Sunday, March 10, 2013

महाशिवरात्रीनिमित्त




१९९६ मधे महाशिवरात्रीनिमित्ताने छापलेली अण्णांची ही अजुन एक कविता


स्मशानवासी शंकर स्मरणे
कैलासावर मने पोचणे
सांब सदाशिव हर हर म्हणणे
काळाचे भय मुळी न धरणे ॥१॥

जो पाठवितो, तो बोलवितो
जो खेळवितो, तो झोपवितो
जो धोपटतो, तो थोपटतो
उग्र भासतो, सौम्यच असतो ॥२॥

शंकर शंकर नाम शुंभकर
तो विश्वेश्वर तो करुणाकर
तोच सदाशिव तो भूतेश्वर
महाबळेश्वर ओंकारेश्वर ॥३॥

कोणी वंदा, निंदा कोणी
ढळे न कधि आसनावरुनी
तृतीयनेत्रे काम जाळुनी
जनां रक्षिले तत्पर ध्यानी ॥४॥

नंदी वाहन सखी पार्वती
गंगा धरली माथ्यावरती
त्रिशूळ शोभे एका हाती
सोहं डमरू दुस-या हाती ॥५॥

कंठ विषाने झाला काळा
जुमानले ना कळिकाळाला
रामनाम दे पराशांतिला
गौरीहर हरिध्यानी रमला ॥६॥

नरनारींची एकरूपता
उभयांचा गुणसंगम होता
महेश नारी नरहि तत्त्वता
भेदाभेदांची नच वार्ता ॥७॥

प्रातःकाली  संध्याकाळी
नामजपाने शांती लाभली
साधकास तर नित्य दिवाळी
आत्मप्रभा देहात फाकली ॥८॥

पुनरपि जननं पुनरपि मरणं
कालचक्र फिरतेच असू दे
व्याघ्रांबर फणिवरधर शंकर
अभयदान देतसे दिसू दे ॥९॥

असुनि नसावे नसुनि असावे
शिवापासुनी हेच शिकावे
मंदस्मित वदनी विलसावे
तत्त्वचिंतनी रंगुनि जावे ॥१०॥

अकरा कडवी महेश लिहवी
श्रीरामाला तोच जागवी
जे जे कळले जनांस शिकवी
हर हे सांगे तिमिर घालवी ॥११॥




No comments:

Post a Comment