Thursday, September 24, 2020

तू आजारी पडशी म्हणजे



तू आजारी पडशी म्हणजे देवाचा अपराधी तू
देह तुझा तो ठेव तयाची मोल न कैसे जाणत तू? ध्रु.

श्री नारायण जय नारायण नरतनु आहे सुंदर साधन
नाम स्मरता, पतितहि पावन सदाचार हा अंगी मुरवुन
हो नारायण संत सांगती रहस्य घे ना जाणून तू !१

जिथून आलो तिथे जायचे मी माझे हे विसरायाचे
चिंतन औषध चिंतांवरचे शिकव मना सगळे रामाचे
विषयी विरक्ती भजनी प्रीती सत्संगी जा रमून तू !२

झाले गेले विसरून जावे, क्षमा धरेचे नाम स्वभावे
घराघरांना जोडत जावे दीनदुःखिता जवळ करावे
आसू पुसता फुलते हासू नयनरम्य हो श्रावण तू! ३

आहारावर आचारावर ठेव नियंत्रण पुरता सावर
मुक्त मनाने विश्वी वावर नाम होउ दे तुला अनावर
जगावयाची भगवद्गीता भगवंताला ओळख तू !४

साहित्याच्या अभ्यासाने मना विस्तरी समरसतेने
पुढे पुढे चल निर्धाराने गाठशील रामाचे ठाणे
प्रकाश ज्ञानाचा मोदाचा देणारा हो दीपक तू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.११.२००१

Sunday, September 20, 2020

भूपाळी भारताची..

प्रभात झाली मनी माझिया जाग जाग भारता
भूपाळी तुज गाता गाता प्रसन्नता चित्ता !ध्रु. 

नैराश्याचे तिमिर लोपले ध्येयसूर्य उगवतो
कोण मी? करू काय? प्राश्निका सद्गुरु सापडतो 
मी देशाचा, भारत माझा लवतो मम माथा!१

स्वराज्य आले बलिदानाने कळत कसे नाही
धनसत्तेचा लोभ अनावर कृतघ्न करू पाही
स्वातंत्र्याचा अर्थ गहनतर ये कोणा सांगता? २

स्वभाव येतो सुधारता हे गीता सांगे मला
वैराग्याने अभ्यासाने पथ मज उलगडला
भारतीय मी हृदयोहृदयी जागविण्या अस्मिता !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०९.१९८३

Thursday, September 10, 2020

सहकाराने चालू या!

सहकारेण समृद्धि:
समृद्ध्या विघ्ननाशनम्।
विघ्ननाशेन स्थैर्यं च
स्थैर्यं विश्वासकारणम् ।।

अर्थ : परस्पर सहकार्याने देशाची समृद्धी होते. त्या समृद्धीने विघ्नांचा नाश होतो. विघ्ने नाहीशी झाल्याने राष्ट्राला स्थैर्य प्राप्त होते आणि आर्थिक स्थैर्य विश्वासाचे कारण आहे. 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

जुलै १९८८

Tuesday, September 8, 2020

श्रीज्ञानेश्वरी हाती आली 'वाचत जा मज' असे म्हणाली

श्रीज्ञानेश्वरी हाती आली
'वाचत जा मज' असे म्हणाली !ध्रु.

अक्षर अक्षर सजीव झाले
भाग्य आज मम उदया आले
असे वाटते आज दिवाळी !१

जवळ घेतसे गोड वदतसे
कर्तव्याची जाण देतसे
हितकारिणी ही मायमाउली !२

अवचित नाते जुळून आले
भक्तिरोपटे सुंदर रुजले
शुभ्र फुलांनी ओंजळ भरली !३

मने मनाला जोडुन घ्यावी
विश्वात्मकता सवय बनावी
ओवीने मज भक्ति शिकवली !४

मागायाचे काही न उरले
कृतज्ञतेने मन गहिवरले
सर अश्रूंची झरली गाली !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.७.२००१

वाचु या ज्ञानेश्वरी..



जीवनी या धन्य होऊ
वाचु या ज्ञानेश्वरी! ध्रु. 

माउली ही बोलवीते
हाक कानी का न येते?
कृष्णगीता बासरी !१

सोसुनी आघात सारे
वज्रदेही व्हायचे रे
ठेव मुद्रा हासरी !२

सज्जनांचा मेळ व्हावा
सत्कृतीचा ध्यास घ्यावा
सांगतो हे श्रीहरी !३

द्वैत सारे लोपण्याला
एकता ही बाणण्याला
कार्य घेऊ हे करी !४

प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
दु:खिता हृदयी धरावे
राम आशा ही धरी !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.५.१९८४

ओवी ज्ञानेशाची गावी

ओवी ज्ञानेशाची गावी गाता गाता ध्यात जावी 
तनी मनी मुरवावी ज्ञानेश्वरी !१

ज्ञानेश्वरी ग्रंथ गहन सुगम करिता नित्य मनन 
स्वये मोहन दे दर्शन भाविकाला !२ 

भाविकाला विश्व घर कुरुक्षेत्र हे माहेर 
कर्तव्यात मोद फार अभ्यासाने !३

अभ्यासाने सर्व सोपे प्रबोधशक्ती जागी होते 
अंतरंगी आपण येते मृदुपण !४

मृदुपण आईचेच हवे सर्वां सदाचेच 
संतरूप मातेचेच कळो येई !५

कळो येई पसायदाने आता आम्हा काय उणे 
झाले जीवनाचे सोने पूर्वपुण्ये !६

पूर्वपुण्ये हा सत्संग आगळाच भक्तिरंग 
होता सोsहं ध्यानी दंग उजाडेल !७

उजाडेल ऐसी आशा मौनावेल मग भाषा 
उजळेल भाग्यरेषा श्रीरामाची !८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.५.१९८४

प्रसन्न ओव्यांमधुनि होतसे गीतार्थाचा पट साकार!

प्रसन्न ओव्यांमधुनि होतसे गीतार्थाचा पट साकार! ध्रु. 

गुरुप्रसादे काव्य बहरले 
श्रोत्यांचे मनमोर नाचले
सुबोध भाष्या अनुभविताना आनंदा ना पारावार !१

ओवीमागुनि ओवी स्फुरते
गंगाजलि मन चिंब नाहते
इंद्रधनूचे रंग जणू की काव्यलेखनी हा भरणार !२

श्रीज्ञानाचे मोहक आर्जव
शब्दयोजनी अपूर्व पाट
पसायदानी श्रीहरि तोषे शांतीचे सुख अपरंपार !३

श्रीगुरु म्हणता सहज तथास्तु
गीतार्थाची प्रपूर्ण वास्तु
हरिभजनाची देत प्रेरणा अध्यात्माची अमृतधार!४

'लेणे देशीकार' घडविले
प्रवरेने मस्तकी घेतले
नगरोनगरी सुकाळु झाला अमृतवेली या फुलणार!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.६.१९७३

ज्ञानेश्वरी वर ईश्वरी !

ज्ञानेश्वरी वर ईश्वरी ! 
ज्ञानेश्वरी वर ईश्वरी !ध्रु. 

नितवाचने नितगायने 
नितचिंतने नितदर्शने 
कानी घुमे मधुबासरी! १

तृप्तास ही छाया गमे 
उद्यानि या यात्री रमे
संजीवनी ही भूवरी!२

करुणाक्षरे ही वाचणे 
घननीळ तो मनि पाहणे 
गुरुबोध हा ठसला उरी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Sunday, September 6, 2020

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम - २

रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम !ध्रु 

नाम मधुर श्रीरामाचे, जपता सार्थक जन्माचे
चिंतांना दे पूर्णविराम!१

जन्म मरण पाउले खरी, अनंतराघवपथावरी 
प्रवासात या घ्यावे नाम !२ 

कोण असे मी चिंतावे तो मी तो मी घोकावे 
आतून शिकवी आत्माराम!३

श्रीरामायण वाचावे, ऐकावे भावे गावे 
जीवनविद्या शिकवी राम!४

जीवनातला श्रीराम, संगत दे घेता नाम 
आळव आळव प्रेमे नाम!५

श्रीरामाने पाठवले, पाहिजेच त्या आठवले 
मना माझिया घेई नाम !६

क्षणहि न वाया दवडावा, रघुपति राघव तो ध्यावा 
उगमापाशी नेतो राम !७

नाम स्मरता दिनरात राम आतला दे हात 
निश्चय ऐसा बाळग ठाम !८ 

यत्नांची तू शर्थ करी, राघव ठेवी हात शिरी 
उपासनाबळ पुरवी राम !९ 

रडू नको रे झुरु नको आत्मानंदा मुकु नको 
आनंदाचे स्वरूप नाम !१०

सुधारेन मी भाव हवा, सत्कृत्याचा  ध्यास हवा
प्रगतिपथावर नेतो राम !११

देवांना जो मुक्त करी त्या रामाचे स्मरण करी 
बंधविमोचक एकच राम !१२

अनुभव नामाचा घ्यावा, अनुभव रामाचा घ्यावा
चैतन्याचा प्रवाह राम !१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.२.१९९०

Saturday, September 5, 2020

श्रीगणेशा करू

 संस्कारांचा सत्कार्याचा 
"श्रीगणेशा" करू !ध्रु. 

नमू गणेशा, नमू शारदा 
नमू जन्मदा, नमू ज्ञानदा 
वंदनभक्ति करू !१ 

प्रभातसमयी करू पाठांतर 
चिंतन करता प्रश्ना उत्तर 
प्रज्ञा कल्पतरू !२ 

कष्टाविण फळ कधीच नाही
अशक्य शब्दच कोशी नाही 
नवे भगीरथ ठरू !३

एक हृदय हो भारतजननी
प्राण पणा लावू उद्धरणी 
दुस्तर सागर तरू !४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.९.१९८३

नित्य नवा दिन सुधारण्याचा..

नित्य नवा दिन सुधारण्याचा !ध्रु. 

जो चुकतो तो मानव आहे 
क्षमाशील तो देवच आहे
शिल्पकार मी आयुष्याचा !१

चुकांस जगती काय भ्यायचे
निजकर्तव्या करत राह्यचे 
ईश्वर साथी चलणाऱ्याचा !२

बीज दडतसे धरणीपोटी 
पर्णगीत मग तरुच्या ओठी 
विक्रम सारा अनामिकाचा !३

सद्भावाची भूक जगाला 
प्रसन्न माधव सद्भक्ताला 
पाठ गिरवणे सत्कर्माचा !४ 
 
विषयाकडची धाव थांबवुन
मनास घ्यावे आपण वळवुन
राम अंतरी पहावयाचा !३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.९.१९८३

माझे जीवन: माझी बाळे परब्रह्म तर मज सापडले

 माझे जीवन: माझी बाळे
परब्रह्म तर मज सापडले!ध्रु.

अवती भवती मुले नाचती
अंगणात जणु फुले डोलती
एक अनामिक गंध दरवळे!१

सूर गवसला गाउन घ्यावे
कृष्णरूप नयनांनी प्यावे
शाळा मजला गोकुळ गमले!२

मी वनमाळी बालोज्ञानी
भगवंताचा ऋणी म्हणूनी
कृतज्ञतेने कर हे जुळले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.१०.१९८३
(माझे जीवन माझी बाळं या शि द रेगे लिखित पुस्तकावर आधारित काव्य) 

ज्ञानदान हे व्रत माझे

 "ज्ञानदान" हे व्रत माझे, 
माझे दैवत, मुले!ध्रु. 

रोज भेटतो मी बाळांना
विहितकर्म हे आचरिताना
गीता थोडी कळे!१

शाळा गमते सदनच माझे
शिक्षक माझे, सेवक माझे
नवीन नाते जुळे!२

संस्कारांनी बनलो शिक्षक
ज्ञानपथाचा मी तर यात्रिक
प्रभुने चालवले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.९.१९८३

Thursday, September 3, 2020

पंतमहाराज बाळेकुंद्री

पंत हा प्रेमाचा अवतार
पंत हा दत्ताचा अवतार!ध्रु. 

मवाळ भाषा, लोचन प्रेमळ
शब्दही ओले, प्राणही व्याकुळ
नेत हा भाविकास भव पार!१

एकतारी घे, चिपळ्याही धर
वाजव दिमडी, आळव सुस्वर
पंत तुज भजनी रंगविणार!२

निद्रेतुन हा तुला जागवी
मातेची ममताच बोलवी
पंत मग हृदयाशी धरणार!३

पंत विसावा तनामनाला
पंत दिलासा चुकणाऱ्याला
पंत हा भक्तिपथे नेणार!४

पंचप्राण जर व्याकुळ झाले
दिनरातींचे भान न उरले
पंत हा घरबसल्या दिसणार!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.३.१९८३