स्वतंत्रतेच्या वीरा, तुजसी
कोटि प्रणाम, तुज कोटि प्रणाम! ध्रु.
तू तेजस्वी मार्तंडासम
बलसागर तू वायुसुतोपम
मृत्युंजय वीरा, भास्वरा
विनम्र होती किती अनाम!१
ज्वलंत ज्वालामुखी भासशी
रणसिद्धांता ठाम मांडशी
सोनेरी पानांच्या द्रष्ट्या,
जरि झालासी तू बदनाम!२
तुझिया देशी तुझी उपेक्षा
तुवा न धरली एक अपेक्षा
तू निरीच्छ, तू दधीचि दुसरा
आणु कोठुनि तुज उपमान!३
तू कर्णाहुनि उदार दाता
लाजविले मृत्यूला मरता
आत्मार्पण तव विस्मित करिते
जीवन धन्य नि मृत्यू महान!४
कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले