Thursday, July 30, 2020

जय जय राम कृष्ण हरि..१

जय जय राम कृष्ण हरि! ध्रु.

जाता पंढरीच्या वाटे
आसू गाली, कंठ दाटे
माहेराची ओढ भारी!१

माळ तुळशीची गळा
पिके भक्तीचाच मळा
नभी भिडती लकेरी!२

कुणी छेडतसे वीणा
घनु वाजे घुणघुणा
कानी हरीची बासरी!३

बाळकृष्ण पांडुरंग
रुक्मिणीचाच श्रीरंग
मने देखिली पंढरी!४

ध्यान लागले लागले
रूप पाहिले सावळे
ब्रह्म ठाके विटेवरी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.५.२००४

Tuesday, July 28, 2020

बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा..

विटोनी प्रपंचा जातो भंडारा डोंगरी
वृक्षवल्ली होती तेथे सोयरी धायरी
पक्षि गोड गाती तेथे गाणे विठ्ठलाचे
ताल देत त्या गाण्याला झरा गोड हासे
भासे रूप भगवंताचे तृणांकुरामाजी
रोम रोम फुलतो देही तुका हो विदेही
पंगुलागीं फुटती पाय मुक्यालागी वाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

धरा तप्त बघता येते गगन की भरोनी
वर्षुनिया अमृतधारा धरेलागी न्हाणी
बीज एक धरणी घेते कोटि फळे देते
पानफुलांनी वनराई फुलोनिया येते
वाटसरा देते छाया सोसुनिया ऊन
अनाथास द्यावी माया व्हावे पांघरूण
ऊब देत उघड्या साहा कडाका हिवाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

दीड वीत पोटासाठी किती आटाआटी
राख चिमूट देहाची व्हायची शेवटी
बैल जुंपला घाण्याला  फिरे तो गरारा
आस पिशाच्ची रे तुजला ओढते फरारा
कोण बायका नी पोरे बंधनार्थ दोरे
खुळ्या मानतोसी त्यांना नभांगणी तारे
एक आप्त पांडुरंग देव हा तुझा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

विठ्ठल सावळा आहे मळा लावण्याचा
काय वानु रूप त्याचे शिणे मात्र वाचा
कासे कसे पितांबर पांघरून शेला
युगेयुगे वीटे वरी हरी उभा ठेला
पालवितो भक्तां हाते सखा पांडुरंग
करा गजर नामाचा होउन निःसंग
बिंदु बिंदु मिळुनी अंती सिंधु व्हावयाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

नको सोडण्या संसार नको राख अंगा
नको उपास तापास भजा पांडुरंगा
पराविया नारी माना रुक्मिणी समान
सकल जीव ते भगवंत देव नाही आन
देह हा पंढरी आणि - आत्मा हा विठ्ठल
कामक्रोधकचरा झाडा व्हावया निर्मळ
बघा अतरंगी अपुल्या नाथ पंढरीचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

कुणी निंदो अथवा वंदो मना भान नाही
फोडुनी भांडार म्हणवी स्वतः मालवाही
शुद्ध धरोनीया भाव तुका वाढलाहो
कळवळोनी धावे देव ऐकुनिया टाहो
जीवशीव मिळले येथे इंद्रायणीमाजी
साक्ष देत अजुनी राहे उभी वनराजी
डोहा डोंगरात घुमतो नाद या पदाचा
बोल रोकडा तुकयाचा सर्व प्रत्ययाचा!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Thursday, July 23, 2020

बाळ जाहला बळवंत..

मुलाच्या नाजूक तब्येतीची मातेला काळजी वाटायची.
पण श्रेष्ठ मनोबलाच्या आधारे कॉलेजचे पहिले वर्ष टिळकांनी शक्ति संपादनासाठीच खर्च केले. शारीरिक दुर्बलतेचे नाव देखील उरले नाही.  बाळाचा "बळवंतराव" झाला ...

नसेच दुनिया कमजोरांची
जगी मात हो बलदंडांची!
पाया भरभक्कम शक्तीचा
त्यावर इमला कर्तृत्वाचा
बाळ मनस्वी याच विचारे
घुमे तालमित दिनरात- बाळ जाहला बळवंत!

शरीर तर धर्माचे साधन
करण्यास्तव सत्त्वाचे रक्षण
शक्ती आधी, नंतर विद्या
आपत्तींशी झुंज झुंजु द्या
जोर काढुनी मारुनि बैठक
शड्डु ठोकिती झोकात- बाळ जाहला बळवंत!

अंगांगातुनि रक्त सळसळे
हृदयातिल चैतन्य खळाळे
नमस्कार सूर्यास घालिता
भूमीवरती चित्र उमटता
भिंतींना देताक्षणि धडका
हादरती त्या कंपात- बाळ जाहला बळवंत!

