Wednesday, March 22, 2023

स्वामी समर्थ यावे हो मजला भेटी द्यावी हो

स्वामी समर्थ यावे हो मजला भेटी द्यावी हो 
दर्शन सुख द्या स्वामी हो लळे आगळे पुरवा हो १

फुटले वारुळ दिसला हो निळ्या प्रकाशी हसला हो 
हसला अंतरि आला हो श्वासोच्छ्वासी   भरला हो २

दत्तदिगंबर स्वामी हो अवधूत श्रीस्वामी हो 
अलख निरंजन स्वामी हो भवभयभंजन स्वामी हो ३

तुमचे डोळे खिळलेले प्रकाश वर्षत असलेले 
विशुद्ध मन्मन झाले हो भक्तीने परिमळले हो ४

विनवू कैसा मी स्वामी वर्णू कैसे मी स्वामी 
कर जुळले माझे स्वामी पदी स्थान द्या मज स्वामी ५

स्वामी तुमचे गुण गावे मने मनाशी बोलावे 
प्रबोधनाला बळ यावे कीर्तनरंगी रमवावे ६

अनन्यभावे जो भजतो त्याची चिंता मी करतो 
योगक्षेमहि मी बघतो अनंत कानी हे वदतो ७

आश्वासन लाभे मजला रोमरोम मग फुललेला 
झरा भक्तिचा झुळझुळला फुलला बगिचा पानमळा ८

आजानुबाहु स्वामी हो लंबोदर श्री स्वामी हो 
प्रणतवत्सले स्वामी हो सेवा करवुन घ्यावी हो ९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, March 20, 2023

पार्थ भगीरथ ठरला भाग्ये गंगाधर भारत साचा

उगम पावली गीतागंगा मुखातुनी भगवंताच्या
पार्थ भगीरथ ठरला भाग्ये गंगाधर भारत साचा!ध्रु.

थोडी थोडी गावी गीता, कृष्ण, कृष्ण म्हणता म्हणता
जीवनमृत्यू यांची जोडी ये ध्यानी चिंतन घडता
सोऽहं, तो मी - तो मी पाढा म्हणावयाचा नित्याचा!१

भाग्य उदेले गीता स्फुरली रणांगणावर साक्षात
श्रीहरि सांगे निवास अपुला श्रीभक्ताच्या हृदयात
उदात्त उन्नत व्हावे मानस ध्यास एवढा पार्थाचा!२

ओघे आले कर्म करावे तो तर स्वाभाविक धर्म 
यज्ञयोग्यता त्या कर्माला कर्म असे जे निष्काम
फली नसे परि कर्मावरती अधिकारच प्रत्येकाचा!३

गीता सोपी असे कळे ती गाताना ही अनुभूती
सांत्वन करते, मार्गि आणते, मायमाउली प्रेमळ ती
गीता दे संदेश जगाला आत्म्याच्या अमरत्वाचा!४

भयभीताला निर्भय करते, पेजबुड्याला रणवीर
रुधिरी न्हाला तरी न ढळला तो जाणावा खंबीर
सुखदुःखी सम होता येते ग्रंथ साच अनुभूतीचा!५

गीतेचा सहवास घडे ज्या त्याच्या भाग्या नसे तुला
स्वभावास औषध श्रीगीता, अर्जुन कर्तव्या सजला
धर्म तिथे जय संजय सांगे चेला जो श्रीव्यासांचा!६

युगमागुनी युगे लोटली अवीट गोडी गीतेची 
सांगड येते घालायाला धर्माशी व्यवहाराची
मी माझे मावळता सहजच सर्वोदय जगि होण्याचा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०९.२००४

Sunday, March 19, 2023

राम म्हणा, कृष्ण म्हणा, म्हणा श्रीहरि

राम म्हणा, कृष्ण म्हणा, म्हणा श्रीहरि
नाम स्मरा, काम करा, ज्ञान ये घरी!ध्रु.

जे घेते वदन नाम, ते न दे शिवी 
जे ओवी गात मधुर त्या न कलि शिवी
उद्यमेच, साहसेच, कुशलता करी!१ 

कर्मि कुशल, जिज्ञासू, दक्ष सदा तो
प्रामाणिक, विनयशील भक्त खरा तो
पार्थसारथी सूत्रे खचित पत्करी!२

समाधान जर चित्ती भाग्य कोणते?
तन्मयता साधनेत स्तुत्य कोणते?
औचित्यच वर्तनात नवल भूवरी!३

गीताई श्रीहरिची बासरी गमे 
अभ्यासी सहजपणे मन सुखे रमे 
जो कृतज्ञ पुण्यवंत योग त्या वरी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०३.२००५

Friday, March 17, 2023

एकतेचे गीत गाजे

 

हिंदु न्हाले नविन तेजे, एकतेचे गीत गाजे!ध्रु.

या समाजी जागृती
सकल घडवू संप्रती
गीत गाता मुक्त कंठे हिंदु बंधु कुणि न लाजे!१

विसरु सगळे जातपाती
निर्मु आता नविन नाती
अस्मिता होण्यास जागी वीरनेता पुढति साजे!२

देवमोचक राम जय
दैत्यनाशक कृष्ण जय
हिंदु सगळे बंधु बंधू भाव हा हृदयी विराजे!३

हाति फडके ती ध्वजा
भेदभावा दे रजा
अंतरंगी बांधवांच्या एकतेचा घोष गाजे!४

अशि दृढावे एकता
अशि स्थिरावे बंधुता
संस्कृतीचा साज फेरी मिरविताना अधिक साजे!५

मंदिरे केंद्रेच झाली
स्वाभिमाना जाग आली
आत्मश्रद्धा वाढते ती धन्यता चित्ती विराजे!६

दास्य मनिचे संपले
विश्व मनिचे उमलले
किल्मिषाचे अभ्र विरता बालभास्कर गगनि साजे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित काव्यामधील हे एक काव्य)

Sunday, March 12, 2023

मंत्र मिळे तुकयाला झाला जगी बोलबाला

राम कृष्ण हरि हरि! 
राम कृष्ण हरि हरि!ध्रु.

मंत्र मिळे तुकयाला 
झाला जगी बोलबाला 
घुमे श्वासाची बासरी!१ 

आवलीच माय झाली 
मोहगाठ सैल केली 
शिव्या श्रावणाच्या सरी!२ 

चढू दुःखाचा डोंगर 
भेटे रुक्मिणीचा वर 
स्वर्गसुखाला ना सरी!३
 
ब्रम्हानंदी लागे टाळी 
कोण देहाला सांभाळी 
देव संत बरोबरी!४ 

विठू देहात दे हात 
तुका दाविताहे वाट 
चालू लागा झडकरी!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२६.१२.२००५

चिंतन कृष्णजीवनाचे


वसुदेवाचे जीवन होते कर्तव्यासाठी
त्याची पत्नी तत्पर होती उपासनेसाठी 

कंसाचा तर जुलुम वाढला वाडा हो कारा 
पती-पत्नींचा जीवनात मग सुरू कोंडमारा 

घन अंधारी कृष्ण जन्मला किरण प्रकाशाचा
त्या रूपे हुंकार स्फुरला प्रिय स्वातंत्र्याचा 

कृष्ण नव्हे स्वातंत्र्यच होते तो तर परमात्मा 
त्या जपण्या वसुदेव निघाला नंदाच्या धामा 

