांचा 
मार्ग एकला संघर्षाचा 
सिद्धता कष्ट सोसण्याची!३

व्यायामाने, अभ्यासाने 
सुसंपन्न माणूस घडवणे 
शिकवण मार्ग शोधण्याची!४ 

दोष शक्यतो टाळायाचे 
चुकता चुकता शिकावयाचे 
प्रेरणा जीवन जगण्याची!५ 

गीता ऐके, सांगे, गातो 
श्रीहरिचा आवडता होतो 
गीता आकृति कृष्णाची!६ 

कृष्ण कृष्ण म्हण येता जाता 
कळेल गीता गाता गाता 
श्रद्धा कवि श्रीरामाची!७ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१२.२००९

कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ध्यान साधु दे एकांती कृष्ण स्वये मजशि बोलु दे!

कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत ध्यान साधु दे 
एकांती कृष्ण स्वये मजशि बोलु दे!ध्रु.

मोह मना देहाचा, धसका या मरणाचा
नच विचार आत्म्याचा, तत्त्वाचा, सत्याचा 
स्फूर्ति मला झुंजाया कृष्ण देउ दे!१

ऐकावे, वाचावे, विवरावे, मुरवावे
मुरलेले ये कृतीत ऐसे नित वाटावे
कळले जे वळले ते शांति लाभु दे!२

भाव हवा, ध्यास हवा, चिंतनि आनंद हवा 
राम हवा, श्याम हवा योगेश्वर कृष्ण हवा 
मी जगेन गीता हे वेड लागु दे!३ 

जो विनम्र तो सुजाण, जो सुजाण भक्त जाण 
भक्ताला जीवनात पडते का काही वाण 
न्यून करित हरिच पूर्ण खोल बाणु दे!४
 
नयन मिटुन आत पहा आत पहा स्वस्थ रहा 
स्वस्थ रहा येत गृहा शांतिदूत श्यामच हा 
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत कृष्ण बनू दे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०५.१९९८

जय देवी जय देवी जय भगवद्गीते

जय देवी जय देवी जय भगवद्गीते
श्रवण नि वाचन गायन संजीवन वाटे!ध्रु.

होउनिया अर्जुन जो करि तव अभ्यास
अंत:करणी त्याच्या भरतो उल्हास
कर्तव्यच प्राणाहुन होते आवडते!१

आसक्ती देहाची सगळी घालविली
आदि नच अंत मला जाणिव बाणवली 
विश्वात्मक सर्वात्मक सश्रद्धा करते!२

कर्माचे अति सुंदर साधन तू देशी
न लगे फल माते मन उन्मनही करशी
मातांची माता तू सगळ्यांना पटते!३

चारी वर्ण नि आश्रम करण्या कर्तव्य
मोह न मोहनदासा अनुभव दे दिव्य
ज्ञानाची गंगा गे आतुन झुळझुळते!४

शांतिस्तव न्यायास्तव लागे झुंजाया
पौरुष ते आवर्जुन लागे फुलवाया
अचला अमला मति दे श्रीरामाते!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०३.१९९८

Thursday, January 19, 2023

सोऽहं हे साधन हरीचे भजन

सोऽहं हे साधन हरीचे भजन 
नुरो देते क्षणभर भिन्नपण! ध्रु. 

अभ्‍यास! अभ्‍यास!!  
हाच निदिध्‍यास 
तेणे हाती लागे जनार्दन! १ 

गुरुमाऊलीने
स्‍पर्शे केले सोने
सोऽहं रूपी दिधले संजीवन! २  

भक्तिभाव वाढे 
हरि ठाके पुढे 
अभ्‍यासे पटते ज्‍याची त्‍यास खूण! ३ 

सोऽहं चा हिंदोला 
प्रेमे झोका दिला 
स्‍वरूपी ये निद्रा हेच समाधान! ४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०४.१९७४

मज अपुला म्‍हटले स्‍वामी धन्‍य मला केले!

मज अपुला म्‍हटले 
स्‍वामी धन्‍य मला केले! ध्रु. 

सोऽहं सोऽहं जपता जपता 
अद्वैतासी तनी मुरविता 
झोके मजला दिले! १ 

जवळ बसवुनी, गाउनि गीता 
परमार्थाचा पाठ शिकविता 
मार्गी मज लाविले! २ 

अभंग हृदयासी संजीवन 
अमृतधारा अविरत बरसुन 
सुखस्‍नान घातले! ३ 

रामकृष्‍णहरि जपत वैखरी 
सोऽहं चा प्रतिसाद अंतरी 
स्‍थैर्य, धैर्य शिकविले! ४  

माय माऊली स्‍वरूपनाथा 
‘राम’ लाडका लववी माथा 
हृदयाशी धरिले! ५ 

र‍चयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
२४.०३.१९७४

Tuesday, January 17, 2023

तुझे सुख तुझ्यापाशी!

नको जगी हिंडायासी
तुझे सुख तुझ्यापाशी!ध्रु.

आळवी श्रीराम
आठवी श्रीराम
नाम घेता उठाउठी
सुख लोळे चरणांसी!१

टाळ कुविचार
करी सुविचार
सर्वभावे जावे लागे
शरण रामचंद्रासी!२

रामासी धरावे
आनंदी असावे
लोभ सोडता साठती
अंतरी सुखाच्या राशी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २३४, २१ ऑगस्ट वर आधारित काव्य)

Sunday, January 15, 2023

वामनरावजी गुळवणी महाराज, सादर आपणा आरती

वामनरावजी गुळवणी महाराज,
सादर आपणा आरती ! ध्रु.

प्रसन्नवदना गुणगंभीरा 
आठवणीही देती धीरा 
पुढे पुढे चल गुरुमार्गावर 
हात फिरे पाठीवरती! १ 

दिली लेखणी, वाणी श्रवणी 
शब्दांची झुळझुळते तटिनी 
कृष्णातीरी वाडी क्षेत्री 
जागजागवी गुरुस्मृती!२ 

स्पर्शाने, दृष्टीने स्मरणे 
शिष्याला आपलेसे करणे 
छायाचित्रातुनी हासते 
कृपा वर्षिते मजवरती !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०८.२००७

Saturday, January 14, 2023

देही देव आणण्‍याते देव भजावा ! भजावा

देही देव आणण्‍याते देव भजावा ! भजावा! ध्रु. 

मीपण येते आड 

देव नांदतो पल्‍याड 

बंधनात दु:खे मोठी देहभाव विसरावा! १  


नाम साधन हे सोपे 

उच्‍चारिता दु:ख लोपे 

नाम गाता गाता लाभे देह मनाला विसावा! २  


मना उलटे करावे 

नाम नित्‍य वाचे घ्‍यावे 

नाम जेथे तेथे देव, देव भुले भक्तिभावा! ३ 


नामाविण नाही सत्‍य 

स्‍मरा स्‍मरा त्‍याते नित्‍य 

नाम मधुर औषधी हृदि धरा दृढभावा! ४ 


नाम घेता चित्‍तशांती 

नामी निर्मळ विश्रांती 

धार धरून नामाची तोषवावे सदाशिवा! ५ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

गोंदवलेकर महाराजांच्‍या चरित्रावर आधारित काव्‍य 


Wednesday, January 11, 2023

श्रद्धा वाढावी, राघवी श्रद्धा वाढावी

श्रद्धा वाढावी, राघवी श्रद्धा वाढावी
श्रीरामाने आस एकली माझी पुरवावी!ध्रु.

कर करिता काम
मुखाने गावे प्रभुनाम
सुधामधुरता माझ्या वचनी सहजपणे यावी!१

मन रंगो नामी
आवडी उपजो सद्धर्मी
सुखदुःखांतरि मनास स्थिरता रघुनाथा द्यावी!२

लाभो सत्संग
खुलू दे भक्तीचा रंग
हलके हलके वृत्ती माझी पूर्ण पालटावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २९३, १९ ऑक्टोबर वर आधारित काव्य)

Saturday, January 7, 2023

राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि मन वेडे गाते

राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि मन वेडे गाते 
श्रीकृष्णाच्या गीतेमधुनी हरिजीवन कळते !ध्रु.

मना माझिया तुजला लागो नामाचा छंद 
नको धावण्या इकडे तिकडे आतच गोविंद 
अंधारातुन प्रकाश उमले अनुभूती मिळते !१

मुक्त कराया बद्ध जनांना जन्म तुरुंगात 
भगवंताला जन्म देउनी धन्य मायतात
अघटित घडवुन अलिप्त आपण थक्कित मन होते !२

कृष्ण कृष्ण म्हण जाता येता कळण्याला गीता 
कर्मफलाची सुटेल आशा मग कुठला गुंता? 
नव्हे देह मी, मन वा बुद्धि नकळत हे कळते !३

जन्म जाहला लगेच तुटले बंधन मायेचे
वसुदेवाने दूर सारले निधान सौख्याचे  
गोकुळात मग माय यशोदा हरिला पाजवते!४

मोह न शिवला कधी मुकुंदा, मनमोहन ऐसा 
हा योगेश्वर पूर्ण विरागी पुरुषोत्तम ऐसा 
शब्दांमागुन सुचवत शब्दा कोण लिहुन घेते?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०५.१९९१

Friday, January 6, 2023

मातु:श्रींची तुळा जाहली


आनंदाश्रू झरती गाली, मातु:श्रींची तुळा जाहली! ध्रु. 

शिवमंदिर हे सजले धजले 
नवल बघाया लोकहि जमले 
मंगलपूजन येथ चालले 
तुलादानविधि मंत्रहि घुमले अशा पर्वकाली! १  

महाराष्‍ट्राच्‍या कैलासावर 
मातृभक्‍त शिव सेवातत्‍पर 
सृष्‍टीमधुनी हसला ईश्‍वर
धन्‍य पुत्र हा धन्‍य माउली सारी जनता स्तिमित जाहली! २  

पुत्राच्‍या या अंत:करणी 
मातृरत्‍न शोभले कोंदणी 
पुन्‍हा पुन्‍हा ये मन गहिवरुनी 
शब्‍द आईचा पृथ्विमोल हा अमाप माया आईवरली! ३  

मांगल्‍याचे निधान येथे 
औदार्याचा निवास येथे 
पावित्र्याचा परिमल येथे 
मातृपूजना शिवरायाची भावफुले ही उमलुन आली! ४ 

मातेच्‍या हृदि सुपुत्र कौतुक 
मातृपूजना शिवबा उत्‍सुक 
तात पाहती वरुनी कौतुक 
सोन्‍याचे पारडे टेकले – मातु:श्रींची तुळा जाहली! ५ 

त्‍याग कराया जो नर धजला 
संयम शिकला, अनन्‍य झाला 
खडतर निश्चय साथी गमला 
ग्रहणकाल हा जणू पर्वणी पारख करण्‍या असे पातली! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Thursday, January 5, 2023

सोऽहं सोऽहं चिंतन चाले हृदयस्‍थाचे दर्शन घडले!

सोऽहं सोऽहं चिंतन चाले  
हृदयस्‍थाचे दर्शन घडले! ध्रु. 

डोळे मिटती 
वदनी दीप्‍ती 
ध्‍यानी सगळे भान हरपले! १ 

भक्ती उमले - 
अश्रू झरले 
तन अवघे रोमांचित झाले! २ 

ही गुरुपूजा 
भाव न दूजा 
मग सोऽहंमय गमले सगळे! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०३.०५.१९७४ 
मधुवंती

सोऽहं चिंतन करी

सोऽहं चिंतन करी 
सदा तू सोऽहं चिंतन करी ! ध्रु. 

तू नच दुर्बल बलाढ्य असशी 
अंतस्‍था तू नच ओळखसी 
ऊठ, उभारी धरी! १

रुग्‍ण न तू मुळचाच निरोगी 
तू नच लंपट असशी विरागी 
निर्लेपत्‍वा वरी! २

विघ्‍नदला दे त्‍वरे झुगारुन 
निर्धारे करि सोऽहं चिंतन
आत्मोन्नति अशि करी! ३

“तत् त्‍वम् असि” हा बोध जीवनी 
कोण मी? पहा स्‍वये शोधुनी 
साह्य करिल श्रीहरी! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 
०९.०५.१९७४