अध्याय पहिला
अर्जुनविषादयोग
ऐकव गीते तुझी कहाणी निर्मळ निर्मळ तुझी वाणी
धनुर्धराला काय झाले ’धनुष्यबाण’ गळून पडले
मोहन जवळ असतानाही ऐसे कैसे मोहे गिळले?
पंडु सुताचा ऐसा विषाद कधी कोणा झाला होता?
महाभारती रणांगणावर नवलाचेही नवल घडले
शस्त्रे टाकून धनंजयाने शांतीवरती प्रवचन झोडले
कृष्णावाचून श्रोता कोण? रथा सारथी दुसरा कोण?
त्याने सर्व ऐकून घेतले, रोगनिदान मनात केले!
बोललाच नाही एक अक्षर, पार्थाचा जीव खालीवर
तोंड कोरडे, भोवळ आली, कंप सुटला देहाला
जो युद्धाचा हेतू होता त्याचाच विसर पडलेला
आचार्यांना आप्तांनाही रणात मारून मिळणार काय?
त्रैलोक्याचे राज्य नको मज, शस्त्रत्यागा ना पर्याय
यावर काय बोलू तरी मी, वेडा सांगे तत्त्वज्ञान
विवेक ज्याला गेला सोडून, त्याचे सगळी सुटले भान
तो जे बोले बोलू द्यावे, तो जे ओके ओकू द्यावे
झुंजेन मी घमेंड होती, नाही लढणार खोटी उक्ती
एक विषण्ण, एक प्रसन्न, का ही ऐशी होते स्थिती?
घसरणारा घसरत गेला, बोलून सगळे पुरता थकला
आता पुढे होणार काय, कृष्ण काही सांगणार काय?
गीता सांगते या ना आत, चालणार्याला मिळते वाट
ऐसे घेई विश्वासात, सर्वच गीता करूया पाठ
जुळले नाते आईचे, मुलेबाळे आवडीची
संवादाची रुचि घेत, ऐका कहाणी गीतेची, ऐका कहाणी गीतेची
No comments:
Post a Comment