
Monday, September 29, 2008
हरिगीतापाठ अध्याय ९
अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
ही तो राजविद्या हे तो राजगुह्य
पार्था निर्मत्सरा ऐक बापा
माझ्याठायी भूते मी न त्यांच्याठायी
आत्मा देहे बद्ध होत नाही
आसक्तीच नाही ऐसा उदासीन
कर्मे ऐशा मज बंध कैचा?
माझे हे स्वरूप न जाणती मूढ
अवमानिताती अज्ञानाने
भक्त होई माझा करी उपासना
कृष्ण सांगे रामा पावशील
Sunday, September 28, 2008
हरिगीतापाठ अध्याय ८
अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
जैसी ज्याला स्मृती तैसी त्याला गती
सोडवीता अंती दुजा कोण
मन करी स्थिर श्वासमण्यावर
ध्याई रमावर सर्वकाळ
हरीस स्मरावे हरिमय व्हावे
योगबले भावे सर्व साध्य
इंद्रिये रोधून मना दमवून
प्रणव जपून देह सोडी
कोण वाया गेला कृष्णध्यास ज्याला
अमृतात न्हाला राम बाळ
Saturday, September 27, 2008
हरिगीता पाठ अध्याय ७
अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
एखादाच कोणी लाखो सिद्धांतुनी
ज्ञान मिळवुनी धन्य होतो
जगाचा निर्माता पाळिता पोषिता
तसा तो संहर्ता जगन्नाथ
शशिसूर्यप्रभा वेदांती ॐकार
सुबुद्धात बुद्धी मीच आहे
गुणातीत व्हावे निर्गुणा जाणावे
पुण्यवंत पावे मोक्षपद
वासुदेव सर्व तारक हा भाव
कृष्णभक्त राम शांत स्वस्थ
Friday, September 26, 2008
हरिगीतापाठ अध्याय ६
अध्याय ६ - आत्मसंयमयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
करावा उद्धार आपला आपण
आपलाच नाश करू नये
मनास जिंकले शांतीस वरिले
स्थैर्य धैर्य आले रहावया
एकांती राहून मन आवरून
दुराशा टाकून योगाभ्यास
आत्म्याला पाहून आत्म्यात संतुष्ट
मुक्त ब्रह्मभूत योगी राहे
अभ्यासे वैराग्ये आपलेसे मन
करी जो सुजाण रामा वाटे
हरिगीतापाठ अध्याय ५
अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
संन्यास कर्माचा योग ही कर्माचा
दोघेही मोक्षाचा देती लाभ
पाहता ऐकता चालता बोलता
सखया तू पार्था स्मर मज
सुविद्य ब्राह्मण गज गय श्वान
सगळे समान योगयुक्ता
शुद्ध ज्याचे चित्त सर्वाभूती रत
पूर्ण निरासक्त जीवन्मुक्त
जिवंतपणीच मोक्षपरायण
तोच तोच धन्य राम सांगे
हरिगीतापाठ अध्याय ४
अध्याय ४ - कर्मब्रह्मार्पणयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
साधुंना रक्षाया दुष्टांना नाशाया
धर्म स्थापावया जन्म घेतो
दिव्य जन्मकर्म सूज्ञ जाणे मर्म
पुन्हा त्या न जन्म मिळे मज
फली आस नाही कर्मबाधा नाही
हे जो जाणे त्याही बंध कैचा?
झाला निरासक्त सत्कर्मा प्रवृत्त
तोच आत्मतृप्त निरामय
स्वकर्म करावे अंती ज्ञान घ्यावे
रामा वाटे ज्ञान अनमोल
Thursday, September 25, 2008
हरिगीतापाठ अध्याय 3
अध्याय ३ - कर्मयोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
कर्म केल्याविना कोणा राहवेना
सोडुनी साधना काय साधे?
जनी जनार्दन कर्म हाच यज्ञ
यज्ञाने यजून तोषवावा
जे जे ओघे आले कर्म आचरीले
चित्त शुद्ध झाले पूर्व भाग्ये
झुंज वैर्यासवे युद्धसिद्ध व्हावे
कामक्रोध नावे शत्रुंची त्या
सावध जो राही तो न गुंते मोही
विजयी तो होई राम सांगे
हरिगीतापाठ अध्याय २
अध्याय २ - सांख्ययोग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
देह येई जाई देही स्थिर राही
जन्म ज्यास नाही मृत्यु कैचा?
सोस सुखदु:खे माणसा तू सुखे
शांतीला ना मुके कदा काळी
कर्तेपण सोड एक हरि जोड
मायाबंध तोड ज्ञानशस्त्रे
सार हे योगाचे समत्त्व चित्ताचे
कर्मफल ज्याचे त्यास देई
स्थितप्रज्ञ होई सांगे गीतामाई
इंद्रियनिग्रही रामे व्हावे
हरिगीतापाठ अध्याय १
अध्याय १ - अर्जुनविषाद योग
करी गीतापाठ संस्कृत प्राकृत
अंतरी पहाट होईल बा
पार्थसारथी तो सूत्रधार होतो
शरण जो जातो पूर्ण त्याचा
प्रश्न ’करू काय’ धरी पाय
भूक गीतामाय भागवील
’लढेन मी’ गर्व ’न लढेन’ गर्व
देह मी हा भाव दु:खमूळ
जनांत मनात घोक गीतापाठ
कृष्ण धरी हात चालवाया
गीता कालातीत गीता स्थलातीत
गीत धर्मरीत राम सांगे
Saturday, September 13, 2008
Subscribe to:
Posts (Atom)