Sunday, April 30, 2017

ग्रंथालय - गंमतघर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने जानेवारी २००३ मध्ये एक ग्रंथालय विशेषांक काढला होता (शिक्षण संक्रमण) ग्रंथालय विशेषांक .  त्यातील श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेली ही कविता .. 


मानव्याचा मंत्रदाता.

१९६९ मध्ये महात्मा गांधीजी विषयक एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्याचे नाव होते  "तव चरणी ही अंजली"  त्यात महाराष्ट्रातील विविध कवींच्या ५४ कविता प्रकाशित झाल्या होत्या.  त्यातील श्रीराम आठवले यांची ही कविता,, मानव्याचा मंत्रदाता ..  



Thursday, April 27, 2017

ते माझे घर..




ते माझे घर! ते माझे घर! ध्रु.

आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर!१

कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर!२

भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर!३

परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर!४

मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर!५

ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर!६

बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, April 24, 2017

श्री स्‍वामी समर्थ जय जय स्‍वामी समर्थ

श्री स्‍वामी समर्थ जय जय स्‍वामी समर्थ
श्री स्‍वामी समर्थ सद्गुरु स्‍वामी समर्थ । ध्रु.

देह लोटला अपुल्‍या चरणी, गंगा यमुना नेत्रांमधुनी
हात फिरवला पाठीवरुनी, गोड झिणझिण्‍या कायेमधुनी
नरजन्‍म न व्‍यर्थ । 

स्‍वामी आपण रोखुन बघता, पापे जळली राखच उरता
त्‍या राखेला भस्‍म समजता, कवच जाहले भक्‍ताकरता
मग चिंता कमर्थ? २

देहामध्‍ये का गुंतावे? कल्पित भय का उरी धरावे?
मी माझे का घट्ट धरावे?  क्रोधाने का मीच जळावे?
नाम एक सत्‍य। ३

अशक्‍य जगती काही नाही, यत्‍न नराला वरती नेई
कष्‍टाविण यश कोणा नाही, श्रद्धेवाचुन जीवन नाही
सदाचरण पथ्‍य । ४

सुधारणा केव्‍हाही होते, पश्‍चात्‍तापे वृत्ति पालटे
मार्गावरती चालता नेटे राघव भेटे, माधव भेटे
सांगत गुरुनाथ। ५

Saturday, April 22, 2017

आरति श्रीरामाची

आरति श्रीरामाची
आरति पुरुषार्थाची । धृ.

राम जीवनी आणायाला
तसे पाहिजे वागायाला
या शुभसंकल्‍पाची । १

विवेक हे कोदण्‍डच हाती
निश्‍चय भाता भरला पाठी
जाण पूर्ण सत्‍याची । २

रामा ऐसा बंधू नाही
रामा ऐसा पतिही नाही   
कर्तव्‍यस्‍मरणाची । ३

सदाचार श्रीरामच आहे
सद्भावहि तो भरतच आहे
त्‍या भाविक भक्‍तीची । ४

सेवा सादर चरणांपाशी
दिव्‍या शक्‍ती मारुतिपाशी
शरणागत होण्‍याची । ५

सीता तर साधना जीवनी
ती समरसता मूर्त होउनी
अनुपमेय जोडीची । ६

चला आठवू राम प्रभाती
सोपवु सगळे रामाहाती
संधी साधायाची । ७

रामकथा ही ऐकायाची
श्रवणे, मनने मुरवायाची
दिव्‍योत्‍कट यत्‍नाची । ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

आरति हनुमन्‍ता

आरति हनुमन्‍ता, बलवन्‍ता
रामाच्‍या दूता ।
सत्‍कार्यास्‍तव उभ्‍या भारता
तू स्‍फूर्तीदाता । धृ

दास जसा तू, वीर तसा तू,
पंडित जैसा, गणनायक तू
सत्राणे उड्डाणे करती
भयचकीत चित्‍ता । १  

झेप घेतली रविबिंबावर
ढळली धरती, घुमले अंबर
अपूर्व शैशव प्रभंजना हे
प्रणाम धीमंता । २

दूतांमध्‍ये तूच अग्रणी
बुद्धिमंत तू जग वाखाणी
शोधलीस तू अचूक सीता
रामनाम ऐकता । ३  

भक्‍त खरा जो देवच झाला
वेगळा न तो कणही उरला
रामदास तू पहिला वहिला
पूर्णा श्रीमन्‍ता । ४

जवळी श्रीरामाच्‍या नेई
रामकृपा तू मिळवुन देई
दास्‍य भक्ति हातून घडावी
आस हीच आता । ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Tuesday, April 11, 2017

श्रीहनुमंतापाशी मागणे



श्रीहनुमंतापाशी मागणे 

मारुतिराया या देहातच दर्शन देई रे 
श्वासोच्छ्वासी सहवासाचा अनुभव देई रे ।। ध्रु ।।

प्रभातकाली रामनाम तू उच्चारून घेई 
पवनासंगे मनास अमुच्या जोडुन तू देई 
नीलगगनि तो राम सावळा दाखव दाखव रे ।।१।।

उद्योगी उत्साह तूच रे प्रयत्नात शक्ती 
रघुनाथाची भक्ति तूच रे योजनेत युक्ती 
नित्याची ती कर्मे घडता रामा भेटव रे ।।२।।

धरतीवरती पदे पडावी चलता ठेक्यात 
श्रीरामाचा जप चालू दे तेंव्हा हृदयात 
तेज रवीचे झळको वदनी अंजनिकुमरा रे ।।३।।

रुंद रुंदशी छाती द्यावी प्रहार झेलाया 
स्वकर्मकुसुमे गुंफू माळा तुजला पूजाया 
आत्मबुद्धिचा वज्रासम तू निश्चय देई रे ।।४।।

द्रोणागिरि पेलला करावर सांभाळुन आणला 
लंकेला जाळले, रावणा विक्रम दाखविला 
सीतेला शोधले प्रयत्ने विमल बुद्धी दे रे ।।५।।

'जय बजरंगा जय हनुमंता' जयजयकार करू  
तुझिया आशीर्वादे आम्ही अजिंक्य वीर ठरू 
बालक रामा दास्यभक्ति तू आपण शिकवी रे ।।६।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले