Friday, July 5, 2024

पडू दे सच्चरणी काया!

भगवंताच्या प्रेमावाचून सर्व काही वाया! 
पडू दे सच्चरणी काया!ध्रु.

प्रेम जयावर स्मरण तयाचे 
प्रेम अंतरी फुलावयाचे 
भगवत्प्रेमाआड येत जे ते ते सगळे माया!२ 

बरी नम्रता, वचनि मधुरता 
हृदि कोमलता, वर्तनि शुचिता 
नाम स्मरता लागतोच नर -  विषयांसी विसराया!२ 

मजसाठि न मी, मी रामाचा 
मी न तनाचा, मी देवाचा 
सोऽहं सोऽहं तत्त्व पाहिजे आचरणी यावया!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराजांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२७, ६ मे वर आधारित काव्य. 

भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व काही वाया आहे.
बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाढणार नाही. सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. कोणती गोष्ट अगर सूचना सांगायची झाल्यास त्या व्यक्तीविषयक न बोलता नम्रतेने व गोड शब्दात सूचना म्हणून सांगावे. स्वार्थाला आळा घालणे आणि विषयांवर सर्व बाजूंनी हल्ला चढवणे. बाहेरून इंद्रियांना वळण लावावे व आतून मनाला अनुसंधानत ठेवावे. मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे म्हणजे जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याचे बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे

No comments:

Post a Comment