Friday, May 26, 2017

हे प्रभो, शिकवी नित्य मला, श्रद्धा दे विमला





हे प्रभो, शिकवी नित्य मला
श्रद्धा दे विमला ! ध्रु.

निराकार साकार तसा तू
जगती तैसा अंतरात तू
प्रगतिपथी ने मला ! १

यश आले तर नच हुरळावे
अल्प अपयशे मी न खचावे
योगबुद्धि दे मला ! २

सद्विचार पठणात असू दे
सत्कार्या प्रेरणा मिळू दे
चिंतनि रुचि दे मला ! ३

जीवनात जर गीता आली
दीपावलि तर सुंदर झाली
दाखव सुखसोहळा ! ४

धागा धागा अखंड विणता
विविधतेत मज दिसो एकता
राम विनवी हे तुला ! ५

सदाशिव पेठेतील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात बाल संस्कार वर्गात हे गीत समूह गान म्हणून भैरवी मध्ये म्हटले जात असे.

Sunday, May 21, 2017

घण घण घण घण घंटा सांगे, चला गं मिळवा विद्येला !

१९६८ साली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित कवितांमधील श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी लिहिलेली ही कविता :

पाटी पेन्सिल घेउन हाती 
पोरी चालल्या शाळेला!
घण घण घण घण घंटा सांगे
चला गं मिळवा विद्येला! ध्रु. 

शिक्षण ही तर सुवर्णसंधी 
हरेल दास्याची व्याधी
कुटुंबियांना सुखी कराया
ऐका या तर हाकेला !१

घराघरातील जर बाई शिकली
शहाणी होतील मंडळी सगळी
चला वंदुया घरी येणाऱ्या 
ज्ञानाच्या या गंगेला!२

जमलेल्या मुली हसती खेळती
मनापासुनी सगळ्या शिकती
मुक्त जाहली मने मुलींची 
अनुभवती आनंदाला!३

भरते आले आनंदाला
बघुन मुलींच्या उत्साहाला 
आनंदाश्रू नयनी येता 
कोण आठवे कष्टाला?४

स्त्री शिकली तर बने देवता
करील मग डोळस ममता
स्त्रीशिक्षण तर संस्कृती रक्षण 
हवे मर्म हे कळण्याला!५

--००00००--

Sunday, May 14, 2017

जीवनयात्रा - जन्म नि मरण ही दोन्ही टोके हाती धरतो हरी






जिथून आलो तिथे पोचता यात्रा होते पुरी 
जन्म नि मरण ही दोन्ही टोके हाती धरतो हरी ! ध्रु. 

मर्यादेतच जगता येते घ्या तर हरिनाम 
तळमळ तगमग द्या द्या सोडुन जवळच श्रीराम 
ध्यान करावे नाम स्मरावे असार संसारी ! १ 

आला दिसला गेला विरला कळे न हा गुंता 
आधी कोठे मागुन कोठे प्रश्न पडे चित्ता 
मी माझे मज शल्य राहते पीडित अभ्यंतरी ! २

देहापासुन देह जन्मला खात्री न ये देता 
उपाय ठरतो अपाय केव्हा न ये कुणा सांगता 
जीवनरेखा कसा वाढवी कुणीही ध्वनंतरी? ३

हात जोडले मस्तक झुकले उदरी पिशवीत 
जाताना कर ते जुळवावे नाम मुखे घेत 
सकाळ जन्म नि मरणहि संध्या जीवा ध्यानी धरी ! ४ 

विकार म्हणजे रोग मोह तो नश्वर देहाचा 
विवेक पथ्यच विचार औषध मी श्रीरामाचा 
आस न माझी उरो वेगळी भक्त प्रार्थना करी ! ५ 

किती जगावे मुळी न अपुल्या हाती जरि असले 
कसे जगावे गीताईने सुंदरसे शिकवले 
देहांतर स्वाभाविक मनुजा ज्ञानी भय ना धरी ! ६ 

शब्द जोडतो शब्द तोडतो मधाळ मित बोलणे 
कौतुक ते भरभरून करता प्रेम लाभते दुणे 
रोग जरी प्रारब्धे आला हरि शुश्रुषा करी ! ७ 

अनंतातुनी अनंताकडे जीवन या नाव 
हरि नावाडी पैलतिराला लावतसे नाव 
उगमी, मध्ये, विलयातहि नित नामच सोबत करी ! ८ 

