Monday, December 24, 2018

शिल्प सजाएं भावी विभव का विजयी ग्राहक शक्तिसे!

सागर धरती नभ अभिमंत्रित जागृत ग्राहक तेजसे
शिल्प सजाएं भावी विभव का विजयी ग्राहक शक्तिसे!

उपभोगों की भयद लालसा
चारों ओर गहन छायी
स्वाभाविक गरजों की पूर्ति
सांस नही लेने पायी
राह दिखाएं भ्रांत जगत को भारतभू के ज्ञान से!

ग्राहक तो हैं भक्ष्य ही केवल
पश्चिम ने इतना माना
विषयविलासी धन लालाइत
इन को कैसे समझाना
हावी होंगे इस हालत पर गरुडध्वज की संमति से!

जब ग्राहक बलशाली होता
समाजजीवन है निखरा
धर्मसहित धन, उत्पादकता
शुचित्व परिमल हैं न्यारा
इन पुष्पों की मोहक माला गुंथे पावन सूत्र से!

न रहे कोई शोषक शोषित
पीडित वंचित कोई न हो
कौटुंबिक भावना जगाएं
गीता का परिपालन हो
देशी वैभव प्राप्त करेंगे शककर्ता की शैलीसे!

समाज तो हैं स्वयं जागरण
पूजन उसका नित्य करें
ऐश्वर्योपनिषद का हम भी
श्रीगणेश नवयुग में करें
शिल्प सजाएं भावी विभव का विजयी ग्राहक शक्तिसे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
शिल्प सजाएं भावी विभव का..
👆🏻 ऑडिओ

Wednesday, December 19, 2018

गीता गात जगावे..

उत्साहाचे अमृत प्यावे
       गीता गात जगावे!ध्रु.
कर्मावरती अधिकार
हा तर मुख्य विचार
       फल कृष्णा अर्पावे! १
तनु ही येई तैशी जाई
आत्मा जैसा तैसा राही
       चिंतनात रंगावे!२
तुझे कर्म हा यज्ञच आहे
तया टाळणे पातक आहे
       समाजऋण फेडावे!३
दोष आपले जाणुन घेई
लयास त्यांना नेई नेई
       सद्गुण शिकुनी घ्यावे!४
सुखात अथवा संकटातही
तोल मनाचा ढळू न देई
       सुशांत नित्य असावे!५
जे कळले आचरणी येते
आचाराने जनांस रुचते
       हरिचा दास म्हणावे!६
श्रीगीता मातांची माता
गीता कळते गाता गाता
       गात गात शिकवावे!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 16, 2018

रघुनाथाला शरण जाउनी मी माझे हे विसरावे..

दहा इंद्रियांच्या देहाला दशरथ राजा शोभे नाम
नाम स्मरता वेध लावितो 'आत्मा म्हणजे तो श्रीराम'!१
'कौसल्या, कैकेयि, सुमित्रा' त्रिगुणांच्या त्या प्रतीक हो
जरी नियंत्रित देती त्या सुख सूत्र निरंतर स्मरणे हो!२
रामचंद्र आराम मनाला विवेक, संयम तिथे असे
सत्यवचन, अमृतमय भाषण स्वभाव त्याचा ठरलासे!३
लक्ष देउनी कार्य करतसे अनुजा लक्ष्मण नाव असे
रामच होते लक्ष्य मनाचे बंधुप्रेमा मनी वसे!४
भाव मनी भरताच्या भरला राम तयाचा प्राणच हो
रामपादुका झाल्या दैवत कर्तव्याने पूजन हो!५
विकारांस ना स्पर्शू देई शत्रु मर्दना सुसज्ज हो
शत्रुघ्नहि ते नाव शोभते आक्रमणा कुणि धजे न हो!६
सेवा हे सौन्दर्यच होते जनकसुता ती सीता हो
पतिव्रता, त्यागाची मूर्ती, सात्त्विकता ती होती हो!७
बलभीमाविण रामायण ना सेवा, शक्ती, युक्ति तशी
कर जुळलेले उत्सुक कार्या मनात ठसली मूर्ती अशी!८
मना माझिया रामनाम गा आवड त्याची लागेल
जीवनातला राम दिसे मग समाधान तुज लाभेल!९
बिभीषणाला अभय लाभते असत्पक्ष जर सोडतसे
पश्चात्तापे मन हो निर्मळ झोप सुखाची लागतसे!१०
कर्तव्याला मानुन पूजन पूजनात त्या रंगावे
रघुनाथाला शरण जाउनी मी माझे हे विसरावे!११
घरोघरी श्रीरामकथा ती पोचावी हे स्वप्न मनी
रामदास प्रज्ञाबल पुरवी कृतज्ञता ही फुले तनी!१२

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, December 9, 2018

देवाचे देणे


कर विचार शोधुन पाही
तुला देवाने काय दिले नाही?

तुझ्याच हृदयी आहे वसला
तो आहे परि तुला न कळला
शोध तयाचा घेई!१

देहाचा बंगला गुणाने बांधला
तूच तयाला ठेव चांगला
नामाचे भाडे देई!२

तुझे काम कर नाम स्मरुनी
प्रभुपूजा ही घ्यावे ध्यानी
शांति राहाया येई!३

प्रपंच त्याचा तयास चिंता
देवच कर्ता देव करविता
भजनी रंगून जाई!४

जे जे घडले इच्छा त्याची
गोष्ट तुझ्या ही कल्याणाची
अनुभव शिकवत राही!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

तयारी

पाठविलेसी म्हणूनि आलो
चल म्हटले की निघायचे
बोट तुझे मी धरायचे! ध्रु.

नाम स्मरता तुझे अनंता
भयचिंतांची कुठली वार्ता?
सोsहं भजनी रमायचे!१

इथले काही नाही माझे
तनमनधन सगळेच हरीचे
भजनाने हे कळायचे!२

राम राम भेटी घडताना
राम राम इथुनी जाताना
नामामध्ये मुरायचे!३

जगण्यामध्ये हवी सहजता
वावरताना हवी अलगता
सहजपणाने सुटायचे!४

कोणी आधी कोणी नंतर
याचा बाऊ करणे कुठवर?
धीर धरूनी जगायचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

Thursday, December 6, 2018

ज्ञानदेव चालले!

कृतार्थतेने उजळुन जीवन
ज्ञानदेव चालले! चालले!ध्रु.

आज्ञा मागुन गुरुरायाची
ओढ लागुनी निजधामाची
पुढे पुढे चालले!१

भावार्थाचा दीप लाविला
इकडे तिकडे प्रकाश भरला
ज्ञानसूर्य चालले!२

पिउन हलाहल दिधले अमृत
धन्य माउली धन्य भागवत
क्षमाशील चालले!३

तिन्ही लोक आनंदे भरले
समुद्राकडे जलौघ चाले
साक्षित्वहि संपले!४

श्रीज्ञानेश्वर जय योगेश्वर
तो सत्कविवर गुरु परात्पर
उचलुनिया पाउले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, November 29, 2018

'माझे पुराण' सांगते अण्णांची बाया!

'माझे पुराण' सांगते अण्णांची बाया!ध्रु.
अर्धांगी मी अण्णांची
सहभागी सुखदुःखांची
आत्मा सेवा उभयांचा जरी दोन काया!
मीही धरली झोळी हाती
स्तुतिनिंदेला लावुन काठी
सत्यवान ते मी सावित्री, तरु ते मी छाया!
पुनर्जन्म माझाच मानते
जीवन जगता, जीवन कळते
अभिमाने सांगते जगाला मी त्यांची जाया!
जसे वाटले तसे बोलले
केले माझ्या मना मोकळे
आयुष्याच्या मुक्तिधामा त्यागाचा पाया!
काम जाहले जाते पुढती
पाच तपांची सरे संगती
वृक्ष बनते धरते आता सगळ्यांवर छाया!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 28, 2018

पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी..

शपथ भवानी मातेची, शपथ नग्न समशेरीची
पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी!ध्रु.

निर्दालाया ही परवशता
झिजविन कायाचंदन आता
यावज्जीव झटेन प्रत्यही धावत येइन सेवेसाठी!१

देहाचा या होम करावा
नवा जन्म भारतात घ्यावा
कार्य न अपुरे राहू देइन तळमळ मनि दिव्यत्वाची!२

आवश्यक ती शक्तीबुद्धी
पवित्र कार्यी मंगलसिद्धी
माझ्या श्रीहरी देइ सकल तू आस प्रतिज्ञापूर्तीची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

उधळितो तव चरणांवर फुले..

सत्यशोधका, दलितसेवका
तुझ्यापुढे कर जुळले
विनम्र मस्तक करुनि
उधळितो तव चरणांवर फुले!ध्रु.

तू करुणामय, तू तेजोमय
तूच हिमालय, तू जगि निर्भय
पददलितांचे अश्रू संता
सदया तू पुसले!१

सत्यपूजका, धर्मप्रेषिता
तुज आवडली साधनशुचिता
सुधारणेचे रोप अंगणी
तू प्रेमे लावले!२

तू जनदुःखे दुःखी होशी
त्यांच्या सौख्यी सौख्य मानिशी
दलितांस्तव जे अश्रु सांडिले
त्यांची झाली फुले!३

मानस व्हावे ते गंगाजल
पसरो मानवतेचा परिमल
थोर महात्म्या ध्येयासाठी
तव तनुचंदन झिजले!४

अभिमानाते जाग आणली
उत्कर्षाची वाट उजळली
ज्योतिर्मय या तुझ्या जीवने
पथ आलोकित झाले!५

लढण्यासाठी तूच जन्मला
तू सत्त्वाचा मान राखला
तुझिया कार्ये समतादेवी
प्रसन्नतेने डुले!६

न्यायाते जगि न्याय मिळाला
सत्याला आधार भेटला
अतुलनीय सामर्थ्य नरविरा
रुढींशी झुंजले!७

प्रयत्नवादावरती श्रद्धा
सार जीवनाचे नवबुद्धा
तुझ्या आश्रमी नित रमली रे
देवाघरची फुले!८

परमार्थी तू , तूच तपस्वी
तू कृतयोगी, खरा मनस्वी
प्रेमे धरले तुवा छातिशी
जे रंजले! गांजले!९

तू ज्योती रे प्रकाशपुष्पा
तूच सुमन रे तू निष्पापा
तव गुणकीर्तनि शब्द येउनि
विनयाने जुळले!१०

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२.४.१९६८

Tuesday, November 27, 2018

नामदार ग. वा. मावळंकर लोकसभेचे पहिले सभापती

असे मराठी, परि गुजराथी भाषाप्रभू झाला
मावळंकर हा मुक्तभारती सभापती पहिला
गांधीजींचे अनुयायीपण प्राणपणे राखले
सौजन्याने, औचित्याने मना मना जिंकले.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 25, 2018

न भूतो न भविष्यति..

संकटे रक्षितम् राष्ट्रं
शस्त्रसज्जम् सुखं कृतम्
यशवंतसमो मंत्री
न भूतो न भविष्यति।।

अर्थ : परकीय आक्रमणाचे वेळी राष्ट्राचे संरक्षण केले. अगदी सहज देश शस्त्रसज्ज केला. खरोखर यशवंतरावांसारखा मंत्री पूर्वी झाला नाही, पुढेही होणे कठीण.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(१९८४ मध्ये तरुण भारत मधे छापून आलेलं सुभाषित.)

Monday, November 19, 2018

संत नामदेव.

विठ्ठलाचे नाम नामदेव गाई
नाम घेत घेत नामा विठु होई!
निरंतर नाम घेता
विठुराय आत येता
जीव ऐसा जडलेला विठु ठायी!
नाम साधकाची माता
निवारिते ताप चिंता
तिने विठु दाखविला नरदेही!
विठ्ठलास गावे ध्यावे
चित्त सुखरूप व्हावे
प्रेमसुख अनायासे हाती येई!
मन जाहले विशाल
विठु करतो संभाळ
मागेपुढे विठु ऐसा नित्य राही!
हारपले देहभान
मन जाहले उन्मन
वासना विलीन झाली हरि पायी!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 14, 2018

पं. जवाहरलाल नेहरू - भारताचे पहिले पंतप्रधान.

जवाहराने स्वातंत्र्यास्तव त्याग किती केला
सारा भारत हिंडहिंडुनी त्याने जागविला!
विज्ञानाने या देशाची प्रगतीही साधली
'महामंत्रि त्याच्यासम ना कुणि' जनता हे वदली.

- श्रीराम बाळकृष्ण आठवले
(जन्मशताब्दी निमित्त अभिवादन म्हणून ही रचना केली होती)

Monday, November 12, 2018

मंत्र

मंत्र

शपथ भवानी मातेची, शपथ नग्न समशेरीची
पांडुरंग मी करित प्रतिज्ञा, मातृभूमि मुक्तीसाठी!ध्रु.

निर्दालाया ही परवशता
झिजविन कायाचंदन आता
यावज्जीव झटेन प्रत्यही धावत येइन सेवेसाठी!१

देहाचा या होम करावा
नवा जन्म भारतात घ्यावा
कार्य न अपुरे राहू देइन तळमळ मनि दिव्यत्वाची!२

आवश्यक ती शक्तीबुद्धी
पवित्र कार्यी मंगलसिद्धी
माझ्या श्रीहरी देइ सकल तू आस प्रतिज्ञापूर्तीची!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, November 11, 2018

पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!

युगयुगांतरी शिवाशिवाचा अटीतटीचा झडत लढा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा! ध्रु.
माजला दैत्य बळी भारी
पौलस्त्य करी शिरजोरी
मथुरेत सज्जना चोरी
बटु वामन, श्रीराम कृष्ण शिकविती जनांना एक धडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
जनि झाला एकच गिल्ला
ये रोरावत अफजुल्ला
शिवबा न मुळी डगमगला
विरोधाविना विकास कैसा झुंजाया हा नित्य खडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
जन रडती धाई धाई कुणि आम्हां त्राता नाही
पाहुनि प्रलय हा भारी कळवळते अंबाबाई
खड्गात प्रवेशे देवी शिवबाची मोठी आई
हो शिवास साक्षात्कार
अशिवाचा कर संहार
खड्गास चढू द्या धार
महिषासुर मर्दिनी निकट तव निर्दालाया दैत्य बडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
डावावर योजुनि डाव खानाला येण्या वाव
देउनी शिवाजी बोले जगदंबे मजला पाव
साकार कपट ये दारी जरी दिसे वरीवरी साव
मन चिंती न वैरी चिंती
न्या अम्हांस तुम्ही सांगाती
शिवबा न श्रवे ही विनती
घन तिमिराला संहाराया समर्थ भास्कर पुरे सडा!
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
आतुनि चिलखत वरी अंगरखा
सफेद मंदिल झाकी टोपा
सावधता घे करी वाघनखा
भैरव करी अभिनव पोशाखा
दग्यास देण्या जबर तडाखा
निर्धारे पद पुढती पडता कालवक्ष करी धडाधडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
ती काळमिठी नच प्रेममिठी
यमधर्माची जणु लिखित चिठी
वाजता कट्यार झुकलीच कटी
झणी वाघनखे घुसता पोटी
या दगा दगा हे वच ओठी
व्याधाची पारध हो अंती
खानासंगे धुळीस मिळला पैजेचा उचलला विडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!
झनझनन झांज करी नाद
तुणतुणे घुमवी प्रतिसाद
कडकडा देत डफ साद
शब्दफेकी टकमक बघताना शेष डुले काढुनी फडा
पुण्यप्रतापासंगे असतां पापाचा भरतसे घडा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, November 9, 2018

'स्त्री शिक्षण संस्था' सांगते, अण्णांची ही कथा!

महर्षी कर्व्यांची 'स्त्री शिक्षण संस्थाच महर्षींबद्दल बोलते आहे अशी कल्पना करून केलेलं हे काव्य -

'स्त्री शिक्षण संस्था' सांगते,
अण्णांची ही कथा!ध्रु.

हा पुरुषोत्तम कणखर होता
देहाने बटु वामन होता
तेजे जणु सविता!

अबला जीवन दुःख जाणले
डोळे भरले, हृदय द्रवले
उद्यत परमार्था!

पुसेन अश्रू होईन छाया
समाज मंदिर, समता पाया
समूर्त सात्त्विकता!

येथे यावे अनुभव घ्यावा
सहकार्याचा धडा शिकावा
क्षणहि न घालविता!

समग्र जीवन हीच तपस्या
तळमळ ऐसी सुटे समस्या
साक्षी मीच स्वतः!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.११.१९८४

Thursday, November 8, 2018

गोवर्धनगिरी आश्रय झाला

गोपगड्यांच्या संघटनेला
गोवर्धनगिरी आश्रय झाला!ध्रु.

गोवर्धन हे नाव सार्थ हो
उपकारा नच मिती पहा हो
गोवत्सांचा पालक असला!

कृतज्ञतेने गिरिचे पूजन
प्रदक्षिणा अन् विनम्र वंदन
हा तर सोपा यज्ञसोहळा!

या गिरिवरती स्वैर फिरावे
मुक्तमने गावे नाचावे
हा गिरिवरही भावभुकेला!

मुसळधार वृष्टी जर झाली
घळही इथली धरी सावली
कोण जुमानी कळीकाळाला!

याच्यासम राहू या अविचल
पुढती ठेवू ध्येय सुमंगल
श्रीकृष्णाचा ध्यास तयाला!

गोवर्धन म्हणतात पेलला
आत्मप्रत्यय उभा ठाकला
गोविंदे जिंकले मनाला!

हृदय कसे उबदार गिरीचे
कृतज्ञता ही मनात नाचे
ते प्रेमाश्रू भिजवत गाला!

जग बदलावे अशी प्रेरणा
कृष्ण वाढतो तनामनांना
गिरिधर गाली गोड हासला!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, November 7, 2018

डॉ. सी व्ही रमण

बालवयातच छंद लागला भौतिक विद्येचा
चंद्रशेखरे रचला पाया विद्यासदनाचा
लेखांमागुन लेखांनी त्या विस्मित झाले सर्वजण
वेंकटसुत हा विनम्र तरीही अभ्यासु रमण!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, October 14, 2018

राजहंस तू....

कसले अवघड सोपे सगळे
राजहंस तू बाकी बगळे!ध्रु.

आपआपला धरी भरवसा
कालावर उमटवी पदठसा
परब्रह्म जगि बाळ सानुले!१

शिशुपण बरवे लेप न कसला
बालभक्त अत्यंत सोवळा
भलतेसलते मना न शिवले!२

बाप्पा आतुन जे सांगतसे
नाम तयाचे तो वदवतसे
कधी कुठेही भजन रंगले!३

प्रश्नामागुन प्रश्न जन्मती
आपोआपच सगळे सुटती
त्यांचे ओझे का शिरि धरले!४

कर्तव्याची कास धरावी
फिकीर दुखण्याची न करावी
थोरपणाचे माप वेगळे!५

नित्य नवा दिस जगण्यासाठी
आनंद देण्याघेण्यासाठी
चिखलामध्ये कमळ उमलले!६

सोपवले सगळे देवावर
भक्त उमावर भक्त रमावर
प्रसन्नतेने भाग्य हासले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०४.२००४

Friday, October 12, 2018

उदे गे अंबाबाई आई उदे गे अंबाबाई..



उदे गे अंबाबाई
आई उदे गे अंबाबाई!ध्रु.

तुझीच आम्ही सगळी बाळे
अजाण असलो तरी लडिवाळे
चुका सुधारुन देई!१

या देहाच्या करी घागरी
सोऽहं फुंकर घाल झडकरी
घोष घुमव गे आई!२

तूच शिवाई शिवनेरीची
आई भवानी तुळजापुरची
आवडते रणघाई!३

नर नारी हा भेद संपवी
अक्षर अक्षर गिरवुन घेई
भारतमाते आई!४

तू वाणी संगीत नि नर्तन
तू परिचर्या तू अध्यापन
कर संगोपन आई!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, October 10, 2018

आरती रेणुका मातेची ..

जय देवी जय देवी रेणुका माते
आरती गाण्याला भाविक आतुरते!ध्रु.

सकाळी दुपारी संध्याकाळीही
तुझाच आधार पाठीशी राही
तुझेच स्मरण नित्य तारते!१

अवती भवती जनी विजनी
डोंगर दऱ्यात तसे गगनी
बघू जाता तुझे दर्शन घडते!२

चालता बोलता देऊळ आले
चिंता क्लेश दूर देशांना गेले
भक्तांच्या मनात आले भरते!३

आरोग्य देहाचे तसे मनाचे
भान राहाणे एकपणाचे
रामाचे भाबडे मन मागते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, October 6, 2018

मद्यपी.

मद्याच्या प्याल्यामाजी सुखदुःखे बुडली अवघी
कुणी नाही जगती माझे, मी जगी कुणाचा नाही!

उकलता हृदयिचा कंद
प्राशुनिया होतो धुंद
थिजतात नयनिचे बुंद
मनवारु उधळता स्वैर, त्या दिशा थिट्या दाहीही!

श्रद्धेचे ढळता कुंकू
मन उदास लागे भटकू
करि आत्मार्पणि ते कांकू
औचित्य-चितेवर चढुनी मी मलाच जळता पाही!

संसृतिचा झंजावात
करि पुनःपुन्हा आघात
गरगरे नाव दर्यात
आशेचा तुटता तंतू, मी सदय मृत्युला बाही!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.१०.१९६०

Sunday, September 30, 2018

मराठी सुभाषिते

जन्मणे भोग देहाचा 
मरणे भोगही तसा 
टाळणे शक्य जे नाही 
त्याचा शोक करू कसा?

'देव पाठीशी आहे!' 

नको भीती, नको शंका 
बोलावे मोकळ्या मने। 
"देव माझा असे त्राता" 
श्रद्धेने कर जोडणे। 

सदासर्वदा मी रामाचा।" 

आलो जगी जरी त्याचा 
गेलो वा तरिही तसा 
सगुणी निर्गुणी एक 
तत्त्वाचा ठसला ठसा।

"सुसंगतीच हवी!" 

संगती चांगली नाही 
कर्णाचे चुकले इथे। 
रथचक्र गिळे पृथ्वी 
पाप पाप्यास भोवते।



Sunday, September 23, 2018

गणेशा नाम तुझे गातो!

रात्रंदिन मी अगा गणेशा
स्वरूप तव ध्यातो
गणेशा नाम तुझे गातो!ध्रु.

मंगलमूर्ती तुजला म्हणती
त्रैलोक्यात पसरली कीर्ती
या मातीतुन देह तुझा रे आकारा येतो!१

अकार उदरा मकार मस्तक
उकार पदयुगुलाचा वाचक
ज्ञानेशे ओंकार दाविला अनुभव तो घेतो!२

मूषकावरी स्वारी बसली
निराशा न नावाला उरली
ज्ञानकमळ करि हळू उमलले सोऽहं घमघमतो!३

ब्रह्मरसाचा करात मोदक
तुझे देखणे सकलां रोचक
अभयहस्त तर अगणित विघ्ने विलयाला नेतो!४

तुला वंदुनी कामे करता
आरंभी घे रूप सांगता
संगीताचा शिल्पकलांचा संगम हा घडतो!५

लोकनायका विनायका हे
प्रवर्तका हे सुधारका हे
एकात्मच हे राष्ट्र बनावे इतके तुज प्रार्थितो!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, September 14, 2018

शेगावच्या गजानन महाराजांची आरती!

गजानना तुज आरती गाउन धन्य धन्य होऊ! ध्रु.

शेगावाचे भाग्य उजळले तुझिया आगमने
अतर्क्य लीला अगा सद्गुरो दरवळली सुमने!
एक एक स्मृतिमणि स्पर्शूनी रोमांचित होऊ!१

अन्न ब्रह्म हे आल्या आल्या जगास दाखविले
सगळे जीवन जलगंगेचे हासत प्राशियले
झळाळते किति विरक्ति कांचन! नेत्र मिटुन पाहू!२

चरणकमळीचे तीर्थ देउनी थोपविले मरण
असा कळवळा ये भक्ताचा करुणामय जीवन
गे विश्वाई धरि गे हृदयी प्रार्थित हे राहू!३

उधळत जगती विकार वारू आण तया नरम
विवेक शिकवी भक्ति बाणवी आस हीच परम
अधिक याहुनी नकोच काही नाम घेत राहू!४

आत्म्याचे अमरत्व शिकविले धगधगल्या ज्वाळा
पलंगावरी सुस्थिर शोभे ज्ञानाचा पुतळा
गिन गिन गिनात बोते भजनच प्रेमाने गाऊ!५

नश्वर देहा त्यजिले तरिही दाखविशी लीला
अनुभव घेता कृतज्ञ भाविक कितिदा गहिवरला
तुझ्या पादुका प्रसादचिन्हच प्रेमभरे पाहू!६

दासगणूंनी ग्रंथनिमित्ते फळ दिधले गोड
जणू माउली निजबाळाचे पुरवितसे कोड
श्रीरामाचे शब्दसुमन हे पदकमली वाहू!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 9, 2018

खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही..

खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही
फसवशील तू सकलां, देवा रुचायचे नाही!ध्रु.

मन हे खाते झोप न येते
अन्न न जाते, तळमळ होते
आयुष्याची धूळधाण ते टळायचे नाही!१

शापित धन ते शापित जागा
शापित सत्ता शापित मत्ता
उलटे फासे पडती कैसे कळायचे नाही!२

भेसळ करणे शापच घेणे
लाच मागणे आत्मा विकणे
अशी तशी ना सजा लाभते चुकायचे नाही!३

काम टाळणे सबब सांगणे
नियम मोडणे व्यर्थ भटकणे
दुष्कीर्तीच्या भोगा त्या मग डरायचे नाही!४

सावध होणे चूक टाळणे
भक्ती करणे, त्याग साधणे
हे जर केले माफ मागले हे ध्यानी घेई!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०१.१९८९
खोटा पैसा असत्य भाषण पचायचे नाही..
👆🏻 ऑडिओ

Thursday, September 6, 2018

ऐसा पैसा सुख देतो

कष्ट करावे अंग भिजावे
संतोषाचे बीज रुजावे
हळूहळू अंकुर फुटतो
ऐसा पैसा सुख देतो!१

कला शिकावी, संधि मिळावी
रडवी वदने हसरी व्हावी
कृतज्ञतेने जो मिळतो
ऐसा पैसा सुख देतो!२

कर संशोधन तनमन विसरून
झिजवत देहा चंदन मानुन
कौतुक म्हणुनी जो मिळतो
ऐसा पैसा सुख देतो!३

जनता माझी मी जनतेचा
सेवाभावच रुजावयाचा
तूट भराया जो सरतो
ऐसा पैसा सुख देतो!४

जो प्रेमाचा जो नेमाचा
जो न्यायाचा जो नीतीचा
लोभा विरहित जो असतो
ऐसा पैसा सुख देतो!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, September 5, 2018

व्रत घेतले अध्यापनाचे! अध्यापनाचे! जनजागराचे!

व्रत घेतले अध्यापनाचे
अध्यापनाचे! जनजागराचे! ध्रु.

ही बालके माझी मुले
उद्यानि या फुलली फुले
मन रंगले, सद्भाव नाचे! १

जे आतले बहु साचले
शोधूनि ते द्यावे कळे
पूजाचि ही वच माधवाचे! २

संवाद तो साधे जरी
मग वैखरी मधु बासरी
फुलते कळी देणे हरीचे! ३

येतात ही जातात ती
माझी परि अचला स्थिती
दुरि राहुनी सांभाळण्याचे! ४

ते भाग्य हो आले भरा
भरती जणू ये सागरा
तरुनी, मुलां तारावयाचे! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.१.८२

डॉ सर्वपल्‍ली राधाकृष्‍णन् (भारताचे माजी राष्‍ट्रपती)

तत्‍त्‍वज्ञ तो राज्‍यकर्ता ऐसा योगच दुर्लभ
ज्ञानाचा चालवी यज्ञ कीर्तिचा जगि सौरभ
पूर्वपश्चिम हा सेतु बांधला मृदुभाषणे
राधाकृष्‍णन् अशा संता नम्रते शतवंदने।

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Sunday, September 2, 2018

तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

काळोखल्या मनात नैराश्य घोर येत
"होईल काय, कैसे" छळते जिवास खंत
मज मीच तारणारा हुंकार स्पष्ट आला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

जड बंधनात जीव सुखदुःख हे चपेटे
सोशी जरी कसेही भजना बसेच नेटे
कोणा कसे न ठावे आनंद दाटलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

कोणी न राव रंक नर नारी नाहि भेद
असु दे स्थिती कशीही नाहीच खंत खेद
द्वंद्वात ना जराही हा जीव गुंतलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

अज्ञान घोर ग्रासे कर्तव्यबुद्धि जाई
मी देह भावनेने तो अश्रुपूर येई
वाक्ताडने कठोर ये जागृती जिवाला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

स्वातंत्र्य संकटात तो ऐक्यभाव जागे
ही मातृभूमि माझी आज्ञेत वृंद वागे
आव्हान पेलण्या हे हा देश ठाकलेला
तेव्हा मनामनात 'श्रीकृष्णजन्म' झाला!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 26, 2018

सत्यार्थ जन्म आहे सत्यार्थ मृत्यु यावा..

अर्घ्य

जन्माचा हेतू कळला पाहिजे.
आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे.
एकही क्षण वाया दवडायचा नाही. धनही सत्कारणी लावायचे, जे ज्याचे ते त्याला देत असायचे.
आपले येथे काहीच नाही हे मनात पक्के जाणून असायचे.
'कृष्णच कर्ता, कृष्ण करविता'
स्तंभात दडून बसलेला नरसिंह दैत्यांचा अन्याय फार काळ सहन नाहीच करू शकत-
प्रल्हादाचा भावार्थ जाणून तो प्रकट होतो.
दुष्टसंहार करतो हे सत्य आहे.
म्हणून श्रीसत्यनारायणा पुढे हा सत्संकल्प बोलून दाखवून अर्घ्य अर्पायचे.

सत्यार्थ जन्म आहे सत्यार्थ मृत्यु यावा
धनकनककामिनींचा थोडा न मोह व्हावा!ध्रु.

पशु जी क्षणात बनवी मदिरा कशास प्यावी?
कर्तव्यभान जाई-रामास दुःखि गोवी
त्या स्वर्णमयमृगाचा हव्यास का धरावा?१

हा देश देव माझा स्वातंत्र्य प्राण आहे
दैदिप्यमान व्हावा हा एक ध्यास आहे
ध्येया कशास विसरू का व्यर्थ श्वास जावा?२

नारायणेच केले वास्तव्य अंतरात
केले तमास दूर झाली मनी प्रभात
जनता जनार्दनाला मी नित्य अर्घ्य द्यावा!३

नरसिंह विक्रमी जो स्तंभात गुप्त आहे
अन्याय लेश तोही कैसा कशास साहे?
गगनास भेदणारा घनघोष तीव्र व्हावा!४

माझे न येथ काही सगळे दयाघनाचे
कर्तृत्व श्रीहरीचे फल निश्चये तयाचे
तो कर्मयोग रामा थोडा तरी कळावा!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुजनहो सत्यच नारायण मधून)

श्रीसत्यनारायण व्रत हे, खूण भगवंताची.


प्रत्येक घराचे मंदिर व्हावे.
श्रीसत्यनारायण व्रताने हे घडू शकेल.
भजनाने प्रत्येकाच्या अंतःकरणातला भगवंत जागा होईल.
श्रमाचा, प्रामाणिकपणाचा पैसा काय तो खरा.
आपल्याजवळ असलेल्यामधून थोडेतरी दुसऱ्याला देऊन पाहावे.
द्यावे आणि विसरावे.
असे झाले की समाजच राम वाटेल.
भगवंताच्या अस्तित्वाची खूण पटल्याशिवाय कशी राहील?

श्रीसत्यनारायण व्रत हे,
खूण भगवंताची!ध्रु.