जे जे खावे पचुनी जावे
शरीर गोटीबंद दिसावे
आग भुकेची पोटी उठता
दूध चरविभर देत शांतता
बळकट पिंडऱ्या भरीव छाती
स्नायु जसे की पोलाद- बाळ जाहला बळवंत!

जली वाहत्या उडी ठोकावी
एका हाती भाकर खावी
या तीराहुन त्या तीराला
अनेक फेऱ्या मारित जाव्या
पहिले वर्षच दिले तालमिस
जगाआगळी ही रीत- बाळ जाहला बळवंत!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 19, 2020

नाम तुझे या ओठांवरती..

श्रीरघुनाथा, हे भगवंता,
जागविलेसी मला प्रभाती
नाम तुझे या ओठांवरती! ध्रु.

झाले गेले ते विसरावे
अनागता सामोरे जावे
नित्य नवा दिस नवी जागृती!१

माझे मजला कळती अवगुण
तूच टाक ते अवघे निपटुन
नामच गंगा स्नानासाठी!२

उठता बसता तुझी आठवण
अशी कृपा तव तूच दयाघन
श्रद्धेची दे हाती पणती!३

हलक्या हाते अश्रु पुसावे
जन रिझवावे जन सुखवावे
परमविसावा संतसंगती!४

काय धनाचे मूल्य मुनिजनां?
द्रव्यलोभ तर उडवी दैना
तुझे स्मरण संपत्ती मोठी!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.७.१९९५

ऑडिओ लिंक : नाम तुझे या ओठांवरती

Saturday, July 18, 2020

नाम हेच 'राम' समज, उमल आतुन..

अर्थ भरी जीवनात करित 'चिंतन'
नाम हेच 'राम' समज, उमल आतुन!ध्रु.

मी न देह, मी अनंत आदि मध्य ना
मज न जन्म, मज न मरण शुद्ध भावना
सवड काढ भजनास्तव मोजके क्षण!१

'हरि हरि' म्हण वासनेस वाव ना मुळी
वेणुनाद सोsहम् तो भरत पोकळी
भक्तिरंग खुलवितसे मनुज जीवन!२

जो स्वतःत, तो जगात एकरूपता
जातिभेद, पंथभेद पूर्ण अज्ञता
तोच धन्य जो करीत धर्मपालन!३

आलो मी जिथुन तिथे जायचे मला
पाहुणाच म्हणुन इथे वागणे मला
'मी, माझे' जात लया तयास जाणुन!४

दासबोध आत्मशोध तोच घे करी
ज्ञानदीप ज्ञानदेव लावतो घरी
श्रवण, मनन भरत सहज जे उणेपण!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१.२.१९९५

भगवद्गीते..

प्रभातकाली भगवद्गीते घडवुन घे पठण
कर्तव्याचे सर्व साधका आणुनि दे भान!ध्रु.

विषाद होतो प्रसाद आणि समस्याहि सुटती
गुरुशिष्यांच्या संवादाची प्रत्यक्षच प्रचिती
तुझ्यासमचि तू आणू कुठले दुसरे उपमान!१

नश्वर त्याचा शोक व्यर्थ, तू अश्रू गे पुसले
शाश्वत त्याचा ठाव सांगुनी मना आत नेले
अंतरंगि श्रीभगवंताचे घडविलेस दर्शन!२

सुटे फलाशा तेव्हा बनते कर्मच कर्तव्य
कर्तव्याचे पालन घडता उजळे भवितव्य
मनःशक्ति दे माते, करवी धर्माचे पालन!३

विश्वरूपदर्शने हरविली, पार्थाची भ्रांती
कर्ता धर्ता श्रीहरि हर्ता तत्कालची प्रचीती
त्या रूपाते कल्पुनि करतो तुजलागी नमन!४

मनास उन्मन करते ऐशी दिली राजविद्या
तुझीच शिकवण यथायोग्य तू सकलांना वंद्या
श्रीरामाच्या वर्तनात तू घडवी परिवर्तन!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
६.६.१९९९

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे, मन्‍मनी नामदेव जागे..

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे
मन्‍मनी नामदेव जागे
असे जाणवे एका वेळी विठ्ठल पुढती मागे ! ध्रु

नामासाठी जो अवतरला
नामी रमला नामे तरला
भक्ति वेढिते देवाभवती चिवट रेशमी धागे ! १

भाव ओतला मूर्ति हालली
नाम्‍यासाठी दूधही प्‍याली
अगाध लीला देवाजीची पिढी पिढीला सांगे ! २

मनास नामे उलटे केले
आत वळविले आत रमवले
सोSहं अनुभव येत भाविका सहज समाधी लागे 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

चिरा पायरीचा व्हावे..

पांडुरंग भेटीसाठी पंचप्राण कंठी येती –
बळ सारे हारपले देह लोटोनियां देती!ध्रु.

भाववेडा नामदेव
स्‍मरू लागे ज्ञानदेव
अदृश्‍याची ओढ जीवा, आतां पाहिजे विश्रांती ! १ 

आता पावलो पंढरी
दिसे सावळा श्रीहरी
वृत्‍ती झाल्‍या अंतर्मुख नाही उरली आसक्‍ती ! २

आषाढाचा धुंद मास
लावी वेधु मानसास
मूळ आले माहेराचे बाहे चैतन्‍याची मूर्ती ! ३

चिरा पायरीचा व्‍हावे
संतें वरी पाय द्यावे
काय पाहिजे आणीक? नको स्‍वर्ग नको मुक्‍ती ! ४

धाव पाव गे विठ्ठले
प्राण माझे व्‍याकुळले
आधारास दे गे हात हाका तरी मारू किती ! ५ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, July 6, 2020

हर हर महादेव बोला!


छातीचा करुनी कोट आडवू सागरलाटेला
हर हर महादेव बोला!ध्रु.

धोंड्यांचा भडिमार करावा
गनीम गडगड लोळत जावा
परिसर हा रक्तात भिजावा
तलवारी, भाल्यांवर झेलू शत्रुचा हल्ला!१

महाराज, तुम्हि गडी पोचणे
अमुची चिंता मुळी न करणे
अमुचे होइल येथे सोने
तलवारीतुन अता आगिचा लाल लोळ चेतला!२

खिंडीमध्ये अडसर होतो
शिकस्त करुनी झुंज झुंजतो
सारी ताकद पणा लावतो
तोफांचा आवाज ऐकण्या बाजी आतुरला!३

देह पिंजला भले पिंजु दे
रक्त गळाले, गळो, गळू दे
परि आम्हाला यश लाभु दे
स्वराज्यसूर्या प्रसन्न हो परि तुझिया भक्ताला!४

पहिली तोफ उडाली धडडड
शांत जाहली मनिची तडफड
स्वराज्य राहो यास्तव धडपड
हर हर गर्जत बाजी भेदी अंति सूर्यमंडळा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, July 5, 2020

गुरुवंदना


श्रीगुरुपौर्णिमा

वन्दे श्रीवेदव्यासं सकलगुणनिधिं सादरं पूर्णिमायाम्।
अस्मिन् देशे खलु-स-महता पुण्ययोगेन जातः।
सत्कार्यार्थं परमविमलं जीवनं यस्य भूतम्।
भगवंतं तं सकलबुधजना  सादरं  संस्मरन्ति॥

अर्थ :
खरोखर या भारतात ज्यांचा जन्म पुण्यकारक योगाने झाला, अवघे जीवन सत्कार्यासाठी वेचले गेल्याने परमविमल ठरले,  सर्वच बुधजन ज्या भगवानांचे सादर स्मरण करतात त्या सकलगुणनिधी अशा श्रीवेदव्यासांना पौर्णिमेच्या दिनी मी सादर वंदन करतो.

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Wednesday, July 1, 2020

पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी !



पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी ! ध्रु.

देव आईबाप
सेविता सरे पापताप
भक्‍तीला भुलला भाबडा देव वाळवंटी ! १

गावच ही काशी
श्रेय त्‍या एका भक्‍तासी
प्राणमोल दिधले खिळवला जागी जगजेठी ! २

परब्रह्म शिणले
विटेवर युगे युगे हसले
सानथोर सगळे मनोमनि हेच हेच वदती !  ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५-७-१९७७

म्हणा विठ्ठल! विठ्ठल!

म्हणा विठ्ठल विठ्ठल (ऑडिओ)

म्हणा विठ्ठल! विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!ध्रु.

भक्तिरसात नहावे, भक्तिरंगात डोलावे
भक्तिजलात डुंबावे, भक्तिनभी विहरावे
तनामनात विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!१

टाळ वाजवा वाजवा, विठू बोलवा बोलवा
गीती आळवा आळवा, वाचे विठ्ठल वदावा
ध्यानामनात विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!२

देहभाव तुडवावा, देव देहात पहावा
पखवाज घुमवावा, आणा स्वरात गोडवा
मायबाप तो विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!३

लय गाण्यालागी येई, ताल मनालागी येई
गंध भक्तीलागी येई, चव भक्तीरसा येई
एक सोयरा विठ्ठल! म्हणा विठ्ठल! विठ्ठल!!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
तोडी भजनी