Wednesday, August 3, 2022

तुळणा नसे!


तुळणा नसे! तुळणा नसे! ध्रु. 

खान नव्‍हे दुर्योधन वधिला, एक आचमनि सागर गिळला 
मृगछाव्‍याने हत्ति फाडिला – श्रम साहसे! श्रम साहसे!१

देवद्वेष्‍टा खान संपला, प्रतापगड रोमांचि‍त झाला 
पुण्‍यपराक्रम संगम झाला – देवी हसे! देवी हसे!२ 

चिंता डोंगर दुरी फेकला, उसने फिटले, उत्‍सव वेळा 
विघ्‍नेश्‍वर नवसास पावला – महिमा ठसे! महिमा ठसे!३

यश जागृतिला, यश धैर्याला, उदंड यश हे नेतृत्‍वाला 
यश बुद्धीला, यश हिकमतिला – शंका नसे! शंका नसे!४ 

खाना मनि पूतना मावशी, शिव ही बनला तो हृषिकेशी 
धर्माची कपटावर सरशी – श्रद्धा वसे! श्रद्धा वसे!५

सज्‍जनरक्षण, खलनिर्दालन, भीतिनिवारण, बलसंवर्धन 
यास्‍तव जगती दैवी दर्शन – घडते असे! घडते असे!६ 

कैसे घडले, कुणा न कळले, एका निमिषी अद्भुत घडले 
अद्रि कोसळे, नवल वर्तले – जगती असे! जगती असे!७

अविचाराते विचार मारी, परमात्‍मा निजभक्ता तारी 
सांबसदाशिव शिवकैवारी – जगता दिसे! जगता दिसे!८

मृत्‍यु अपुला जबडा उघडे, मृत्‍युंजय मृत्‍यूते फाडे 
मगरमुखातुनि मौक्तिक काढे – उपमा नसे! उपमा नसे!९

वार्ता फुटली, फत्‍ते झाली, मने हासली, मने नाचली 
गडावरी साजरी दिवाळी – गडही हसे! गडही हसे!१०

तुळणा नसे! तुळणा नसे! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
अफजलखान वधाच्या प्रसंगांवर आधारित काव्य

No comments:

Post a Comment