व्रते शुभंकर घर हो मंदिर
घर हो मंदिर , प्रसन्न परिसर
स्फूर्ति होत भजनाची!१

नकोच धन मज कष्ट न करता
कष्ट न करता कुठे तृप्तता?
महती परिश्रमांची!२

जे जवळी ते थोडे द्यावे
थोडे द्यावे विसरुनि जावे
गुरुकिल्ली मोक्षाची!३

समाज गमतो इथेच राम
इथेच राम जेथे नाम
आवड नैतिकतेची!४

थेंब न दिसतो गंगा वाहे
गंगा वाहे तैसा आहे
प्रचीति सातत्याची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुजनहो सत्यच नारायण मधून)

Saturday, August 25, 2018

भूपाळी मारुतीची..

भूपाळी मारुतीची

प्रभात झाली, वायुलहर ये, जाग मना आली
मारुतीराया तव स्पर्शातुन स्फुरते भूपाळी! 
जय बजरंग बली! ध्रु.

आंजनेय तू  केसरिनंदन चैत्रातच जन्मला
जन्महेतु तव रामकार्य हा कळला रे कळला
रवितेजाचे तुज आकर्षण झेप नभी घेतली! १

व्याकरणाची तुजला आवड  भाषण अति मधुर
आश्वासक तव हात फिरतसे माझ्या पाठीवर
रामनाम भर श्वासोच्छ्वासी तीच कृपा आगळी!२

शोधलीस तू सीतामाई राममुद्रिका दिली
श्रीरामाचा आद्य दास तू खूण मना पटली
तुझ्या अलौकिक कथा ऐकता काया थरथरली!३

पुच्छ पेटले त्यासरशी तू पेटवली लंका
दुष्टांच्या छातीत धडधडे जरी न झडे डंका
स्रीजातीचा मान अबाधित असो तिन्ही काली!४

रामकथेची आवड भारी जिथे गान चाले
रामनाम तर ओठी संतत अश्रू ओघळले
जरि नच दिसशी निश्चित असशी तू प्रचिती दिधली! ५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, August 19, 2018

आई, बाबा ऋणात राहू..

बाबा तर जन्माचा दाता, तशी जन्मदा आई
पुंडलिकांनो त्या दोघांना अंतर देणे नाही! ध्रु.

जन्मभरी ते कष्ट उपसती, तसे निपटती घाम
गृहिणीसंगे गृहस्थसुद्धा घेत न पळ विश्राम
संस्कारांची देत शिदोरी, अजून सरली नाही!१

धाकामागे प्रेमच दडले, चोप विसरती बाळे
गहिवरताती आठवणींनी, गाल ओलसर झाले
मौक्तिकमाला ती अश्रूंची, गंध चंदनी येई!२

कधी खेळती मांडीवरती नात नि नातू ऐसे
आई बाबा आतुर ऐसे उत्सुकता ही हासे
शिल्प येत ते आकाराला, अनुभव आला देही!३

पालक बनणे नसते सोपे, वाण सतीचे आहे
जिवंतपणिही जळत राहणे असिधाराव्रत राहे
वार्धक्यातही श्रीपरमेश्वर तत्पर देण्या ग्वाही!४

समाजजीवन घेवो अनुभव कौटुंबिक बंधांचा
तोडू जाता तुटत न नाती, राम नित्य सीतेचा
भारतीय हे भाग्यवंत जगि डंका झडतच राही!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७/१०/२००८

Friday, August 17, 2018

तुलसीदास

तुलसीदास

भांगेहूनही हीन जरी मी तुलसी माझे नाम
दास म्हणविले मी मज जेव्हा, स्वामी झाला राम!१

जन्म दिला जरी मायपित्यांनी केला माझा त्याग
दुःख जाणले रघुनाथांनी जीवन केले याग!२

नाम जाहले मला अनावर सदैव घोकत राम
त्या नामाने लंपटासही केलेसे निष्काम!३

रामाहुन नामाची शक्ती अधिक असे खचित
तेच घडविले कर्म हातुनी सदैव जे उचित!४

वेष धरावा मुनिचा आणखी रामाचा सहवास
तोच भागवे तनामनाची युगायुगांची प्यास!५

मनास व्हावे ज्ञान वाटले ऐका रामकथा
ऐकुन गाउन चला अनुसरू भक्तीच्या पंथा!६

जानकीनाथा विकलो गेलो ना भय ना चिंता
द्वंद्व निमाले दुःख पळाले चित्ती ये समता!७

देश कोश कुल धर्म कर्म धन धान्य गतीही राम
जो गुंतवतो तो सोडवतो नामनिवासी राम!८

रामनाम हे सार जीवनी सूरतालही राम
वक्ता लेखक श्रोता गायक तन्मयताही राम!९

हृदय विकारांनी भरलेले वर्तन हो बेफाम
नाम रसायन होउन निशिदिन जगवी मजसी राम !१०

दोन चारदा नाम आळविता मनास ये भरते
रामचरितमानस गाताना शांति वास करते!११

दीनावरती दया करतसे करुणासागर राम
दानशूर तो मीच भिकारी पतित मी पावन राम!१२

मना आवरुन थकलो पुरता धावा मी मांडला
नाचनाचुनी जीव शिणूनी मरायला टेकला!१३

मारुतिराया भजनी प्रेमा दे दे तुलसीला
जीवनी यावा राम म्हणूनी निधडा कर रे मला!१४

जो रमतो तो राम पोषितो माझा संतोष
स्तिमित होत मन  असा पाहुनी भजनी आवेश!१५

लिही रामायण गा रामायण गजानना पुन्हा
शतशतके ही सुधीर वाहो शरयूची करुणा!१६

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, August 16, 2018

पथ हा चालत राहू

पथ हा चालत राहू

येती संकटे स्वागत करुया
प्रलय वादळे येती, येउ द्या
असती निखारे पायतळी तरी
अग्नि कोसळो जरी शिरावरी
निज हातांनी आग लावुनी
हासत हासत जळतची राहू
पथ हा चालत राहू।।

हास्य-रोदनी, तुफानातही
अमर्त्य अगणित मरुभूमिवरी
अपमानी अन सन्मानीही
उन्नत मस्तक, छाती ताणुनी
व्यथा मिळुनी, आनंदित राहू
पथ हा चालत राहू।।

प्रकाशात अन् अंधारातही
दलदलीत वा प्रवाहातही
स्नेहामध्ये उपहासातही
दीर्घ पराजयी क्षणिक जयातही
जीवनातल्या अगणित मोहक
आकांक्षांना शमवित राहू
पथ हा चालत राहू।।

Wednesday, August 15, 2018

सत्यवान सावित्री व्हावे..

नर नारींनी मनी धरावे सत्यवान सावित्री व्हावे!ध्रु.

सावित्रीचे व्रत हे खडतर, तिच्या पतीचे भाग्य महत्तर
धनाहून सद्गुणच महत्तर, मन जर कणखर शरीर कणखर
सार कथेचे जाणून घ्यावे!१

पर्णकुटीतही स्वर्ग आणला, भूषण ठरली उभय कुलाला
बुद्ध्या वरिले तिने पतीला, निष्ठा जिंके कळीकाळाला
का काळाला व्यर्थच भ्यावे?

धर्म जाणुनी करा आचरण सदैव सत्य नि मंजुळ भाषण
मन कोणाचे कधी न दुखवुन, देह न मी हे दिले दाखवुन
यमराजाला पिता करावे!३

आदि अंत ना कळे वटाचा, जन्म तनाचा ना आत्म्याचा
सोऽहं  स्मरता मुकीच वाचा, नरदेही हा मोक्षच साचा
बुद्धिबळाने स्तिमित करावे!४

तने निरोगी मने विरागी संतोषी जो मोहा त्यागी
कधि न म्हणावे मी हतभागी आनंद वितरा जागोजागी
सुखदुःखाना लंघुन जावे!५

विधुर नि विधवा नसते कोणी, सोबत लाभे अंतरातुनी
यमहि बद्ध कर्तव्यबंधनी सावित्री सत्यास अग्रणी
श्रीरामा हे कळुनि वळावे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

स्वामी आत्मरूप झाले!

स्वामी आत्मरूप झाले!
स्वामी विश्वरूप झाले! ध्रु.

गुरुपुष्यामृत योग साधला
देह शुभदिनी सहज सोडला
स्वामी मुक्त मुक्त झाले!१

विश्वचि गमले सदन जयासी
येणे-जाणे काय तयासी?
सगळे उपचारहि सरले!२

साहित्याचा प्रसाद दिधला
अमृतवाणी परम मंगला
जीवन सोऽहंमय सगळे!३

आनंदाचा अमोल ठेवा
स्वरूप हृदयी ऐसें ठेवा
ध्यान मग सहजपणे साधले!४

मी पण गळले, "तो मी!" कळले!
तो मी! तो मी हृदयी भिनले
अश्रू गाली ओघळले!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

देश हाच परमेश!

मी नच माझा, मी देशाचा
भारत माझा देश
देश हाच परमेश! ध्रु.

इथली माती पिकवी मोती
डोंगर इथले किल्ले होती
पवन देत संदेश!१

भगवद्गीता खेळे ओठी
कर्तव्याची सुमने होती
पूजू या योगेश! २

नवीन स्तोत्रे, नवी आरती
मनामनाला नवी जागृती
असीम हा आवेश!३

हवाच संयम, हवी साधना
नि:स्पृहतेला मिळो चेतना
सौम्य असो गणवेश!४

समाज राघव, समाज माधव
राव रंक हे दोघे बांधव
समतेचा उद्देश!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

देश हाच परमेश..
👆🏻 ऑडिओ

Thursday, August 9, 2018

चले जाव....

चले जाव

"छोडो भारत!" तुम्हा बजावत नका बघू वळुनी मागे
चाळिस कोटी प्रजाजनांचा सागर गर्जत हे सांगे
करेंगे या मरेंगे!

नेत्री तुमच्या असेल शक्ती बघाच तर मग हा वणवा
रणातुनी माघार घेतसा हरता नित्य प्रदेश नवा
कुवत या क्षणि तुमची कळली
आजादी अपनी लेंगे!

मातृभूमिते संरक्षाया अम्हीच सैनिक सिद्ध असू
स्वातंत्र्याते मान्य करा तुम्हि कशास आता रुसुफुसू
घराघरातुन नृसिंह गर्जत
दुश्मन को भगाएंगे!

सत्ता द्या तर सहकार्याची अम्हास कळते ही भाषा
ना तरि या क्षणि हे आंग्लांनो गुंडाळावा तुम्हि गाशा
हितार्थ अपुल्या स्वदेशास जा
तब ही इज्जत करेंगे!

सेना तुमची राहिल राहो भारतीय घ्या सेनानी
देतो तुम्हा हे आश्वासन, संकटि राखू जिनगानी
हेही म्हणणे मान्य नसे तर
कौमी जंग पुकारेंगे!

हरेक महिला जागृत झाली गाय न आता वाघिण ती
सत्ता परकी पाहुनि त्वेषे आवळताती बाळमुठी
चलेजाव इस नारेसे हम
आसमान को भर देंगे!

अपुल्या मनचे नेता बोले, जनता गहिवरली आता
उधाण आले उत्साहाला हर्षाते सीमा नुरता
मोहनचंद्रा सुखे पाहता सागरास आले भरते
तो ही गर्जत गर्जत उठला
करेंगे या मरेंगे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

अरे जिवा जगावेस उत्साहाने, आनंदाने..

अरे जिवा जगावेस उत्साहाने, आनंदाने
नको गुंतू व्यसनात देह देवाचेच देणे!

नको हव्यास कसला मिळे काही न मागता
जर गाळलास घाम तुझ्या भुकेची त्या चिंता!

एका जागी बैस जरा जग धावते पळते
अरे मिटल्या डोळ्यात नील आभा प्रवेशते!

देह भिन्न एक आत्मा पशुपक्ष्यांत, जनांत
एक तृप्ती असे त्याची पहा एक अनेकांत!

फक्त देहाचा विचार तिथे सुरू अनाचार
करी वासना बेजार कैसा देव भेटणार?

गोड बोलता वागता मैत्री नकळत होते
सुखदुःखी सहभाग जगावेगळेच नाते

जन्म ज्याला त्याला मृत्यु धन येते तैसे जाते
वेडे माणूस झुरते संत संसारी ना गुंते

कर सुखाने संसार जरी असला असार
नाम हेच एक सार सकलांना तारणार

देह करू देत काम मुखे घेऊ जाता नाम
इहलोक परंधाम एकरूप वाटे ठाम

ऐसा बाळग विश्वास घेता विठ्ठलाचा ध्यास
तुटे अज्ञानाचा फास मुखी अमृताचा घास

नको रडू, झुरु नको नको काम, क्रोध नको
नको शंका, चिंता नको हातपाय गाळू नको

अरे जिवा जगावेस उत्साहाने आनंदाने
नको गुंतू व्यसनात देह देवाचेच देणे

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, August 7, 2018

जाग उठो हे अमृतपुत्र तुम अपनी शक्ति पहचानो

जाग उठो हे अमृतपुत्र तुम अपनी शक्ति पहचानो
मृगेंद्र हो तुम नरेंद्र हो तुम, खडे रहो सीना तानो

बनो खिलाडी क्रीडांगणपर जी जान से खेलो खेल
कुदो गाओ, धूम मचाओ, बना रखो यौवन से मेल
भगवद्गीता क्रीडांगणपर सीखी जाती यह जानो!१

एक व्यक्ति नही विजयी बनता, अच्छा संघ बनाना है
संघ बनाकर एक हृदय हो भारतवंदन करना है
इस पूरब का ज्ञानतेज पश्चिम पर बिखरो दीवानों!२

दरिद्र में जो ना दिख पडता नारायण है बुला रहा
जिस की कानोंपर ध्वनि आई, सेवा में वह मग्न रहा
सेवा पूजा, ज्ञान दक्षिणा अच्छा सेवक शीघ्र बनो!३

बिना ध्येय के जीवन कैसा प्राणवायु आवश्यक है
बिना त्याग के आनंद कैसा, प्रेमशून्यता नरकही है
स्वर्ग नरक अपने ही मन में जाग उठो रे इन्सानो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.१२.२००३

Friday, August 3, 2018

विठ्ठल सापडला!



विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल म्हणता विठ्ठल सापडला
सोऽहं सूत्रे परमप्रेमे तो बंदी झाला! ध्रु.

वीट फेकली पुंडलिकाने थांब जरा म्हटले
वीट केवढी तिच्यावरी श्रीपांडुरंग ठाकले
कटीवरी कर ठेवुनि विठ्ठल सांभाळी तोला!१

कर्तव्याच्या आचरणाने श्रीहरि संतुष्ट
युगे लोटली तरी न त्याला थोडेही कष्ट
वारकऱ्यांना विठू बोलवी या या भेटीला!२

उभा राहुनी हेच सुचवितो कीर्तनात जागा
परस्परांना विठ्ठल मानुन प्रेमाने वागा
घरी पंढरी देहमंदिरी भेटत जा विठ्ठला!३

विठ्ठलात रखुमाई भरली कळला एकपणा
मी तू शब्दा वावच नाही कोठे दुजेपणा
चिंतन रमवी नाम स्फुरवी रुची अभंगाला!४

विठुरायाच्या पायी डोई यात सर्व आले
मी माझेपण पूर्ण हरपले आसू ओघळले
स्वरूप आनंदाचा अनुभव श्रीरामा आला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, August 1, 2018

स्मृती जागवू लोकमान्यांची!

सदैव जागे रहावयाचे, रात्र वैऱ्याची
आज पुन्हा हो स्मृती जागवू लोकमान्यांची!ध्रु.

चरणांपाशी बसून जाणू अर्थ स्वराज्याचा
बलोपासना करून घालू पाया कार्याचा
संघटनेची कला देणगी गणेशरायाची!१

मायभूवरी प्रेम कराया अडचण हो कुठली
तळमळ मनि जर समजा कोडी क्षणात उलगडली
बालवयातच छात्रा आवड लागे गणिताची!२

शिवरायांचे रूप आठवू त्यांचा उद्योग
अजिंक्य ध्येयासक्ती त्यांची तसा कर्मयोग
राज्य हिंदवी व्हावे ऐसी इच्छा सगळ्यांची!३

वसन स्वदेशी भाषा अपुली सुयोग्य ज्ञानाला
वेळ न लागे असाध्य ते ते साध्य बनायाला
भारतवासी बाळगोत मनि चाड न्यायाची!४

शेतीमध्ये सुधारणा त्या नव्या यंत्रशाळा
विज्ञानाचे शोध नवनवे पूरक प्रगतीला
ढळू न देऊ व्यवहाराची बैठक नीतीची!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 15, 2018

महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

गडावरुनि अजुनि नच सुटला तोफेचा गोळा....
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!ध्रु.

तळपलेत येथे भाले
झेलण्या शिरावर घाले
रणकंदन तुंबळ चाले
रुधिरांत मावळे न्हाले
एक एक क्षण अतां भासतो युगसमान झाला!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

या गजापुराच्या खिंडी
फुटु न दिली आम्ही कोंडी
पोचण्यास गडी शिवदिंडी
मी ठाण या स्थळी मांडी
कर्तव्यपालनी उणा तर नव्हे आत्मा कळवळला
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

छातीचा करुनी कोट
रोकले सागरी लोट
क्रोधात थरथरे ओठ
गिळला न जळाचा घोट
आतुरता दाटे या कानी अजुनी ना ध्वनि आला!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

तोच ये कुठुनशी कानी
धऽधऽऽ  घुमत घनवाणी
मी कृतार्थ मजला मानी
नयनात साठते पाणी
चरणांशी अपुल्या रुजु व्हावा, भक्तिभाव भोळा!
महाराज, घ्या अंतिम मुजरा जातो ...सांभाळा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 8, 2018

मन स्वच्छ स्वच्छ केले तर रोग दूर गेले..

मन स्वच्छ स्वच्छ केले
तर रोग दूर गेले!ध्रु.

का भ्यायचे कुणाला, दुखवायचे कुणाला
जर बोल गोड झाले!१

तो वैद्य जीवनाचा श्रीराम अंतरीचा
जर नाम पथ्य झाले!२

ती भूक हीच खूण, घे तूच पारखून
जर अन्न ब्रह्म झाले!३

आनंद घ्यावयाचा, आनंद द्यावयाचा
जर देवघेव चाले!४

चिंता जिवंत जाळे, चिंता जिवास पोळे
निश्चिंत चित्त झाले!५

अभिमान सोडुनीया, पदि भाव ठेवुनीया
मन रामि रंगलेले!६

उपवास चिंतनाला उपवास चालनेला
मन कर्मि गुंतलेले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, July 6, 2018

आरती गाऊ साईनाथा उदारा विश्वाच्या नाथा....

आरती गाऊ साईनाथा
उदारा विश्वाच्या नाथा!ध्रु.

माझे दत्तगुरु साई
होऊ कैसा उतराई?
तत्पदी टेकवीन माथा!१

सारखे शिरडी बोलविते
अनावर उत्सुकता होते
झरतसे अश्रूंची सरिता!२

कोण मी? कोठुनि गा आलो?
मीच मज कैसा विस्मरलो?
तोच मी! बिंबू दे आता!३

नाम हे मधुर मधुर साई
वाटते चित्ता अंगाई
उदी ही तीट होय भक्ता!४

प्रेममय जीवन हे व्हावे
दुजेपण निमिषी विलयावे
"तथास्तु" म्हणा साईनाथा!५

स्वरूपी रमती ते संत
जनासी धीर देत संत
भक्तिपथ दिसो गुरुनाथा!६

अहंता पूर्ण पूर्ण जावी
माधवी वृत्ती रंगावी
"राम" नच मागे अधिक!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 5, 2018

मी चुकलो शिकतच नाही शिकवा ना मजसी साई..


मी चुकलो शिकतच नाही
शिकवा ना मजसी साई! ध्रु.

कामात खोल मी बुडलो
स्वत्वाला मुकलो मुकलो
रडतो मी धाई धाई!१

क्रोधात स्वतः मी जळतो
कितिकांना दुःखी करतो
मज सुशांत बनवा साई!२

लोभाचे मोहक जाळे
कुणि मार्गी पसरून दिधले
रुततो मी ठाई ठाई!३

मत्सर तर अंतरि भरला
मी सदाच गुदमरलेला
मज मुक्त श्वास द्या साई!४

का नाम न वदनी येते?
का ध्यान न मजला रुचते?
तुम्ही स्वामी सद्गुरु साई!५

लोटला देह हा चरणी
मज तार मार वा जननी
माझे नच उरवा काही!६

मम मना सुमन होऊ दे
चरणांशी स्थान मिळू दे
श्रीराम विनवितो पायी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवलेे
०३.०८.१९७६

Wednesday, July 4, 2018

श्री साईनाथ भक्तिस्‍तोत्र.

ॐ नमो जी गणराया
गुरुराया, साईराया
बालक पडते तव पाया
लाव उराशी सदया रे ।। १ ।।

साई मंगल तव नाम
भक्‍तां करिते निष्‍काम
जीवन बनते सुखधाम
किमया कैसी वानू रे? ।। २ ।।

तुझी कृपा हो जयावर
उरे न पळभर तनावर
भाव होतसे अनावर
समाधि सत्‍वर लागतसे ।। ३ ।।

परमार्थाची रुचि लागे
काय अधिक मग तो मागे?
भवभय पळते झणि वेगे
प्रत्‍यय दे हा गुरुनाम ।। ४ ।।

साई! साई! जप चाले
रूप मधुर नयनी भरले
गंधित मन झाले, झाले
अष्‍ट भाव सात्त्विक स्‍फुरले ।। ५ ।।

शिळेवरी तू बसलेला
आवडला बहु आवडला
सोSहं स्‍वर कुठुनी आला
दिसली मज गुरुपदकमले ।। ६ ।।

मधुर झिणझिण्‍या येतात
हासू फुटते गालात
सात्त्विकता जी चित्‍तात
ये उदया बघता बघता ।। ७ ।।

नकोच मज धन भुलवाया
नकोच गौरव मज वाया
नकोच सत्‍ता झिंगाया
ठाव तव पदी दे साई ।। ८ ।।

मन झाले शिरडी माझे
आले मनि साई राजे
मानसपूजा बहु साजे
पूर्ण चंद्रमा भक्‍तीचा ।। ९ ।।

अरूप जरि तू गुरुराया
सुस्‍वरूप दिसशी सदया
तूच लाविशी बोलाया
वेड शहाणे लाविशि रे ।। १० ।।

विश्‍व सदन मज वाटतसे
साईमूर्ती हृदि विलसे
निर्भय मानस झालेसे
प्रसाद ऐसा सद्गुरुचा ।। ११ ।।

असता सद्गुरु हृदयात
शिष्‍य होतसे निभ्रांत
स्‍मृतिसौरभ त्‍या सुखवीत
कोण छेडते हृदयसतार?  ।। १२ ।।

साई स्‍वामी एकच हो
शिरडी पावस एकच हो
अभिन्‍नत्‍व हे मन पाहो
काय उणे मग भक्‍ताला?  ।। १३ ।।

भूती दिसतो भगवंत
कानी येतो भगवंत
स्‍पर्शनि भासे भगवंत
एक विषय गुरु झालेला ।। १४ ।।

अचिन्‍त्‍य वाटे चिंतावे
अदृश्‍य वाटे देखावे
अलभ्‍य ते मज लाभावे
छंद लागला साईचा ।। १५ ।।

दत्‍तराज हे साईनाथ
आदिनाथ हे साईनाथ
धरा तुजमुळे असे सनाथ
वंदन घे सद्गुरुराया ।। १६ ।।

तव पूजा मी कशी करू?
तुझी स्‍तुती मी कशी करू?
तुझे ध्‍यान मी कसे करू?
शिकव शिकव गे साईमाय ।। १७ ।।

सोSहं चा मज प्रत्‍यय दे
मधुराद्वय मज अनुभवु दे
भक्तिगीत मज गाऊ दे
कोड जिवाचे पुरवी गे ।। १८ ।।

साई! साई! मन गाते
साई! साई! मन ध्‍याते
साई! साई!! मन बघते
निशिदिनि साईचा छंद ।। १९ ।।

गुरु‍चरित्र मी गाईन
गुरुमूर्ती मी पाहीन
गुरुकीर्तन मी ऐकेन
वेडच ऐसे भजनाचे ।। २० ।।

उदी तुझी दे साई गे
विरक्‍ती अंगी बाणव गे
उत्‍कटता दे भजनी गे
नकोच काही अन्‍य मला ।। २१ ।।

जेथे जेथे मन जाई
तेथे दर्शन दे साई
पवन ही देवो तव ग्‍वाही
तथास्‍तु! वद ना साईमाय ।। २२ ।।

देहभाव हा विरेल का?
भक्तिभाव हा फुलेल का?
सद्गुरु दर्शन देतिल का?
हुरहुरताहे मन माझे ।। २३ ।।

स्मित जे वदनी मज दिसले
चांदणेच ते मज गमले
प्राजक्‍ताची जशी फुले
गंध दरवळे सोSहंचा ।। २४ ।।

गौरीशंकर साई हो
रमारमण श्रीसाई हो
ब्रह्मदेव ही साई हो
परब्रह्म श्री साईनाथ ।। २५ ।।

साई ओळखता यावा
मना रुचू दे जनसेवा
आत्‍मारामहि तोषावा
भक्तियुक्‍त कर्तव्‍याने ।। २६ ।।

साई तुजला आळविता
झरणी हर्षित हो झरता
अमृतमय हो ही कविता
तुझी कृपा मज जाणवते ।। २७ ।।

झोळी भिक्षेची धरता
विश्‍वनिकेतन मज होता
मधुर शिदोरी ये हाता
सार्थक झाले जन्‍माचे ।। २८ ।।

उदी लावता भाळाला
काम श्‍याम सत्‍वर झाला
अग्नि घेतसे शैत्‍याला
पुनव सदा मनि प्रकाशली ।। २९ ।।

साई! साई! गर्जावे
साई! साई! ऐकावे
साई! साई! मी गावे
सोSहं भजनी मन रंगे ।। ३० ।।

साईंच्‍या दरबारात
भक्‍तमंडळी जमतात
साईमहिमा गातात
दिव्‍यानंद मिळवावा ।। ३१ ।।

कणव मनी ती साई हो
भक्तिभावना साई हो
कौतुक ते ही साई हो
साई म्‍हणजे मानवता ।। ३२ ।।

बरी फकीरी दास म्‍हणे
बरी भाकरी दास म्‍हणे
गरिबाघरी हरि दास म्‍हणे
साई दीनांचा नाथ ।। ३३ ।।

गुरुराया साई सदया
निर्हेतुक रे तुझी दया
भवभय नेशी तू विलया
जय मुनिराज जय योगिराज ।। ३४ ।।

कोण मी? असा प्रश्‍न पडे
अहंभाव सर्वत्र नडे
परमेश्‍वर मग कुठे दडे
उलगडशी साई कोडे ।। ३५ ।।

देहोSहं फिटते भ्रांती
अनुभवास ये मग शांती
ध्‍यानांतरि ये विश्रांती
जीवन अमृतमय आता ।। ३६ ।।

डामडौल तो नको नको
दंभ नको, मत्‍सरू नको
दुजाभाव मनि नको नको
एवढेच मज दे साई ।। ३७ ।।

नेशिल केव्‍हा शिरडीला
ओढ लागली लेकीला
साद म्‍हणुनि ही साईला
अंगुलि धरुनी चालव गे ।। ३८ ।।

चरणधूलि मज उदीच गे
स्‍मरण तुझे मज अमृत गे
तव नामाचा छंदच गे
वेडा झालो मी साई ।। ३९ ।।

तुला आळवू सांग कसा?
कोठे ठेवू सांग कसा?
मनी उमटला खोल ठसा
तुझिया हस-या मुद्रेचा ।। ४० ।।

विकारवश का मन होई? 
तोल मुळी राहत नाही
शांत दांत बनवी साई
स्‍नेह शिकव या दासाला ।। ४१ ।।

मीपण माझे लोपावे
साईमय मज जग व्‍हावे
सोSहं सहजचि साधावे
सद्गुरु पुरवी ही आस ।। ४२ ।।

वायुलहर तू साई का?
जलतरंग तू साई का?
नीलगगन तू साई का?
हे जो वदवी तो तूच ।। ४३ ।।

चुकता चुकता मज शिकणे
पडता पडता सावरणे
ज्ञान हळुहळू आचरणे
श्रद्धा सबुरी देशिल ना? ।। ४४ ।।

भगवद्गीता आवडते
"पार्थ मी" असे मन म्‍हणते
"तूच कृष्‍ण" साई, गमते
शिष्‍य तुझा मी, शिकव मला ।। ४५ ।।

काय ग्राह्य हे मला कळो
काय त्‍याज्‍य ते सहज गळो
चित्‍त न माझे कधी मळो
ते गंगेचे जळ व्‍हावे ।। ४६ ।।।।

आदिनाथ तू साईनाथ
आदिगुरु तू साईनाथ
आदिकवि हि तू साईनाथ
पदलालित्‍ये जाणवते ।। ४७ ।।

गानकला तू श्रीसाई
शिल्‍पकला तू श्रीसाई
शब्‍दकळा तू श्रीसाई
जाणवले हे जाणवले ।। ४८ ।।

कर साह्याचा तू साई
स्‍पर्श आईचा तू साई
वच जे प्रेमळ तू साई
अवती भवती वास तुझा ।। ४९ ।।

मायतातही तू साई
सानलेकरे तू साई
घरकुल माझे तू साई
स्‍वानंदाच्‍या सम्राटा ।। ५० ।।

आसन सुस्थिर मजसी दे
प्रशांत मानस मजसी दे
अढळ श्रद्धा मजसी दे
ठेवी कर मस्‍तकि माझ्या ।। ५१ ।।

डोळे मिटुनी मी घ्‍यावे
आत मनासी मुरडावे
अंत:स्‍था बघता यावे
आस गोमटी ही माझी ।। ५२ ।।

या भजनाचे दे प्रेम
तूच चालवी मम नेम
ध्‍यानी येउनि दे क्षेम
लळा आगळा पुरवी रे ।। ५३ ।।

धनसुतदारा सुखे असो
तव पदकमली चित्‍त वसो
कंटकजाली सुमन हसो
ऐसी लाभो प्रसन्‍नता ।। ५४ ।।

ज्ञान भक्ति यांचा योग
दुग्‍धशर्करा संयोग
सहज हटवितो भवरोग
वैद्यराज साई मिळता ।। ५५ ।।

जे माझे ते मजपाशी
दाखवूनि ते दे मजशी
शरणागत या शिष्‍यासी
दूर नको लोटू देवा ।। ५६ ।।

प्रणवाचा जो उच्‍चार
तो आहे तव हुंकार
तव प्रतिमा घे आकार
ॐकारात्‍मक मज दिसते ।। ५७ ।।

तिळहि न खोटे तुज खपते
भोळे मानस आवडते
भजनी वृत्‍ती बहु रमते
साईशंकर नृत्‍य करी ।। ५८ ।।

“मी कर्ता” हा गर्व नसे
“मी तर त्‍याचा” भाव असे
तन्‍मयता नयनी विलसे
स्‍फटिकाचे घर प्रकाशले ।। ५९ ।।

स्‍वस्‍थ तरी विश्‍वी फिरशी
देह धरुनि ही अविनाशी
अघटित लीला दाखविशी
भक्ति अंतरी रुजवाया ।। ६० ।।

अनासक्ति जी तू साई
निरहंकारीपण साई
स्थिती विदेही तू साई
कोटि कोटि वंदने तुला ।। ६१ ।।

मदीय दोषां घालव रे
हात धरूनि तू चालव रे
बोल बोबडे बोलव रे
हट्ट पुरव गे साईमाय ।। ६२ ।।

कायापालट घडेल का?
मार्दव भाषणि येइल का?
सेवा काही घडेल का?
आतुरलीसे उत्‍सुकता ।। ६३ ।।

बरे कांबळे बैसाया
बरी भाकरी भक्षाया
बरे उदक ते प्राशाया
तव साधेपण दे साई ।। ६४ ।।

स्‍वस्‍थ बैसता देव दिसे
प्रसन्‍नचित्‍ती देव दिसे
गुरुच देव हे सत्‍य दिसे
शिकवण प्रेमळ तव साई ।। ६५ ।।

जनात असलो तरी तुझा
एकांतीही तुझा तुझा
मी सर्वांगे तुझा तुझा
अजाण बालक साईमाय ।। ६६ ।।

परब्रह्म ठावे नाही
तर्क कराया मति नाही
पांडित्‍याचा कण नाही
एकच कळते तू सर्व ।। ६७ ।।

तू जननी तू जनक तसा
तू बंधू तू तशी स्‍वसा
तू सद्गुरु भवतारु तसा
साई मनाला कळते हे ।। ६८ ।।

थेंबे थेंबे होत तळे
क्षणाक्षणाने युग झाले
कणकण मिळुनी गिरि बनले
स्‍मरण नित्‍य मी तसे करी ।। ६९ ।।

तू बोलविल्‍या बोलेन
तू चालविल्‍या चालेन
तूच लिहविल्‍या मी लिहिन
सूत्रे सारी तुझ्या करी ।। ७० ।।

नश्‍वर ते दाखवी उदी
शाश्‍वत स्‍मरणी आणी उदी
उदी शिकविते पदोपदी
रक्षा अंती सगळ्याची ।। ७१ ।।

दे रक्षण संकटी गुरु
चिंता कसली व्‍यर्थ करू
साई साई उच्‍चारू
आत्‍मबळासी वाढवितो ।। ७२ ।।

“जेथे, तेथे” तू साई
“जेव्‍हा, तेव्‍हा” तू साई
“जैसा, तैसा” तू साई
निर्गुण तैसा सगुणहि तू ।। ७३ ।।

तू कर्ता या सृष्‍टीचा
तू धर्ता या सृष्‍टीचा
तू हर्ता या सृष्‍टीचा
ब्रह्मा विष्‍णु शिव साई ।। ७४ ।।

बागेमधले सुमनहि तू
त्‍यावरचा दवबिंदू तू
गंधित शीतल वायुहि तू
प्रत्‍ययकारी तव सहवास ।। ७५ ।।

अनुतापे मी पोळावे
कळवळुनी मी क्रंदावे
कुशीत मजला त्‍वा घ्‍यावे
करुणा येउनि अनावर ।। ७६ ।।

स्‍वामी समर्थ तू साई
परम सद्गुरु तू साई
जगदुद्धारक तू साई
कितिदा तुज संबोधावे ।। ७७ ।।

किती उशीरा मज कळते
जे कळते ते नच वळते
आघाते मन हुळहुळते
हळवी फुंकर मार त्‍वरे ।। ७८ ।।

जखम वाहते भळभळ रे
अंतरि वाढे तळमळ रे
तुजविण कोणा कळकळ रे
शरण शरण सद्गुरुराया ।। ७९ ।।

दृष्टि अमृता वर्षत रे
वाणी सुखवी भक्‍ता रे
तुझी छबीही बोलत रे
अनुभव हा ज्‍याचा त्‍याला ।। ८० ।।

बाहेरुनि वळवी आत
प्रकाश वितरी चित्‍तात
ये सोSहं च्‍या भजनात
काळाचाही विसर पडो ।। ८१ ।।

असता जवळी नच दिसशी
दूर जाउनी झकवीशी
अनुसंधाना साधविशी
जाणुनिया हित दासाचे ।। ८२ ।।

का मग चुकण्‍याची खंत
जो सांभाळी तो संत
भक्तिपथे जाणे संथ
गाठिन निश्चित ध्‍येयासी ।। ८३ ।।

जरि अवखळ हे मन माझे
भावसुधा पिउनी ताजे
सुमन गुरूच्‍या पदि साजे
पूजा करण्‍या पडलेले ।। ८४ ।।

साई पदिची धूळच मी
साईचे स्मित सुंदर मी
वदनावरचे तेजहि मी
रोम रोम तनुचा फुलला ।। ८५ ।।

“साईसच्‍चरिता” गावे
साईस्‍मरणी रंगावे
तरीच साईप्रभु पावे
देव भुकेला भावाचा ।। ८६ ।।

सज्‍जनगडचा समर्थ तो
शेगावाचा समर्थ तो
पावसचही स्‍वामी तो
संत स्‍वरूपी मिळलेले ।। ८७ ।।

महत्‍त्‍व आहे सत्‍यासी
जाणावे अंत:स्‍थासी
ध्‍यावे आत्‍मारामासी
गुरुबोधाचा मथितार्थ ।। ८८ ।।

सुख साईला मागावे
दु:खहि त्‍याला सांगावे
शिशु होउनिया बिलगावे
घे जवळी साईमाय ।। ८९ ।।

जो जो वाढे हव्‍यास
भक्‍त अंतरे सद्गुरुस
एकच धरणे मनि आस
गुरुपदसेवा नित्‍य घडो ।। ९० ।।

साईचा तो जयघोष
तो भक्‍तीचा परिपोष
मनास देई संतोष
भजनसोहळा सद्गुरुचा ।। ९१ ।।

माळेमधला मणि एक
शिकवी भक्‍ता “तो एक”
डोळे मिटुनी त्‍या देख
नाम नि नामी एकच की ।। ९२ ।।

का खंती मग कर्माची
कास धरी रे योगाची
पूजा कर गुरुरायाची
स्‍वकर्मकुसुमे वाहुनिया ।। ९३ ।।

जो जो भेटे तो साई
अंतर्बाह्यहि तो साई
विश्‍व भरुनि उरला साई
विश्‍वात्‍मक तैसे व्‍हावे ।। ९४ ।।

निजदेहाचा मोह नको
स्‍वार्थाचा लवलेश नको
द्वेषाचे तर नाव नको
साई प्रेमाची मूर्ती ।। ९५ ।।

भिक्षा शिकवी “दान करा”
भिक्षा शिकवी “गुरु स्‍मरा”
भिक्षा शिकवी “जगि विहरा”
थोड्यावर व्‍हा संतुष्‍ट ।। ९६ ।।

भिक्षा घेई तो साई
भिक्षा देई तो साई
हे जो निरखी तो साई
ध्‍यानी घ्‍यावा एकपणा ।। ९७ ।।

हे यज्ञाचे रूप नवे
संघटनेसी सूत्र नवे
चिंतनासहे खाद्य नवे
भिक्षाटनही भक्‍तीच ।। ९८ ।।

राव-रंक हा भेद कुठे?
अंत्‍यज-द्विज हा भेद कुठे?
अज्ञ-प्राज्ञ हा भेद कुठे?
समान भूमी भक्‍तीची ।। ९९ ।।

भाषा हृदयांची एक
भाविकता सगळी एक
ओढ गुरूची ही एक
जाणवले हे जाणवले ।। १०० ।।

साई न केवळ शिरडीचा
नच केवळ तुमचा-आमचा
तो तर अवघ्‍या विश्‍वाचा
विश्‍वनाथ हा साईनाथ ।। १०१ ।।

या वाग्यज्ञे तोषावे
पसायदानहि मज द्यावे
अंतरि नित्‍याचे यावे
देह बनू दे देव्‍हारा ।। १०२ ।।

साई ज्ञानाचे ज्ञान
साई ध्‍यानाचे ध्‍यान
साई गानाचे गान
विश्रांतीची विश्रांती ।। १०३ ।।

चंद्र तिथे चंद्रिका असे
शंभु तिथे अंबिका असे
भाव तिथे श्रीसाई असे
साई प्रत्‍यय देतात ।। १०४ ।।

क्रोधासी औषध शांती
स्‍नेहाने जुळती नाती
अंतरि तेवतसे ज्‍योती
श्रीसाईच्‍या भक्‍तीची ।। १०५ ।।

कृपा करी रे कृपा करी
श्रीरामासी लाव उरी
कृपाहस्‍त तू ठेव शिरी
मागू मी दुसरे काय? ।। १०६ ।।

तुझे स्‍तोत्र हे मज गीता
तुझे नाम हे मज कविता
तुझी भक्ति तर सुरसरिता
आचमने लाभे तृप्‍ती ।। १०७ ।।

अधिक असे जे कर सरते
न्‍यून असे ते कर पुरते
राम विनवि साई तूंते
भावांजलि ही स्‍वीकारी ।। १०८ ।।

हरि: ॐ तत् सत्।

।। श्री साईनाथार्पणमस्‍तु ।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
(१९७६ सालची रचना आहे)

Saturday, June 30, 2018

साईनाथा मजसी प्रसाद द्या..

साईनाथा मजसी प्रसाद द्या
कुरवाळा मज शांती द्या!ध्रु.

कणाकणातून भरला आपण
विरवा हलके माझे मीपण
एकपणा मज अनुभवु द्या!१

बसल्या ठायी नयन मिटावे
मिटल्या नयनी आपण यावे
भावभेट नित ध्यानी द्या!२

वामहस्त दक्षिण चरणावर
श्वेतवसन मुनि बसे शिळेवर
सोsहंचा मज छंद द्या!३

कामक्रोध हा झाडा कचरा
बरसा हृदयी अमृतधारा
प्रेमळवृत्ती अपुली द्या!४

श्रद्धा द्यावी सबुरी द्यावी
साधन करण्या सन्मति द्यावी
अशीर्वच उत्तेजन द्या!५

चैतन्याचा ध्यास लागु दे
चैतन्याचे गीत गाउ दे
कीर्तनरंगी नाचू द्या!६

देहातुनि न्या देवापाशी
मला जाणवो मी अविनाशी
'तत् त्वम् असि' हा प्रत्यय द्या!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

कितिकितिदा घोकायाचे शिरडीला मज जायाचे..

कितिकितिदा घोकायाचे
शिरडीला मज जायाचे! ध्रु.

साईमाय माझी
वाट पाहे कधीची
कडकडून भेटायाचे!१

आनंदाने गावे
गावे गावे जीवेभावें
भजन साईरायाचे!२

हाती खंजिरी प्रेमाची
पायी घुंगुरे सोsहंची
भक्तिरंगी रंगायाचे!३

गोदामाईचा तो घाट
भक्तिप्रेमाची ती पेठ
भरभरुनि प्रेम घ्यायाचे!४

माझी ज्ञानाई साई
माझी तुकाई साई
विश्वात्मक मज व्हायाचे!५

वाटे कल्पतरु साई
माझे दत्तगुरु साई
सोsहं ध्यानात रंगायाचे !६

काय वानू नवलाई
कनवाळू साईमाई
फळ रसाळ मज व्हायाचे!७

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०७.१९७६
कितिकितीदा घोकायाचे
👆🏻 ऑडिओ

Sunday, June 24, 2018

श्री साई बावन्नी

शिळेवरी साई बसले मनी रूप हे ठसलेले
फिकीर विश्वाची ज्यांना शिरडी आवडली त्यांना
रोखुनि डोळे ते बघती मनातले झणि ओळखती
साई साई मी म्हणता रसना प्रेमे ओलवता
दोन्ही डोळे हे भरता मनोमलिनता मावळता 
श्रद्धेचा उगवे चंद्र लोप पावते ते तिमिर
सबुरी म्हणजे सोशिकता धैर्याची शोभे माता
उदी ठसवते नश्वरता संजीवक सगळ्या भक्ता
ती लावावी भाळाला का भ्यावे कळीकाळाला
ज्याच्या खांद्यावर झोळी अशुभाची करतो होळी
कांदाभाकर आवडते गाणे देवाचे रुचते
सबका मलिक एकही है उपदेशाचे सूत्रच हे
मानवतेचे बालक हा शांतीचा आश्वासक हा
धर्माचा अभ्यासक हा मांगल्याचा पूजक हा
जरी लेखणी ना धरली उपनिषदे त्या स्फुरलेली
कोणासाठी शंकर हा दत्तगुरु कोणासी हा
आकारी नच मावतसे मनामनातून शिरलासे
ज्ञानेश्वर हा आळंदीचा तुकाराम हा देहूचा
पैठणचा जणु नाथ असे या रूपे सद्भाव वसे
दासगणू नि उपासनी आवडती त्यांना दोन्ही
संतकवी स्त्रीचा त्राता व्यवहारीही नि:स्पृहता
शिरडी तैसी साकोरी तीर्थक्षेत्रे भूमिवरी
देहाची सोडा ममता मी असताना का चिंता
जो कोणी पायरी चढे भाग्य तयाच्या पुढे खडे
चुकले कोठे कळले ना भगवंताला ये करुणा
साई साई असे म्हणा कुणी अधिक ना कुणी उणा
रोग निपजतो देहात उपचारही तो देहात
देव नांदतो भावात धर्म वसे माणुसकीत
समता जगती वर्तावी अहंभावना खंडावी
मोदाची गुढी उभवावी शिरडीची यात्रा व्हावी
स्मराल तेथे मी आहे स्मराल तेव्हा मी आहे
स्मराल तैसा मी आहे कणकण क्षणक्षण मी आहे
पायघोळ कफनीच बरी फडके माथी मुकुट जरी
साई दीनास्तव दीन साई लीनाहुन लीन 
साई वृद्धाचे आसू साई बाळाचे हासू
साई जैसा मशिदीत मंदिरात गुरुद्वारात 
चुकले हळहळ वाटू दे माय आसरा देऊ दे
सुधारणा ती घडवू दे भक्तीपथावर आणू दे
नरनारी सगळेच हरि साईनाथ तू असे करी
उजाड भूमी भिजवावी हिरवा शालू ती ल्यावी
नको रुक्षता वचनात हवी सुजनता वृत्तीत
आवेगे जवळी घ्यावे बालकास या चुंबावे
जातिभेद ते विसरावे साई साई मी गावे
उणे भरूनी काढावे अंतर्मुख बनता यावे
स्थल काला ओलांडावे विश्वात्मक मज बनवावे
गीतेचा जडू दे छंद राम कृष्ण हरि गोविंद
साई सत्चरिता ध्यावे जे न दिसे ते उमजावे
माझा मी घेता शोध  कुठे काम कोठे क्रोध
मशीदीतली दिपवाळी बारा मास घरी व्हावी
माझ्या नकळत हे व्हावे मनमंदिरि साई यावे
उघड दार मन खुले करी साईनाथा त्वरा करी
साई बावन्नी इथे पुरी साईचरणा राम धरी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, June 21, 2018

चला करू या व्यायाम...

चला करू या व्यायाम!ध्रु.

सतेज होऊ
सुदृढ होऊ
चला शिकु प्राणायाम!१

प्रातःकाळी
रवि उदयाचलि
रूप तयाचे अभिराम!२

मन:संयमन
भगवद्चिंतन
हाच जिवाला विश्राम!३

आठहि अंगे
वंदन रंगे
उच्चारू या रविनाम!४

मंत्र आगळा
आम्हा लाभला
होऊ आपण बलराम!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, June 20, 2018

सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे....

अशि वाट संपता खडतर वळणे-कडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!ध्रु.

हातात घालुनि हात फिरत असताना
गुंतलो मने कल्पना मुळी नसताना
आकर्षण मधुमय भान हरपवी गडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!१

कालची संकटे, भीती, कठिण प्रसंग
जे गडद भासले पार निवळले रंग
उतरलो कसोट्या शिकलो अवघड धडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!२

सुरकुत्या तनावर अंधुक अंधुक दिसे
परि उठले असती चरणांचे पथि ठसे
कधि नव्हते इतके परस्परांविण अडे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!३

देऊन न सरते घेउन उरते सदा
कुणी म्हणोत माया वरदायिनी हिज वदा
जरि थकते पाउल पथावर पडे पुढे
सखि प्रवास सुखमय उत्तररंगाकडे!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, June 17, 2018

आशीर्वाद

मुला तुला शाळेत घातले तुझेच तुजला शिकायचे
बलशाली हो, हो उद्योगी विश्वाला सुख द्यायाचे! ध्रु.

अक्षर सुंदर मोत्यावाणी नयनांचा तो आनंद
हिशेब वेळेचा द्रव्याचा, कलागुणांचा घे छंद
एकलव्य तू गुरुनिष्ठेने पुढे पुढे तुज जायाचे!१

इतिहासाने स्फूर्ति लाभते, हस्तकला दे उद्योग
चित्रकला सौन्दर्य दाखवी संस्कारे हरिशी योग
विशाल दृष्टी, विशाल सृष्टी बाल्यी हे जाणायाचे!२

भूगोलाने दिली प्रेरणा सारे जग मी पाहीन
भाषा फुलवी भावभावना दुःख दुज्याचे जाणेन
संगीताने तुला शिकवले समाजजीवन जगण्याचे!३

पाठांतर हे ज्ञान जिभेवर थोरांचा सहवास खरा
स्फूर्तिकेंद्र तू हो सगळ्यांचे असा खळाळो मोदझरा
मेरूसम तू राही निश्चल वज्रासम तुज होण्याचे!४

कृतज्ञता ही सद्गुरु भक्ती विनम्रता ही श्रीमंती
दैवीगुण तू जोडत जाता वश होती ऋद्धी सिद्धी
तुजवर केंद्रित सगळ्या दृष्टी आशीर्वच तुज थोरांचे!५

सहली शिबिरे विरंगुळा हा कंटाळ्याला पिटाळले
प्रयोगशाळा प्रात्यक्षिक ते अचूकपण अंगी आले
अनुभवातुनी ज्ञान लाभते ज्ञान देउनी फुलायचे!६

दूरदर्शना घरी सोड तू खेडोपाडी भटकत जा
कशी मोकळी हवा कसा तो निसर्ग त्याची चाख मजा
काटकपण जर अंगी आले मानच देणे देवाचे!७

अंकुरणारे बीज जसा तू, तूच उद्याचा वटवृक्ष
तूच जिवाचा आश्रयदाता समाज ठेवुन हे लक्ष
वसा घेतला उतू नको तू असे वागणे पथ्याचे!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, June 5, 2018

कलियुगात अवतरले रामराज्य भूमीवरी - शिवराज्याभिषेकावर आधारित गाणे



रायगडी शिंग नभी उच्च स्वरे घोष करी
कलियुगांत अवतरले रामराज्य भूमीवरी ! ध्रु.

तीर्थरूप माउलीला
वंदण्यास शिव झुकला
थरथरता कर फिरला
रोमरोम तनी फुलला
हर्षभरे नयनांतुनि ओसंडत अश्रूसरी!१

गंगा-सिंधु-यमुना
गोदा-कृष्णा-पवना
भरभरुनी कलशांना
घालण्यास शुभस्‍नाना
तटिनी भगिनी मिळुनी जमुनी पोचल्यात येथवरी!२

शोभतसे छत्र शीरी
धारदार खड्ग करी
भवति उभे सहकारी
देई सभा ललकारी
विष्णुचा अंश तूच, तू अमुचा कैवारी!३

वेदमूर्ति गात गान
कर्ण नवा देत दान
वडिलांचा होत मान
तृप्‍त सकल थोर-सान
शुभदिनी या शक नवीन प्रचलित हो राज्यभरी!४

कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, June 4, 2018

अवघाची संसार सुखाचा होण्यास.

अंग मोडूनि काम करावे आळस नाही कामाचा !१
घरदार आपले स्वच्छ ठेवावे, ठाव नसावा केराचा!२
घर हे मंदिर समजावे, प्रत्यय यावा शांतीचा!३
हास्य मुखावर विलसावे, प्रपंच सगळा रामाचा!४
नको अहंता, नको दुरावा आदर्शच सहकार्याचा!५
पति नारायण पत्नी लक्ष्मी भाव असा हा जपायचा!६
तुच्छ न दुसऱ्याला समजावे मान राखणे दुसऱ्याचा!७
मनी मानसी अढी नसावी डाव मोजक्या घटिकांचा!८
झाले गेले ते विसरावे मार्ग चांगला भक्तीचा!९
स्वावलंबने श्रीहरि तोषे यज्ञ खरा सत्कर्माचा!१०
देता घेता वाढतसे सुख हात असावा कर्णाचा!११
समेट करणे पुढती होउन काय भरवसा देहाचा!१२
चैन न वाटो गरज कदापि निर्व्यसनी तो सगळ्यांचा!१३
मुले खेळती ते घर गोकुळ खेळ असे भगवंताचा!१४
मना रोग ना शिवो कधीही छंद जडो हरिनामाचा!१५
सद्गुण रुजती अनुकरणाने जो सावध तो भाग्याचा!१६
तथास्तु वदतो वास्तु पुरुष तो सत्संकल्पच वदायचा!१७
शुभं करोति नित्य म्हणावे सांगावा गृहलक्ष्मीचा!१८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 16, 2018

आरती श्रीगीतेची

आरती श्रीगीते, तू प्रसाद देते
मोह जातो दूर देशा आत प्रभात होते ! ध्रु.

तुझे नाव सार्थ आई तुज गाई सदा मी
समस्या न उरे काही ऐसा अनुभव येई ! १

कर्ता मी न कळो आले माझे मीपण गेले
फली नुरे लेश आस मन विरक्त झाले ! २

भोग देह सुखे भोगो त्याचा लेप कशाला?
सोसण्यात सुख सारे शांति वाटे जिवाला ! ३

नर होय नारायण यत्न हवा कराया
अल्प स्वल्प सत्कार्य कधि न जाई वाया ! ४

नित्य नवे गीता बोले रामे ऐकावे नित्य
श्रवणेहि जाती दोष हे त्रिवार सत्य ! ५

- श्रीराम बाळकृष्ण आठवले

कृष्णनाथ हे कृपाच तुमची! अध्याय १८ - मोक्षसंन्यास योग

नियत कर्म ते अटळ अर्जुना मनापासुनी मुदे करी
नको अहंता नको फलाशा तो कर्ता हा भाव धरी!१

लेप न लागे कर्तृत्वाचा आकाशासम तो झाला
भिन्न देह जरि भक्तीने त्या योगेश्वरही गहिवरला!२

सात्त्विक बुद्धी पूर्ण जाणते अविनाशी त्या भगवंता
सहज कर्म ते धर्मच गमले लेश न भ्रांती मग चित्ता!३

संग तुटे मग द्वंद्व मिटे पथ पुढचा सगळा उलगडला
आत हरी बघ निमिष तरी तो नित भेटाया आसुसला!४

प्रकृति घडवी कर्मे सारी नको युद्ध  मज हट्ट तुझा
स्वतंत्र नसशी पार्था येथे छळे तुला अविचार तुझा!५

हे अंतःस्था शरण तुला मी जसे सांगशी मी करतो
तुझ्या कृपेने ज्ञान जाहले कृतज्ञतेने तुज नमितो!६

कृष्णार्जुनसंवाद चालला अंतर्मुख तो श्रवण करी
द्वंद्व कुठे भयशोक कुठे ज्या चालवि संगे स्वये हरी!७

अर्जुन झाले मन हे माझे स्वरूपनाथा स्वामिवरा
कृष्णनाथ हे कृपाच तुमची आत झरे शांतिचा झरा!८

- शुभं भवतु-
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, May 14, 2018

ॐ तत् सत् हा घोष घुमावा! अध्याय १७ - श्रद्धात्रयविभाग योग

शास्त्रविधीला सोडुनि पूजन करिती जन जे देवाचे
त्यांची श्रद्धा कशी असे हा प्रश्न माधवा मनि उपजे!१

स्वभाव जैसा श्रद्धा तैशी सात्त्विक राजस तामस रे
श्रद्धेविण ना जगता येते श्रद्धामय जन हेच खरे!२

आहाराने मन बनताहे मनच घडविते आचार
सात्त्विक श्रद्धा सात्त्विक मन मग धार्मिक झाला आचार!३

प्रसन्न मन जर शांत भाव तो मन:संयमन पावित्र्य
सुखद सत्य वच कृती संस्कृती परमात्मा नित ध्यातव्य!४

शरीरस्थ परमात्म्यालागी कृश करणारे असुरच ते
अविचाराने झपाटलेले अध:पतित जन ते पुरते!५

गुरुजनपूजन, सुमधुर भाषण, कर्म जयांचे निष्काम
मनी शांतता, तनी वज्रता हृदय तयांचे मम धाम!६

ॐ तत् सत् हा घोष घुमावा कर्मे हरिला पूजावे
यथासांग तो यज्ञ खरोखर प्रत्येकाने जाणावे!७

श्रद्धा असते प्राण खरोखर हवनाचा तपदानाचा
श्रद्धा आहे दृढतर पाया विजयाचा ऐश्वर्याचा!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

दैवी संपद् झगमगते! अध्याय १६ - दैवासुरसंपद् विभाग योग

अभय  शुद्ध मन ध्यानी आवड दान दमन पूजन रुचते
दुःख न देणे, सत्य वागणे दैवी संपद् झगमगते!१

दंभ दर्प अभिमान क्रोध अन् भाषणातली कर्कशता
अज्ञानच वर्तनी प्रकटते अशी आसुरी गुणवत्ता!२

मुक्तिदायिनी दैवी संपद् सहजपणे तुज लाभतसे
शोक टाक अर्जुना भाविका सुदैव कैसे शोभतसे!३

कामक्रोधपरायण जे जे आशापाशी बद्ध सदा
अज्ञाने मोहित झालेले त्यांच्या दैवी बहु विपदा!४

अंतर्यामी जो मी वसलो त्या माझ्या द्वेषे जळती
पुन्हा पुन्हा ते असुरच म्हणुनी इहलोकी खितपत पडती!५

काम क्रोध अन् लोभ अशी ही तीनहि द्वारे नरकाची
तयां टाळण्या मनापासुनी कास धरी तू भक्तीची!६

नरकद्वारापासुन सुटला साधतसे निजकल्याण
त्या भक्ताचा त्या ज्ञान्याचा वाटतसे मज अभिमान!७

जे शास्त्राने नेमुन दिधले कर्म करावे मनुजाने
मनात येते तसे वागणे कड्यावरुन लोटुनि घेणे!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, May 13, 2018

संसाराचा वृक्ष वाढला! अध्याय १५ - पुरुषोत्तम योग

संसाराचा वृक्ष वाढला फांद्या खाली मूळ वरी
आदि न अंत जयाचा ठावा नवल केवढे खरोखरी!१

'मी माझे मजसाठी सगळे' अशी वासना दृढ बंध
संगच हा सुखदुःखा कारण मनुज होत भोगे धुंद!२

असंगशस्त्रा करात घेउन नेटाने या छेदावे
जिथे जाउनी पुन्हा न येणे परमपदा त्या पोचावे!३

स्वरूपात स्थिर सुखदुःखी सम निरहंकारी निर्मोही
तो ज्ञानी द्वंद्वातुन सुटला मला मिळाला तू पाही!४

भगवंताचा अंश जीव हा स्वरूप कैसा नाठवतो
इंद्रियवश तो झाला म्हणुनी अज्ञानातच गुरफटतो!५

हृदयी वसला तयास दिसला अभ्यासाला जो बसला
अज्ञ जनांना यत्नांतीही श्रीहरि नाही सापडला!६

नाशवंत अविनाशी ऐसे पुरुष उभयविध जरि असती
परंतु उत्तम पुरुष निराळा त्या परमात्म्या मुनि म्हणती!७

पुरुषोत्तम हा पूर्ण जाणला ज्ञानी भक्त असा विरळा
तो योगी तो आत्मतृप्तच सेवक स्वामी झालेला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 12, 2018

त्रिगुणांचा हा खेळ चालला! अध्याय १४ - गुणत्रयविभाग योग

त्रिगुणांचा हा खेळ चालला प्रकृति त्यांची आई रे
अव्ययास त्या गुणच बांधती शरीरात या ओळख रे!१

ज्ञानाचा अभिमान, सुख हवे सत्त्वाचे बंधन पडले
निर्विकार जो प्रकाशदाता त्यावर पडले हे जाळे!२

मी कर्ता मज हवेच फळ ही रजोगुणाची खूण असे
कर्मासक्ती जखडत जीवा जाच हाच ना सोसतसे!३

अज्ञानातुन तमोगुणाचा उगम मोह मग झपाटतो
आळस निद्रा प्रमाद यांचा प्रभाव मोठा जाणवतो!४

सत्त्वगुणातुन ज्ञान होतसे लोभ वाढतो रजोगुणे
तमोगुणे अज्ञान वाढते कळेल तुज हे मननाने!५

त्रिगुणांविण नच कर्ता कोणी साक्षी त्याला हे दिसते
तिन्ही गुणांच्या पलीकडे जो त्याला भेटावे वाटे!६

जन्ममृत्यु वा जरादुःख नच पार्था त्रिगुणातीताला
सुखदुःखी सम हरिभजनी रत सदैव अमृत प्यालेला!७

भक्ति घडावी गुण लंघावे सहजपणे सगळे व्हावे
कृष्णच कर्ता कृष्ण करविता ज्ञानकमळ मग उमलावे!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, May 11, 2018

सर्व क्षेत्री माझी वसती! अध्याय १३ - क्षेत्रक्षेत्रज्ञ योग

शरीर म्हणजे क्षेत्र अर्जुना आत्मा तो क्षेत्रज्ञ असे
या दोघांचे नाते कैसे जिज्ञासा वदनी विलसे!१

सर्व क्षेत्री माझी वसती दिक्कालांची ना सीमा
जो परमात्मा तोच तोच मी ज्ञान हेच रे अरिंदमा!२

दहा इंद्रिये पाच विषय ते अहंकार मन बुद्धि तशी
क्षेत्र विकारी संक्षेपाने तुला दिली कल्पना अशी!३

विकारविरहित निर्मळ तनमन उपकारक हे ज्ञानाला
साधक असतो सदैव तत्पर नित्यनेम अनुसरण्याला!४

ज्ञान प्रकटते सद्गुणांतुनी आचरणे जन पारखती
विषया विटता ममत्व सरते समत्व देते अनुभूती!५

आनंदाचा कंद अंतरी पालटले मन आत वळे
नमन घडे मग सहजपणे हे ज्याचे त्याला जाणवले!६

वसे शरीरी लेप न काही गुणातीत परमात्म्याला
दोघांमधला भेद कळे तो भ्रमजाली ना गुरफटला!७

क्षेत्र तसे क्षेत्रज्ञ जाणता नश्वरात शाश्वत दिसला
विकारातुनी सुटण्याचाही उपाय सहजच सापडला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, May 10, 2018

भाविकजन ते आवडती! अध्याय १२ - भक्तियोग

सगुण समजुनी पूजन करिती भक्तीने तुज आळविती
निराकार तू ज्ञान होउनी उपासना योगी करिती!१

कळला वळला योग कुणाला सांग मला हे गोपाळा
उत्तर देता या प्रश्नाचे योगेश्वर फुलुनी आला!२

नाम स्मरती गुण गाती जे भगवच्चिंतनी रमताती
देह विसरती समरस होती भाविकजन ते आवडती!३

कर्मे हातुनि जी घडताती पूजेचे साहित्यच ते
मी माझे हे मावळलेले अज्ञानाचे तिमिर कुठे?४

माझ्या ठायी लाव मनाला स्थापन कर तू बुद्धि तिथे
कर्मे कर तू माझ्यासाठी नको फलाशा शुद्धमते!५

ममत्व सरले सुखदुःखी सम शांत शांत मन झालेले
ध्यान साधले त्या योग्याचे मी माझेपण मावळले!६

सावधान तो पूर्ण मोकळा भक्तिभावना रसरसली
न विटे जगता, विटे न जग त्या स्थिती तयाची आवडली!७

ईश्वर ध्याता ईश्वर झाला प्रज्ञा त्याची स्थिर झाली
तो माझा मी त्याचा संतत चाले खेळीमेळी!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 9, 2018

बघून घे रे रूप खरे! अध्याय ११ - विश्वरूपदर्शन योग

शक्य असे तर मला पाहु दे रूप दिव्य ते श्रीकृष्णा
विस्ताराने वर्णिलेस जे ते बघण्याचा मोह मना!१

दिव्य दृष्टि घे धनंजया तू विश्वरूपदर्शन घे रे
ज्ञानशक्तिबलतेजयुक्त ते बघून घे रे रूप खरे!२

अंत न मध्य न आदि तसाही न कळे काही पार्थाला
विस्मयकारक भयंकर असे बघता बघता बावरला!३

सर्वच जाते तुझिया तोंडी उफाळताती त्या ज्वाळा
कुणी न सुटते तडाख्यातुनी ठाव मनाचा मम सुटला!४

तू निर्माता, पालनकर्ता, तू संहर्ता कुणी न मी
वळे बोबडी आवर आवर भगवंता तुज भक्त नमी!५

दिशा न कळती सुख न लाभते प्रसन्न हो रे भगवंता
का धरिलेसी उग्ररूप हे मना ग्रासती भयचिंता!६

