Friday, February 25, 2022

दास जाहला स्वामी राम!

 
"सज्जनगड" हा बहु आवडला
ओढ अनामिक आज मनाला
जरी दास मी आहे सान -
इथे मिटावे अंतिम पान
असे वाटते घेता नाम
दास जाहला स्वामी राम -
श्रीराम जय राम जय जय राम! १

या देहाचा शोक कशाला?
मृत्यू का कधि कोणा टळला?
दासबोध सोपविला ठेवा -
शिष्यमंडळी स्मरणी ठेवा
मनोबोध दासाचे धाम
दास जाहला स्वामी राम -
श्रीराम जय राम जय जय राम!२

जे जे ठावे ते शिकवावे
शिष्यासी धन नच मागावे
कामक्रोध रामार्पण करता
त्यास लागते सगळी चिंता
माझ्यामागे भजाच राम
दास जाहला स्वामी राम -
श्रीराम जय राम जय जय राम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.०३.१९८४

Thursday, February 24, 2022

श्री गजानन! जय गजानन!

श्री गजानन! जय गजानन!
जप हा जपता देती दर्शन!ध्रु.

करुणेचा हा सागर दिसतो
पलंगावरी निवांत बसतो
अर्धोन्मीलित त्याचे लोचन!१ 

धगधगते वैराग्य येथले
स्वामीतन भगवेपण ल्याले
सुमन दरवळे श्रीहृदयातुन!२

फुले उमलली पडली चरणी
मूर्ति विदेही बिंबे नयनी
नाद अनाहत घुमला आतुन!३

ऐका गणि गण गणात बोते
अंगुलि हलके टिचक्या देते
दर्शन घडवी भक्ता उन्मन!४

चैतन्याची ठिणगी पडता
धूर चिलमिचा वरवर जाता
नवीन काही स्फुरते चिंतन!५

रच यिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०२.०३.१९८४

सप्त वीर धावले! सप्त रुद्र धावले!



सूड घ्यायचा पुरा, कलंक हा पुसायचा
कोण आड येइ जो, धुळीत धूळ व्हायचा
देहभान हरपुनी प्रतापराव दौडले
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!१

हाच खान दैत्य जो, कृतघ्न पातकी खरा
जीवदान विस्मरे शल्य हेच अंतरा
याच पातक्यामुळे चरण मज दुरावले
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!२

हे अपेशि तोंड ना राजियांस दाविणे
बुडवुनीच दैत्य हा चूक ती सुधारणे
सूड, सूड, सूड घे! रक्त देहि सळसळे
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!३

कालिका क्षुधा जणू सप्त शस्त्रि उतरली
खान दैत्य फाडण्या ती जणू अधीरली
पृथ्वीला गिळावया सप्त लोट धावले
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!४

कोण रोधणार या पिसाट मत्त वादळा
सप्तचित्ती एकसमयि सूड सूड पेटला
दख्खनच्या दौलतिचे सात तारे तुटले 
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!५

शिवा अता प्रसन्न हो, बिल्वपत्र  वाहिले
शिवा अता प्रसन्न हो, कलंक सर्व क्षाळिले
अमरकीर्ति स्वर्गि नेत सप्त वीर धावले
सप्त वीर धावले, सप्त रुद्र धावले!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, February 22, 2022

कसे करावे गजाननाचे आपण गुणगान..


कसे करावे गजाननाचे आपण गुणगान?
'गणि गण गणात बोते' म्हणता हारपते भान!ध्रु.

देही असला तरी विदेही, ज्ञानी तरि या घमेंड नाही
चिलीम करि परि छंदी नाही, काही काही लपवत नाही
थोरांमध्ये थोर तसा हा सानाहुनि सान!१

विहिर कोरडी याला चिंता हा पाझर फोडी
सोपी सोपी करून सोडी जी अवघड कोडी
सांब सदाशिव भोळा वर्तनि ते आत्मज्ञान!२

विकारवारू उधळे त्याला हा करतो शांत
स्वरूप स्मरता धेनु हंबरे वानु कशि मात?
जिथे वसतसे ते घर मंदिर रुचले या गान!३

दांभिकपण ते जरा न खपते परखड हा बोले
भाव जाणतो अंतरातला चिंतनि हा डोले
गणाधीश हा गुणाधीश हा सगळ्यांना जाण!४

वठलेला जो आम्रवृक्ष त्या आली नवपालवी
पीतांबर जो त्याची श्रद्धा सत्य सत्य ठरवी
जीवनमूल्यांचे हा राखे आचरणी भान!५

समाजशिक्षक असा न होणे चिंतन हा शिकवी
पंथ भिन्न परि मानव एकच हा जगता दावी
शेगावला चला सुजन हो यात्रा सन्मान!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गजानन)

शीत शीत वेचले


माघ वद्य सप्तमीस, शेगावी रस्त्यावर
भर उन्हात, उघड्याने योगिराज बैसले
शीत शीत वेचले!ध्रु.

अन्न शुद्ध नेहमी, देत ही कृती हमी
अन्न सेवतोच मी, अन्नरूप तोहि मी
हे कुणी न जाणले!१

ब्रह्मरूप अन्न जे, काय त्यास टाकता?
अन्नदान धर्म हा का कुणी न पाळता?
न बोलताच बोलले!२

न मागता मिळेल ते, घ्या असा सदा सुखी
प्रभुकृपा अशी जनी जाणतोच पारखी
कृतज्ञ चित्त हासले!३

यज्ञकर्म भोजन श्रीसमर्थ सांगती
नाम घ्या 'हरी, हरी' संत हेच बोधिती
हे जनांस दाविले!४

भाव शुद्ध आतला, भाविकास वाचवी
संशयी अडे कुणी जात तोच रौरवी
कळे जया तया वळे!५

समर्थ सिद्ध्योगि हा आत्मरंगि रंगला
आवडे न नावडे भेदभाव कोठला?
दृश्य हे ठसावले!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गजानन)

न देखिला हो, न ऐकला हो असा अवलिया कुणी..



न देखिला हो, न ऐकला हो
असा अवलिया कुणी..
"शेगावीचा गजानन" वसे ज्याच्या त्याच्या मनी!ध्रु.

आजानुबाहू पूर्ण दिगंबर
वैराग्याचा हा तर भास्कर
लपे न काही मनातले परि, याच्या दृष्टीतुनी!१

चिलमीमधुनी निघे धूर वर
उर्ध्वदृष्टि हा मस्त कलंदर
स्तुतिनिंदेच्या पल्याड राहे, चिंतनरत हा मुनी!२

नको दान मज नको दक्षिणा
नकोत वस्त्रे मज दिग्वसना
विकारवसने भिरकावुनि दे, योगिराज अग्रणी!३

दुजाभाव जर मनात नाही
कामवासना नयनी नाही
हा शिवशंकर जाळुनि मदना, कृतार्थ झाला जनी!४

कांदा मिरची चून भाकरी
मनापासुनी रुचते भारी
जिंकुनी रसना वश केले मन, तत्त्वज्ञच  हा कुणी!५

दासगणूंची ओवी ओवी
चित्र मनातील रंगरंगवी
न पाहिला परि बोले मजशी योगि गजानन गुणी!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गजानन)

Monday, February 21, 2022

सोऽहम् ची भूपाळी


प्रभातकाली सोऽहम् देवा सोऽहम् भूपाळी
पूज्य नि पूजक नुरला आता भेदच भूमंडळी!ध्रु.

सोऽहम् रविने मनातल्या या तमास घालविले
अकर्मण्यता गेली गेली, चैतन्य स्फुरले
कृतज्ञ साधक अर्पितसे ही भावाची अंजली!१

सोऽहम् रूपी सद्गुरु वितरित सोऽहम् मंत्राला
सोऽहम् सोऽहम् घोष उधळितो समाधिसौख्याला
काळाचे कालत्वा लोपले ऐशा शुभकाली!२

सोऽहम् शंकर तया वाहिली सुंदर बिल्वदले
शिवपूजन हे अंतरातल्या शिवास बहु रुचले
अंतरि सोऽहम् भवती सोऽहम् काया मोहरली!३

देहदु:ख ही तनामधे या सुंदर झिणझिणले
कंटक झाली फुले तयांचे रचले मी झेले
मी द्वंद्वाच्या अतीत असतो शिकवण करि आली!४

स्व-रूप कळता आनंदाची होते बरसात
देहाचे ही बंधन तुटते एका निमिषात
पंचप्राणहि प्रमुदित म्हणती प्रभात बघ झाली!५

अमृतानुभव यावा म्हणुनी सोऽहम् गर्जावे
सोऽहम् सोऽहम् म्हणता म्हणता मीपण लोपावे
सोऽहम् मय कर श्रीरामासी प्रार्थित या काली!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०८.१९७७

सुखसंवादच गीता!

सुखसंवादच गीता! सुखसंवादच गीता!ध्रु.

विचार ओघाने आलेले
भावनेमुळे झाले ओले
पाठीवर कर फिरवी जणु की
प्रेमळ वत्सल माता!१

गुरुशिष्यांची जोडी जमली
तत्त्वचिंतनी रतली रमली
मंथन झाले जगावेगळे
नवनीत जणू कविता!२

स्वगत मनोहर वर्णन सुंदर
स्वभावरेखा मधुर मधुरतर
शब्दचित्र हे नादचित्र हे
साहित्यिक कोमलता!३

व्यक्ती व्यक्ती विकसित व्हावी
अवघी सृष्टी हळु उमलावी
विश्वकमल हलके उमलावे
बघता माधवसविता!४

चित्तशुद्धिसी मधुर रसायन
श्रीगीतेचे सुस्वर गायन
कायापालट घडवी नकळत
प्रबोधिनी श्रीगीता!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९.६.१९७६

