Sunday, October 25, 2020

संघे भवतु मे श्रद्धा ..

संघो रूपं गणेशस्य 
संघं चिन्तय सर्वदा ।
संघेन वर्धते शक्तिः 
संघाय तस्मै नमः ।।  १ ।।

संघात् संजायते युक्तिः 
संघस्य युवको भव
'संघे भवतु मे श्रद्धा' 
भो संघं मां पालय ।। २ ।।

अर्थ : 

संघ हे समष्टिरूप गणेशच अशा संघस्वरूपाचे तू चिंतन कर.  संघामुळेच (कायिक, मानसिक, आत्मिक) बळ वाढते. अशा संघाला नमस्कार असो. 

संघामधूनच जगण्याची कला (युक्ती) उत्पन्न होते. तू संघाचा स्वयंसेवक हो. 'माझी श्रद्धा संघावरच असो' असे तुला वाटू दे.  हे संघरूप  भगवंता तू माझे रक्षण कर संवर्धन कर. 
 
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 



Sunday, October 18, 2020

गाऊ या, ध्याऊ या, अंबेजोगाईची योगेश्वरी

गाऊ या, ध्याऊ या, अंबेजोगाईची योगेश्वरी !ध्रु.

शब्द लेखणीतुन आले, आनंदाने मन डोले
घुमू लागला नाद अंतरी, गाली अश्रूसरी!१

मार्गशीर्ष पौर्णिमा येतसे, माहेराला मन धावतसे
गती लाभली चरणांलागी, उठे तनी शिरशिरी!२

खड्ग पात्र मुसळासह नांगर, करी शोभती किती शुभंकर 
मनोहारिणी, प्रलयकारिणी अवतरली भूवरी !३

कविता स्फुरली गाता गाता, परदयाळू आंबामाता
अमूर्त जी ती समूर्त झाली अपुली योगेश्वरी !४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.२००६

Saturday, October 17, 2020

जय माताजी

।। जय माताजी।।

तुझ्या दारी आलो   माते रेणुके
पाखर तू धरी         आम्हांवरी १
सकाळी सकाळी   ओढ लागे जीवा
वळती पावले         येथे येण्या २
जी जी सुखदुःखे     कोंदली मनात
येती ती ओठात      आपोआप ३
अदृश्य तो हात       फिरे पाठीवर
वाढतसे धीर          अधीराचा ४
दुःखे सरतील        सुखे भेटतील
विश्वास मनाचा      बळावतो ५
तुझ्या दर्शनाने       हुरूप वाढतो
उत्साह साठतो      अंतरात ६
माते रेणुके गे         सातही दिवस
आणव पायाशी     आस साधी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली कृपेची सावली
वत्सासी गाउली तैसी आम्हां १
आले नवरात्र जागवले तूच
तूच सुचविले लिही काही २
काय चुका झाल्या मनाशी विचार
सुधार आचार येथुनी तू ३
उतावीळ मन तेणे अविचार
नामे सुविचार सुचतील ४
सारेच आपले दुजे कोण येथे?
मीच येथे तेथे पाहा मला ५
कन्या पत्नी सून माझीच ती रूपे
भेद नच खपे अणुमात्र ६
दुरावा संपव उचल पाऊल
मीहि दे चाहूल ऐक बाळा ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१७.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके रेणुके दयाळे अंबिके
बाहतो कौतुके येई वेगे १
पूस पदराने कोमेजले मुख
देई प्रेमसुख माय माझे २
नाते न आताचे कितीक जन्माचे
म्हणोनिया वाचे स्फुरे नाम ३
लाविलास लळा गाता झाला गळा
बहरला मळा भक्तीचा हा ४
सारा परिवार तुझिया छायेत
नेमाने तो येत नकळत ५
तिमिर घालव प्रकाश आणव
आम्हा गोडी लाव अध्यात्माची ६
ताई भाऊ आम्ही तुझिया पायाशी
सिद्ध श्रवणासी करी बोध ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

