घरोघरी, करोकरी गीता जाऊ दे -
गीताभ्यास छंद हाच जीवा जडू दे! ध्रु.
गीताभ्यास छंद हाच जीवा जडू दे! ध्रु.
यज्ञ ओघे आले कर्म
त्याचे पालन हा धर्म
कर्तव्याचा कंटाळा ना कधि येऊ दे!१
गीता वाचा बोले कृष्ण
सारे भाविक अर्जुन
मोह मोहनाला सारा दूर करू दे !२
यश येवो अपयश
मन कृष्णनामे वश
साधनेने नमन हे मला जमू दे!३
जीव जीवात घालावा
साध्या कृतीत ओलावा
भक्तीचे हे पोहे कृष्णा मला देऊ दे!४
चालवते स्वतःसवे
गीता पुसते आसवे
शोक आता नश्वराचा नाश पावू दे!५
मी नि माझे लया जावे
कृष्णमय विश्व व्हावे
कृष्ण राम राम कृष्ण हरि गाऊ दे!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.०५.१९९८