अक्कलकोटनिवासी स्वामी अवचित सदनी आलात
नकळत नयनांमधुनी माझ्या हृदयमंदिरी बसलात !१
गाउ कसा मी, ध्याउ कसा मी नकळत माझे कर जुळले
रोमांचांनी नटली काया, पावन अश्रू ओघळले!२
कोण असे मी? करू काय मी? गुंता प्रश्नांचा करतो
शरण जाउनी जिज्ञासेने उत्तर मिळण्या आतुरतो!३
भिऊ नको मी असे पाठिशी! आतुन कोणी हे वदते
करी शुद्ध मन, दृढ निश्चय कर, वाट मनीही सापडते!४
'आत्मा असतो मित्र आपला' गीता अभ्यासा घ्यावी
मोहग्रस्ता पार्था मोहन उत्कर्षाचा पथ दावी!५
मंद दरवळे सुगंध येथे धूपगंध हा घमघमतो
अक्कलकोटच घर हे माझे, घरात ऐसे अनुभवतो!६
सत्याची धर कास नेहमी, भीड कुणाची धरू नको
नव्हे देह मी, मन वा बुद्धी, भूमिकेस या सोडु नको!७
चैतन्यच ते तुझिया रूपे जगात आहे सळसळते
सदैव राही हसरा, निर्भय चहू दिशांना भय पळते!८
स्पष्ट असावे तुझे बोलणे सल्ला तैसा हितकारी
तुझिया आप्ता असे वाटु दे हा तर अमुचा कैवारी!९
परिश्रमांना सिद्ध सदाचा, चुकारपण ते घात करी
आळस प्रकटे रोग होउनी आयुष्याचा नाश करी!१०
हवा कशाला तुला बंगला सुखासीन असतो बद्ध
घाम गाळतो, मिळवी भाकर कामगार असतो मुक्त!११
स्वराज्य असते कर्तव्याचे सुराज्य भक्तीने बनते
गीतामृत सेवता निरंतर वृत्ती पुरती पालटते!१२
हवे हवे पण सुटूनि जाता मनात येते श्रीमंती
विश्वच गमते सदन आपुले सर्वांशी नाती जुळती!१३
तुझी परीक्षा क्षणाक्षणाला बेसावध का तू बसशी
विकारवश होऊनि नेहमी अनुत्तीर्ण का ठरतोसी?१४
समर्थ स्वामी, समर्थ स्वामी नामस्मरणी रंगावे
सागरात थेंबुटा तसे तू विश्वामाजी मिसळावे!१५
दुजेपण असे समूळ सरता सर्व समस्या सुटतात
मने मोकळा, तने निरोगी आत्मसौख्य ये हातात!१६
गुरुकिल्ली ही आनंदाची गुरुरायाची अमित कृपा
जे माझे ते माझ्या जवळी शोधाया बसविले जपा!१७
घोर निराशा नर्क खरोखर स्वर्ग स्वतःवर विश्वास
यत्नच साथी हवा भरवसा सांगे हे श्वासोच्छ्वास!१८
क्रोध कुणावर, द्वेष कुणाचा, संशय तरि कसला घ्यावा?
जीव सुखाचा वृथा कशाला दुःखसागरी लोटावा!१९
माझी मजला अखंड सोबत 'तो मो, तो मी ' जाणवता
समर्थ अवती भवती असती जगी कुठेही वावरता!२०
जन्म देत जो, तोच पोसतो, थकता अंती घे जवळी
तू बालक, सद्गुरु माउली जाण आतुनी जाणवली!२१
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.०८.१९९१