आई रेणुके गे शरण मी तुला
कवितेच्या फुला गंध हवा १
वासना नसावी भावना असावी
साधना घडावी नित्यनेमे २
अंतरी निर्मळ दृष्टीने प्रेमळ
वाणीने रसाळ करी भक्ता ३
सौभाग्याचे लेणे हळद नि कुंकू
अशिवाला जिंकू शक्ति देई ४
सुहास्य वदन राजीव लोचन
अतीव मोहक रूप तुझे ५
तूच ज्ञानेश्वरी तुकोबांचा गाथा
नाथ भागवत त्यातही तू ६
पहात राहावे बोलणे सरावे
मनाने रिघावे स्वरूपात ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.१०.१९९३

।।जय माताजी।।

रेणुके माऊली तुझ्या उत्‍सवात
आनंद मनात मावेनासा १
शशिसूर्यप्रभा उजळवी नभा
चैतन्‍याचा गाभा परि तूच २
आई सुहासिनी तूच सुभाषिणी
राग नि रागिणी संगीतात ३
पक्ष्‍यांचे कूजन भृंगांचे गुंजन
वाऱ्याचे विंझण स्‍तोत्र तुझे ४
योगियांचे ध्‍यान मुनींचे चिंतन
भक्‍तांचे वंदन तुजलागी ५
कैसे गे भारिले वेड गे लाविले
तूच लिहविले येथवर ६
ललितापंचमी रंगाची पंचमी
आश्विनात आली जणु आज ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.१०.१९९३

।।जय माताजी।। 

रेणुका आई गे अशी तू दूर का
अंतर दुस्तर भेटीआड १
कधी तो पाऊस वाटेत ती ओल
पावले ती खोल रुतताती २
तुझे हे देऊळ वाटते बोलवी 
प्रेमाने खुणावी बाळांनो या ३
देहाचा चिखल पाण्याने जाईल
मनाच्या शुद्धीला तुझे नाम ४
रेणुके तुकाई माझे तू विठाई 
कृष्णाई ज्ञानाई अंतरी ये ५
हाच धावा माझा हात दे सावर 
माया तू आवर माय माझे ६
अहंता जाऊ दे दृष्टीला दिसू दे 
हिताचे होऊ दे विनवणी ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१०.१९९३

।।जय माताजी।।

तुला आठविता रेणुका माऊली
काया थरारली आनंदाने १
तुझ्या स्‍मरणाने सार्थक जन्‍माचे
फळ पूजनाचे भक्तिभाव २
जेथे तेथे आई जेव्‍हा तेव्‍हा आई
जैसी तैसी आई दिसशी तू ३
देह ही घागर घालुनी फुंकर
सोऽहं चा सुस्‍वर ऐकव गे ४
फुगडी खेळावी जिवाने शिवाशी
सर्वसुखराशी प्राप्‍त झाल्‍या ५
तुझे हे मंदिर सर्वांना माहेर
भक्‍तीचा आहेर माहेराचा ६
जो तो प्रेमे वागो ऐक्‍यभाव जागो
दुजे काय मागो तुझ्यापाशी? ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.१०.१९९३



जय जय योगेश्वरी माता..

योगेश्वरी माता। जय जय योगेश्वरी माता! ध्रु. 

नरनारी ही तुझी लेकरे
रानामधली मुक्त पाखरे
विश्वासाने जगी विहरती, ना भय ना चिंता!१

सकलदेवमयी अगे योगिनी
धाव पाव विश्वाचे जननी
तुझ्याविना ना दुःखग्रस्ता दुजा कुणी त्राता!२

महालक्ष्मी महाकाली तू
महासरस्वती पुरवी हेतू
मजला गमशी महन्मग्ङले मातांची माता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.२००६

Thursday, October 15, 2020

आम्ही ज्ञानार्थी, विद्यार्थी

 
आम्ही ज्ञानार्थी, विद्यार्थी
बालवयातच या शाळेतच 
घालू आयुष्याचा पाया!ध्रु. 

विकास अमुचा साधायाचा
मार्ग आमुचा परिश्रमाचा
विश्वासे विश्वास वाढतो
चंदनसम झिजु दे काया!१

निर्णय अमुचा आम्ही घेऊ
कर्तव्यास्तव सिद्धच राहू
सावधान हा मंत्र जपावा
वेळ न जवळी दवडाया!२

भावी जीवन विशाल मंदिर
कळस तयाचा गाठे अंबर
निढळाचा या घाम गाळुनी
प्रगतिपथावर पुढे धावु या!३

शाळेहुन ही मोठी शाळा
विशाल जग हे मोठी शाळा
अनुभवातुनी ज्ञान लाभते
हवी कसोटी उतराया!४

विघ्ने आली येऊ देत ती
जीवनवीरा कसली भीती?
अभ्यासाने घडते प्रगती
क्षण क्षण लावू या कार्या!५

योगाभ्यासे आवरते मन
व्यायामाने कणखर हो तन
हीच शिदोरी आयुष्याची
जीवनभर ती पुरवू या!६

प्रयत्न म्हणजे शिक्षण आहे
शिक्षणातुनी विकसन आहे
आळसास त्या जरा न थारा
इतिहासाला घडवू या!७

एक एक गुण जोडत जाणे
हवे हवेसे सकलां होणे
योगेश्वर श्रीकृष्ण सारथी
रथात आरुढ होऊ या!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०३.०९.१९८९

Sunday, October 11, 2020

गीतेचे सार..

अर्जुनाच्या विषादाने         जिज्ञासा जागली असे
धर्म्य काय असे युद्ध          पार्था भोवळ येतसे १

आत्मा न जन्मतो नाशे      कार्य कर्म न चूकते
स्थितप्रज्ञ सदा शांत          पाप त्याला न लागते २

कामक्रोध महावैरी            झुंजायाचे तयासवे
यज्ञार्थ कर्म ना बाधे          अर्जुना पूस आसवे ३

ज्ञानयज्ञ असे थोर             पापा निमिषि लोपवी
मुमुक्षू करुनी कर्मे            अंतरात्म्यास तोषवी ४

कर्मयोग असे सोपा          संग सोडी धनंजया
आत्मनिष्ठ समाधानी        साध वीरा मनोजया ५

आवरी मन अभ्यासे         आत्मोध्दार स्वये करी
वैराग्ये साधतो योग          सन्मार्गी नेट तू धरी ६

उत्पत्ति स्थिति संहार        जगाचा माधवामुळे
व्यापुनी सर्व हे विश्व         राहिला तो दशांगुळे ७

सर्वदा  स्मरता कृष्णा       अंतकाळी मिळे गती 
आत्मज्ञान जया लाभे       योगी मोहन पावती ८

अनन्यभक्त हो माझा        माझे यजन तू करी
योजुनी मन तू ऐसे           प्रेमे जिंक पहा तरी ९

बुद्धियोग स्वये देतो         भक्ति पार्था करी अशी
विभूती मुख्य जाणूनी      योग्यता मिळवी कशी १०

अनन्यभक्तिने होते          शक्य जे रूप पाहणे
जाणुनि महिमा त्याचा     प्रर्थिले शीघ्र अर्जुने ११

सगुणी निर्गुणी भक्ती       ते दोन्ही सारखे प्रिय
फलत्यागी स्थितप्रज्ञ        ज्ञानी ध्यानी अतिप्रिय १२

शरीर म्हणजे क्षेत्र           आत्मा क्षेत्रज्ञ बोलती 
सर्व देही वसे आत्मा        निर्विकार नि अकृती १३

त्रैगुण्य म्हणजे काय        कर्ता ना त्रिगुणांविना
गुणातीत खरा भक्त        कृष्ण सांगे स्वये खुणा १४

वाढला वृक्ष अश्वत्थ        खाली फांद्या वरी मुळे
वैराग्य शस्त्र छेदाया        मोहने अर्जुना दिले १५

दैवी संपद् मोक्षदात्री       आसुरी दे अधोगती
अश्रद्ध जे दिशाहीन        त्यांना कोठुन सद्गती १६

कार्याकार्य कळे भेद       आदरे शास्त्र पाहता 
ॐ तत् सत् अशा बोले    संकल्पा येत पूर्णता १७

निःशंक पार्थ हो आता     हासे त्याची प्रसन्नता 
कर्तव्यस्मृति ही होता      पार्थ कृष्णच तत्त्वतः १८ 

गीतेचे सार मी नित्य       पाजावे तृषिता जना
स्वरूपानंद ध्यानात        हृष्ट तुष्ट दिसे मना १९

कृष्ण कर्ता कृष्ण वक्ता   ग्रंथकर्ताहि कृष्ण तो 
अंतरीच्या प्रकाशात        राम कृष्णास वंदितो २०

जीवनात असे गीता        जैसी त्याला कळे तशी 
अमृताची तया गोडी       जो जो सेवी तया तशी २१

।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.१०.१९८२

Saturday, October 10, 2020

उठि उठि गोपाळा, कृष्णा विलंब बहु झाला !

उठि उठि गोपाळा, कृष्णा
विलंब बहु झाला !ध्रु.

धर्माला या कळा उतरती
कोण मीच हे सकल विसरती
डोळे असुनी लोक आंधळे, घाल अंजनाला !१

आत्मश्रद्धा तुझी लाभु दे
अन्यायाची चीड येउ दे
भित्रेपण लज्जास्पद असते घुमव प्रणवाला !२

तू गोपाळा कसे जमविले
झुंजायाला समर्थ बनले
अपुल्या हाते आम्ही घडवू दिव्य भविष्याला !३

कंसाची ना तमा कुणाला
कठोर शासन पापात्म्याला
अर्थ अहिंसेचा उमगावा ज्या त्या छाव्याला !४

शरीर नश्वर मी तर नाही
मन बुद्धी वा काही नाही
सोऽहं प्रत्यय गीता देते खचित साधकाला !५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०६.२००६

Wednesday, October 7, 2020

उषादेवते ..

 
उषादेवते, तुजला वंदन!
जीवनात ये, तुला निमंत्रण !ध्रु. 

रवि उदयाचलि येऊ पाहे
मंद समीरण वाहत आहे
मनी जागतो श्री यदुनंदन !१

तुज भूपाळी गाता गाता
देहभान हे जाता जाता
गीता करते घरी पदार्पण !२

सर्वभाव ओतून आळवित
मिटल्या नयनी तेज साठवित
साधक करती प्रकाशपूजन !३

सत्संगे जागते चेतना
सत्कार्या लाभते प्रेरणा
चिंतनातुनी मिळे चिरंतन !४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.१०.१९८५

भूपाळी श्री गुरुदत्तांची

श्रीगुरुदत्ता मला प्रभाती आपण जागविले 
दत्त दत्त जप आतुन चाले आपण ऐकविले!

औदुंबर वृक्षाच्या खाली जाउन बैसावे
मिटता डोळे दत्त दिगंबर पुढती ठाकावे 
माझ्या माथी हात आपला हे मज जाणवले! 

भस्म लाविले माझ्या भाळी कृपा आगळी ही 
नित्य नवा दिन मला दिवाळी कृपा वेगळी ही 
परमार्थाचे सौख्य लुटावे कसे मला कळले! 

सत्य शिवाच्या सुंदरतेच्या मार्गावर चाल 
त्रिगुणातीतच  तुला व्हायचे उजळ भावि काल 
वैराग्यासम कुणी न साथी मजला बोधविले!
 
प्रासादाहुन पर्णकुटी ही किती तरी छान 
दूर जनांहुन वनात कर रे ध्यानामृतपान
तुझ्यात मी अन् मदंतरी तू वच कानी आले!

दानासाठी हात आपला चिंतनास हे मन
नामासाठी रसना आहे कर्मा कर दोन
सावध संचारास लाभली दोन्ही ही पाउले!

साधेपण जे तनामनाचे त्यातच आनंद
नको अमीरी बरी फकीरी तो परमानंद
जगदाधारा उपदेशाने पावन मन केले!

गुरुचरिताची गोडी ऐसी साधकास गीता
जीवनयात्रा सोपी होते सरताती चिंता
वत्सा मी पाठीशी आहे अभयदान दिधले!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.११.१९८९

Tuesday, October 6, 2020

ग्रंथ भागवत

ग्रंथ भागवत       थोर भक्तिकथा
ऐकताच भक्ता    मोक्षलाभ !१

याच देही मुक्ती    सांगे हरि युक्ती
यात्रिकाला शक्ती  चालावया !२

कृष्णनाम गावे      देहातीत व्हावे
अंतरी पहावे         ज्याचे त्याने !३

इंद्रियांच्या गाई      सांभाळी गोपाळ
भक्तांचा सांभाळ   तोच करी !४

आत्म्याची मुरली   ऐकतो संयमी
तो न रमे कामी      सदा स्वस्थ !५

वासुदेव हरि          पांडुरंग हरि
राम कृष्ण हरि       म्हणा म्हणा !६

नाम मुखी यावे      ऐसे जर व्हावे
नाम नेटे घ्यावे       गोविंदाचे !७

म्हणा कृष्ण कृष्ण  कळू लागे गीता
अर्थ सांगे भक्ता     जीवनाचा !८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०७.१९९०

Monday, October 5, 2020

सांब सदाशिव तुजला वंदन

सांब सदाशिव तुजला वंदन
स्मशानवासी पापहरा
सोऽहं सोऽहं डमरू वाजे, अज्ञानाचा कर निचरा ! ध्रु. 

वामांगी पार्वती बैसली
तत्त्वचिंतनी पुरती रमली
आदिनाथ हे, आदिगुरुच तू योगिराज हे महेश्वरा !१

शिव शिव म्हणता शांत वाटते 
निवांत निश्चल काया होते
अभ्यासा साधका बसविशी, शिक्षक प्रेमळ कुशल खरा !२

जटेतुनी तर गंगा उसळे
त्रिविधताप हे विलया गेले
क्रोधनाग तुज वश झालेला, रुळतो कंठी उमाहरा !३

कुठली थंडी ऊनहि कसले
मुसळधार जरि मेघ बरसले
हिमाचलासम तूही अविचल,  वंदनीय म्हणुनी रुद्रा !४

भस्म तुझे लावताच भाळी
काम न शिवतो कधी अवेळी
चंद्रकोर जी विलसे भाळी, प्रसन्न करिते वसुंधरा !५

संहारातुन नवी निर्मिती
इकडे मृत्यू तिथे निर्मिती
चिरंतना हे, निरंजना हे, प्रणाम घे रे उमाहरा !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०८.१९८९

Sunday, October 4, 2020

आई रेणुकेचा जयघोष

आई रेणुके तुझाच जय जय
तिमिर घालवी कर ज्ञानोदय १

आई रेणुके तुझाच जय जय
तू उत्पत्ती स्थिती आणि लय २

आई रेणुके, तुझाच जय जय
मना उलटवी कर गे निर्भय ३

आई रेणुके, तुझाच जय जय
सूर ताल तू नर्तनात लय ४

आई रेणुके, तुझाच जय जय
तू दुर्गा तू पुण्याचा जय ५

आई रेणुके, तुझाच जय जय
नवीन दृष्टी पापाचा क्षय ६

आई रेणुके, तुझाच जय जय
कला शास्त्र तू विद्या अक्षय ७

आई रेणुके, तुझाच जय जय
तूच विरक्ती शक्तीसंचय ८

आई रेणुके, तुझाच जय जय
उमा, रमा, सावित्री जय जय ९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०९.१९९५

कृष्ण, गोविंद गोविंद, कृष्ण गोपाल गोपाल


"कृष्ण, गोविंद गोविंद" गाई मना!
"कृष्ण, गोपाल गोपाल" ध्याई मना !ध्रु. 

श्वास साथी तुझा सख्य त्याशी करी
श्याम कैसी तनी वाजवी बासरी
आणवी तू मनी लाडक्या मोहना!१

काय दुःखात तू? पूस रे आसवे
हास थोडा तरी कृष्ण बोले सवे
वेद झाल्या पहा पूर्विच्या वेदना !२

गाई राखे कसा, देह राखी तसा
धार काढे कसा, बोध घेई तसा
संयमी तो सुखी आवडे सज्जना !३

काम हा कालिया क्रोध हा कालिया
मत्सरू कालिया दंभ ही कालिया
ठेच त्याची फणा देवकीनंदना !४

कंस मामा जरी क्रूरकर्माच तो
आप्त झाला जरी वध्य आहेच तो
तूच निर्धार दे चेतवी चेतना !५

कर्म जे कोठले 'यज्ञ' म्हणुनी करी
श्रेय त्या अर्पिता तोषतो श्रीहरी
यज्ञचक्रास तो देतसे चालना !६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
९.८.१९८९ 

ध्यान कर आदेश मिळेल


आसनी तू बैस स्वस्थ
तने मने होत शांत।
सद्गुरु जे अंतरात 
बोलतील ।१

बोलतील अरे पुत्रा
खिन्न काय तुझी मुद्रा
जाण तूच तुला मित्रा
अजन्मा तू ।२

अजन्मा तू तत्त्व ते तू
साधनेचा दिव्य हेतू
दक्ष राही सदाचा तू
आनंदी हो ।३

आनंदी हो करी कर्म
प्राप्त कर्म हाच धर्म।
फलत्याग हेच मर्म 
ध्यानी घ्यावे ।४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.१०.१९८६

Thursday, October 1, 2020

स्वामी माधवनाथांचा प्रसाद मज लाभला

स्वामी माधवनाथांचा   प्रसाद मज लाभला
किरणांच्या प्रकाशात   वाटचाल करी मुला

साधनेची वाट सोपी      गोडी वाढो तिची मनी
सोsहं ध्यानी रमावे तू    कोठेही जा जनी वनी

आशीर्वाद प्रभावी हा     पाठ राखी सदा कदा
देहबुद्धी घालवी तो       लाभ याहून कोणता

आता नाही कुठे जाणे    आसनी स्वस्थ बैसणे
पाहताना स्वरूपाला      शांत होणे तने मने

कुणी वंदो कुणी निंदो    कुरवाळो पिटो कुणी
उपाधींची नसे चिंता      आकाशासम होत मी

सुधास्रोत असे आत      अभ्यासी पूर्ण जाणवे
त्याचा लाभ तना होत    कर्तव्यी ना पडे उणे

ईश्र्वरार्पण वृत्तीही         साधका उपकारक 
अद्वैत बोध आतूनी        श्रीरामा उपकारक

रचयिता :  श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०१.१९८६

गीता


तुज जगावयाचे आहे
तुज लढावयाचे आहे
तुज हसावयाचे आहे
शिकवते हरीची गीता १

तू झटक मोह देहाचा
कर होमच आयुष्याचा
आदर्श होई धर्माचा
दे स्फूर्ति निरंतर गीता २

सुखदुःखा सम समजावे
कर्तव्या सादर व्हावे
ना फलाशेत गुंतावे
निरपेक्ष करतसे गीता ३

तव जन्माआधी होती
तव पोषण करणारी ती
तू गेल्यावर असते ती
धीराची दात्री गीता ४

सहकार्य करावे लागे
शरणागत व्हावे लागे
तळमळ ना आपण भागे
सोसण्या शिकवते गीता ५

अप्रिय जरी सत्यच बोल
आघातही बुद्ध्या झेल
नच जाऊ देणे तोल
कसरत घे करवुन गीता ६

घे योगेश्वर वदवून
घे पार्थसखा लिहवून
दाखवी स्वये जगवून
श्रीकृष्णचरित श्रीगीता ७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०५.२००४