Sunday, December 16, 2018

रघुनाथाला शरण जाउनी मी माझे हे विसरावे..

दहा इंद्रियांच्या देहाला दशरथ राजा शोभे नाम
नाम स्मरता वेध लावितो 'आत्मा म्हणजे तो श्रीराम'!१
'कौसल्या, कैकेयि, सुमित्रा' त्रिगुणांच्या त्या प्रतीक हो
जरी नियंत्रित देती त्या सुख सूत्र निरंतर स्मरणे हो!२
रामचंद्र आराम मनाला विवेक, संयम तिथे असे
सत्यवचन, अमृतमय भाषण स्वभाव त्याचा ठरलासे!३
लक्ष देउनी कार्य करतसे अनुजा लक्ष्मण नाव असे
रामच होते लक्ष्य मनाचे बंधुप्रेमा मनी वसे!४
भाव मनी भरताच्या भरला राम तयाचा प्राणच हो
रामपादुका झाल्या दैवत कर्तव्याने पूजन हो!५
विकारांस ना स्पर्शू देई शत्रु मर्दना सुसज्ज हो
शत्रुघ्नहि ते नाव शोभते आक्रमणा कुणि धजे न हो!६
सेवा हे सौन्दर्यच होते जनकसुता ती सीता हो
पतिव्रता, त्यागाची मूर्ती, सात्त्विकता ती होती हो!७
बलभीमाविण रामायण ना सेवा, शक्ती, युक्ति तशी
कर जुळलेले उत्सुक कार्या मनात ठसली मूर्ती अशी!८
मना माझिया रामनाम गा आवड त्याची लागेल
जीवनातला राम दिसे मग समाधान तुज लाभेल!९
बिभीषणाला अभय लाभते असत्पक्ष जर सोडतसे
पश्चात्तापे मन हो निर्मळ झोप सुखाची लागतसे!१०
कर्तव्याला मानुन पूजन पूजनात त्या रंगावे
रघुनाथाला शरण जाउनी मी माझे हे विसरावे!११
घरोघरी श्रीरामकथा ती पोचावी हे स्वप्न मनी
रामदास प्रज्ञाबल पुरवी कृतज्ञता ही फुले तनी!१२

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment