सान थोर या, राव रंक या
अवघे जन या या
गाउ या टिळकांचे गुणगान ॥ध्रु॥
भारतभूच्या उजळ ललाटी
’तिलक’ शोभला अक्षयकीर्ती
रत्नागिरीच्या खाणीमधुनी
झळके रत्न महान ॥१॥
’गंगाधर’ विद्यांचे आगर
’पार्वती’चेही तप दारुणतर
रविराजाच्या कृपाप्रसादे
पुत्रहि तेजोमान ॥२॥
सह्याद्रीच्या गिरिकुहरातुन
घुमे ’केसरी’चे घनगर्जन
राष्ट्राची जागली ’अस्मिता’
उफाळला अभिमान ॥३॥
मंडालेच्या सुदूर विजनी
स्थितप्रज्ञ रत गहनचिंतनी
कर्मयोगि हा लिहून गेला
गीताभाष्य महान ॥४॥
जन्मसिद्ध हक्कास्तव झटला
’स्वराज्य’ व्हावे ध्यास घेतला
यज्ञाची धगधगती ज्वाळा
उजळवि नभोवितान ॥५॥
गाउ या टिळकांचे गुणगान !
No comments:
Post a Comment