Sunday, July 28, 2024

नरजन्म याचसाठी ' श्रीराम ' प्राप्त व्हावा!

नरजन्म याचसाठी ' श्रीराम ' प्राप्त व्हावा!ध्रु.
' श्रीराम ' प्राप्त व्हावा, तो एकला विसावा!

नामात "राम" आहे 
कामात "राम" नोहे 
"मी तोच" संतबोध या अंतरी ठसावा!१

निष्ठा अशी असावी 
नामास चित्त लावी 
अणुरेणुही जगाचा मजलागि "तो" दिसावा!२ 

शंका छळे जयाला 
भवसागरी बुडाला 
तो नामबिंदु एक या चातका पुरावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १६८ (१६ जून) वर आधारित काव्य.

आपण मनुष्यजन्माला आलो ते भगवंतप्राप्ती करताच आलो. संत आपणास "तोच मी" असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. जे गोरगरीब, भोळेभाळे लोक, यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांसही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरून कचेरीस निघताना आपण कचेरीस वेळेवर पोहोचू अशी (अंध) श्रद्धा आपली असते. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीस पोहोचू शकत नाही. तरी पण आपण भरवसा ठेवतोच! परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा. पण आपण अर्धवट आहोत; म्हणजे, पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसांना शंका फार, व त्यांचे समाधान करणेही फार कठीण जाते.

Saturday, July 27, 2024

जो साक्षित्वे राहतो तो दुःखी नच होतो!

जो साक्षित्वे राहतो
तो दुःखी नच होतो!ध्रु.

सत्यासत्य कळतसे त्याला
मोहजालि तो नसे गुंतला
भगवंती रंगतो, तो कष्टी नच होतो!१

व्यापामध्ये का गुंतावे?
ब्रह्मानंदा कसे मुकावे?
हसत घाव सोसतो, तो आत्मतृप्त होतो!२

निद्रेचे सुख नाहिपणाचे
ब्रह्मसौख्य तर अस्तित्वाचे
सावध नित राहतो, तो संतोषा भोगतो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८९ (२९ मार्च) वर आधारित काव्य.

सत्य वस्तु ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो पण भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षित्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापात सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षित्वाने राहायला शिकले पाहिजे. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असूनसुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय. ब्रम्हानंद हा आहेपणाने आहे व सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे.

रामा तुझाच झालो, तुज वेगळा न उरलो!

रामा तुझाच झालो, 
तुज वेगळा न उरलो!ध्रु.

जगणे तुझ्याचसाठी
मरणे तुझ्याचसाठी
नामामृती नहालो!१

मन हा तुझाच अंश
मनने तरेल वंश
तव नाम मीच झालो!२

करणे न काहि उरले
प्राप्तव्य प्राप्त झाले
स्मरणे कृतार्थ झालो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२४ (३ मे) वर आधारित काव्य.

मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. मन हा परमेश्वराचा अंश आहे. भगवंताचे स्मरण राहू शकत नाही असे नाही होणार. मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे. तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे. पैसाअडका, प्रपंचातील सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा. असा त्याग केला तर कार्यभाग निश्चित होतो. धर्माचरण, भगवद्भक्ती, नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय आहेत. सत्संग हा त्याला तोडगा आहे. सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत्कृपेने ते साधेल. भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे. म्हणून आपण भगवंताचे स्मरण अखंड टिकवू या आणि आनंदाने राहू या.

Thursday, July 25, 2024

करावे काय न हे कळते!

जी जी धडपड सुखार्थ चाले दुःखच ती देते 
करावे काय न हे कळते!ध्रु.

प्रपंचात जी दिसे चिकाटी 
का न दिसतसे ती परमार्थी? 
नश्वर जे ते भुरळ घालुनी विटंबना मांडते!१ 

जरी भोगिले विलास नाना 
समाधान या जिवा मिळेना -
सामंजस्या चित्त अज्ञ हे किमर्थ ना वरिते?२ 

अशाश्वताचा मोह गळू दे 
जे शाश्वत ते प्रिय वाटू दे
अंतरंग नच जाणुनि मन का बहिरंगा भुलते?३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६७ (७ मार्च) वर आधारित काव्य.

प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल. तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत, त्यापासून दुःखच पदरात पडते. म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे.

Monday, July 22, 2024

आम्ही नव्हेच देहाचे - आम्ही आहो रामाचे!

आम्ही नव्हेच देहाचे - आम्ही आहो रामाचे!
आम्ही आहो देवाचे!ध्रु. 

देहात रमे तो बद्ध
देहात न गुंते सिद्ध
बद्ध जगाचे - मुक्त परंतु एका भगवंताचे!१ 

विषयांची गोडी सुटली 
देहोऽहं भ्रांती फिटली 
मूळ रूप जे स्वयंसिद्ध ते - भावभक्ति मनि नाचे!२ 

जे घडते इच्छा त्याची 
जे मिळे देणगी त्याची 
भक्ति भिनावी म्हणूनि धरितो चरण राघवाचे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१७ (१२ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

बद्ध हे जगाचे असतात. मुक्त जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांना देहाची आठवण नसते, ते आपला देहाभिमान, मीपणा भगवंताला देतात. विषयांचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गास लागणे. मी भगवंताचा म्हटले की तेथे बद्धपणा संपला. आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो, व त्यामुळे देहाचे सुखदुःख होते ते आपणास झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असेच आपण म्हणत असतो.  भक्तीस जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय व ती गेल्याशिवाय भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल.

Sunday, July 21, 2024

गुरुवंदन


त्या सद्गुरुला नमन असो!ध्रु.

मायमाउली जीवन घडवी 
मंगल ते वदनातुन वदवी 
स्मरण तिचे निशिदिनी असो!१

कठोर गमती आतुन प्रेमळ 
वडील गंगेसमान निर्मळ 
तातचरणि मन वसो वसो!२

हासत खेळत शिक्षण देती 
जीवनास या वळण लावती 
सकलगुरुजनां नमन असो!३

श्रीगुरु नसती कोणी व्यक्ती 
संजीवक सत्प्रेरक शक्ती 
अंतःस्थाला नमन असो!४

आत्मरूप ते ध्यानी यावे
निमिष मोटके देत असावे 
श्रीरामा औत्सुक्य असो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
अल्बम : अण्णांची गाणी
(शुभचिंतन मधून)

Saturday, July 20, 2024

प्रार्थना कर प्रगती होईल



भक्तिपथी हो प्रगती 
हीच प्रार्थना!ध्रु. 

कर जुळले दिसता तू 
दिसता तू नच किंतू 
तृप्तता मना!१

रक्षण कर, जवळी धर 
सौजन्यच सुंदर वर 
मोद हो मना!२

गगन नील मन सुशील
बनवी मज सत्त्वशील
अन्य आस ना!३

नच मागत मजसाठी 
ध्यानी घे जगजेठी
हे दयाघना!४ 

विश्व सदन वाटावे 
मी जनांत मिसळावे
होय होय ना?५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
( चिंतन चतुर्दशी मधून) 
१९८६

अर्थ मिळे गीता!

राम कृष्ण हरि! राम कृष्ण हरि! नामावलि गाता 
सद्गुरु दिसले त्या नामांतरि - अर्थ मिळे गीता!ध्रु.

नाम जाहले मजसि अनावर 
सद्गुरु घालति शीतल पाखर 
जगी न काही उरे अमंगल - द्वंद्वचि मावळता!१ 

भक्ति उगवली स्मरता माधव
शबरीच्या घरि रघुपति राघव
नामस्मरणे भक्तिगायने अवतरली कविता!२ 

देह भलेही राहो, जावो 
भगवद्भक्ति अखंडित राहो 
भक्तीसंगे ज्ञान खेळते अनुभव हा मिळता!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.११.१९७४
(प.पू. बाळासाहेब वाकडे (स्वामी माधवनाथ) प्रथम घरी आले त्या दिवशीचे काव्य.)

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१६ (११ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

परमात्म्याची ज्याने ओळख होते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही. भक्ती केल्यानेच तो ओळखता येईल. भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच मागे येते. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. ज्या स्थितीत आपणास देव ठेवील त्या स्थितीतच आनंदाने राहणे म्हणजे वैरागी होणे.  
कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल तीतच आनंदाने राहणे म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणे होय व तसे राहिले म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसे होण्यास राजमार्ग म्हणजे नामस्मरण करणे. गुरुने जे नामस्मरण करण्यास सांगितले असेल तेच करीत राहावे व त्यातच त्यास पहावे म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागते. नामस्मरणावर विश्वास ठेवावा व ते विश्वासाने घेत जावे असे झाले म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही तेच आहे.

जय जय राम कृष्ण हरि..२

 ॐ 

जय जय राम कृष्ण हरि! ध्रु.

भजन हे नेते हरिपाशी 
शांति ये मनी रहायासी 
कानी श्रीहरिची बासरी। १ 

प्रभाती उठून बैसावे
देहा शुद्ध करुन घ्यावे 
आपसुख पंढरपुर ये घरी। २

माउली शिकवी हरिपाठ 
सोडवी जन्ममरणगाठ 
जिव्हा घोष करी हरि हरी।३

राम हा मनास रमवितसे 
कृष्ण मन ओढुन घेत असे 
हरि हा मनास नाम करी।४ 

चालता चिंतन चालू दे 
बोलता माधव बोलू दे 
जाणता खचित स्वहित करी।५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०६.०१.२००३

जैसा ज्याचा भाव, तैसा त्याचा देव!

जैसा ज्याचा भाव, तैसा त्याचा देव!ध्रु.

भाव शुद्ध व्हावा
स्वार्थ लुप्त व्हावा
विशुद्ध प्रेमाची व्हावी देव घेव!१

शुद्ध भाव ज्याचा
राम हो तयाचा
अशा साधकासी नुरते संसाराचे भेव!२

राम हाच नाम
नाम हेच राम
आत्मसुख धावुनि येते द्यावयास खेव!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४९ (१८ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

नामाविषयी शुद्ध भाव व दृढनिश्चय आवश्यक आहे. एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध, निस्वार्थी असावा. भाव शुद्ध कसा होईल हे पाहावे. नाम श्रद्धेने व शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. भगवंत आणि त्याचे नाव ही एकरूपच असल्यामुळे त्या दोघांचे आड काहीच येऊ शकत नाही. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढभावना झाली पाहिजे. नामासारखे सोपे साधन नाही विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामात गोडी येते.

Wednesday, July 17, 2024

का हुरळावे? हिंपुटि व्हावे?

फळ जर नाही अपुल्या हाती 
मी कर्ता तरि का समजावे? 
का हुरळावे? हिंपुटि व्हावे?ध्रु.

मी मी जो नर व्यर्थ बरळतो 
दुःखाचा तो धनीच होतो 
कर्तृत्वाचा भार वाहुनी, ओझ्याचे का गाढव व्हावे?१ 

देहबंधने पूर्ण जखडला 
तो जगती कधि सुखी जाहला?
तटबंदी ती विध्वंसुनिया, विशाल विश्वा का न पहावे?२ 

स्मरण असावे भगवंताचे 
नुरेल नावहि मग विषयाचे 
विवेकबंधू असता जवळी का न तयाचे लव ऐकावे?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९१ (३१ मार्च) वर आधारित काव्य.

कर्ता मी नाही म्हटले म्हणजे प्रपंचातील अडचणी सुटू लागतात.
ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे? कर्ता मी नाही हे समजले म्हणजे सर्व साधते. नको असलेले नामस्मरण बळजबरीने करावे, म्हणजे हवे असलेले विषय जातात. जर आपल्याला विवेकाने सुखी राहता आले नाही तर आपल्याला सुख कधीच मिळणार नाही. कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणाने आपण प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये व अनुसंधान कमी होऊ देऊ नये.

Tuesday, July 16, 2024

राम राम राम राम राम राम राम राम!

राम राम राम राम 
राम राम राम राम!ध्रु.

रामनाम घ्यावे हो 
देहा विसरुन जावे हो 
सर्व सुखाचे निधान नाम!१

अंगी मुरते भक्ती हो 
ओसरते आसक्ती हो 
अनुभव ऐसा देई नाम!२ 

आता गायचे कोणा हो 
अद्वयानुभव आला हो
भावसमाधी साधे नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
११.०१.१९७९
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११ (११ जानेवारी) वर आधारित काव्य.

राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःचे विस्मरणात होत असतो म्हणजे देह बुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजेच स्थूलातून तून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे. हा राम राम म्हणण्याचा परिणाम.
एखादी वस्तु आपल्याला हवी असे वाटल्यावर आपण तिच्या प्राप्ती विषयी विचार करू लागतो म्हणून पहिल्याने भगवंत हवा असे वाटले पाहिजे.

Sunday, July 14, 2024

हा प्रपंच परमात्म्याचा! तद्भजना माझी वाचा!

हा प्रपंच परमात्म्याचा!
तद्भजना माझी वाचा!ध्रु.

विश्वाचा राम नियंता
चिंता मम त्या भगवंता
तात्पर्य मी न देहाचा!१

रामाने सगळे दिधले
रामाने मज पोशियले
मी कृतज्ञ म्हणुनि त्याचा!२

ठेविले तसेच रहावे
सुखदुःखी त्यास स्मरावे
भजनास वाहिली वाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१९ (१४ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

परमात्म्यास ओळखण्यास, प्रपंच त्याचा आहे हे जाणून करावा.  जगाचा कोणीतरी कर्ता हा असलाच पाहिजे तो कोण हे आपणास समजत नाही इतकेच. जर सर्वच देवाने केले आहे तर त्याचे पालनही तोच करतो व संहारही करणारा तोच असतो. तर मग आपणास तरी त्यांनी दिलेल्या संसारात काही बरेवाईट झाले म्हणून सुखदुःख मानण्याचा काय अधिकार आहे. जो प्रपंच त्याने आपणास भाड्याने दिला आहे तो आपण आपलाच म्हणून धरून बसलो. परंतु त्यास वाटेल तेव्हा हर प्रयत्नाने आपणास काढून लावता येणे शक्य असता आपण तो आपला म्हणून कसे म्हणावे? तर तो त्याचा आहे असे समजून वागावे व जेव्हा तो नेण्यास येईल तेव्हा जाण्याची आपली तयारी ठेवावी, म्हणजे संसारात सुखदुःखे बाधत नाहीत.

जेथे रामाचे नाव। तेथे माझा ठाव। 
जेथे नामाचे स्मरण। ते माझे वसतिस्थान।।

Saturday, July 13, 2024

का करिशी तू खंत? जीवा तू स्वतःच आनंद!

का करिशी तू खंत?
जीवा तू स्वतःच आनंद!ध्रु.

मी दुःखी हे मानुनि घेशी
रडशी, कुढशी तू चरफडशी
हृदयि भक्तिमकरंद!१ 

ब्रह्मरूप तू ध्यानी घ्यावे 
देहबंधनी नच गुंतावे 
घे घे सोऽहं छंद!२

होणारे ते होतचि असते 
नच घडणे ते सहजचि टळते
काळजीस करि बंद!३

मी माझेपण तुजसी भ्रमवी 
त्या चित्ता तू रामी रमवी
गातचि चल गोविंद!४

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२० (१५ नोव्हेंबर) वर आधारित काव्य. 

जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले. संत लोक आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वतःसिद्ध व आनंदरूप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो व त्यामुळे त्यातील सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. परमात्म्यास काय करायचे ते तो करित असतो. आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंतास शरण होऊन राहावे. काळजी आपल्याला भगवंतापासून खेचून काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात व कर्तेपणात आहे आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो. मग ती सुटणार कशी? भगवंताचे स्मरण करत गेल्याने वासना व काळजी दोन्हीही सुटतात.

