Wednesday, December 19, 2018

गीता गात जगावे..

उत्साहाचे अमृत प्यावे
       गीता गात जगावे!ध्रु.
कर्मावरती अधिकार
हा तर मुख्य विचार
       फल कृष्णा अर्पावे! १
तनु ही येई तैशी जाई
आत्मा जैसा तैसा राही
       चिंतनात रंगावे!२
तुझे कर्म हा यज्ञच आहे
तया टाळणे पातक आहे
       समाजऋण फेडावे!३
दोष आपले जाणुन घेई
लयास त्यांना नेई नेई
       सद्गुण शिकुनी घ्यावे!४
सुखात अथवा संकटातही
तोल मनाचा ढळू न देई
       सुशांत नित्य असावे!५
जे कळले आचरणी येते
आचाराने जनांस रुचते
       हरिचा दास म्हणावे!६
श्रीगीता मातांची माता
गीता कळते गाता गाता
       गात गात शिकवावे!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

No comments:

Post a Comment