नाम हा देवाचा अवतार!ध्रु.
जितकी नामे तितकी रूपे
महिमा परि नामाचा लोपे -
फोडावा नामाचा टाहो
प्रतीति मग येणार!१
कुवासनेते पळवुनि लावी
सद्भावाच्या वृक्षा रुजवी
भक्ता करि नामाची झारी
वर्षत अमृतधार!२
नामचि घेणे ना विस्मरणे
श्रद्धा नामी अचल ठेवणे
सूक्ष्म कारणा उपाय सूक्ष्मच
अमोघ तो ठरणार!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३१, (३१ जानेवारी) वर आधारित काव्य.
नाम हा भगवंताचा अवतार आहे. सुष्टांचे रक्षण व दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत म्हटले आहे. दुष्टांकडून सुष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सुष्टच नामशेष झाल्याकारणाने अवतार तरी कसा व्हावा? पूर्वी सद्वासना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे. म्हणजे पायाच ढासळला आहे, तेथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. आत्ताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे; म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणून जसा रोग, तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातीलच असली पाहिजे. वासना बदलण्याला वासनेइतका जबरदस्त इलाज पाहिजे व तो म्हणजे भगवंताचे नाम. सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे; ज्याअर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्याअर्थी त्याचा इलाजही सूक्ष्मातीलच पाहिजे. म्हणूनच नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे व त्याची कास धरणे हेच आमचे आजचे मुख्य कर्तव्य आहे.