"गीत गणेशायन"
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले
संगीतकार : मोहिनीराज ओंकार
माझ्यावर असेच प्रेम ठेवा. विनायकाने नगरवासियांना त्यांचा निरोप घेताना हात जोडून असे म्हटले होते. नगरवासियांना विरह असह्यच होणार होता. नाही तरी निरोपाचे क्षण अवघडच असतात. काशीराज विनायकासह कश्यपांकडे आला. अदितीला क्षणभरही राहवले नाही ती धावतच पुढे आली आणि मुलाला दृढ आलिंगन दिले. सर्व इतिहास कानी आला. आईनं बाळाची दृष्ट काढली. विनायकाने मातापित्यांशीही निरोपाचीच गोष्ट काढली. लग्न, प्रपंच कसल्याच उपाधीमध्ये हा महापुरुष अडकला नाही. आपल्या माय तातांना उद्देशून विनायक म्हणाला -
निजधामाला जाऊ दे
निरोप दे! निरोप दे!ध्रु.
कार्य येथले आता संपले
कार्यक्रम ते शेष न उरले
परतू दे, परतू दे!१
स्वराज्य व्हावे ध्यास तुम्हाला
स्वराज्य आले अनुभव आला
निरोप दे! निरोप दे!२
तप केलेसी उदरी आलो
वात्सल्ये न्हाऊनि निघालो
परतू दे, परतू दे!३
मातृभूमिचे शत्रू मारले
तुझिया पुत्रा स्वतंत्र केले
निरोप दे! निरोप दे!४
राज्यव्यवस्था आखुन दिधली
शांति रहाया आली आली
परतू दे, परतू दे!५
No comments:
Post a Comment