Thursday, November 26, 2020

माउलीचा हरिपाठ


माउलीचा हरिपाठ
विठ्ठलाला देत वीट
हरि हरि म्हणताना
संसार ही घडे नीट १

माऊलीची शिकवण
हरि मुखे म्हण म्हण
होशी मोकळा आतून
बंध जातात सुटून २

माऊलीचा सहवास
घर होतसे आळंदी
माझे तुझे सारे संपे
जो तो एकमेका वंदी ३

माऊलीचा जो जिव्हाळा
भाग्यवंतास लाभला
ज्ञाना स्वये देव झाला
ओवी ओवीत दिसला ४

माऊलीचा हा प्रसाद
बळे लिहाया बसवी
गाई एक तरी ओवी
जवळीक अनुभवी ५

ज्ञाना आपण विठ्ठल
शांत सुस्थिर वत्सल
हरिपाठ जे सांगेल
हरि साधका करील ६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.७.२००३

Sunday, November 15, 2020

हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे

कळलेली आम्हा मृत्युतिथी आधीच
गुंडाळुन गाशा सिद्ध मित्र केव्हाच
वध तुमचा करता वैरभाव नच चित्ती 
ती अटळच घटना भाळी लिहिली होती
अपकीर्ती होवो सूखेनैव, दोघांचे -
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !१

हा खंडित भारत पुनरपि व्हावा एक
जय हिंदुराष्ट्र घनगर्जन करि प्रत्येक
हा मंगल प्रातःसमय बोलवत आहे
यमराज भेटिची ओढ वाढते आहे
हे पुष्पहार नच दोरखंड फासाचे
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !२

शासनार्ह दोघे यात न शंका काही
म्हणूनीच क्षमेची मनी अपेक्षा नाही
बलिदान घडे बहुमान, देह हे समिधा
हा देश कृष्ण तर आम्ही दोघे राधा
सिंधूत पडो मम रक्षा स्वप्न मनीचे
हे प्रायश्चित्तच पवित्रतम पापाचे !३

Wednesday, November 11, 2020

दीपज्योतीस

दीपशिखे तू जळत रहा
तव प्रकाशी मना जाणवो 
ज्वलनांतरिही शीतलता ! ध्रु.

नाचत नाचत उजळ मुखश्री
मनामनातील फुलव वनश्री
'जीवन अपुले दुसऱ्यासाठी'
घोष अंतरी घुमो महा!१

मंद तेवुनी चिंतन शिकवी
आत्मबोधनी वृत्ति रंगवी
स्वतेजाने मना उजळुनी
ईशचरणि अंजली वहा!२

तुझ्या गुणांची प्रभुला पारख
तव जळण्याचे तयास कौतुक
पूजाद्रव्यी तुला लाभले
स्थान अलौकिक, जळत रहा!३

द्वैतभावना उरली नाही
मी विश्वाते व्यापुनि राही
मदंतरी क्षण डोकावुनि तू
तुझेच अक्षय रूप पहा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीतादर्शन - मार्च १९७०)

Sunday, November 1, 2020

अवचित रामायण स्फुरले

क्रौंचमिथुन प्रणयात रंगता
सशर थांबला व्याध मागुता
शर लागुनिया नर कोसळता
मुनिवर कळवळले, रामायण स्फुरले!

रुद्ध गळ्यातुन उमटत ना स्वर
अश्रुसरी ओघळल्या सरसर
शरीर अवघे कापे थरथर
मना न राहवले, रामायण स्फुरले !

दोन जिवांची करुण कहाणी
चित्रित करता नयनी पाणी
क्रौंचवधाची अमर निशाणी
शब्दशिल्प सजले, रामायण स्फुरले !
अवचित रामायण स्फुरले!

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले