Friday, May 31, 2019

हे भारतीय नवयुवका..

ओठांशी नेशी पेला?
दे भिरकावुन नवयुवका
ती सिगारेटही फेक -
हे भारतीय नवयुवका! ध्रु.

का श्रमास आपण भ्यावे?
मातीत का न खेळावे?
तुज भारत मारत हाका!१

तीरावर श्रमगंगेच्या
घामातुन नवयुवकांच्या
तू फुलव फुलव रे बागा!२

रचनेतुन भेटे देव
श्रमशिबिरी भेटे देव
घे दर्शन तू नवयुवका!३

जे तुटले ते जोडावे
मणि एक सूत्रि गुंफावे
आमंत्रण तुज लागे का?४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.१०.१९८५

Wednesday, May 22, 2019

देहातच पंचमहाभूते..

देहातच पंचमहाभूते

पंचमहाभूतांचा खेळ हा तनी।ध्रु.

मातीची ओढ तना तीत खेळला
रांगलास, घास तिचा तूच घेतला
अंकावर घेई ती अंतिच्या क्षणी!१

जीवन ते जळ झाले, तेच प्राशिले
आत तुझ्या जीवाला शांत वाटले
सुखदुःखी अश्रुरूप जात वाहुनी!२

तेज तुझ्या डोळ्यातच ते जनां दिसे
ते तनात, भाषणात तू पहा कसे
पाहि ईशतेज नित्य नेत्र झाकुनी!३

वायूविण शब्द कुठे? तोच बोलवी
देहाचे यंत्र तुझे श्वास चालवी
त्या पवना तू मनास टाक जोडुनी!४

पोकळी असे तनात ती जरा हवी
तीच तुला विश्रांती नित्य देववी
आकाशा आतल्याच घेई पाहुनी!५

कल्पना: अण्णा (ज.कृ.) देवधर
शब्दांकन: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(चिंतन चतुर्दशीमधून)

ऑडिओ ऐकण्यासाठी टायटल वर क्लिक करा

Friday, May 17, 2019

कडाड कड कड ध्वनी उमटले, स्तंभ दुभंगुन प्रभु प्रकटले..

कडाड कड कड ध्वनी उमटले
स्तंभ दुभंगुन प्रभु प्रकटले!ध्रु.

सिंहगर्जना कानी आली
ना भी ना भी मजला गमली
तातांना निज अंकी घेतले!१

सत्य जधी ये आकाराला
असत्य झाले लोळागोळा
शौर्यापुढती क्रौर्य पांगळे!२

तीक्ष्ण नखांनी पोट फाडले
धुळीत आता पातक लोळे
अभावितपणे कर हे जुळले!३

अशिवाच्या संहारासाठी
अवतरलासे श्रीजगजेठी
पुण्य फळाला आले आले!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(भक्त प्रल्हाद श्री नृसिंह प्रकटल्यावर म्हणत आहे अशी कल्पना आहे)

स्तंभ दुभंगुनि प्रभू प्रकटले, अभिनव रूपात..

स्तंभ दुभंगुन प्रभू प्रकटले

स्तंभ दुभंगुनि प्रभू प्रकटले
अभिनव रूपात
सेवका तारक भगवंत!ध्रु.

देह मानवी, मुख सिंहाचे
तेज अलौकिक शतसूर्याचें
निर्दालन करण्या पापांचे
अवतरले या नृसिंहरूपी पुण्य मूर्तिमंत!१

उचलुनि दैत्या अंकी घेता
नखे रोवुनी उदर फाडता
शोणित वेगें वरी उसळता
केविलवाणी धडपड सरली एका निमिषात!२

भक्त चिमुकला उभा ठाकला
'श्रीहरि' 'श्रीहरि' घोष गाजला
अभय लाधले, लीन शिशूला
आज जाहली सफल साधना, बाळ भाग्यवंत!३

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, May 15, 2019

स्वराज्यसूर्या तुला अर्घ्य हे धारातीर्थांचे तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे

स्वराज्यसूर्या तुला अर्घ्य हे धारातीर्थांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!ध्रु.

अगणित माता होत सुभद्रा
असंख्य कन्या तशा उत्तरा
शत अभिमन्यू गेले करुनी सार्थक जन्माचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

दिवा दिव्याने लागे जैसा
ध्येयाग्नि उरी पेटुनि तैसा
आगमनास्तव तुझिया, केले होमहवन प्राणांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

धन्य जगति ते आत्मसमर्पण
ज्यातुनि प्रगटे हे सिंहासन
अधिष्ठान लाभले तयाला पावन आत्म्यांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

दास्याच्या तिमिराचा अंतक
सत्कार्याचा तूंची प्रेरक
जीवनदात्या लोटांगण हे पामर देहांचे
तुझ्याचसाठी हार, घडविले अमोल रत्नांचे!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, May 12, 2019

वंदन तुज माते....

वंदन तुज माते, देवते
वंदन तुज माते! ध्रु.

तुझिया चरणी ठेवत माथा
आशीर्वच तव मंगलगाथा
न्हाऊ दे मज अश्रुसरींनी
तनमन मम भिजु दे!१

तुझ्यात दिसते रूप ईश्वरी
स्नेहचंद्रिका जगती विखरी
दया क्षमा तू समूर्त सेवा
मन तुजला ध्याते!२

वत्सलतेस्तव देव भुकेला
पुनःपुन्हा धरतीवर आला
धन्य माउली विश्वसावली
गे पावन सरिते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, May 11, 2019

भूमातेची तुझी योग्यता


भूमातेची तुझी योग्यता, खाशी किती खस्ता
माते, तू तुजसम देवता!ध्रु.

कष्टाळूपण जगावेगळे
घरे तुजमुळे गमत राउळे
देवाची मंदिरे साजिरी, लवतो मम माथा!१

सोशिकतेला नाही सीमा
तव संतोषे हसे श्रीरमा
स्वर्ग धरेवर हसत आणशी करुनि स्तिमित जगा!२

आद्य गुरु तू जीवनातला
सेवेचा मधु पाठ शिकवला
कधि उत्तेजन, कधि वाक्ताडन आकारा देता!३

चकमक झडता ठिणगी पडते
तव शब्दांनी जागृति येते
कृतज्ञतेने गहिवरले मी हात तुला जोडता!४

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्यामची आई वर आधारित कविता -लेखनकाल सप्टेंबर १९७३)

आई तुझ्या कुशीत मी सान मूल व्हावे!


आई तुझ्या कुशीत मी सान मूल व्हावे!
मांडीवरी निजावे, प्रेमे तुला पहावे!ध्रु.

हलकेच थोपटी गे, म्हण चार गोड ओव्या
गंधीत वायुलहरी अति मंद मंद याव्या
तव स्पर्शसौख्य आई माझ्या तनी मुरावे!१

डोळे मिटून घेतो जरि झोप येत नाही
फिरवी करास पाठी ना आस अन्य काही
माझ्या तनात अवघ्या अमृत पाझरावे!२

झालो कितीही मोठा तुजसाठि मी लहान
संकोच ना मनाला कुरवाळि बाळ सान
माझ्या मनोरथाने मज शैशवात न्यावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(श्यामची आई वर आधारित कविता - लेखनकाळ सप्टेंबर १९७३)