Sunday, February 20, 2022

राम कृष्ण हरि जप नाममणि माला


राम कृष्ण हरि वद रे वद रे! १
राम कृष्ण हरि स्मर रे स्मर रे!२
राम कृष्ण हरि बघ रे बघ रे!३
राम कृष्ण हरि वदत वैखरी!४
राम कृष्ण हरि घुमत बासरी!५
राम कृष्ण हरि उठती लहरी!६
राम कृष्ण हरि नील गगन रे!७
राम कृष्ण हरि वायु लहर रे!८
राम कृष्ण हरि सूर्यकिरण रे!९
राम कृष्ण हरि छत्र शिरी रे!१०
राम कृष्ण हरि कवळ करी रे!११
राम कृष्ण हरि श्वास संथ रे!१२
राम कृष्ण हरि पवित्र मंदिर!१३
राम कृष्ण हरि प्रतिमा सुंदर!१४
राम कृष्ण हरि ध्यान शुभंकर!१५
राम कृष्ण हरि मागुति पुढती!१६
राम कृष्ण हरि अवती भवती!१७
राम कृष्ण हरि हृदय संपुटी!१८
राम कृष्ण हरि श्रवण करावा!१९
राम कृष्ण हरि हृदयी भरावा!२०
राम कृष्ण हरि जगती पहावा!२१
राम कृष्ण हरि आदिनाथ गुरु!२२
राम कृष्ण हरि आदिसिद्ध गुरु!२३
राम कृष्ण हरि थोर आदिगुरु!२४
राम कृष्ण हरि प्रेमळ जननी!२५
राम कृष्ण हरि सोशिक धरणी!२६
राम कृष्ण हरि वत्सल रजनी!२७
राम कृष्ण हरि झरा झुळझुळे!२८
राम कृष्ण हरि पान सळसळे!२९
राम कृष्ण हरि कवन स्फुरले!३०
राम कृष्ण हरि परिसा स्पंदन!३१
राम कृष्ण हरि गंधित चंदन!३२
राम कृष्ण हरि देवकिनंदन!३३
राम कृष्ण हरि भाव मधुर रे!३४
राम कृष्ण हरि स्वर सुरेल रे!३५
राम कृष्ण हरि झंकृति मधु रे!३६
राम कृष्ण हरि नित्यपाठ रे!३७
राम कृष्ण हरि मनोबोध रे!३८
राम कृष्ण हरि मार्गदीप रे!३९
राम कृष्ण हरि तापशमन रे!४०
राम कृष्ण हरि दुःखहरण रे!४१
राम कृष्ण हरि निर्वासन रे!४२
राम कृष्ण हरि कर्मयोग रे!४३
राम कृष्ण हरि भक्तियोग रे!४४
राम कृष्ण हरि ज्ञानयोग रे!४५
राम कृष्ण हरि गुरुदर्शन रे!४६
राम कृष्ण हरि गुरुकृपा रे!४७
राम कृष्ण हरि गुरुगौरव रे!४८
राम कृष्ण हरि उषःकाल रे!४९
राम कृष्ण हरि भूपाळी रे!५०
राम कृष्ण हरि ओवि मधुर रे!५१
राम कृष्ण हरि गोरस मधु रे!५२
राम कृष्ण हरि मुरलीरव रे!५३
राम कृष्ण हरि हास्य मधुर रे!५४
राम कृष्ण हरि शैशव लोभस!५५
राम कृष्ण हरि यौवन राजस!५६
राम कृष्ण हरि आकृति गोंडस!५७
राम कृष्ण हरि पंकज सुंदर!५८
राम कृष्ण हरि सौरभ सुंदर!५९
राम कृष्ण हरि ऋतु कुसुमाकर!६०
राम कृष्ण हरि झांज झणझणे!६१
राम कृष्ण हरि वायु रुणझुणे!६२
राम कृष्ण हरि रिंगण धरणे!६३
राम कृष्ण हरि मृदंग बोले!६४
राम कृष्ण हरि भाविक बोले!६५
राम कृष्ण हरि साधक डोले!६६
राम कृष्ण हरि दिंडी चाले!६७
राम कृष्ण हरि वदनी आले!६८
राम कृष्ण हरि तनिमनि मुरले!६९
राम कृष्ण हरि प्रीतिच प्रीती!७०
राम कृष्ण हरि भक्तिच भक्ती!७१
राम कृष्ण हरि शांतिच शांती!७२
राम कृष्ण हरि सहा अक्षरे!७३
राम कृष्ण हरि रुद्राक्षच रे!७४
राम कृष्ण हरि शुद्ध भस्म रे!७५
राम कृष्ण हरि शिल्पकला रे!७६
राम कृष्ण हरि गानकला रे!७७
राम कृष्ण हरि नृत्यकला रे!७८
राम कृष्ण हरि स्थिर आसन रे!७९
राम कृष्ण हरि समाधि सुख रे!८०
राम कृष्ण हरि मौन मधुर रे!८१
राम कृष्ण हरि जीवनकविता!८२
राम कृष्ण हरि जीवन सरिता!८३
राम कृष्ण हरि जीवन गीता!८४
राम कृष्ण हरि अटवी पट्टण!८५
राम कृष्ण हरि मानस मोहन!८६
राम कृष्ण हरि अंतर शोधन!८७
राम कृष्ण हरि भवभयभंजन!८८
राम कृष्ण हरि अमृत मंथन!८९
राम कृष्ण हरि अलख निरंजन!९०
राम कृष्ण हरि अरिनिर्दालन!९१
राम कृष्ण हरि सज्जनरक्षण!९२
राम कृष्ण हरि धर्मस्थापन!९३
राम कृष्ण हरि तीर्थाटन रे!९४
राम कृष्ण हरि सत्संगति रे!९५
राम कृष्ण हरि निदिध्यास रे!९६
राम कृष्ण हरि हीच पंढरी!९७
राम कृष्ण हरि खरी कस्तुरी!९८
राम कृष्ण हरि श्रीमदनारी!९९
राम कृष्ण हरि नवविधभक्ति!१००
राम कृष्ण हरि प्रभुची शक्ति!१०१
राम कृष्ण हरि विषयि विरक्ति!१०२
राम कृष्ण हरि हटवी आतप!१०३
राम कृष्ण हरि विशाल पादप!१०४
राम कृष्ण हरि हा अजपाजप!१०५
राम कृष्ण हरि दीप प्रज्वलन!१०६
राम कृष्ण हरि थोर उपायन!१०७
राम कृष्ण हरि श्रीकृष्णार्पण!१०८
राम कृष्ण हरि ॐ  हरि ॐ!१०९

श्रीकृष्णार्पणमस्तु

रचयिता: श्रीराम बाळकृष्ण आठवले
८.१०/९.१०.१९७७

Sunday, February 13, 2022

परमात्म्यासी नच ओळखसी, हेच हेच अज्ञान

परमात्म्यासी नच ओळखसी, हेच हेच अज्ञान!ध्रु.

खरे न जे त्या खरे मानिसी
अंतरि वळुनी शोध न घेसी
कस्तुरिमृगसम वेडा होसी हिंडसि तू बेभान!१ 

देव आपल्या सन्निध असतो
कृतीस अपुल्या सदा निरखतो
जाणिव याची जर नच झाली समज तेच अज्ञान!२

निष्ठा रामी अशी असावी
नित संतोषी वृत्ति रहावी
देव न जाणुनि जर देहाचा धरलासी अभिमान!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचन क्र. २८७ वर आधारित काव्य)

Friday, February 4, 2022

कोंढाणा फिरुनि मिळाला, मृत्यूने भाऊ उचलला..

 

कोंढाणा फिरुनि मिळाला, मृत्यूने भाऊ उचलला!ध्रु.

दुर्दैवी मज सम नाही
एक एक सौंगडी जाई
'गड घेतो' म्हणुनी गेला, कायमचा गेला गेला!१

कोंढाणा नवरा रुसला
प्राण हाच आहेर केला
काढूनी रुसवा त्याचा तान्हाजी स्वर्गा गेला!२

दुःखाने मजला गिळले
तटतटा आतडे तुटले
नरवीर रणांगणि पडला, सूर्याचा दादा गेला!३

जिवलग या मित्रासाठी
मा:तुश्री झाल्या कष्टी
लडिवाळ पुत्र जणु गेला निर्दया कराला काळा!४

जे एका हाती येते
ते दुज्या कराने जाते
लागला घोर चित्ता हा, गड आला आणिक गेला!५

ऐकूनि मरण तान्ह्याचे
हरपले बाल्य शिवबाचे
विरहाचा चटका बसला - सोबती जिवाचा गेला!
सोबती शिवाचा गेला!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

परनिंदेचे पातक माथी नको नको देवा..



परनिंदेचे पातक माथी नको नको देवा
त्याहुनि बरवा चाखावा मी तुझा नाममेवा!ध्रु.

नामरत्न हाती कशाला हवी पापमाती?
निंदेच्या संगती लोटती महापापपंक्ती
जिव्हा केवळ नाम जपू दे वर देई देवा!१

निंदेने मन दूषित होते हानि किती मोठी?
देता घेता प्रेम वाढते करु या गुजगोष्टी
परनिंदेची गोडि न वाटो या जीवा देवा!२

जे दुसऱ्याचे दोष दिसत मज ते माझ्या अंगी
दुर्गुण जावे म्हणुनि रमावे सत्वर श्रीरंगी
शरण येउनी चरण धरुनि मी विनवित तुज देवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचानामधी २९० व्या प्रवचनावर आधारित ही कविता)

निंदा ही आपल्या साधनाची होळी करते.

परनिंदा करण्यासारखे पाप नाही. परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत चालला असे समजावे. ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जिव्हा नामाला वाहावी.  पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते.

पाळणा हले..



सूर्यनारायण प्रसन्न झाले. अदितीला फारा दिवसांनी मुलगा झाला. कश्यप ऋषींचा आश्रम आनंदाने उल्हसित झाला.  दुर्वांकुरांचा पाळणा सजला. बारशाला स्त्रिया जमल्या. पाळणा जो जो म्हणून हलू लागला - 

पाळण्याच्या मागे पुढे होण्याच्या लयीतच गीत गायले जाऊ लागले -

पाळणा हले, पाळणा हले!ध्रु.