हरिपाठाला गाता गाता आश्वासन लाभे 
मनोबोध तो म्हणता म्हणता पाठांतर शोभे 
शुभेच्छाच ती तप्ताच्या शिरि शीतल छाया धरी ! ९ 

हरि नाचवितो तसे नाचता वय वाढत गेले 
तन म्हातारे तरुण वासना आश्चर्यच घडले 
आपुलकीची दिठी परंतु हरि भक्तावर धरी ! १० 

मरणाचे जर कारण जन्मच जन्म वासनेमुळे 
सद्गुरुराया पार निखंदुनि टाकी सगळी मुळे 
सो s हं मधला अहं घालवी कृपा एवढी करी ! ११

तिथि द्वादशी कडवी बारा सुयोग जुळला खरा 
स्वानंदाचा ज्या त्या हृदयी झुळझुळलासे झरा 
चरणशरण मी स्वरूपनाथा रामा जवळी धरी ! १२ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२७.९.१९९६

या देहातच सगळे वसले हे ज्‍या कळले तो ज्ञानी..






ब्रह्मा विष्‍णु आणि महेश्‍वर अशी त्रिमूर्ती घ्‍या ध्‍यानी
या देहातच सगळे वसले हे ज्‍या कळले तो ज्ञानी ! ध्रु.
       वात पित्‍त कफ त्रिदोष जरी ते राखावा त्‍यांचा तोल
       समप्रमाणा महत्‍त्‍व देता मोदाचे येती डोल
       नरतनु सुंदर साधन झाले बनण्‍याला आत्‍मज्ञानी ! १
शैशव यौवन वार्धक्‍य ही ते एका देही अनुभवितो
आज्ञा होता नश्‍वर देहा धरेवरी सोडुन जातो
निजधामाचा अर्थ कळेना शोकी बुडतो अज्ञानी ! २
       जशी भावना विचार तैसा कर्माचा होतो जन्‍म
       सात्त्विक सुंदर भावभावना सद्धर्माचे हे मर्म
       रजोतमाला वेसण घाली तरीच होशी तू ज्ञानी ! ३
भोजन पचन नि विसर्जनाची सांगड घाली तूच पहा
काय नि कितिदा खावे प्‍यावे तूच प्रयोगा करी पहा
मनी शांतता तनी वज्रता परिणामासी घेध्‍यानी !४
       पोटापुरते धन मिळवावे हाव हावरी नको नको
       पचेल तितके सेवत जावे अन्‍नावर वासना नको
       वासुदेवमय विश्‍व वाटता अवघे जगही वाखाणी ! ५
दया क्षमा शांती या भगिनी माहेराला आणाव्‍या
संवादाने आचरणाने सदा सर्वदा सुखवाव्‍या
स्‍वर्ग धरेवर ऐसा आणी नकोस होऊ अभिमानी ! ६
       विवेक आणिक विचार बांधव त्‍याग सोबती घे तिसरा
       जोड तिघांची तुला लाभता हीच दिवाळी हा दसरा
       संतुष्‍टाला सणच सर्वदा सज्‍जन गेले शिकवूनी ! ७
शेती सेवा अथवा करिशी कुठलाही तू व्‍यापार
परिश्रमाला सदा सिद्ध हो जरा न घेई माघार
जशी सचोटी तशी चिकाटी सोन्‍याला चढु दे पाणी ! ८
       मिळते जुळते घेता वाढे तनामनाची श्रीमंती
       कलही त्‍याला सदैव कटकट पळभर ही ना विश्रांती
       अनंत ठेवी तसे राहता सुख शांती येती सदनी ! ९
अंतरातला राम पहाण्‍या ध्‍यानाला तू बैसावे
श्‍वासावरती जपा करावे देहभानहीविसरावे
नरास नारायण जी करते गीता माता उद्धरणी ! १०
       शेवटचा दिस तरी सुखाचा आधी घेई ध्‍यानांत
       शिक्षण वर्तन कथन हिताचे नि:स्‍वार्थी तो निभ्रांत
       जे ज्‍याचे त्‍या परत द्यायचे ठेवावे इतके ध्‍यानी ! ११

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

१५॰१२॰१९८६

Thursday, May 11, 2017

भक्तिपथावर चाल माणसा हयगय कसली करू नको..


