Sunday, April 27, 2025

समर्था स्वीकारा वंदना!

समर्था स्वीकारा वंदना!ध्रु.
 
विषयासी आधीच जाणले 
सावधपण आचरणी आले 
केले पलायना!१ 

अंतरात या कुठला काम? 
माझा दाता एकच राम! 
ऐकविले वचना!२ 

अंगी अपुल्या खरी विरक्ती 
मनी उमलली कोमल भक्ती
लाजविले चंदना!३ 

प्रपंच जैसा काळा फत्तर 
त्यातुनि परमार्थाचे अत्तर 
काढुनि दिधले जना!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११८ (२७ एप्रिल) वर आधारित काव्य 

हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात. पण मातीतून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकवणारा कोणी असेल तर ते समर्थच होत. समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून "सावधान" म्हटल्या बरोबर ते पळून गेले. समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही, परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत. उपासना चालवत असता जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही, दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे.  समाजातील ज्या वर्गामध्ये परमार्थाच्या शिकवणीची जरुरी आहे, त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संताचे काम आहे. समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात.

Thursday, April 24, 2025

संतग्रंथ बहुमोल ठेवा..

संतग्रंथ बहुमोल ठेवा -
प्राणपणाने जतन करावा!ध्रु.

व्यवहारी वेदान्त आणिला
आचरिला मग सहज विवरिला
बोध त्यातला सुमधुर मेवा!१

मृत्युपत्रसम लेखन त्यांचे 
आचारास्तव वाचायाचे
लाभ घडिघडी करुनी घ्यावा!२

तळमळ त्यांच्या अंतरि उत्कट
थापटण्याने थोपटती घट
उद्धरिण्यासी या जड जीवां!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११४ (२३ एप्रिल) वर आधारित काव्य.

आपल्याला आपल्या परीने जो मोठा वाटतो त्याचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. जगात नाना प्रकारचे लोक असतात. जगातील सर्व सुख आपल्याकरिताच आहे, कशाचेही आपल्यावर बंधन नको असे एक जण म्हणतो; तर दुसरा म्हणतो शास्त्राप्रमाणे राहावे व आपले हित साधावे;  कुणाचेही नुकसान करू नये. तिसरा म्हणतो लोकांचे नुकसान झाले तरी चालेल आपले हित साधावे; तर चौथा म्हणतो प्रपंच परमार्थाची पायरी आहे, व भगवंत आपला कसा होईल हे पाहावे. एकंदरीत कोणीही माणूस असू द्या मी आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटते. संतांचे ज्ञान स्वतंत्र असते व ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले हे ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो.

Monday, April 21, 2025

गीतेसंगे जीवन रंगे श्रीकृष्णाची ही मूर्ती!

गीताध्याने गीताभ्यासे आनंदाची हो प्राप्ती 
गीतेसंगे जीवन रंगे श्रीकृष्णाची ही मूर्ती!ध्रु.

घरात गीता, करात गीता मनात नांदे गोविंद 
सुरात गीता, लयीत गीता अभ्यासाचा हा छंद 
गाता गीता कळते गीता विश्रांतीची विश्रांती!१ 

तनु ही येई तैशी जाई शोक कशाला देहाचा
अनादि आत्मा, अनंत आत्मा घोष असे हा गीतेचा 
अशाश्वताचा मोह नसावा, फली नसावी आसक्ती!२

कृष्णच कर्ता कृष्ण करविता राहो द्यावे हे भान 
मनापासुनी कर्मे करता अंतरात प्रकटे ज्ञान
त्या ज्ञाने संतोष मनाला, राहावयाला ये शांती!३

स्वभाव अपुला बदले गीता धनंजयाला पहा पहा
विषाद जाउन प्रसन्नता ये चमत्कार हा पहा पहा
चिंतन करता तत्त्वार्थाचे कळते जगण्याची युक्ती!४

असो कोठला प्रश्न तयाचे उत्तर देते श्रीगीता
पडता रडता कडेवरी घे ऐसी प्रेमळ ही माता
उदात्त उन्नत मंगल जीवन जगण्यासाठी दे स्फूर्ती!५

जगण्या मरण्यासाठी लागे सत् तत्त्वाचा आधार
म्हणून निर्गुण सगुण जाहले निराकार हो साकार
आनंदे श्रीराम वंदितो गीतादेवी सप्तशती!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३.०१.१९८५

Saturday, April 19, 2025

नामस्मरणाचा उपाय हा साधा!

संत वैद्य घालवीती भवरोगबाधा!
नामस्मरणाचा उपाय हा साधा!ध्रु.

कृपावंत थोर 
सद्गुरु उदार 
स्वये माय होती दीना अनाथा!१

संतसंग देती
नामी ठेवताती
पथ्य सांगताती सुखविण्या आर्ता!२

संत मायबाप
निवारिती ताप
वरदहस्त त्यांचा स्पर्शितसे माथा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११० (१९ एप्रिल) वर आधारित काव्य.

वैद्याने सांगितलेले औषध व पथ्य एखाद्या मनुष्याने पाळले नाही तर त्यात त्या वैद्याचे काहीच नुकसान होत नसते त्याप्रमाणेच आपणास गुरु सांगत असतो, संत लोक जे आपणास करण्यास सांगतात त्यात त्यांना स्वतःला काही मिळवावयाचे नसते. त्यांचे ऐकल्याने आपलाच फायदा होत असतो. ते आपणास भवरोग झाला आहे असं सांगतात, व त्याकरिता संतसंग करा व नामात राहा म्हणून सांगत असतात. ते जे सांगतात ते स्वतः अनुभव घेऊनच सांगत असतात. संत तुकारामांनी आपल्या उपासनेची शपथ घेऊन सांगितले आहे की नामस्मरणासारखे सोपे साधन नाही. त्यांनी तुमच्या कल्याणाकरताच ते साधन सांगितले आहे; हे तुम्ही न कराल तर त्यात त्यांचे काहीच नुकसान नाही, नुकसान तुमचेच आहे.

Friday, April 18, 2025

संत आपणा हेच सांगती "तू देवाचा!तू देवाचा!

नाम घ्यावे मना वदावे "मी देवाचा! मी देवाचा!
संत आपणा हेच सांगती "तू देवाचा!तू देवाचा!ध्रु.

विषयाचा मी कुणी नसे
भगवंताहुनि भिन्न नसे
विभक्त नाही "त्याच्यापासुनि" घोष चालु दे नित्याचा!१

नाम घ्यावे हे स्मरण्यासी
नाम घ्यावे अभिषेकासी
नामजलाच्या धारा करतिल प्रसन्न आत्मा शंभूचा!२

झुळझुळेल मग अंतरि गंगा
मनातला शिव होइल जागा
हातुनि घडते ते देवाचे विषयच ईश्वर ध्यानाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०८ (१७ एप्रिल) वर आधारित काव्य.

नाम घेताना आपण नाम कशाकरिता घेतले, त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे. संत, तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस, असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी, व याकरिता ते नाम घ्यायला सांगतात.  नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे असे मनाला सांगणे. रामास पक्के ओळखता आले पाहिजे. याकरिता अंत:करणाची पवित्रता पाहिजे; शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधने केली, पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे पण भाव ठेवून साधने केली म्हणजे प्राप्ती लवकर होते. वास्तविक जे जे काही तुम्ही करीत आहात ते मीच करीत आहे माझी इच्छा तशी आहे असे मनी दृढ करून वागावे. तुम्ही असे भेदबुद्धीने का वागता? मीच तुमच्या हृदयात असून तुमच्या बुद्धीस प्रेरणा करतो असे का मानत नाही?

Wednesday, April 16, 2025

देहात न असती संत त्या शोधावे वचनांत!

देहात न असती संत
त्या शोधावे वचनांत!ध्रु.

निर्विषयच चित्त तयांचे
ते केवळ रघुनाथाचे
ते जनी बघति एकांत!१

मातेसम करिती माया
माथ्यावर धरिती छाया
निरपेक्ष कर्म ही रीत!२

उपदेशासम वागू या
दृढनिश्चय तो मागू या
हृदयात वसे भगवंत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०७ (१६ एप्रिल) वर आधारित काव्य.

भगवंताची भेट घ्यायची असल्यास संत जेथे राहतात तेथे आपण जावे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून वचनांत आहे. शिष्य केलला खरा पण साधनांत त्याची जर प्रगती होत नसेल तर संतांना वाईट वाटते. संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगी होत नाही; त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत. संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे. मानाची अपेक्षा करू नये. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात हे ओळखून आपण त्यांची संगत करावी.

Thursday, April 3, 2025

सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधु समजावे!

सर्व ठिकाणी दिसे देव त्या साधु समजावे!ध्रु. 

चराचरी भगवंतचि भरला 
ऐसा अनुभव संतत आला 
मातृप्रेमा ज्याच्या हदयी त्याला संत म्हणावे!१

देहधारी परि असे विदेही 
हीण सुवर्णी लवही नाही
चोखट सोने असे वागणे त्याला साधु म्हणावे!२

"चित्त शुद्ध कर" देवा विनवी
सोऽहं बोधी स्वतःस रमवी
लोकांकरिता जगतो मरतो त्यासी- संत म्हणावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९४ (३ एप्रिल) वर आधारित काव्य.

संतांना कसे ओळखावे?
साधु देहात नसतात हे खरे; परंतु म्हणून ज्यास देह आहे तो साधु नाहीच असे होत नाही. जो सर्व ठिकाणी देवास पाहतो तो साधु. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो,  त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्मरूपाने असतात असे समजावे व आपण लगेच देवास शरण जाऊन "हे माझे दुर्गुण काढून टाक" म्हणून त्याची करुणा भाकावी. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःस आधी सुधारावे. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्याला सर्व ठिकाणी भगवद्भाव उत्पन्न होणार नाही. आपण परमात्म्याची करुणा भाकून त्यास शरण जावे व माझे चित्त शुद्ध कर अशी त्यास विनंती करावी. वासनेतून वृत्ती, वृत्तीमधून उर्मी आणि उर्मीमधून कृती असा क्रम आहे. माझ्याकरता जगत् नसून मी जगताकरिता आहे ही वृत्ती आपण ठेवावी.

Tuesday, April 1, 2025

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!

साधुसंतांची संगत, करी चित्तास उन्नत!ध्रु.

ज्याशी घडते संगत
त्याचे गुण अंगी येत
असू द्यावे नाम मुखी, तेच करील सोबत!१

अन्न ऐसेचि सेवावे
भक्ती अंतरी बळावे
संतसदनीचे अन्न याचसाठी सेवितात!२

संतसंगे लाभ होतो
देव आटोक्यात येतो
मग रामाशी घडते नित्य अंगत पंगत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९२ (१ एप्रिल) वर आधारित हे काव्य.

मनुष्याच्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्व पुण्याईमुळे लाभते. ज्याच्याशी आपण संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. अन्नाने वासना बनते, म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. संतांच्या देहाची संगती सगळ्यांनाच लाभते असे नाही. सत्पुरुषांची संगत ही उत्तम होय. सत्संगतीपासून सद्‍वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात. नामाची संगत हीच सर्वात उत्तम सत्संगत होय.