Wednesday, December 13, 2017

शुभमंगल सावधान!



शुभमंगल सावधान!

शुभमंगल सावधान। शुभमंगल सावधान!ध्रु.

युवकाचे युवतीशी
युवतीचे युवकाशी
नाते ये आज जुळुन!१

धर्म, अर्थ, काम यात
निष्ठा ही जपत सतत
चलत रहा गात गान!२

सातत्यहि वंशाचे
वरदानच हे श्रींचे
श्रवण मनन करी सुजाण!३

द्वंद्व दिसे, तरिहि नसे
सावध तो कधि न फसे
सोsहंचे सहज स्मरण!४

साधुनिया तो मुहूर्त
अंत:पट दूर होत
आत्म्याचे घ्या दर्शन!५

कौटुंबिक मधुजीवन
विसरवते माझेपण
अद्वयत्व ये उमलुन!६

नरनारी उभय हरी
सप्तपदी बोध करी
संसारी सुखद जाण!७

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Sunday, December 10, 2017

नांदा सौख्यभरे..



नांदा सौख्यभरे

समाज सांगे वधूवरांनो नांदा सौख्यभरे !ध्रु.

दोन जीव हे कोण कोठले एकत्रित झाले
देवघेव बघण्या हसण्याची वदनी स्मित फुलले
हार करातील दोघांच्याही आतुरलेत खरे!१

आश्वासन श्वसनातुन लाभे नावाला पडदा
हृत्स्पंदन छे सतारीच या गाताती दिडदा
माना डुलती, मनगटातले हासतात गजरे!२

शुभ चिंतावे, शुभ बोलावे मंगल होत असे
शुभ ऐकावे, शुभच घडावे प्रसाद लाभतसे
वृद्धांचे घ्या शुभाषीश हो आपण भावभरे!३

वत्सलतेसह सामाजिकता संयम सुखकारी
संस्कारांनी साधा आपण पुरुषार्थहि चारी
विवाहबंधन पाळताच या जन्मी मुक्त खरे!४

दूर करा पट, मी तू गेले, उरले एकपण
शब्द संपले उरले सुस्मित मौनातुन भाषण
संगीताने, संवादाने सदन करा साजिरे!५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

सप्तपदी!



सप्तपदी

हाती घालुनि हात तुजसवे चालत असताना
सात पावले ही शिकवती सुरेख ओनामा! ध्रु. 

जुळवुनि घ्यायाचे तोल मग सहज साधताहे
मंजुळ बोलांनी मनाला मोद होत आहे
सुखदच अनुभव हा लाभतो सहजच उभयांना!१

कायेला काया कैसी श्रीहरिची माया
मने गुंतण्याला घातला भरभक्कम पाया
शिकायचा नित्य प्रपंची अपुला एकपणा!२

दृष्टी आत वळवू दिसशी तू माझ्यामध्ये
मी तर केव्हाची राहिले येउन तुजमध्ये
तू मी सरलेले आपण भरु या उणेपणा!३

जोडीची गोडी वाढते इथे संयमाने
बंध स्मरताना मोक्ष ये हाती सहजपणे
हातचे न राखू बोलू वागू जगताना!४

विश्वासावरती चालतो दोघांचा श्वास 
गाठ बांधलेली आहे साक्ष विवाहास
सवंगडी रंगे कसा हा खेळ खेळताना!५

विशाल मन बनता सासर झाले माहेर
भेद न उरला तो आत जे उमटे बाहेर
जन्म नवा रुचतो समंजस नकळत होताना!६

असो नसो कोणी मानता अनंत अस्तित्व
प्रपंच रामाचा कळो ये हे मोठे तत्त्व
परमार्थहि साधे रोजची कामे करताना!७

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Saturday, December 9, 2017

मी पुसता तुज




मी पुसता तुज

मी पुसता तुज होशिल का मम
नयन भूवरी खिळले
सखि मज तुझे मनोगत कळले !ध्रु.

खुले कपोली प्रणयरक्तिमा
नयनी दिसे तव रम्य नीलिमा
बघता लाजुन जाई चंद्रमा
पदराशी चाळा चाले !१

प्रणयभाव वसत मनि या
रोमांचे हो पुलकित काया
गूढ भावना व्यक्त कराया
तुझे अधर थरथरले ! २

हातामध्ये हात गुंफुनी
मूकभावना नयनि आणुनी
यौवनाचिया रम्य उपवनी
हो शुभमंगल अपुले ! ३

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९५५

Wednesday, December 6, 2017

कर्तृत्वे ठरला भीम!

जो नामे होता भीम
कर्तृत्वे ठरला भीम !ध्रु.

अस्मिता जागली पोटी
मग गूढ स्मित ये ओठी
मनि राष्ट्रभक्ती निःसीम!१

हा योद्ध्यांचाही योद्धा
आवडला अंती बुद्धा
गहिवरला योगी भीम!२

आघात घणाचे साहे
मेरूहुन अविचल राहे
आदर्श पहा परिपूर्ण!३

ही जात मनातुन जावी
समतेची वार्ता यावी
कटुतेला नुरले स्थान !४

- श्रीराम बाळकृष्ण आठवले.