सप्तपदी
हाती घालुनि हात तुजसवे चालत असताना
सात पावले ही शिकवती सुरेख ओनामा! ध्रु.
जुळवुनि घ्यायाचे तोल मग सहज साधताहे
मंजुळ बोलांनी मनाला मोद होत आहे
सुखदच अनुभव हा लाभतो सहजच उभयांना!१
कायेला काया कैसी श्रीहरिची माया
मने गुंतण्याला घातला भरभक्कम पाया
शिकायचा नित्य प्रपंची अपुला एकपणा!२
दृष्टी आत वळवू दिसशी तू माझ्यामध्ये
मी तर केव्हाची राहिले येउन तुजमध्ये
तू मी सरलेले आपण भरु या उणेपणा!३
जोडीची गोडी वाढते इथे संयमाने
बंध स्मरताना मोक्ष ये हाती सहजपणे
हातचे न राखू बोलू वागू जगताना!४
विश्वासावरती चालतो दोघांचा श्वास
गाठ बांधलेली आहे साक्ष विवाहास
सवंगडी रंगे कसा हा खेळ खेळताना!५
विशाल मन बनता सासर झाले माहेर
भेद न उरला तो आत जे उमटे बाहेर
जन्म नवा रुचतो समंजस नकळत होताना!६
असो नसो कोणी मानता अनंत अस्तित्व
प्रपंच रामाचा कळो ये हे मोठे तत्त्व
परमार्थहि साधे रोजची कामे करताना!७
- श्रीराम बाळकृष्ण आठवले.
No comments:
Post a Comment