नंद म्हणा आनंद म्हणा ते निधान सौख्याचे 
माय यशोदा आगर होते ते वात्सल्याचे
 
पापामागुन पाप वाढली हत्यांची रास
कंसाने जणु निमंत्रण दिले अपुल्या मरणास 

गोपाळांनी गोपींनीही कृष्णा प्रेम दिले
दही चोरले दूध चोरले चित्त जिंकलेले

श्रीकृष्णाचे केवळ असणे सत्याचा नारा 
सहकार्याचा गोवर्धन दे जनतेला थारा

देहामध्ये कृष्ण सानुला आत्मा तो आहे 
विकारदैत्या संहारावे - ज्ञान प्रकट आहे

कृष्णजन्म जीवनात ऐसा नित्याचा होई
जो सावध तो विघ्नसागरा सहज तरुन जाई 

निर्भय व्हावे, हसत राहावे सोसावे मोदे 
श्रीकृष्णाचे जीवन ऐसे आतुन उमलू दे 

निराशेतुनी उमले आशा कृष्णजन्म तेथे 
संकटातही हिंमत मोठी कृष्णजन्म तेथे 

अफझलखाना जिथे दंडिले कृष्णजन्म तेथे 
समुद्र लंघुनि जाइ विनायक कृष्णजन्म तेथे 

शिवास दिधले राज्य परत ते कृष्णजन्म तेथे
ग्रामसफाई सुंदर चाले कृष्णजन्म तेथे 

कृष्णजन्म जीवनात मम ही, अशक्य ते नाही 
कृष्ण कृष्ण जय घोष देतसे सत्याची ग्वाही

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, March 10, 2023

स्वराज्य व्हावे या भूमीवर

स्वराज्य व्हावे या भूमीवर मायलेक वांछिती
जय भवानी जय भवानी मंत्र हाच जपती!ध्रु.

लेखन वाचन शिकला शिवबा रामकथा ऐकली
चौकस जागृत बाल शिवाने दु:स्थिती न्याहाळिली
पराक्रमाते उत्सुक बाहू स्फुरण पावताती!१

पंतांसंगे बसुनी शिवबा न्यायदान पाहतो
मौक्तिक चारा राजहंस हा वेचुनिया घेतो
श्रद्धेने घे चिमणा शिवबा संतांच्या भेटी!२

भग्न मंदिरे, जळकी सदने पदोपदी दिसता
त्वेषे येतो फुलून शिवबा ओठा आवळता
या दैन्याते पूर्ण निपटणे ठरवी शुद्धमती!३

सत्संगाने, नामजपाने पावनता येते
बलोपासना पुण्याचरणा शक्ती निरवीते
संस्कारांनी अशा शुभंकर घडते शिवमूर्ती!४

जास्वंदीच्या फुलासारखे चित्त फुलू लागले
मातु:श्रींना बालवयांतरि पक्षिराज दिसले
शिवहृदयांतरि पूर्ण बिंबली मातृपितृभक्ती!५

अपमानाची हवि भरपाई वन्हि चेतवावा
युद्धाभ्यासावाचुनि कैसा बेत सफल व्हावा
चाणक्याची राजनीति मग दोघे अभ्यासिती!६

जगज्जननि अंतरी हासते उठतो पडसाद
जय शिवशंकर जय प्रलयंकर हृदि घुमतो नाद
स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा पुनः पुन्हा वदती! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, March 9, 2023

आता दिसो नये जना! ऐसे करा नारायणा!



आता दिसो नये जना! ऐसे करा नारायणा!ध्रु.

केले भजन कीर्तन 
अता जाहलो उन्मन 
वैकुंठास न्यावे देवा, करा पांडुरंगा करुणा!१

ऐहिकाची नुरली आशा
स्वये तोडतसे पाशा
परमोच्च आनंदाचा द्यावा ठेवा नारायणा!२

नको इंद्रियांचा संग
नको नको विषयी भोग
शेवटचा दीस गोड करा माझा नारायणा!३

परब्रह्म गाठायाचे
देहमुक्त मज व्हायाचे
मुखी नामघोष केला याचसाठि दयाघना!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(जयजयवंती, दादरा, लहरी अहाट)

मन माझे ओढ घेते माहेरास जाया


मन माझे ओढ घेते माहेरास जाया
तुम्ही संतजन तुमच्या पडतसे पाया!ध्रु.

अता न मी माझा तुमचा झालो विठ्ठलाचा
सांगावा हा ध्यानी घ्यावा भोळ्या तुकोबाचा!
नाम हाच सोपा मार्ग देव आपणाया!१

भक्ति तेचि ज्ञान तेचि विठ्ठल ही एक
ऐसी माझी झाली स्थिती विष्णुमय देख
पांडुरंगि श्रद्धा ठेवा चित्त शुद्ध व्हाया!२

ओढाळ वासरू मन त्यास लावा दावे-
ईश्वरी प्रेमाने त्यास कारणी लावावे
मुखी नाम हाती मोक्ष, असो द्यावी दया!३

वैकुंठास जातो तुका रामराम घ्यावा
वैकुंठिचा राणा भुलतो जगी भक्तिभावा
रामकृष्ण मुखी बोला संसार तराया!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(भैरवी, दादरा)

Sunday, March 5, 2023

जीवनात जर गीता आली ऐकू आली हरीची मुरली!

जीवनात जर गीता आली 
ऐकू आली हरीची मुरली!ध्रु.
 
काय करावे प्रश्न संपला 
आसक्तीचा गुंता सुटला 
श्रीकृष्णाची संगत जडली!१ 

वेचक घ्यावी गीतावचने 
आनंद लाभे स्वावलंबने 
ध्यानधारणा जमू लागली!२
 
मन पवनाला जोडुन द्यावे 
कर्तेपण लोपते स्वभावे 
घनश्यामही हसतो गाली!३

अर्जुन आपण माधव आपण
समरसतेने जिवंत जीवन 
नरनारायण जोडी जमली!४ 

रोग पळाला योग साधला 
निरर्थकाला अर्थ लाभला 
दीपावलि ही सुंदर झाली!५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०५.२००४

ज्ञानियांचा राजा आळवीत गीता आळवीत गीता धन्य करी आता!

ज्ञानियांचा राजा आळवीत गीता
आळवीत गीता धन्य करी आता!ध्रु.

गोपालाचा वेणु दुजे काय म्हणू?
दुजे काय म्हणू फुले अणुरेणू
राम कृष्ण हरि मंत्र होय गीता!१

ओवी ओवीतुन निनाद प्रसाद
निनाद प्रसाद आमोद आल्हाद
नेवासे मनात वाचकच श्रोता?२

शब्देविण काज सुमनाचा साज
सुमनाचा साज स्वर्गसुखा लाज
कीर्तनास रंग हरिगीत गाता!३

सद्गुरु निवृत्ती अनावर स्फूर्ती
अनावर स्फूर्ती कृपा वर्षताती
आषाढ श्रावण धारानृत्य होता!४

सूरताल यांचा साधलासे मेळ
साधलासे मेळ रंगलासे खेळ
अनाहत नाद श्रुतिपथि येता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.१२.१९८०

प्रभातकाली मजला स्वामी आपण जागविले

प्रभातकाली मजला स्वामी आपण जागविले 
ऊठ राजसा प्रेमळ शब्दे आत मना वळविले!ध्रु. 

आळंदीहुन पावस येथे, तिथून पुण्यपुरी 
आनंदयात्रा नित्य घडतसे केले वारकरी 
सोऽहं बोधावरी आणले, प्रेमे कुरवाळिले!१

ध्यान कोठले अवघड बाळा आत्म्याचे भान 
नाम स्मर श्रीराम तेच रे मधुर मधुर गान 
अवती, भवती अंतरि माधव स्वरूप दाखविले!२ 

उपासनेने सार्थक होते या नरदेहाचे
नरनारी तर अवघे यात्री सोऽहं पंढरिचे
दासबोध भावार्थदीपिका जीवनि उतरविले!३ 

सरळ मन तरी त्यात विराजे हसरा गोविंद 
भाविक त्याच्या मुद्रेवरती नाचत आनंद 
विश्वच अवघे घर हे अपुले मीपण मावळले!४ 

व्यक्ती व्यक्ती मिळुन समष्टी थेंबांचा सागर 
विभक्त ना कुणी परमार्थी या सत्य हेच प्रखर 
नवनीताहुन मृदुल मृदुलतर मानस मम केले!५

सगळे  मिळुनी  ध्याना बसणे अपूर्व नवलाव 
मन पवनासह गगना भिडता आनंद वर्षाव 
गुढीपाडवा, दिपवाळी सण प्रतिदिनि अनुभविले!६

चुकता चुकता शिकता येते उमेद वाढविता 
चरणशरण श्रीराम आपणा मुनि माधवनाथा 
असुनि नसावे नसुनि असावे प्रात्यक्षिक केले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०८.१९९६
(स्वामी माधवनाथांवर रचलेली भूपाळी)