अध्याय दुसरा - सांख्य योग
ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
शिष्य तुझा मी पार्थ बोलला भगवंताला शरण गेला
करू काय मी? प्रश्नच पडला कढत आसवे ढाळू लागला
ज्याचा शोक करायला नको अर्जुन त्याचाच शोक करतो
शिकवावे जर त्याला काही, पांडित्याच्या बाता मारतो
वस्त्र पुराणे जसे टाकणे जीर्ण शरीरा सोडून देणे
यात रडण्यासारखे काय नव्हे देह मी घोकत जाय
लढावेच लागते क्षत्रियाला या कर्माचा का कंटाळा?
लढून जिंकता राज्य लाभते रणात मरता कीर्ती होते
आत्म्याचा जो करी विचार तो ना केव्हाच बावरणार
ऊठ अर्जुना निर्धार कर चापबाण तू हाती धर
रणात लढणे धर्म तुझा नकोस शोधू मार्ग दुजा
लाभहानि समान मान सुखदु:खांना समान मान
ऐसी संधी येणार नाही शत्रूंना कर त्राहि त्राहि
कर्म करावे तो अधिकार अरे फलाचा नको विचार
कर्म टाळतो दळभद्री खांद्यावरती झोळी धरी
यश येवो अपयश लाभो देह भले राहो जावो
समत्व ज्याला हे जमले तो तर तरला योगबले
भगवंताचा हा आवेश मोह घालवण्या नि:शेष
ज्याची प्रज्ञा स्थिरावली महीवरी तो महाबली
आत्म्यातच जो संतुष्ट त्याला ना कुठले कष्ट
दु:ख न करते उद्विग्न सुखे न जाई हुरळून
हवे नकोची ना बाधा सत्पुरुषाला त्या वंदा
प्रसाद जर हृदयी भरला बुद्धी स्थिर तेथे अमला
कृष्ण स्वये तैसा होता निर्वातीचा दीप जसा
ऐकत राही धनंजय जमेल मजला मनोजय?
पाठीवर मायेचा हात बघता बघता गीता पाठ
मन सारे एकवटून ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment