Sunday, March 10, 2013

ॐ नमः शिवाय

महाशिवरात्रीच्या दिवशी १९९६ साली छापलेली एक कविता आत्ता सापडली ती येथे देत आहे

ॐ नमः शिवाय
ॐ नमः शिवाय ॥ध्रु.॥

शिवमंदिरी मी नित जावे
दर्शनास आतुर व्हावे
त्वरा करुन धावत पाय
ॐ नमः शिवाय ॥१॥

शिवनामाचा छंद जडो
शिवकार्यी तनु अंति पडो
याविण मागू काय?
ॐ नमः शिवाय ॥२॥

शिवस्मरण करता घडता
पटे जगण्याची सार्थकता
अता न सोडी शिवपाय
ॐ नमः शिवाय ॥३॥

कोण राहते तनावरी?
शिव शिव जिव्हे वेग करी
जीवन वाया जाय
ॐ नमः शिवाय  ॥४॥

पुत्राची ममता सोडी
पतिपत्निंची ती जोडी
चिलयाही करि साह्य
ॐ नमः शिवाय  ॥५॥

एकतारी घे तू हाती
चिपळ्यांना ही कर साथी
शिवस्तुति तू गाय
ॐ नमः शिवाय  ॥६॥

उतर पाय-या हळू हळू
मन लागे बघ उजळू
शीतल होइ काय
ॐ नमः शिवाय  ॥७॥

शिवलीलामृत वाचावे
तरीच मी शिव म्हणवावे
चिंतन शुद्ध उपाय
ॐ नमः शिवाय  ॥८॥

स्मशान नाही वर्ज्य कधी
मरण स्मरे तो खरा सुधी
आतुन बदलत जाय
ॐ नमः शिवाय  ॥९॥

द्वंद्वांना उल्लंघावे
तरीच नरजन्मा यावे
असाध्य जगती काय?
ॐ नमः शिवाय  ॥१०॥

अकरा अकरा बहु अकरा
कुवासनांचा हो कचरा
शिवनाम राम नित गाय
ॐ नमः शिवाय  ॥११॥

श्रीराम बाळकृष्ण आठवले





No comments:

Post a Comment