तुझी योग्यता ध्यानी आली सौम्य रूप तू धरी हरी
चरणशरण मी अरे अच्युता धाव पाव तू कृपा करी!७

कर्म करी तू माझ्यासाठी मीच अर्जुना परम गती
असे वदे गोविंद तेधवा कौंतेया लाभली धृती!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

विभूतींस या गणना नाही! अध्याय - १० विभूति योग

तू आवडता म्हणुनि अर्जुना हितार्थ तुझिया सांगतसे
रहस्यमय हे वचन ऐक रे तव मूर्ती अंतरी वसे!१

सुरगण ऋषि वा कुणी न जाणति मम उत्पत्ती वा लीला
निश्चल ध्याने ध्याता मजला अवगत होई ज्ञान तुला!२

जे दिसते जे जाणवते ती माया भगवंताची रे
इथे तिथे भगवंत नांदतो ही अनुभूती तत्त्व बरे!३

मलाच ध्यावे मलाच गावे मज वर्णावे परोपरी
असे वाटते त्या भक्तांना जोड बुद्धिची मिळे खरी!४

शशीसूर्य मी सामवेद मी मी रुद्रांचा शंकर रे
मी सागर मी हिमाद्री तैसा कुंतीसुत मी अर्जुन रे!५

उत्कट भव्य नि दिव्य तसे मी न दिसे तेथेही असतो
जो मज भजतो अनन्यभावे कधी कुठेही ओळखतो!६

कर्तव्याचे भान तेच मी भगवंताचे कीर्तन मी
परमार्थाचे चिंतन ते मी चराचराचे बीजच मी!७

विभूतींस या गणना नाही तरी कल्पना दिली तुला
एकांशाने जगा धारिले तत्त्वाधारे जाण मला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, May 8, 2018

भजन करी मम! अध्याय ९ - राजविद्याराजगुह्य योग

असूया न तुज हे निष्पापा तुझ्या मनाचा तळ दिसतो
म्हणुनि अर्जुना पवित्र शुभ हे ज्ञान गहन तुजला कथितो!१

मी निर्माता, मी संहर्ता पार्था सगळ्या भूतांचा
करुनि अकर्ता कसा पहा तू आश्रय घेउनि योगाचा!२

माझी माया जगा निपजवी कर्तृत्वाचा लेप नसे
नच ध्यानी ये परमात्मा मी, अज्ञ जनां मी तुच्छ दिसे!३

दृढव्रती मज भजती संतत वंदुनि माझे गुण गाती
ते माझ्याशी नित्य जोडले निरहंकारी मज ध्याती!४

मी जीवन मी मृत्यु तसाही मी तपतो मी वर्षतसे
सर्व सर्व मी ध्यानी धरता अनुसंधानी खंड नसे!५

नसे फलाशा अनन्यभावे मला चिंतुनी जे रमती
योगक्षेम तयांचा वाहे निजरूपाची त्या प्राप्ती!६

पान फूल वा पाणी दिधले आवडले मज आवडले
जे भक्तीने मला अर्पिले ते घेता मन गहिवरले!७

विसर मागचे भजन करी मम पूजन कर देहा विसरी
पवित्र संगम सरितांचा हा तप्त जनां संतृप्त करी!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, May 7, 2018

सदा सर्वदा मला स्मरावे! अध्याय ८ - अक्षरब्रह्म योग.

कसे जगावे हे तुज कळले, कसे मरावे जाणुनि घे
सदा सर्वदा मला स्मरावे रहस्य इतके साधुनि घे!१

ज्या भावाचे चिंतन घडते त्या भावाचे कर्म घडे
नाम स्मरता ज्ञान स्फुरते भक्ताचे ना कुठे अडे!२

सदैव स्मर तू मजला पार्था युद्ध करी तू प्राणपणे
मजला अर्पुनि तनमनधन मग तुला न राही कुठे उणे!३

मन हे निश्चल योगाभ्यासे देह पडो मग कुठे कधी
मलाच येउनि मिळे भक्त तो, तो योगी तो खरा सुधी!४

एकाक्षर जे ब्रह्म तयाचा मुखातुनी हो उच्चार
मीच प्रेरणा देत तयाला तो वदतो मग ओंकार!५

धाव मनाची नच बाहेरी इंद्रिये न कसमस करती
प्रसन्न मुद्रा त्या योग्याची आत रहाया ये शांती!६

नित्ययुक्त जो माझ्या ठायी अनन्यचित्ते मज भजतो
त्या योग्याने स्मरता मजला तो माझ्यातच विरघळतो!७

आठवाच मी आठव मजला सदा सर्वदा निरोप हा
दुःखालय तो पुनर्जन्म नच, परमसिद्धिचा मार्गच हा!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 5, 2018

भाविक ज्ञानी बनतात! अध्याय ७ - ज्ञानविज्ञान योग

सखाच असशी म्हणुनि अर्जुना विज्ञानासह मी ज्ञान
कथितो तुजला असे विवरुनी ऐकताच तू सज्ञान!१

जिज्ञासा तव मला आवडे, कथितो तैसे आचरिशी
साधन घडता योगाचे तू ओळखशी मज ओळखशी!२

मणि ओवावे एका सूत्री मणिमाला ती एक असे
मजविण कोणी जगी न दुसरे स्थावर जंगम मीच असे!३

त्रिगुणांनी जग मोहित झाले कोण ओळखे कसे मला
गुणातीत मज पूर्ण जाणतो दैवी माया तो तरला!४

मायेने जे झपाटलेले ज्ञाना मुकले दैत्यच ते
ते पापी मज कसे पावती आत्मघातकी ठरती ते!५

पुण्यशील जे नित्ययुक्त ते भाविक ज्ञानी बनतात
मी त्यांचा ते माझा ऐसा भाव जगतो हृदयात!६

अचला श्रद्धा मीच देतसे जैसी श्रद्धा लाभ तसा
जे माझे ते मलाच मिळती भक्तीचा भरवसा असा!७

जरामरणभय त्यांचे सुटले आश्रयास ते आलेले
ते योगी ते ज्ञानी त्यांनी ब्रह्माला त्या आपणिले!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Friday, May 4, 2018

सुशांत सुस्थिर मन व्हावे ! अध्याय ६ - आत्मसंयम योग

कर्मफलाची धरी न आशा जो योगी तो संन्यासी
नच शिवतो संकल्पही चित्ता लेप न लागे गगनासी!१

मन वश झाले इंद्रिये तशी समजावा हा उद्धार
खचे न केव्हा महावीर जो गोविंदच तो होणार!२

विषया विटला हरिस भेटला भाग्यवंत तो खराखुरा
अभ्यासाने घडता प्रगती विकार करती पोबारा!३

एकांतातच बसुनी ठायी सुशांत सुस्थिर मन व्हावे
मंदिरात त्या ये मुरलीधर सोsहं सोsहं ऐकावे!४

गोपालाचे ध्यान लागता उसळे आतुन आनंद
कृष्णसखा कर धरुनि चालवी आनंदाचा तो कंद!५

मीच सुदामा हरिला देतो अवधानाचे हे पोहे
हरीच ध्याना मला बोलवी कृतज्ञ त्याचा मी आहे!६

चंचल मन परि कसे आवरू विचारता हे श्रीकृष्णा
हासत सांगे समजावुन हे करुणा आली दयाघना!७

'अभ्यासाने वैराग्याने मन वश होते' हरि वदला
ते आश्वासन जणु संजीवन उपकारक ते योगाला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, May 3, 2018

दोन्ही पथ हे कल्याणाचे! अध्याय ५ - कर्मसंन्यास योग

संन्यासाचे जे फल आहे योगाचेही तेच असे
दोन्ही पथ हे कल्याणाचे पार्था मी तुज सांगतसे!१

कर्मयोग आचरिण्या सोपा जनसामान्या तोच भला
ओघे आले कर्म करी जो स्वधर्म त्याने आचरिला!२

नसे फलाशा निर्मळ तनमन कर्म न बांधे मनुजाला
हरिशी साधे योग सहज मग सद्भाग्याला नसे तुला!३

मी नच कर्ता फलावरी मग कुठला माझा अधिकार
अशी भूमिका ज्याची राहे हरि घे त्याचा कैवार!४

आशा सुटता कर्मफलाची भगवत्प्राप्ती होत असे
जनसामान्या कर्मयोग हा आचाराचा मार्ग दिसे!५

प्रकृतीच ती घडवी कर्मे कर्तेपण मग ते कुठले?
हरिभक्ताला जीवन जगता नित्य आतुनी जाणवले!६

समत्वभावी स्थिरावले मन अंकित  झाला संसार
निराकार सम ब्रह्म जणू ते याच्यारूपे साकार!७

ध्यानाचा आनंद आगळा आत आत तो साठवला
विषया विटुनी साधक सहजच अभ्यासी सुस्थिर झाला!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

ज्ञानयज्ञ हा थोर अर्जुना अध्याय ४ - कर्मब्रह्मार्पण योग

असशी माझा सखा म्हणूनी योग अर्जुना तुज कथिला
बरीच वर्षे होउनि गेली सूर्याला जो सांगितला!१

धर्मग्लानी जेव्हा येते अधर्म वाढे जोराने
धर्मस्थापन करण्यासाठी मी अवतरतो नेमाने!२

सज्जनरक्षण खलनिर्दालन याचा लागे ध्यास मला
मम जन्माचे रहस्य जाणे रुचतो ज्ञानी भक्त मला!३

कर्मे मजला लिप्त न करती कर्मफलाची स्पृहा नसे
हे जो जाणे तोही तैसा कर्मे बद्ध न होत असे!४

तनमन ज्याने वश केलेले देहाने जरि कर्म करी
पाप न लागे तिळभर त्याला अंतरि त्याच्या वसे हरी!५

नाश पावते कर्म तयाचे यज्ञ तयाला नाव मिळे
चित्तहि होते सहज शुद्ध मग संदेहाने ते न मळे!६

ज्ञानयज्ञ हा थोर अर्जुना कर्मे ज्ञानी विरघळली
विनम्र होउनि प्रश्न करी बघ सद्गुरु त्याला कुरवाळी!७

त्या ज्ञानाने  धन्य धन्य तू मोहाचे मग नाव नको
तुझ्यात मी अन् मदंतरी तू अच्युत तू विस्मरू नको!८

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 2, 2018

कर्म न चुकले कधी कुणाला! अध्याय ३ - कर्मयोग

कर्म न चुकले कधी कुणाला इंद्रियवश ना कधी व्हावे
कर्तृत्वाचे ओझे कोणी माथ्यावरती नच घ्यावे!१

'मी, माझे' अभिमान सुटावा परमात्म्याशी तो योग
जरी निरंतर ऐक्यभाव मग द्वैताचा कुठला रोग?२

आसक्ती सोडूनि कर्म जे यज्ञच त्याला नाव असे
मिळवायाचे मला न काही तरी कर्म नच टाळतसे!३

परस्परांना जाणत जगणे सहकाराचा हा मंत्र
उणे दिसे ते पूर्ण करावे प्रगतीचे सोपे तंत्र!४

यज्ञचक्र हे सतत फिरावे अशी योजना आखलेली
कामक्रोध ही छुपी मंडळी दबा धरुनी बसलेली!५

देवांना संतुष्ट करा हा यज्ञ चालवा कर्मांचा
बंधन सुटते कर्माचे ते सांगावा हा कृष्णाचा!६

आत्म्यातच सर्वदा रमावे असा रमे तो संतुष्ट
यश लाभो वा येवो अपयश जरा न जाणवती कष्ट!७

आचारच आदर्श मानती बहुजन थोरांचा येथे
ज्ञान जाहले तरी न संता स्वकर्म करणे ते चुकते!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, May 1, 2018

कृपामेघ बरसला भूमिवर! अध्याय २ - सांख्य योग्य

खरा धर्म जर कळला नाही कर्म कसे ते घडणार?
देहच मी अज्ञान मनाचे लयास कैसे जाणार? १

शोक न करणे योग्य अशाच्या शोकी अर्जुन बुडलेला
पांडित्याच्या गोष्टी हरिला रणात सांगत सुटलेला!२

कृष्णाच्या उपदेशासाठी अर्जुन निमित्त झालेला
कृपामेघ बरसला भूमिवर जो तो मानव धालेला!३

आत्मा असतो नित्य सत्य हे तनु येई तैशी जाई
स्वधर्म ध्यानी धरूनि पार्था झुंज रिपूंशी तू घेई!४

धर्मोचित हे युद्ध पांडवा जरी न आता करशील
उपहासाला जगात अवघ्या पात्र इथे तू ठरशील!५

'मी कर्ता' हे नकोस समजू अज्ञाने या बेजार
नसत्या शंका काढुनि पार्था वाढविशी तू आजार!६

प्रसन्नतेच्या योगे दुःखे बघता बघता सरतात
सोशिकता तर अशी वाढते भूमाता तो साक्षात!७

प्रज्ञा ज्याची स्थिरावलेली कसा वागतो वदे कसा
हरी तयाच्या हृदयमंदिरी, विश्वसखा तो भक्त असा!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, April 30, 2018

शोकाला श्लोकत्व लाभले ! अध्याय १ - अर्जुनविषाद योग


मनास होतो विषाद जेव्हा भगवद्गीता करात घे
वासुदेव तर तुझ्याच हृदयी योग तयाचा साधुनि घे!१

कृष्ण कृष्ण म्हण अनुरागाने तुझी आर्तता वाढू दे
मोह हराया तुझ्या मनाचा पार्थसख्याला धावू दे!२

असे कोण मी? करू काय मी? प्रश्न जयाला हा पडला
जिज्ञासा जागता मनाची ज्ञानमार्ग त्या सापडला!३

मरण आपले आप्तजनांचे कल्पनेतही सहवेना
मी माझे हे अवजड ओझे दूर फेकता येईना!४

प्रगतीच्या तर आड येतसे कर्तृत्वाचा अभिमान
मी कर्ता, फळ हवेच मजला असे मागते अज्ञान!५

मी लढतो ते राज्यासाठी वाट खरोखर चुकलो मी
वंद्य जगी ते वध्य कसे मज पुरता झालो लज्जित मी!६

ज्या शस्त्रांनी अधर्म होई रणात शस्त्रे ती त्यजिली
धनंजयाला शोकभयाने रणात भोवळ आलेली!७

विषाद आला शरण प्रसादा योग हरीशी जुळुनी ये
शोकाला श्लोकत्व लाभले चमत्कार हा पाहुनि घे!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

सदैव गीता वाचत जा..

अरे मना तू होउनि अर्जुन सदैव गीता वाचत जा
तुझ्या आतला माधव सांगे सदैव तैसे वागत जा !१ 

कर्तव्याचा निर्णय करते म्हणून गीता वाचावी
आशागीतच आहे गीता म्हणून गीता ऐकावी !२

देह येतसे देह जातसे नश्वर त्याचा मोह नको
दिसे न परि जो असे सुनिश्चित तो आत्मा विस्मरू नको!३ 

ओघे आले कर्म करूनी आवडता हो कृष्णाचा
अभ्यासा उत्साहे लागुनि घे घे अनुभव सोsहंचा!४ 

विकारातुनी विचाराकडे प्रवास ऐसा होऊ दे
अंधारातुनि प्रकाशाकडे प्रवास पथिका होऊ दे!५ 

कृष्ण कृष्ण म्हण येता जाता गीता आचरणी येते
सदा सर्वदा योग हरीचा गीताई साधुनि देते!६

तुझे प्रश्न अन् तुझी उत्तरे खेळ कसा हा गमतीचा 
गीताभ्यासे साधे प्रगती पाठ गिरव संन्नीतीचा!७ 

आठच कडवी या कवितेची गोडीने तू गाशील 
तूच तुझा उद्धार मानवा भवार्णवी या करशील!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, April 28, 2018

मंदिर हे नरसिंहाचे केंद्रच संस्कारांचे!


मंदिर हे नरसिंहाचे
केंद्रच संस्कारांचे! ध्रु.

सकलजनांनी येथे यावे
'दर्शन' घेउन कृतार्थ व्हावे
नाम वदावे वाचे!१

'श्रीनारायण' मंत्र लाभता
तनी वज्रता मनी अभयता
साधक जन भाग्याचे!२

परमात्मा सर्वत्रच आहे
अंतरि आहे, भवती आहे
स्थान असे भजनाचे!३

येथे यावे, घ्यावा अनुभव
प्रल्हादाचे श्रद्धावैभव
आपण मिळवायाचे!४

श्रोता वक्ता समरसताना
इथे तजेला क्षणसुमनांना
निधान हे सौख्याचे!५

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

नरहरे, घालतो साद! तू आम्हां कर प्रल्हाद!

नरहरे, घालतो साद!
तू आम्हां कर प्रल्हाद!ध्रु.

तव मूर्ती नयनी भरली
नकळताच अंतरि ठसली
तव दर्शन दे आल्हाद!१

"नारायण" म्हणता म्हणता
देहत्व लयाला जाता
ये मोक्ष सहज हातात!२

ही ओळख बहु जन्मांची
आश्वासक वाटे साची
पाउले येथ वळतात!३

नयनी ये अश्रूपूर
तू नकोस लोटू दूर
तव दर्शन हाच प्रसाद!४

मन नामस्मरणी रमते
नकळतच मस्तक लवते
ओठात शब्द अडतात!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

उठा उठा नरहरी!

उठा उठा नरहरी! ध्रु.

प्रभात झाली, या शुभकाली
दिठी दर्शना आतुरलेली
कृपा करा सत्वरी!१

उपासना नित, करवुनि घ्या हो
चित्त सदोदित प्रसन्न राहो
या हो या अंतरी!२

तुम्हां स्मरता सरल्या चिंता
आनंदाश्रू नयनी झरता
उठली तनि शिरशिरी!३

प्रल्हादाची श्रद्धा द्यावी
निर्भयता आचरणी यावी
घुमवा तनुबासरी!४

अधर्म जगती बळावलेला
रिपूवरी त्या घालू घाला
आवाहन हे करी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, April 19, 2018

कृतार्थ जीवन अण्णांचे..

कृतार्थ जीवन अण्णांचे!ध्रु.

रूढीच्या बंधनी जखडली
ऐसी अबला स्वतंत्र केली
फल निर्धाराचे!१

असा तपस्वी, असा मनस्वी
तेजस्वी हा अंति यशस्वी
सार प्रयत्नांचे!२

नावे धोंडो कुसुम सुकोमल
ऋषिस्मरण हे मंगल मंगल
अर्घ्य जीवनाचे!३

पुसता अश्रू हासू उमले
स्त्री साठी नवविश्व लाभले
साक्षी सगळ्यांचे!४

इथे न थांबू जाऊ पुढती
पथिका वाटा उलगडताती
निधान स्फूर्तीचे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

ना प्रभू दे अंतर

चालणे चालूच ठेवा
चढ असो वा उतरण
साधणे संवाद जमवा
गोड गाली हासुन !१

नाम घ्यावे गुणगुणावे
तुष्ट व्हावे ऐकुन
वेळ लागे सार्थकी हा
दिवस सारा शुभ दिन !२

देव सारे भेटताती
चालणारे बोलते
कुशल सारे सांगताती
मोकळे बहु वाटते !३

जे दिसे ते देव समजा
सृष्टि माता आपली
टेकड्यांची चढण छोटी
कौतुकाने हासली !४

चांगले जर कथन केले
लाभते प्रोत्साहन
संत उत्सुक सांगण्याला
अल्पमोली बहुगुण !५

मागणे काहीच नाही
सांगणे ना फारसे
हा असा श्रीराम भेटे
भाग्य का थोडे असे ?६

सातही वारी म्हणावे
होतसे पाठांतर
पालटे मन साथ दे तन
ना प्रभू दे अंतर !७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, April 17, 2018

झटक मोह देहाचा तू....

रडून काय कधी मना गेला जीव येत असतो
झटक मोह देहाचा तू कोणीच येथे राहात नसतो । ध्रु.

बाहेर धावशी तळमळशी तू क्षणक्षण वाया गेला
आत वळशी नाम घेशी राम येतो भेटायला
न बोलता संवाद साधतो जाणता पुरुष शांत बसतो। १

गेला त्याचे काम तुला जीव ओतून करायचे आहे
कृष्ण कर्ता आतून तुला शक्तिस्रोत पुरवत आहे
श्वासासंगे जुळवुन घ्यावे सोsहं स्वर कानी येतो।२

वाचण्यापुरती नसते गीता घोट घोट सेवन कर
विचाराने विवेकाने माझ्या मना तूच सावर
वडीलपणा पुत्रधर्मही देहासंगे जळत नसतो।३

भलबुरे आतून कळते सारासार ध्यानी धर
मनोहर तूच मना सत्कर्माचा मार्ग धर
कर्तव्याचा दीप पथिका रस्ता रस्ता उजळत जातो। ४

आज ना उद्या येथुन आपला मुक्काम नक्की हलणार आहे
कसा जगला माणूस गीता काळपुरुष पहाणार आहे
समिधा होऊन यज्ञी पडतो तोच मरून अमर बनतो। ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३ जानेवारी १९९७

Monday, April 16, 2018

जाग आणली मला

हात जोडले, वंदन घडले
जाग आणली मला
दयाळा, प्रणाम देवा तुला! ध्रु.

हालचाल देहाची घडता, जडता बघ लोपली
नामस्मरणी मने रंगता स्फुरली भूपाळी
तूच शिकविले मला। दयाळा  १

शीतल जल ते, हस्तपादमुख शीतल करणार
पवन सुगंधी अवचित येउन स्पर्शून जाणार
विशाल गगनी, पहा आतही चेतविलेसी मला। दयाळा २

आयु वाढवुनि मिळे तर तना आता झिजवावे
देहदुःख विसरून जनांना प्रेमे सुखवावे
लिहुनि कवने गाउनि दाखव
दीक्षा दिधली मला। दयाळा ३

उंबरठ्याचा घाटच अवघड जा ओलांडून
नकोस घेऊ आपआपणा ऐसे कोंडून
उत्साहाचा, चैतन्याचा निर्झर केले मला। दयाळा ४

गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, तुकयांचा गाथा
समजुन उमजुन सुलभ सुगम कर तू गीते गाता
कृतज्ञ कविने श्रीहरीचरणी
देह लोटुनी दिला। दयाळा ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, April 8, 2018

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा! ध्रु.

झुंज द्यावयाची आहे प्राणपणे येथे
खचायचे नाही कधीहि भान मना येथे
मार्ग जरी काटेरी हा मला चालण्याचा!१

उगाच का कष्टी व्हावे जरी होय हार
एकवटून शक्ती सारी करावा प्रहार
हार जीत यांनी नक्की घोष विक्रमाचा!२

स्वयंनियंत्रण मज रुचते नसे पराधीन
मी न कधी होतो हळवा आणि उदासीन
ध्येय खुणावे मज रस्ता आत्मविकासाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

२००४ मधे सकाळ मधे सुप्रभात या सदरामधील खालीलप्रमाणे विचार वाचल्यावर सुचलेली ही कविता.
पराभूत मनोवृत्तीच्या तत्त्वज्ञानाला आळवत बसण्यापेक्षा मूलभूत आणि स्वयंभूतेचे स्वतंत्रतेचे विचार मनात रुजवले पाहिजेत. कोणत्याही घटनेवर आपण नियंत्रण करू शकत नसल्याने पराधीन ठरत नाही. आपण नियंत्रण करतो ते घटनांवर नाही, तर घटनांना आपण जो वैचारिक, नैतिक व भावनिक प्रतिसाद देतो त्यावर. ते विचार व भावना सर्वस्वी स्वयंनियंत्रित व स्वतंत्र असतात. स्वतः मधल्या या नियंत्रक क्षमतेची जाणीव झाली की मन बलशाली आणि निश्चयी होते.

Monday, March 19, 2018

भूपाळी - प्रभात झाली स्वामि समर्था.

प्रभात झाली स्वामिसमर्था भक्त सहज जमले
उठा उठा हो सद्गुरुराया दावा पदकमले!ध्रु.

दत्तदिगंबर ध्यान पाहु दे डोळे भरभरुनी
श्रीस्वामी समर्थ जय जय घोष असो वदनी
भक्तिप्रेमे कंठ दाटतो अश्रू ओघळले!१

वैराग्याची विजयपताका अशीच फडफडु दे
अध्यात्माचा भव्य चौघडा धडधड  वाजू दे
अक्कलकोटच मन झालेले कानी वच आले!२

आजानबाहू स्वरूपसुंदर काया रसरसली
रोमरोम फुलला मम तनुचा अशा सुभगकाली
स्वामीस्तवना हवी सुसंधी शब्द पुढे धावले!३

मंदमंदशी झुळूक आली गंधित झालेली
कळ्या वेलिवर सुमने होण्या टपल्या यावेळी
ती आतुरता होय अनावर डोळे उत्सुकले!४

सद्गुरु लीला कथिता श्रविता मन झाले काशी
तुम्हीच शंकर स्वामिसमर्था यावे वसण्यासी
गंगेचे जल चरण धुवाया नयनी या भरले!५

अच्छा होगा घनगंभिर ही सादाविण वाणी
आता ऐकली भावभाबड्या माझ्या कानांनी
अहोभाग्य हे प्रशांत वेळी जवळ मला केले!६

स्वामी समर्थ स्वामी समर्थ पाचच ही अक्षरे
वेदमंत्रशी वंद्य आम्हाला त्यांच्या उच्चारे
श्रीरामाला स्फुरण जाहले स्तवन सहज घडले!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

काकड आरती गाऊ स्वामी समर्था..

काकड आरती गाऊ स्वामी समर्था
स्वामी समर्था हो दत्ता अवधूता!ध्रु.

तण अभिमानाचे उपटावे
आसक्तीचे नाव नुरावे
नामस्मरणे मन पवनाला द्या जोडुन आता!१

गृहस्थ असुनी घडते भक्ती
नीतिबंधने जीवन युक्ती
प्रभातकाली तनामनाने वंदू समर्था!२

बसल्या जागी यात्रा घडते
स्वामीदर्शन अवचित होते
आनंदाश्रू ओघळती हो अनुभव हा येता!३

देहच मी भ्रम जळून जावा
भवभीतीने पळ काढावा
पराक्रमाची वाढो ईर्षा पुरुषार्था करिता!४

सुधारणा हो माझ्यापासुन
पालट व्हावा स्वामी आतुन
मने मनाला द्या द्या जुळवुन स्वामी समर्था!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

भूपाळी - उठा उठा हो स्वामी समर्था..

उठा उठा हो स्वामी समर्था प्रभात ही झाली!
प्रभात झालेली, वदनी प्रसन्नता हसली!ध्रु.

नित्यच लागे परस्परांना ओढ भेटण्याची
हसण्या रमण्याची, तैशी सुखसंवादाची
आम्ही लेकरे स्वामीमाउली जमलो भवताली!१

शुभकार्या आरंभ करावा सादर नमनाने
नमने वाहुन स्तवने उधळत भाविक नेमाने
भूपाळीस्तव सरसावत या शब्दांच्या ओळी!२

आपण अमुचे, आम्ही अपुले या रेशिमगाठी
तुटायच्या ना सुटायच्या ना या रेशिमगाठी
सुरेल सनई म्हणते गाते मीही भूपाळी!३

ज्योत ज्योतिने लागे, वाढे भक्तीने भक्ती
समाजपुरुषा जागृत करते व्यक्ति आणि व्यक्ती
चैतन्याचा अनुभव देण्या रचना ही स्फुरली!४

आत्म्यावर विश्वास प्रकटतो शब्दाशब्दात
भीति कुठली, ठामपणा तो नित्य भाषणात
प्रकाशपूजन स्वामी घ्यावे करवुन या वेळी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, March 3, 2018

तुकोबांचे बोल ..

तुकोबांचे बोल आणतात 'डोल
जीवनास मोल कर्तव्याने ।।१

उजळाया वाट अभंगाचा थाट
नामाची पहाट उजाडली ।।२

आनंदाचा गाव देई विठुराव
ऐसा नवलाव भक्ताघरी ।।३

आपुले कीर्तन आपुले श्रवण
भजन पूजन चाले सदा ।।४

हाचि संतसंग देही पांडुरंग
रंगला अभंग तुकोबांचा ।।५

पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी
रामाच्या नयनी अश्रुपूर ।।६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

तिथे तुका साकारला.

टाळ चिपळ्यांची साथ। करी काळावर मात
जरी तुका वैकुंठात। भरलासे अभंगात।।

दीन जन हृदी धरा। दु:खितांची सेवा करा
पांडुरंग घोष करा। ठेवा स्वार्थावर चिरा।।

हेच हेच वीणा सांगे। धाव माये पांडुरंगे
तुकाराम हेच मागे। राहा देवा पुढे मागे।।

समाजाशी एकरूप। तरी व्यक्ति सुखरूप
पाहा आपलाले रूप। सुख भजनात खूप।।

तुका वैकुंठास गेला। तरी घरोघरी आला
जिथे प्रेम नि जिव्हाळा। तिथे तुका साकारला।।

राम सांगे थोडक्यात। ठेवा समतोल चित्त
परमार्थ प्रपंचात। पांडुरंग माणसात।।

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले


Friday, March 2, 2018

परमार्थाला प्रपंच साधन!!

नव्हेच अडसर प्रपंच काही
नव्हेच बेडी प्रपंच पायी
वद वद जिव्हे श्रीनारायण
परमार्थाला प्रपंच साधन !१

पाची बोटे समेट करती
अवजड वस्तू सहज उचलती
सहकार्याचे गाता गायन
परमार्थाला प्रपंच साधन !२

पोटापुरता पैसा मिळवा
लोभ धनाचा टाकुन द्यावा
दीन जनांचे करता पालन
परमार्थाला प्रपंच साधन !३

दुःख जनांचे माना अपुले
सुख सर्वांचे सुखच आपुले
जनात बघता श्रीनारायण
परमार्थाला प्रपंच साधन !४

एकनाथ हे माय जनांचे
तात जनांचे गुरु जनांचे
सर्वात्मकता अंगी येण्या
परमार्थाला प्रपंच साधन !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, February 26, 2018

स्वतंत्रतेच्या वीरा, तुजसी कोटि प्रणाम, तुज कोटि प्रणाम!




स्वतंत्रतेच्या वीरा, तुजसी
कोटि प्रणाम, तुज कोटि प्रणाम! ध्रु.

तू तेजस्वी मार्तंडासम
बलसागर तू वायुसुतोपम
मृत्युंजय वीरा, भास्वरा
विनम्र होती किती अनाम!१

ज्वलंत ज्वालामुखी भासशी
रणसिद्धांता ठाम मांडशी
सोनेरी पानांच्या द्रष्ट्या,
जरि झालासी तू बदनाम!२

तुझिया देशी तुझी उपेक्षा
तुवा न धरली एक अपेक्षा
तू निरीच्छ, तू दधीचि दुसरा
आणु कोठुनि तुज उपमान!३

तू कर्णाहुनि उदार दाता
लाजविले मृत्यूला मरता
आत्मार्पण तव विस्मित करिते
जीवन धन्य नि मृत्यू महान!४

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, February 25, 2018

भाग्याला काय उणे? यत्न करी! यत्न करी! ध्रु.


भाग्याला काय उणे?
यत्न करी! यत्न करी! ध्रु.

कर विचार काय सार
सोडुन दे जे असार
शुद्ध बुद्ध होशि तरी ! १

जरि विकार करि प्रहार
कर विवेक घे न हार
दक्ष राही नित्य तू अंतरी ! २

बोलत जा वचन असे
हृदया जे सुखवितसे
मधुर मधुर भाव वसो अक्षरी ! ३

तू विषण्ण जग विषण्ण
तू प्रसन्न जग प्रसन्न
बिंब प्रतिबिंब भाव जाण तरी ! ४

मी पणास विसर त्वरे
प्रेमभाव त्यास पुरे
सर्वात्मक होइ नरा निमिष तरी ! ५ 

वचन जसे वाग तसे
संगति सुख देत असे
नीतीने न्यायाने वाग तरी ! ६

होउ नको देहदास
होई होई रामदास
सार्थक नर जन्माचे खचित तरी ! ७

१९ जानेवारी १९७७
कवि : श्रीराम बाळकृष्ण आठवले