ज्‍या सत्‍याची पूजा करिशी त्‍या देवा विस्‍मरू नको
भक्तिपथावर चाल माणसा हयगय कसली करू नको! ध्रु.

तळमळ तळमळ निशिदिनि होई सौख्‍य कसे ते गवसेना
मृगजळ भुलवी पुढे पुढे परि धाव मृगाची थांबेना
हाव हावरी करिते फरफट इरेस नसत्‍या पडू नको !

कर्मभोग जरी चुकला नाही स्‍मरण हरीचे सुख देते
जे द्यावे ते तैसे घ्‍यावे प्रेम न का द्यावे वाटे
सुख दुसऱ्याचे मान आपुले लेशहि त्‍सर करू नको !

मनात आली कृती चांगली मुहूर्त वेड्या बघू नको
आधारा दे हात स्‍वये तू अंगचोर तू नू नको
भक्तिभाव जे मनी वाढवी त्‍या हरिभजना मुकू नको !

धन हे येते तैसे जाते गर्वाने तू का फुगशी
हितचिंतक ते आप्‍त खरोखर उत्‍कर्षी का विस्‍मरशी
सत्‍यदेव पूजाच सुसंधी यज्ञचक्र थांबवू नको !  ४

मनोबोध वा हरिपाठ वा अभ्‍यासाला तू घेई
ज्‍योत ज्‍योतिने लागे तैसी जे कळले सांगत जाई
नारायण संकल्‍पा पुरवी संकोचाचे नाव नको !  ५

लाच घेत तो विकला जातो तळतळाट ये गरिंबांचा
या रूपे वा त्‍या रूपे वा झाडा नाही चुकायचा
मार्ग लांब जरि परिश्रमाचा सत्‍याश्रय तू सोडु नको !

कर्ज काढुनी घरात वस्‍तू श्रीमंती छे भीक खरी
श्रीखंडाहुन झोपडीतली मीठभाकरी बरी बरी
स्‍वतंत्र नि:स्‍पृह डरे न कोणा चुकून मिंधा होउ नको !

परद्रव्‍य वा परदारा वा अभिलाषा बाळगू नको
कामक्रोध नरकाची दारे दैत्‍यधर्म अनुसरू नको
नर नारायण धर्मपालने श्रीरामा विस्‍मरू नको !  ८

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

श्री सत्यनारायणावर जुलै १९८२ मध्ये रचलेला "फटका" हा काव्यप्रकार.  

Wednesday, May 10, 2017

शेगावनिवासी श्रीगजानन महाराज हरिपाठ.

शेगावनिवासी श्रीगजाननहरिपाठ
भूपाळी व आरती यासह हरिपाठाच्‍या धर्तीवर २१ अभंग
लेखनकाल १९.२.१९९८ ते ४.३.१९९८
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

भूपाळी

प्रभात झाली श्रीगजानना आता जागावे
गण गण गणात बोते याचे रहस्‍य उकलावे!ध्रु.

माघामध्‍ये वद्य सप्‍तमी प्रकट जाहलात 
भादव्‍यात ऋषीपंचमी साधुनि तुम्‍ही परतलात
घरोघरी या, मनोमनी या इतके ऐकावे !१

का कोणाशी कलह करावा कारण काय तरी
का कोणाला झिडकारावे गर्व कशाचा तरी
पाठीवरल्‍या हातामधुनी अमृत झिरपावे ! २

चून भाकरी तुम्‍हास प्‍यारी बोरे श्रीरामा
बालमित्र जे देतो पोहे रुचत घनश्‍यामा
घर सोडावे वस्‍तीवस्‍तीतुन आम्‍ही हिंडावे !३

देता वाढे सौख्‍य असे ती प्रेमाची खूण
गोड बोलणे सरस्‍वतीचे पूजन जाणून
मार्दव अमुच्‍या पाहण्‍यातही हलके उतरावे ! ४

दुरिताचे हे तिमिर घालवा गजानना देवा
पोथीवाचन गीत गाववुन करवुन घ्‍या सेवा
श्रीरामाला प्रांजलपण ते आपण निरवावे ! ५



।। श्री गजानन हरिपाठ ।।

शेगावनिवासी    माझा गजानन
घेतो सांभाळून   सर्व काळ ।। १ ।।
अन्‍नाचा आदर   करावा सर्वांनी
शिते ती        वेचून दाखवितो ।। २ ।।
तापल्‍या उन्‍हाचे काय योगियाला
देहभाव गेला    मावळून ।। ३ ।।
वेड पांघरले     कार्य साधायाला
सिद्ध अवस्‍थेला   पोचला तो ।। ४ ।।
भिन्‍न चवी कोठे अन्‍नकाला केला
जिभेचा चोचला   आहे कोठे?।। ५ ।।
सज्‍जन दुर्जन    सारखे पाण्‍याला
दाविले जनाला   पिऊनिया ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्‍यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी?।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय !

भोग हा भोगून   लागे संपवाया
कळे ते वळाया   साह्य करी ।। १ ।।
पलंगावरी जो    योगियांचा राजा
गजानन माझा   मायबाप ।। २ ।।
सोसाव्‍या वेदना  संयोग वियोग
भक्तिचा जो योग पाठिराखा ।। ३ ।।
चरणाचे तीर्थ    करिता प्राशन
गेले ते पळून    मृत्‍युभय ।। ४ ।।
आज वा उद्या वा आहेच जायचे
कशाला भ्‍यायचे   मरणाला?।। ५ ।। 
माझा गजानन   सोs हं आत्‍मा जाण
समर्थांची आण   ठसवतो ।। ६ ।। 
गजानन पाठ    प्रत्‍यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय !

वासना विकार    मी तू उरे कोठे
उपाधी गळते    योगियाची ।। १ ।।
वानोत निंदोत   तमा न कसली
स्‍वरूपी राहिली   विभूती ती ।। २ ।।
जो का अंतरात   तोच देवळात
बाहेर वा आत   काय त्‍याचे?।। ३ ।।
भक्‍तांचे लांछन   समर्था भूषण
जन गांज्‍यातून   सोडवले ।। ४ ।।
चिलीम करात    घेतो गजानन
श्‍वास नियंत्रण   खेळ त्‍याला ।। ५ ।।
गण गण गणात,  बोते हे म्‍हणावे
रंगुनीया जावे    स्‍वानंदात ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी?।।  ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

भुकेला भाकर    तहानेला पाणी
गरीबाला आणि   काय हवे?।। १ ।।
पाण्‍याला नकार   शस्‍त्राचाच वार
घायाळ जिह्वार योगियाचे ।। २ ।।
मुखी गोड स्‍वर डोळियांना धार
अनाम निर्धार    जागलासे ।। ३ ।।
हात ते जोडले   देवा मागितले
झरा तो उफाळे   विहिरीत ।। ४ ।।
कोरडी विहीर     पाण्‍याने भरली
मने ती द्रवली   कठोरांची ।। ५ ।।
माणसा, माणसा माणूस हो आधी
गोष्‍ट जरी      साधी बहुमोल ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

माझ्या बंकटाला दोष नका देऊ
खरा शिष्‍य पाहू त्‍याच्‍यातला ।। १ ।।
देह तो ही देव   कणसेही देव
माश्‍या त्‍याही देव परमात्‍मा ।। २ ।।
आल्‍या अंगावर   देह हा झाकला
जरी दंश केला   प्रेम त्‍यात ।। ३ ।।
क्‍लेश काय त्‍यात ऐक्‍य सिद्ध झाले
सारी सत्‍ता      चाले देवाचीच ।। ४ ।।
माश्‍यांनो, मुलींनो पळा जा परत
आला ना लक्षात निरोप हा ।। ५ ।।
देह जरी भिन्‍न   आत्‍मा परि एक
ग्‍यानबाची मेख   ध्‍यानी आली ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

पोरे पाटलाच्‍या   मांडिला उच्‍छाद
जगी छळवाद    दुर्जनांचा ।। १ ।।
मारुतिमंदिरी    समर्थांची स्‍वारी
सोसतसे सारी    टवाळकी ।। २ ।।
किती झोडपले   ऊस घेऊनीया
निश्‍चल ती काया समर्थांची ।। ३ ।।
वळ ना उळले    कण्‍हणे कुठले?
ब्रह्म ते हसले   स्‍वत:शीच ।। ४ ।।
दमला पोरांनो    पिळतो हा ऊस
प्‍या ना गोड रस ताजे बना ।। ५ ।।
शिकवा पोरांना   कुस्‍ती नि व्‍यायाम
रामाचे ते नाम   मुखी असो ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

मस्‍ती आली होती तुला फार खंड्या
गण्‍या नि गणप्‍या म्‍हणालास ।। १ ।।
आता चोरासम   उभा अंधारात
उद्याला वरात   बेड्यांनिशी ।। २ ।।
बायकोला पुत्र    कोणाच्‍या कृपेने
करावे जयाने    निस्‍तरावे ।। ३ ।।
वाचवा समर्थ    टाहो की फोडला
आला कळवळा   समर्थांना ।। ४ ।।
अभय देतात    सद्गुरु समर्थ
संकटे येतात    जाती तैशी ।। ५ ।।
खंडू डरू नको    आणि रडू नको
चिंता करू नको  अशुभाची ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

पलंग पेटला     ऊफाळल्‍या ज्‍वाला
तेजे सिद्धयोगी   झळाळला ।। १ ।।
भास्‍करा जा आण त्‍वरे गोसाव्‍याला
बसव तयाला    माझ्या येथे ।। २ ।।
तुटत ना आत्‍मा  भिजत ना आत्‍मा
जळत ना आत्‍मा बोलला तो ।। ३ ।।
येवो अनुभव     माझिया जवळ
लावू नको वेळ   आणायाला ।। ४ ।।
सोपे ते बोलणे   कठिण करणे
हेच ध्‍यानी घेणे  ज्‍याने त्‍याने ।। ५ ।।
रडे बह्मगिरी    समर्थ उले
पलंग कोसळे    जळताच ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!


बाळकृष्‍णबुवा वृद्ध रामदासी
स्‍मरत मनासी   समर्थांना ।। १ ।।
आनंदबोधात जावे या विरून
डोळे भिजवून    धन्‍य झाले ।। २ ।।
घरी या समर्था,  काया ही थकली
पाहतो वाटुली    केव्‍हाची मी ।। ३ ।।
उपेक्षा न करा    ऐके विनवणी
आले त्‍या सदनी सिद्धयोगी ।। ४ ।।
जो का गजानन तोच रामदास
नको संशयास    थारा देऊ ।। ५ ।।
समर्थ! समर्थ!   घोष चालो सदा
सारी क्षेत्रे तदा   घरी येती ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

पाहिले समर्था    विरक्‍तच झाला
भक्‍तीचा पुतळा  बाळाभाऊ ।। १ ।।
समर्थ शंकर     सेवा हितकर
मना लवकर     परा शांती ।। २ ।।
घेऊनीया काठी   देव झोडपतो
बाळा ते सोसतो  आनंदाने ।। ३ ।।
मेला बाळाभाऊ   लोकांचे उद्गार
हा माझा उद्धार   शिष्‍यभाव ।। ४ ।।
छत्री ती मोडली  काठी नष्‍ट झाली
काया तुडविली   बाळा शांत ।। ५ ।।
हासत सोसावे    सोसत हसावे
एवढेच ठावे     अनन्‍यास ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना   करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

आपला म्‍हटले   त्‍याचे सोने झाले
मृत्‍युभय गेले    दिगंतरा ।। १ ।।
बायको ती मेली  पोरेबाळे गेली
परवड झाली     प्रपंचाची ।। २ ।।
जन्‍म वाया गेला  पस्‍तावे माधव
आता धावाधाव   वृद्धपणी ।। ३ ।।
बघू नको येथे    लक्ष लाव तेथे
पश्‍चात्‍तापे होते   चित्‍त शुद्ध ।। ४ ।।
माधवाचा जप    चाले अव्‍याहत
पडे न कळत     देह त्‍याचा ।। ५ ।।
शैशवी यौवनी    भक्तिपंथे जावे
रामाते पावावे    सार हेच ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

श्‍वानदंश झाला    भक्‍त भास्‍कराला
उलगडा केला     समर्थांनी ।। १ ।।
भक्‍त परि शांत   श्रद्धा भास्‍कराची
तयारी मनाची    मृत्‍यूसाठी ।। २ ।।
लाथा घालूनिया   भास्‍करा पाडले
करे बुकलले      समर्थांनी ।। ३ ।।
जाण्‍याचा तो मार्ग  खुला पूर्ण केला
निघे वैकुंठाला    भास्‍कर तो ।। ।।
सूर्य माथ्‍यावर    ध्‍वनी हर हर
पोचला भास्‍कर   वैकुंठाला ।। ।।
झाले अन्‍नदान   तुष्‍ट सर्वजण
नाम गजानन    ज्‍या त्‍या मुखी ।। ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!


नाम गजानन    मुखी ज्‍याच्‍या आले
भय त्‍या       कसले वाटणार?।। १ ।।
मुंगळे डसती    म्‍हणुनी बेजार
हिंडे फांद्यांवर   येथे तेथे ।। २ ।।
नाव पीतांबर     धड ना धोतर
समर्थ उदार     दिले दान ।। ३ ।।
दुपेटा नेसलो    आज्ञेत राहिलो
दूर येथे आलो   आज्ञा त्‍यांची ।। ४ ।।
पाने या झाडांना आणवा समर्था
शिष्‍या तारा आता करा कृपा ।। ५ ।।
पदी लय लागे   पोचली प्रार्थना
पाने ही फांद्यांना दिसो आली ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

जगाने टाकले    पायी तुडविले
दूर दूर केले     जगू कसा? ।। १ ।।
झाली रक्‍तपिती  बोटे झडताती
माश्‍या घोंगावती  दु:ख जीवा ।। २ ।।
म्‍हणा हो आपला समर्था दीनाला
ब्रीद ते सांभाळा  रक्षणाचे ।। ३ ।।
चापट जोराची    झुळुक सुखाची
लाथ ही जोराची  कृपा थोर ।। ४ ।।
बेडका मलम     चोळला अंगास
कस्‍तुरीचा वास   चमत्‍कार ।। ५ ।।
समर्था गाईन    इथेच राहीन
सेवा मी करीन   गंगा बोले ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!


घोडा किती द्वाड नाठाळ लाथाळ
चिंता सर्व काळ  कथेकऱ्या ।। १ ।।
कैसे आवरावे    कैसे शांतवावे
कैसे बाणवावे    सत्‍वगुण ।। २ ।।
कुशीवर झोपे    चारी खुरां आत
सद्गुरु समर्थ    गाती गोड ।। ३ ।।
दुष्‍टपणा गेला   उपरती झाली
वृत्‍ती बदलली   घोड्याची ही ।। ४ ।।
मना हो शहाणा नाम गातो भला
सावर स्‍वत:ला   संयमाने ।। ५ ।।
इंद्रियांची खोड    येते घालवाया
प्रेम नाही वाया   कधी जात ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

नका नेऊ कोठे   बरा शेगावात
सांगती समर्थ    त्‍यात तथ्‍य ।। १ ।।
बळे नेता कोणी दृष्‍टी चुकवुनी
डब्‍यात शिरुनी   केली लीला ।। २ ।।
नर नारी भेद नसे योगियाला
सम सारे त्‍याला राव रंक ।। ३ ।।
शुद्ध ज्‍याचे मन काय त्‍या वसन
लौकिक बंधन    नसे तया ।। ४ ।।
आणाल का पुन्‍हा फसवून असे
गाली गोड हसे   सिद्धयोगी ।। ५ ।।
शैशव पहावे     गजानना ध्‍यावे
दूर ते सारावे    व्‍यवहारा ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!


भाकरी ही देतो   घाला टिळकाला
प्रसाद तयाला    ठरणार ।। १ ।।
सज्‍जनाचा छळ होतो जेव्‍हा जेव्‍हा
घडा भरे तेव्‍हा   पातकाचा ।। २ ।।
जावे लागे दूर    मनात काहू
येतो नेत्री पूर    आसवांचा ।। ३ ।।
दुधात भिजली   मऊ मऊ झाली
भक्‍तीने सेविली टिळकांनी ।। ४ ।।
गीतेचे रहस्‍य    मनी प्रकटले
धन्‍य ते मंडाले   धर्मक्षेत्र ।। ५ ।।
बद्ध जीवा आता खुले मोक्षमार्ग
युगामागे युग    जरी जाय।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

नर्मदेचे पाणी    नावेत शिरले
धाबे दणाणले    यात्रिकांचे ।। १ ।।
समर्थ सुशांत गिण गिण गिणात
बोते मंत्र गात   शांतपणे ।। २ ।।
आधी सांगितले   नाही ते ऐकले
पुरते भोवले     आम्‍हांलागी ।। ३ ।।
शंकरा वाचव     नर्मदे पोचव
पैलतीरा लाव    तूच नाव ।। ४ ।।
ओंकार कोळ्याची लेक ती नर्मदा
निवारी आपदा   पावली ती ।। ५ ।।
धावा जो करेल   संसार तरेल
समर्था भजेल    लीनतेने ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!


नाम गजानन    संकटनाशन
व्‍याधिनिवारण    स्‍मरणाने ।। १ ।।
निराश का व्‍हावे  कर्तव्‍य सोडावे
कैसे हे रुचावे    समर्थांना ।। २ ।।
प्रसाद मानावा   नित्‍याचे भोजन
प्रेमाचे वर्तन     हीच भक्‍ती ।। ३ ।।
चुकीचे समज    काढून टाकावे
मैत्र ते जडावे    सा-यांशीच ।। ४ ।।
दिल्‍याने वाढते   केल्‍याने रुजते
सद्भावे लाभते    समाधान ।। ५ ।।
आचार पालटे    ईश्‍वर प्रकटे
भेदभाव आटे    पारायणे ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

शेगावाची वारी   एकदा घडावी
अंगी शक्‍ती यावी गजानना ।। १ ।।
विशाल जे मन    देवाचे सदन
प्रसन्‍नवदन     तुझा भक्‍त ।। २ ।।
माळ सुयशाची   ज्‍वाला संकटाची
दोन्‍ही समानची तुझ्या दासा ।। ३ ।।
घडो अन्‍नदान   नामसंकीर्तन
मधुर भाषण     जीवनी या ।। ४ ।।
स्‍वर्गही येथेच    नरक येथेच
कारण स्‍वत:च   कळो येते ।। ५ ।।
तुझी पोथी गोड सिद्धांत शिकवी
अक्षर घटवी     भाविकाचे ।। ६ ।। 
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

श्रीगजानन महाराज की जय!

कोठे ना निघालो देहवस्‍त्र जीर्ण
देत ते टाकून    सांगितले ।। १ ।।
गणेशाची मूर्ती   जळात सोडवी
कीर्ती आठवावी   मोरयाची ।। २ ।।
निरोप द्या मला शोकी जो बुडला
तो न रुचे मला सांगतो हे ।। ३ ।।
सेवा हे जीवन   स्‍वार्थ हे मरण
नाम संजीवन    गजानन ।। ४ ।।
येथेच मी आहे   सांगती समर्थ
नका करू खंत   मरणाची ।। ५ ।।
मरणा स्‍मरतो   पाप न करतो
तनु झिजवितो   चिरंजीव ।। ६ ।।
गजानन पाठ    प्रत्यक्ष कृतीचा
तेथे कशी       वाचा शिणवावी? ।। ७ ।।
अंतर्बाह्य गोड   करी गजानना
श्रीराम प्रार्थना    करी तुझी ।। ८ ।।

।। श्रीगजाननार्पणमस्‍तु ।।
।। शुभं भवतु ।।
श्रीगजानन महाराज की जय!

आरती
शेगावाच्‍या गजानना तुज ओवाळू आरती
मानव कसला परब्रह्म तू, तू मंगलमूर्ती !  ध्रु.
नाम गजानन मुखी असू दे सकलां सांभाळ
मना मनाला दे बा जोडुन तूच जगत्‍पाल
दासगणूंची पोथी आहे तव अक्षरमूर्ती !१
कांदा भाकर पिठले मिरच्‍या बेत असा साधा
तू तर असशी भावभुकेला हे परमानंदा
सोसायाला आघातांना तू पुरवी शक्‍ती ! २
नकोच मत्‍सर भांडणतंटा एकपणा प्‍यारा
गण गण गणात बोते भिडतो गगनाला नारा 
शेगावाची वारी घडवी आर्त विनवताती ! ३
चुकतो कोठे अमुचे आम्‍हां अता कळो यावे
अमुचे वर्तन अमुच्‍या हाते तूच सुधारावे
दिवा दिव्‍याने लावत करू या दिपवाळी भारती ! ४
लाभहानि वा जन्‍ममरण वा समान वाटू दे
आत्‍मबलाने दीर्घप्रलये असाध्‍य साधू दे
श्रीरामाला दिली प्रेरणा लिहिण्‍याला आरती ! ५

श्रीगजानन महाराज की जय!