Thursday, November 30, 2023

ध्यानास काय भ्यावे? मनने सुशांत व्हावे!

ध्यानाचे भय वाटते. का? आपले असंख्य दोष दिसतात. वासना/कामना स्वैर उधळतात. हीच हीच ती माया. ध्यान सोडायचे नाही त्याला भ्यायचे नाही. उपासनेला दृढ चालवावे. मनाचे अमन होण्यासाठी..

**********

ध्यानास काय भ्यावे?
मनने सुशांत व्हावे! ध्रु.

ठायी रहा निवांत
जाईच आत आत
नामी मने वसावे!१

त्या संपता उपाधी
लागे पहा समाधी
सोऽहं सुधेस प्यावे!२

जरि पातके उदंड
उठली करूनि बंड
गुरूच्या पदां स्मरावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०७.१९७७

Tuesday, November 28, 2023

देहाचा जो भोग, भोगून सरावा भोगतां भोगतां राम आठवावा!

देहाचा जो भोग, भोगून सरावा
भोगतां भोगतां राम आठवावा!ध्रु.

संकटे दुखणी
मानु बंधुभगिनी
कर जोडुनीया नमू वासुदेवा!१

ठेविसी जैसे
सुखे राहु तैसे
जनकाजा देह - चंदन झिजावा!२

रामाचे होऊन
प्रपंच करून
भक्तिभावे राम आम्ही आळवावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २२६, १३ ऑगस्ट वर आधारित काव्य 

परमात्म्याने पाठविलेली दुखणी, संकटे यात आनंद मानला पाहिजे.
परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे, यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की, भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही, तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?

Monday, November 27, 2023

आनंद गगनि मावेना..

आनंद गगनि मावेना, आनंद गगनि मावेना!ध्रु.

ध्यानयोग भगवंत सांगतो
सकल जगाला प्रभु तोषवितो
गंगा आली परमार्थाची स्वये चालुनी सदना!१

सरिता वाहे आत्मानंदे
तिचिया तीरी गोकुळ नांदे
कल्पना न तिज ती उजळविते जीवांच्या जीवना!२

उपकारच जणु हे पार्थाचे
निमित्त घडले अज्ञानाचे
ज्ञान सुमंगल म्हणुनि येतसे सहजच अपुल्या श्रवणा!३

विकल अवस्था सरली सरली
तृषा मनाची शमली शमली
अमृतमधुरा वाणी परिसुनि मानस करिते नर्तना!४

गीतेचे ये सारच हाता
पैलतीर तो दृष्टिस पडता
पुष्प अनंताचे हे अवचित वितरत मंगलदर्शना!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०१.१९७३

Sunday, November 26, 2023

प्रार्थना

प्रार्थना

माझा विकास होऊ दे 
अंतर सगळे उजळू दे!ध्रु. 

विश्व हेच घर 
करु दे ईश्वर 
परिमल पसरू दे!१ 

देव दयाघन 
पावन करि मन 
श्रद्धा सुदृढ होऊ दे!२ 

नको फलाशा 
वा अभिलाषा 
विशाल मज बनू दे!१ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.११.१९७७

घातक परमार्था क्रोध हा!

घातक परमार्था क्रोध हा!ध्रु.

विफल कामना 
भारिते मना -
कडेलोट जणु करी क्रोध हा!१
 
अशांति येते 
दु:खी करिते 
जीवन मसण करी क्रोध हा!२ 

सोऽहं भावे 
हरिस पहावे 
सिद्ध जनां ना छळी क्रोध हा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२७.१०.१९७४

ऐसा जो कामक्रोधलोभा 
झाडी करूनि ठाके उभा 
तोचि येवढिया लाभा 
गोसावी होय 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १६१ वर आधारित काव्य

Saturday, November 25, 2023

श्रीकृष्णाचे सद्गुण गावे, सद्गुण गावे सद्गुण घ्यावे..


श्रीकृष्णाचे सद्गुण गावे 
सद्गुण गावे सद्गुण घ्यावे!ध्रु.