Thursday, July 11, 2024

मुख्य रोग अमुचा वाटतो प्रपंच सौख्याचा!

मुख्य रोग अमुचा वाटतो प्रपंच सौख्याचा!ध्रु.

विषयी चित्ते विषयी रमती
लाभहानिची कोठली क्षिती?
प्रापंचिक जन नच स्मरती हे मी तर देवाचा!१

खोटे कळते मन नच विटते
लाचारी ते कुठली शिकते?
ते ते करता कंटाळा ना चित्ता विषयांचा!२

माझे माझे म्हणत राहतो
स्वये स्वतःला बांधुनि घेतो
जाणुनि बुजुनी स्वीकारित हा मार्ग विनाशाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६१ (१ मार्च) वर आधारित काव्य.

प्रापंचिक माणसाची स्थिती अशी असते.
आमचा मुख्य रोग, संसार दुःखाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे.
खोटे कळूनही त्यात सुख मानून आपण राहतो व देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच पण आज करतो. तेच ते जेवण, तीच ती नोकरी, तोच तो पैसा मिळवणे. सगळे तेच असे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का?

राघवा, घालवि रे मीपणा!

राघवा, घालवि रे मीपणा!ध्रु.

संकल्पांचा उगम तेथुनी 
विषयांची ये माथी गोणी
अपार मग वेदना!१ 

तुझाच अंकित नित्य असावे 
तुला स्मरावे तुजला गावे 
अन्य नसे कामना!२ 

तव नामाची लाभो संगत 
भक्ति वाढवी जीवनि रंगत
नुरु दे अपुरेपणा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६४ (२९ डिसेंबर) वर आधारित काव्य.

मीपणाचे विसर्जन करून सत्संगतीत म्हणजे नामात राहावे.
मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषयच मनात येतात. 
भक्ती म्हणजे संलग्न होणे. थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. पण मनुष्य नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन सुखी किंवा दुःखी होतो. संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगतीत राहावे. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावीशी वाटेल ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण कोणाला मारणार नाही.

Tuesday, July 9, 2024

कर्तेपण टाका, पात्र व्हा आपण परमार्था!

कर्तेपण टाका, पात्र व्हा आपण परमार्था!ध्रु.

नकोच दगदग, नकोच तगमग 
नको अशांती, नकोच लगबग 
मनि भक्ती नसता, कसा ये रामचंद्र हाता?१

नाम जपावे, विषय सुटावे 
स्थिरपद व्हावे, शरण रिघावे 
शांति ही खरी प्रथम पायरी जाण्या परमार्था!२ 

आनंदाचे निधान जवळी 
अंतर्मुख जर दृष्टी झाली 
सोऽहं हा भाव आवडे त्या श्रीभगवंता!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १५५, (३ जून) वर आधारित काव्य.

ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्यास शरण जावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. शरण येताना मी कोण, माझा धर्म, माझे कर्म वगैरे सर्व विसरावे. ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो. शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार.

Sunday, July 7, 2024

ही रामनामनौका भवसागरा तराया!

ही रामनामनौका भवसागरा तराया!ध्रु.

संसाररूप पाणी -
येवो न आत कुठुनी 
आताच लाग मनुजा, भावे तया भजाया!१

जाती आपाप दोष 
ये राहण्यास तोष 
शरणागतीस नाम, क्षण घालवी न वाया!२ 

नामाचसाठि नाम 
रामाचसाठि नाम 
दिधले विवेकवल्हे/प्रयत्नवल्हे - भवसागरा तराया!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०१.१९७९

चाल : माझाच हिंद देश

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २२, (२२ जानेवारी) वर आधारित काव्य.
शरणागतीला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. भवसागर तरून जाण्यास नाम हेच साधन आहे. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळ्या खात आहे. समुद्रातून तरून जाण्यास जशी नाव, तसं भवसागरातून तरून जाण्याला भगवंताचे नाव आहे. फक्त संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजेच कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. वाईट विचार मनात येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही.

Saturday, July 6, 2024

हेचि दान द्यावे देवा माझा विसर पडावा!

हेचि दान द्यावे देवा माझा विसर पडावा!
माझा विसर पडावा, तुझा आठव घडावा!ध्रु.

तुझे करता भजन
तुटो देहाचे बंधन
माझा हेतु पुरवावा - देवा केशवा माधवा!१

तुझे धरिले चरण 
आलो तुजसी शरण
जीव तापला पोळला मिळो नामात गारवा!२

तुझी लाभावी संगती
विषयांची घडो तुटी
चित्त शुद्ध करी माझे दीनदयाळ राघवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन १४४, २३ मे वर आधारित काव्य.

आपण स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरतो की नाही? स्वतःला विसरावे पण ते विषयांकरिता विसरू नये, परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करताना मी देवापुढे आहे, व तो आणि मी यांचे शिवाय दुसरे कोणी नाही असे म्हणूनच भजन करावे व तशीच सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयांचे आधीन केव्हाही न होता संसार करावा.

Friday, July 5, 2024

पडू दे सच्चरणी काया!

भगवंताच्या प्रेमावाचून सर्व काही वाया! 
पडू दे सच्चरणी काया!ध्रु.

प्रेम जयावर स्मरण तयाचे 
प्रेम अंतरी फुलावयाचे 
भगवत्प्रेमाआड येत जे ते ते सगळे माया!२ 

बरी नम्रता, वचनि मधुरता 
हृदि कोमलता, वर्तनि शुचिता 
नाम स्मरता लागतोच नर -  विषयांसी विसराया!२ 

मजसाठि न मी, मी रामाचा 
मी न तनाचा, मी देवाचा 
सोऽहं सोऽहं तत्त्व पाहिजे आचरणी यावया!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराजांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२७, ६ मे वर आधारित काव्य. 

भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व काही वाया आहे.
बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाढणार नाही. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. कोणती गोष्ट अगर सूचना सांगायची झाल्यास त्या व्यक्तीविषयक न बोलता नम्रतेने व गोड शब्दात सूचना म्हणून सांगावे. स्वार्थाला आळा घालणे आणि विषयांवर सर्व बाजूंनी हल्ला चढवणे. बाहेरून इंद्रियांना वळण लावावे व आतून मनाला अनुसंधानत ठेवावे. मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे म्हणजे जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याचे बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे

Thursday, July 4, 2024

इतुके घ्या ध्यानी सार!

शेतालागी कुंपण तैसा परमार्थासी संसार -
इतुके घ्या ध्यानी सार!ध्रु.

जागृत असणे निशिदिनी 
रहावेच अनुसंधानी 
असे न होवो असावधक्षणी कुंपण शेता खाणार!१

भ्रमे वागता खुंटे प्रगती 
यत्नांची होते माती 
नाम जपावे प्राणपणाने ते परतीरा नेणार!२

संग कुणाचा? नेम नसे
स्वतःस जपणे सूत्र असे 
मीपण मारुनि स्वये उरावे असली अवघड शिकार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२३ (२ मे) वर आधारित काव्य.

शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा. कुंपणालाच जर खतपाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते. तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खतपाणी घालावे.
परमार्थ ही कठीण शिकारच आहे. शिकार अशी मारली पाहिजे, की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे, आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे.

Tuesday, July 2, 2024

तुझे प्रेम लागो, रामा! तुझे प्रेम लागो!

हात जोडितो हेच विनवितो 
तुझे प्रेम लागो, रामा! तुझे प्रेम लागो!ध्रु.

अहंपणा गेला खोल 
दवडिलाच वाया काळ
भक्ति अंतरी या जागो!१

कळते परि मुळि ना वळते
जालकात मन गुरफटते 
दुःख मेळा सत्वर पांगो!२

ठेवशील - राहू तैसे 
सांगशील - वागू तैसे 
अधिक काय मागो?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३४ (१३ मे) वर आधारित काव्य.

आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पाहा! आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्‍कत दुसऱ्यावर फोडायला तयार होतो. 
संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही.