Sunday, March 30, 2025

धरोनी रामाचा आधार करावा आनंदे संसार!

धरोनी रामाचा आधार
करावा आनंदे संसार!ध्रु.

पत्नी लक्ष्मी, पति नारायण
दोघेही जण धर्मपरायण
देत नित प्रेमाचा उपहार!१

शांति मनाची सांभाळावी
सेवा काही अशी घडावी
वहावा कर्मसुमांचा हार!२

मने राखणे ज्याला जमले
त्या मनुजाला सौख्य लागले
तृप्तिचा परिमळ दरवळणार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९० (३० मार्च) वर आधारित काव्य.

भगवंताचा धरावा आधार। सुखाने करावा संसार।

Thursday, March 20, 2025

राम आहे रक्षिता ..

राम आहे रक्षिता, राम आहे रक्षिता!ध्रु.

काळजी कसली नको
भीति चित्ती लव नको
राम नाही तो निजेला, राम आहे मागुता!१

यत्न तो सोडू नये
गर्व शिरि वाहू नये
"मीपणा"सी सोडता, राम आहे रक्षिता!२

मीपणाने दुःख येते
देहबुद्धी त्रास देते
देहबुद्धी भंगिता, राम आहे रक्षिता?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८० (२० मार्च) वर आधारित काव्य.

भीति न बाळगावी चित्ती। रक्षण करणार आहे रघुपति।।
न करा काळजीला। राम नाही तो निजला।।
म्हणावा प्रपंच रामाचा झाला।।
जे जे मीपणाने केले। ते ते दुःखाला कारण झाले।।
देहबुद्धी धरून राही। त्याला कोठे सुख नाही।।
जेथे मीपणाचे ठाणे। तेथे दुःखाचे साम्राज्य असणे।।
ज्याला म्हणावे मी माझे। त्यावर सत्ता न माझी गाजे।।
म्हणून माझे मीपण। हेच दुःखाला कारण।
रामाचे होण्याने होईल निवारण ।।

Tuesday, March 18, 2025

सुखासाठी खटपट व्यर्थ व्यर्थ जाते

सुखासाठी खटपट व्यर्थ व्यर्थ जाते
भुलोनिया मृगजळा हरिण धाव घेते!ध्रु.

मुळात प्रपंच खोटा
त्यात सुख शोधू जाता -
कण ही न गवसे हाती, निराशाच होते!१

प्रपंच हा नाही माझा
असे केवळ रामाचा
मनी वागविता भाव, वृत्ति शांत होते!२

ईशकृपा करिते काम
आळविता आत्माराम -
शरण गेलिया रामाते कृतार्थता भेटे!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७८ (१८ मार्च) वर आधारित काव्य.

प्रत्येक जण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांस वाटत असते व त्याकरिता जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणास सुख झाले आहे? आपली लोभाची हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कोणी कधी तृप्त झाला आहे का? प्रपंचच जेथे खोटा तेथे सुख कसले मागता? प्रपंच माझा नाही, तो रामाचा आहे, असे म्हणा म्हणजे झाले. हे दिसण्यास सोपे आहे, पण आचरणात आणण्यास अत्यंत कठीण आहे. ते परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय साधायचे नाही. याकरिता रामाला अनन्य भावाने शरण जावे म्हणजे त्याची कृपा होईल. त्याच्या कृपेला तुम्ही देहबुद्धीचा बंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवावे. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा. खरोखर राम तुम्हांस सुखी करील.

Monday, March 17, 2025

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!

सोड प्रपंचाची चिंता, शरण जाय भगवंता!ध्रु.

निजकर्तव्या पाळावे
घडी घडी नाम घ्यावे
उपासना हीच थोर आवडते अच्युता!१

चित्ति असो समाधान
सखा मान नारायण
तोच पाठिराखा भक्ता तोच एक त्राता!२

नामस्मरणी रंगावे
देहभान विसरावे
लेकुराची चिंता वाहे सदोदित माता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७७ (१७ मार्च) वर आधारित काव्य.

सत्वगुणात भगवंत असतो, तेव्हा त्या मार्गाने जावे. सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली, तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी. जे फळ येईल ते भगवंताच्या इच्छेने आले या भावनेने समाधान मानायला पहिल्यांदा आपण शिकावे. मागील आठवणींनी आणि उद्याच्या भीतीने आपण काळजी करीत बसतो. ही काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करते. उद्याच्या काळजीने आजची भाकरी आपल्याला गोड लागत नाही याला काय करावे? यावर रामबाण असा एकच उपाय आहे, तो म्हणजे आजपासून आपण काळजी करण्याचे अजिबात सोडून देऊन, तेवढा वेळ भगवंताच्या नामस्मरणात घालविणे.  असले तर असू दे व नसले तर नसू दे, अशा मनाच्या अवस्थेत जो राहील त्यालाच काळजी सुटेल.

Saturday, March 15, 2025

माझी ओळख पटु दे मजला!

"मी देवाचा" कळू दे मजला
माझी ओळख पटु दे मजला!ध्रु.

सत्यावरती पडली छाया
तीच तीच झालीसे माया
ब्रह्म कसे संबोधू तिजला?१

नासे माया, उपजे माया
उपजे तैसी नासे माया
भला भलाही तिने भुलविला!२

उपाधीविना मी भगवंत
भोगत ठायी सौख्य अनंत
केव्हां अनुभव येईल मजला?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चाल : गमते सदा (भीमपलास)
 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७५ (१५ मार्च) वर आधारित काव्य.

खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते, तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले म्हणून समजावे. सत्यावर छाया पडली तीच माया झाली. वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. जे विपरीत दिसते ते ब्रह्म कसे म्हणावे? म्हणजे माया ही नासणारी आहे भंगणारी आहे. भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया. एक भगवंत फक्त सत्यस्वरूप आहे, त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय. "मी देवाचा आहे" हे कळणे, याचे नाव आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय; म्हणजेच मायेला दूर सारणे. वास्तविक उपाधिरहित जो "मी" तोच भगवंत आहे. आपल्या वाट्यास येणारी चांगली अगर वाईट करणे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे.

Friday, March 14, 2025

आपलेपणा संसाराचा ईश्वराकडे वळवा

आपलेपणा संसाराचा ईश्वराकडे वळवा-
रामा भजने आळवा! ध्रु. 

"मीपण" विसरा, विश्वी पसरा 
कुणी न दुसरा, राम सोयरा!
प्रभु निजकर्मी पहावा!१

स्वार्थ साधता, प्रेम आटते 
लोभ टाकिता, सौख्य लाभते -
त्यागी देव दिसावा!२

भगवंताविण अपुले नडते,  
सहवासा त्या मन धडपडते- 
हृदयी राम वसावा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७४ (१४ मार्च) वर आधारित काव्य.

प्रेम हे लहानपणापासून सर्वांना उपजत येत असते. एकदा आपले मानले की आपोआप प्रेम निर्माण होते. परमार्थ हा काही प्रपंचापासून वेगळा नाही. स्वार्थाच्या प्रेमापासून सुख कसे लागेल? प्रपंचात आपण कर्तव्य बुद्धीने वर्तावे. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळकाळ यायला लागतो, तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करा, आणि भगवंता हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे म्हणा, म्हणजे आपोआप भगवंताचे प्रेम लागेल. प्रपंचातील जे आपलेपण आहे ते भगवंताकडे वळवा. घरातल्या मंडळींवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिका, म्हणजे परमार्थ आपोआप साधेल व आपलेपणा भगवंताकडे वळवल्यामुळे भगवंतावर प्रेम जडेल याकरता काही वेगळे करणे नको. हा आपलेपणा निर्माण होण्यासाठी भगवंतावाचून आपले नडते ही भावना झाली पाहिजे. याकरिता आपण त्याच्या अखंड सहवासात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्या नामस्मरणानेच ही गोष्ट सहज शक्य आहे.

Wednesday, March 12, 2025

आनंदरूप परमात्मा, अनुभव हा घ्यावा घ्यावा!

आनंदरूप परमात्मा, 
अनुभव हा घ्यावा घ्यावा!ध्रु.

रघुनाथ देत विश्रांती 
चित्तासी मिळते शांती 
विषयाचा संग सुटावा!१ 

सत्कर्मे हातुनि घडता 
हळुहळु गळू दे ममता 
याकरिता राम स्मरावा!२ 

कर्मे नच कोणा टळती 
बांधते जनां आसक्ती 
प्रभु कर्ता बोध ठसावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७२ (१२ मार्च) वर आधारित काव्य 

परमात्मा हा आनंदरूप आहे. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. आपण विषयातून आनंद घेऊ पाहतो आणि तो बाधक होतो. आपण सत्कर्मे करताना पोटात विषयाचे प्रेम ठेवून ती केली तर त्यामुळे विषयच पोसला जाऊन, त्यापासून त्याला समाधान लाभू शकत नाही. कर्म कसे करावे तर त्याच्यातून वेगळे राहून. कर्माशिवाय कोणालाच राहता येत नाही. परंतु ती कर्मे "राम कर्ता" ही भावना विसरून केल्यास बाधक होतात, आणि मरणापर्यंत माणूस पुढील जन्माचीच तयारी करीत राहतो. तेव्हा, देहाने कर्म करतानाही "कर्ता मी नव्हे" हे जाणून कर्म करावे.

Sunday, March 2, 2025

नामी राहुनि स्वयें दुजाते नामा लावावे

नामी राहुनि स्वयें दुजाते नामा लावावे 
रामाचे व्हावें।ध्रु.

राम कर्ता, राम दाता
राम भोक्ता, राम त्राता 
ऐसे जाणावे!१

विषयाचे खत वाढवि मीपण
संकट येते अतीव दारुण
ते तर टाळावे!२

सर्वांभूती नम्र जाहला 
अहंपणा सोडतो तयाला
स्वतःस विसरावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६२ (२ मार्च) वर आधारित काव्य.

खरोखर जगात माझे जर कोणी अनहित करणारा असेल तर तो मीच. विषयाचे खत घालीत गेले की मीपणा वाढत जातो. प्रापंचिकांत व संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात व आम्ही आपल्याकडे घेतो. विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्मास येऊन एकच करावे आपण नामात राहावे व दुसऱ्याला नामाला लावावे. भगवंताच्या स्मरणात स्वतःला विसरावे. राम कर्ता म्हणावे की सुख, कल्याण, सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा व आनंदात राहा, त्यातच खरे हित आहे. आकाशाचे छत्र जसे सर्वांवर आहे, तसे भगवंताचे छत्र सर्वांवर आहे अशी खात्री बाळगा.