खेळगडी हा गोपाळांचा 
कार्यक्रम रंगे काल्याचा 
सगळ्यांशी मी समरस व्हावे!१

अधरी लावी हरी बासरी 
हळवी फुंकर कैसी मारी 
सूरसागरी मी विहरावे!२ 

खांद्यावर घोंगडी घेतली 
गाईमागे हा वनमाळी 
ते साधेपण स्वभाव व्हावे!३ 

दैत्यांना हा ठरला भारी 
प्रतापसूर्यच जसा अंबरी 
शत हत्तींचे बळ मिळवावे!४ 

' मी करतो ' हे नसे बोलणे 
' आपण करु या ' असे सांगणे 
मी माझेपण विलया जावे!५ 

मोहन मोही रुतला नाही 
स्वरूपात तो रमून राही 
स्वरूपात राहणे जमावे!६ 

श्रीगीता कृष्णाचे जीवन 
जैसे जीवन तैसी शिकवण 
श्रीकृष्णार्पण सगळे व्हावे!७ 

गाता गाता गीता कळते 
सुखदु:खी सम होता येते 
श्यामसुंदरा आत पहावे!८ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.०६.१९८७

माधवनाथ ऐसे घडले!

माधवनाथ ऐसे घडले!ध्रु.

सहज बोलणे, सहज चालणे 
सहज पाहणे, सहज वागणे
अंत:करणी अलगद वसले!१ 

जणु ते ओवी ज्ञानेशाची 
रसाळ वाणी श्री तुकयाची 
भजनानंदी कसे डोलले!२ 

पाषाणाची असु दे प्रतिमा 
पूजनात परि अपूर्व प्रेमा 
आनंदाश्रू ओघळलेले!३ 

गान ऐकता समरस होता 
मुद्रेवरती प्रभा फाकता 
पावसचे मज स्वामी दिसले!४

अवघे जीवन असे साधना 
नित राखावे अनुसंधाना 
मधुर वचांनी सावध केले!५ 

मधुर स्मित ते झळको वदनी
ओलावा ही असो भाषणी 
आचरणाने कसे शिकविले!६ 

क्षणहि न वाया जाऊ द्यावा
परोपकारी देह झिजावा 
समर्थ वचने आपण जगले!७
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०९.१९८९

Thursday, November 23, 2023

सकल हृदयि मी राहतसे सोऽहं भावी सदा वसे!

सकल हृदयि मी राहतसे
सोऽहं भावी सदा वसे!ध्रु.

देहाविषयी ना आसक्ती
लाभाविण करिता प्रीती
ती ओळख पटता मीच हसे!१

' मी आत्मा ' प्रत्यय हा येता
निजसंगे भक्ते मज नेता
ते प्रेमसूत्र मज बांधतसे!२

जे स्वरूपाचे अनुसंधान
ते योग, भक्ति तैसे ज्ञान
साध्य होत नित्याभ्यासे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९७४

परि संतांसवे वसता
योगज्ञानी पैसता 
गुरुचरणी उपासिता
वैराग्येसी 

येणेचि सत्कर्मे 
अशेषही अज्ञान विरमे 
जयाचे अहं विश्रामे
आत्मररूपी
 
या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५२ वर आधारित काव्य.

Wednesday, November 22, 2023

उपनिषदांचे सार गीता सद्भाग्याने आले हाता!

उपनिषदांचे सार गीता 
सद्भाग्याने आले हाता!ध्रु.

अनुभव ज्याचा त्याने घ्यावा 
अंतरंगि भगवंत पहावा 
अंगुलिने नच ये दाखविता!१

श्रवण करिता मनन करावे 
श्रद्धेने ते कृतीत यावे 
तो मी! तो मी! अनुभविता!२ 

मी, माझे हे सोडुनि द्यावे 
तूच, तुझे हे मनी ठसावे 
अज -अमर प्रभूशी समरसता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

साचचि बोलाचे नव्हे हे शास्त्र
पै संसारु जिणते हे शस्त्र 
आत्मा अवतरवी ते मंत्र 
अक्षरे इये 

ज्ञानेश्वरीतील या ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५४ वर आधारित काव्य.

Tuesday, November 21, 2023

माझा कैसा होईल राम?

माझा कैसा होईल राम? ध्रु.

कवित्व त्याचे
गायन त्याचे
होइन का निष्काम?१

रामचि गातो
राम ऐकतो
श्रोता गायक राम!२

विषयी विरक्ती
रामी प्रीती
पालट घडविल नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २४७, ३ सप्टेंबर वर आधारित काव्य

भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वांत श्रेष्ठ साधन सांगितले आहे.

प्रत्येक नामात ‘ भगवंत कर्ता ’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही.

Sunday, November 19, 2023

मनाला नाम घेण्याचा श्रीहरि छंद लागू दे

साधनेचे तेज चेहऱ्यावर दिसतं

मानवाला आयुष्याच्या शेवटी कसली ना कसली खंत वाटत राहते. मी कोण आहे हे कळले नाही. ही खंत लागली पाहिजे. 

मन लावून संसार केल्याने मन मळलेलं असतं. मी मूळचा तेजोमय आहे हे माणूस विसरतोच. अभ्यासाची गोडी लागली पाहिजे. रोज साधना झालीच पाहिजे. संत वचन श्रवणाने चित्त शुद्ध व्हायला लागतं. रोज अभ्यास केला तर मनही झळाळायला लागतं. चेहऱ्यावर तेज विलसतं. साधनरहित माणूस जिवंतपणीच नरकयातना भोगतो. संतवाणी ऐकली, तसे वागायचे ठरवले तर अनहित कसे होईल?
***********

मनाला नाम घेण्याचा श्रीहरि छंद लागू दे 
हरी जो आतला आहे तयाशी सख्य साधू दे!ध्रु.

कळेना कोण मी ज्याला करंटा तोच या जगती 
शांति ना सौख्य त्या जीवा तया ना लेश विश्रांती 
हरी दे संग संतांचा जगी मी नांदतो मोदे!१ 

आदि ना अंत ज्याला असा मी सोवळा पूर्ण 
हवे ना वाटते काही कर्म ही सर्व परिपूर्ण
दिवाळी हीच ज्ञानाची प्रसादा नित्य सेवू दे!२ 

बोचणी लागता जीवा चुकेना साधना येथे 
कदापि खंड जर नाही कृपा ती ईश्वरी तेथे 
दिवा हा रामनामाचा सदाचा शांत तेवू दे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.११.१९९३ 

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

होणार कैसी - भगवंताची भेट?

अंत:करणी विषय राहता 
होणार नाही, होणार कैसी - भगवंताची भेट?ध्रु.

प्रवचन, कीर्तन सुंदर केले
भाराभर दृष्टांत मांडले 
दिव्याखाली अंधार परी जर - 
साधनि न धरला नेट!१ 

क्वचित आढळे विषयि विरक्ति 
फारच दुर्मिळ निर्मम भक्ति
कोटींतुनि एखादा योगी 
त्यांसी भिडतो थेट!२ 

हवीच नियमित ध्यानधारणा 
सोडणे न कधि माधवचरणा 
सोऽहं भावी नित्य नांदतो 
विशुद्ध सात्त्विक हेत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.१०.१९७४
केरवा 

पै तोंडभरो का विचारा 
आणि अंतःकरणी विषयांसी थारा
तरी नातुडे धनुर्धरा 
त्रिशुद्धी मी 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५० वर आधारित काव्य.

भगवत्प्राप्तीसाठी प्रथमतः अंतःकरणातून विषयांविषयीचा ओढा नष्ट व्हावा लागतो ही गोष्ट जोपर्यंत घडून येत नाही तोपर्यंत नुसते तोंड भरून परमार्थिक विचार मांडले, त्यावर प्रवचने झोडली तरी त्यापासून काहीही प्रगती होणार नाही.

Saturday, November 18, 2023

जीव हा अंश समज माझा!

जीव हा अंश समज माझा!ध्रु.

देहाची या दिसे उपाधि 
तिलाचि जडती आधि- व्याधि 
आत्मा निर्लेपच राजा!१ 

ज्ञानदृष्टिने पाहू जाता 
अभिन्न मजशी सर्व तत्त्वत: 
अनुभव नित्यचि हा ताजा!२ 

"देहरूप मी" अबोध आहे 
शिवरूपासी शोधुनि पाहे 
सहज मग सरेल तव ये- जा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९७४
मारुबिहाग, रसिया, आधा. 
 
तसे ज्ञानाचिये दिठी 
मजसी अभिन्नचि ते किरीटी 
येर भिन्नपण ते उठी 
अज्ञानास्तव 

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १४९ वर आधारित काव्य.

Friday, November 17, 2023

मना नाम घे, पहा अंतरी श्याम वाजवी कशी बासरी!

मनाचं प्रतिबिंब आपल्या वर्तनात!

आपल्या मनाचे प्रतिबिंब आपल्या वागण्यातून प्रतिबिंबित होते! 
देहाच्या क्षणिक सुखासाठी आपण इंद्रियांचे कौतुक करतो, इंद्रिये सांगतील तसे ऐकतो. मनाच्या घोड्याचे - इंद्रियांचे लगाम आपल्या ताब्यात ठेवले पाहिजेत. मन स्थिर होण्यासाठी नामासारखे दुसरे साधन नाही. अभ्यासाला सुरुवात केली थोडे नियम पाळू लागलो की संयम येऊ लागतो. परमार्थ हा सूक्ष्म व अंतरंगाचा असतो. अंतरीची तृप्तता भक्तीने प्राप्त होते.

**********

मना नाम घे, पहा अंतरी 
श्याम वाजवी कशी बासरी!ध्रु.

श्वासावरती लक्ष असावे 
नामस्मरणी दक्ष असावे 
राम कृष्ण हरि वदो वैखरी!१ 

तुझेच असते तुझियापाशी 
उगाच का मग वणवण फिरशी? 
एक निमिष दे वदे श्रीहरी!२ 

मना लाग रे अभ्यासाला 
जागव जागव आत जिव्हाळा
हरिभक्तीने मोक्ष ये करी!३ 

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

Tuesday, November 14, 2023

गुणातीत व्हावं; सुखी व्हावं..!

देवाने जगात मुक्त हस्ताने सौंदर्य उधळलेलं आहे - सौंदर्याचा आस्वाद घ्यायला वेळ हवा.  संसारी जिवांचे विश्व अगदी सीमित, बंदिस्त. संत म्हणतात - राहते घर सोडू नको पण शरीर - रूपी घरात मुळीच राहू नको.

आनंदसागरात मी ला बुडवून टाक. संसाराचे खोटे ओझे क्षणभर जरी दूर केले तरी कसं वाटतं सांगू? आवाजाचा स्टोव्ह बंद केल्यावर वाटत तसं.

तुझा देहभाव हरपण्यासाठी रोज फिरत जा. तू कोणी विशेष नाहीस हे पटेल.

अभ्यासाने तीन गुण नक्की ताब्यात ठेवता येतात. 

*********

तिन्ही गुणांना लंघुनि जावे -
हरिमय हे जीवन व्हावे!ध्रु.

शरीर आहे तुरुंग मोठा 
आत सुरक्षित भावच खोटा 
मुक्त मनाने विहरावे!१ 

संसाराचे ओझे खोटे 
न दिसे परि ते जाचक मोठे 
दूर फेकुनी ते द्यावे!२ 

तुझ्याविना ना अडे कुणाचे 
चंद्रसूर्य हे झळकायाचे 
भजने मीपण विलयावे!३ 

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९९३ 

माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित कविता.

सर्व काही माझे वाटो रामराया!

सर्व काही माझे वाटो रामराया!
रामराया! रामराया!ध्रु.

घडावी ती सेवा
प्रिय जीच देवा
माझा राम देई मज माउलीची माया!१

खरा कर्ता राम
खरा दाता राम
काय उणे त्याला ज्याच्या जगी रामराया!२

दिले त्यात समाधान
वाटे ज्यास तो सुजाण
रामनाम येता मुखे शिरी धरी छाया!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०९, २७ जुलैवर आधारित काव्य.

राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.
आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. 
सर्व काही राम करतो, खर्रे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे.

Sunday, November 12, 2023

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!

येई दासबोधा, अंतरी, सोऽहं घमघमला 
कृपा राघवाची स्वागता शुद्ध स्वर लागला!ध्रु. 

तुझ्या प्रसादे होता सावध कोऽहं हे कळले 
नाम दिलेसी त्या तेजाने तिमिर हि मावळले 
त्रयोदशाक्षरी मंत्र आवडे परमार्थी आगळा!१ 

एकांताची ओढ लागली मिटली नयनदले 
जनांत असुनी शांतिगृहाच्या सौख्या अनुभविले 
भक्तिकमळ उमलले पाहुनी ज्ञानभास्कराला!२ 

गुरु शिष्यांच्या संवादाची रुचीच ही वेगळी 
प्रमेय आले रुचीस येथे प्रज्ञा टवटवली 
उत्साहाचा चैतन्याचा निर्झर झुळझुळला!३

शिवथर घळ प्रत्येक मानसी सदैव असलेली 
तुझ्या वाचने साधकास ती पुरती जाणवली 
जो तो साधक डोळे मिटुनी अंतरंगि वळला!४ 

अखंड चाले सोऽहं सोऽहं रामदास वदले 
श्वासाला त्या भूदेवाने नाम जोडुनी दिले 
अनुभव घेता साधक ऐसा कणकण मोहरला!५

प्रपंच परमार्थाचे नाते उमा शंकरांचे
परस्परांविण जगी न भागे पळभर कोणाचे 
गृहस्थाश्रमी सहज पांघरे विरक्तिशालीला!६

अक्षर अक्षर ठसव मनावर ऐकावी प्रार्थना 
धार लाव प्रज्ञेला अमुच्या बळ दे गा चिंतना 
श्रीरामाचा अजुनि जिव्हाळा ध्यानी न का आला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
प्रसिद्धी सज्जनगड मासिक एप्रिल १९७७ चैत्र

Saturday, November 11, 2023

श्रीसमर्थां आरती! रामदासा आरती!

श्रीसमर्थां आरती! 
रामदासा आरती!ध्रु.

जांब जन्मे धन्य केले 
सान थोरा हर्षवीले 
देवभूमी गमत ती!१ 

वाहिला शिरि देवराणा 
शैशवी त्या चिंतिताना
कौतुकावह ती धृती!२ 

टाकळीला ध्यास त्याचा 
छंद त्या सर्वोत्तमाचा 
लाभु दे रामी रती!३

सर्व भारत पाहिला 
राम अंतरि स्थापिला 
योजिली नामी कृती!४ 

" खात ना आम्ही कुणाचे -
दास केवळ राघवाचे! " 
द्या निराशा थोर ती!५ 

राष्ट्र ज्यांसी देव हो 
देशकारण धर्म हो -
त्या तुम्हां ही आरती!६

दासबोधा वाचताना 
बोल परखड ऐकतांना
भक्त भाविक हर्षती! ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१२.१९७६

(पाचव्या कडव्यात निराशाचा अर्थ प्रचलित निराशा नव्हे.  निरपेक्ष वृत्ती किंवा ज्याला काही ऐहिक आशा नाहीत असा असावा .)

जो आला तो गेला मनुजा भज भज रामपदाला!

जो आला तो गेला 
मनुजा भज भज रामपदाला!ध्रु. 

एक मरे तधि दुसरा रडतो 
रडणाराही मरण पावतो 
खंड न या यात्रेला!१ 

नको शोक अन नकोच चिंता 
जे जे येई सुखे भोगता 
मिळेल अमृतपेला!२

देहदुःख विस्मरणासाठी 
रामनाम तू जोडच गाठी 
उद्धरिण्या ' तो ' ठेला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

जे मन आत्मसुखा भोगे कसे ते विषयसुखी रंगे?

जे मन आत्मसुखा भोगे
कसे ते विषयसुखी रंगे?
नच ते विषयसुखी रंगे!ध्रु.

मृगजळ आले वाहुनि गेले
प्रचंड पर्वत जरा न चळे (हाले)
समदृष्टीचा संत विरागी रमला देवासंगे!१

मेघच्छाया येत न कामा
मना मोहवी जरि अभिरामा
विषय देत जे सुखाभास ते इंद्रियसंयोगे!२

शाश्वतसुख नच विषय देतसे
जहर का कधी सुधा होतसे?
सर्पफणा का देते छाया, घातक ठरे प्रसंगे!३

विरक्ति काठी टेकू देते
झंजावाती तोल राखते
निश्चयबंधू सहाय्य देता योगाभ्यसनी दंगे!४

अहंकार मन बुद्धि न उरती
ब्रह्मसुखांतरि विरूनी जाती
जिवाशिवांचा मिलनसोहळा ऐसा अद्भुत रंगे!५

देहधारी हि तरी विदेही
ब्रह्मपदाला पावत तोही
वृत्ति मनांकित, नित्यानंदी, ब्रह्मानंदा भोगे!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

आत्मरूप होणे ध्येय साधकाला!

आत्मरूप होणे ध्येय साधकाला!ध्रु.
 
जन्म - मृत्यु नाही मजला 
स्तुतिनिंदा लेप न कसला 
राम सर्व ठायि आहे भरुनि राहिलेला!१

त्रिगुणात्मक प्रकृति बनली 
गुंते नर नकळत जाली 
अहंकार निरसन होता, मार्ग खुला झाला!२

अभेदत्व अंगी यावे 
विश्वरूप मनि विकसावे 
हेच भजन दिव्या दृष्टी देत साधकाला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

म्हणोनि विश्वपण जावे 
मग माते घेयावे 
तैसा नव्हे आघवे
सकटचि मी 

ऐसेनि माते जाणिजे 
ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे 
येथे भेद काही देखिजे
तरि व्यभिचारु तो

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३९ वर आधारित काव्य

Tuesday, November 7, 2023

स्थितप्रज्ञ तो जगी खरा!

दुःखाने हिरमुसला व्हायचे नाही, आनंदाने हुरळून जायचे नाही. बुद्धी कुठल्याही प्रसंगात स्थिरच ठेवायची.

भगवंतांनी एका मागून एक खुणा सांगितल्या. असा हा स्थितप्रज्ञ खऱ्या अर्थाने जीवन जगणारा असतो. पलायनवादी तर नसतोच नसतो.

शरीर यात्रा व्यवस्थित चालू ठेवावी यासाठी तो यत्नशील असतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अगदी आत्मतृप्त, नित्य आनंदी वृत्तीचा असतो.

मोहोराने लहडलेला आम्रवृक्षच जणू! पिसारा फुलवून नाचणारा मत्त मयूरच!

स्थितप्रज्ञाची लक्षणे विशद करून सांगण्यासाठी भगवान म्हणाले -
**********

जो उदास राही फला न वांछी
रडे न दुःखी हसे न सौख्यी
स्वतःशीच संतुष्ट पुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!१

कुणा न वंदी कुणा न निंदी
संयम पाळी रमे न विषयी
कूर्मापरि रोधी गात्रा 
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!२

गात्र गुंतवी मनास वळवी
भजनी रंगुनी सत्पथ दावी
स्वकर्म दीपे उजळि घरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!३

कर्म न टाळी स्वधर्म पाळी
कुशल होउनी विकार जाळी
कैवल्याचा जणु पुतळा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!४

द्वाड इंद्रिया मुळी न मारी
मितोपभोगे तयां सावरी
स्थिरावली ज्याची प्रज्ञा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!५

झरा सुधेचा उदरी ज्याच्या
तृषा क्षुधाही अंकित त्याच्या
प्रसन्न नित ज्याची मुद्रा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!६

विश्व झोपते तेव्हा जागा
नच संदेहा मनात जागा
जागृत राहुन वाहि धुरा
स्थितप्रज्ञ तो जगी खरा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 5, 2023

अनंत रूपे अनंत नटला

अनंत रूपे अनंत नटला देखिलें त्यासी - 
खूण बाणली कैसी? ध्रु.

चैतन्याचा विलास येथे 
चैतन्याविण काहीच नसते 
जगत् जीव परमात्मा एकच
मिळविलेच ज्ञानासी!१ 

भूषण कधि झाकते सुवर्णा
तेज प्रकटवी अधिकच रत्ना 
रूपे नामे असोत अगणित 
जाणलेच तत्त्वासी!२ 

कशास जगता दूर सारणे? 
सर्व ठिकाणी हरि पाहणे 
गुरुकृपेने स्वरूप - ज्ञाने 
सोऽहं बोध मनासी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०८.१९७४
केदार, त्रिताल

जालेनी जगे मी झांके
तरी जगत्वे कोण फाके?
किळेवरी माणिके 
लोपिजे काई?
म्हणोनि जग परौते
सारूनि पाहिजे माते
तैसा नोहे उखिते
आघवे मीचि

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथ यांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३७ वर आधारित काव्य.

Saturday, November 4, 2023

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!

इंद्रियांचे लाड नकोत

घरात दहा माणसं असली की सर्व जणांचं करता करता घरातल्या मुख्य बाईचा जीव मेटाकुटीला येतो. तिला थोडा सुद्धा विसावा मिळत नाही. आपल्या शरीराच्या घरात पण दहाच माणसं आहेत. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये. जीव मायेत गुंतलेला मनाला विश्रांती कशी मिळायची?

देवासाठी एवढे कष्ट घेतले असते तर देव तरी प्रसन्न झाला असता - खरं तर या संसाराचा कर्ता कोण? माझे प्रयत्न व प्रभूची इच्छा असेल तरच जीवनात स्वास्थ्य मिळेल.

भक्तीने रघुपतीस आळवावे.
******

नको नको करू लाड कधी इंद्रियांचे
समाधान त्याने कधि का होतसे जिवाचे!ध्रु.

हवे हवे संपत नाही 
माय मात्र कष्टत राही 
गणित ना सुखाचे काही असे सुटायाचे!१ 

जीव गुंतला मायेत 
राम नाही हाता येत 
देह होत कोठारच हे मनोविकारांचे!२

ओढ जिवा प्रपंचाची 
तमा कोठली कष्टांची? 
मन:स्वास्थ्य गेले, ये ना नाम विठोबाचे!३ 

जीभ आणता ताब्यात 
तीही रमे अभंगात 
अता तरी साध जीवा हित आयुष्याचे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य

Friday, November 3, 2023

सुख विषयामधि नाही!

किती कितीदा सांगावे?
सुख विषयामधि नाही!ध्रु. 

अंत न भोगा 
स्‍थानचि रोगा 
जो विषयदास त्‍यासी, शून्‍य दिशा दाही ! १ 

घ्‍या हो नामा 
आळवा रामा 
जर नाम कंठि धरले, मग बाधत ना काही! २ 

धुंदि निराळी 
तृप्ति निराळी 
जो वासनांस जिंके, तो समाधानी राही! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३५, २२ ऑगस्‍ट वर आधारित काव्‍य.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

आपुले आपणां झाले विस्मरण! आपणां आपण पाहणे हे ज्ञान!

आपुले आपणां झाले विस्मरण!
आपणां आपण पाहणे हे ज्ञान!ध्रु.

मी कोण? याचा करावा विचार
देहाचा साधकां पडावा विसर
नच घडू द्यावा विकारांनी ताण!१

भवस्वर्गादिकां तिलोदक द्यावे
आत्मसुख लाभो - मनी हे धरावे
उपासावे आधी गुरूचे चरण!२

सोऽहं भजनात होताच तन्मय
झणी एक होती ज्ञाता आणि ज्ञेय
प्रत्यये वदाल हेच आत्मज्ञान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.०८.१९७४
पूरिया, भजनी धुमाळी

एऱ्हवी ज्ञान हे आपुले
परी पर ऐसेनि जाले
जे आवडोनि घेतले
भवस्वर्गादिक

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १३६ वर आधारित काव्य.