संतग्रंथ बहुमोल ठेवा -
प्राणपणाने जतन करावा!ध्रु.
प्राणपणाने जतन करावा!ध्रु.
व्यवहारी वेदान्त आणिला
आचरिला मग सहज विवरिला
बोध त्यातला सुमधुर मेवा!१
मृत्युपत्रसम लेखन त्यांचे
आचारास्तव वाचायाचे
लाभ घडिघडी करुनी घ्यावा!२
तळमळ त्यांच्या अंतरि उत्कट
थापटण्याने थोपटती घट
उद्धरिण्यासी या जड जीवां!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ११४ (२३ एप्रिल) वर आधारित काव्य.
आपल्याला आपल्या परीने जो मोठा वाटतो त्याचे अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करतो. जगात नाना प्रकारचे लोक असतात. जगातील सर्व सुख आपल्याकरिताच आहे, कशाचेही आपल्यावर बंधन नको असे एक जण म्हणतो; तर दुसरा म्हणतो शास्त्राप्रमाणे राहावे व आपले हित साधावे; कुणाचेही नुकसान करू नये. तिसरा म्हणतो लोकांचे नुकसान झाले तरी चालेल आपले हित साधावे; तर चौथा म्हणतो प्रपंच परमार्थाची पायरी आहे, व भगवंत आपला कसा होईल हे पाहावे. एकंदरीत कोणीही माणूस असू द्या मी आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटते. संतांचे ज्ञान स्वतंत्र असते व ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. संतांनी लिहिलेले हे ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत. आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये, ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो.
No comments:
Post a Comment