वर्ण सावळा मूर्त ठेंगणी
नीर दाटले मातृलोचनी
भाळ भव्य हे, नेत्र सानुले!१

राष्ट्रनायका, हे विनायका
धीर द्यावया, तूच दीपिका
सार्थ व्हावया, नाव ठेवले!२

पक्षि कूजती, हरिण नाचती
पवन वाहता वृक्ष डोलती
सृष्टि हासते, आज तुजमुळे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जयजयवंती, दादरा (लहरी अशा)

Thursday, February 3, 2022

अभंग गीतेचे..



अभंग गीतेचे करिता गायन
मनात चंदन परिमळे!१

मिटता नयन प्रकटे माधव
गुरूंचे वैभव जाणवते!२

देहाचा संबंध क्षणात तुटतो
गोपाल भेटतो गुरूमुळे!३

ठायीच बसावे आपण निवांत
साधावा एकांत स्वरूपाशी!४

स्वतःच स्वतःशी करावा संवाद
भोगावा आल्हाद अनंताचा!५

नव्हेच देह मी घोकावे सतत
सोऽहं ध्यानी रत होऊनीया!६

सिंधूत बिंदु मी नाहीच वेगळा
श्रीकृष्ण सावळा झालो मीच!७

भय ते कशाचे साधता एकत्व
गळाले ममत्व नश्र्वराचे!८

आता ऐसे झाले हिंडावे कोठेही
जेवावे कोठेही विश्व घर!९

ध्येय ध्याता ध्यान संपली त्रिपुटी
देता बालगुटी कृष्णमाय!१०

मनाचा संतोष गीतेचे चिंतन
आत्म्याचे पोषण होत असे!११

होत आपोआप व्यक्तित्व विकास
बळावे विश्वास साधकाचा!१२

ईश्वराला नाही आदि किंवा अंत
शोधावे तयास अंतरंगी!१३

अव्यक्त ईश्वर ध्यानी हे घेऊन
प्रतीक मानून उपासावे!१४

गीताई देतसे कर्तव्य-निर्णय
जीव हो चिन्मय प्रसाद हा!१५

जन्म नि मरण अटळ सर्वांस
आत्म्याचा विनाश संभवेना!१६

गीताई पाजते ज्ञानाचे अमृत
साधक सुव्रत होत असे!१७

फलाशा सोडून कर्माचे सुमन
चरणी वाहून करू पूजा!१८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९७६/७७

Wednesday, February 2, 2022

रेडा वेद बोलला



काय वानु नवलाई समदी
चिमक्तार झाला
सन्याश्याच्या पोरे शिवता
रेडा वेद बोलला!ध्रु.

पंडित पडले पाया
बघती पोरे आया बाया
लाजलाजले पोर कोवळे करुणा देवाला!१

डोळ्यांमधुनी नद्या वाहती
धन्य धन्य सगळेजण म्हणती
काय कथा अम्हा गरिबांची, ब्रह्मवृंद लोळला!२

ज्यांनी दिधल्या शिव्या
त्यांनी म्हटल्या वव्या
अद्भुत करणी ही देवाची कळे न कोणाला!३

कसले पंडित कसले शास्त्री
अमुच्या भारे शिणे धरित्री
कोण आम्ही पावन करणारे म्हणति मुक्त जाहला!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, February 1, 2022

रेडा वेद बोले!

अघटित घडले पैठणनगरी, वैदिक चक्रावले!
रेडा वेद बोले! ध्रु.

अहंभाव हे सावट जेथे
ज्ञानभास्करा ग्रासु पाहते
चमत्कार परि दिसता थक्कित जाहलीत द्विजकुळे!१

रेडा भासत केविलवाणा
ज्ञानाहाती अपार करुणा
अश्रू त्याचे ज्ञानाचरणी ठिबकत जैसी फुले!२

नादलहरी त्या क्षणात जुळल्या
त्वचा थरथरे अद्भुत माया
संथा घेउनि भावभरे मग घनगर्जनसम बोले!३

निश्चल गोदा, पवन थांबला
काल वाहता झणि गहिवरला
साक्ष पटे मग शुद्धत्वाची सहस्र कर जुळले!४

सर्वाभूती एकच ईश्वर
मानुनि  डुलले ते पंडितवर
ज्ञानी अज्ञानी सगळे जन चरणांसी लागले!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२५.०६.१९७३