कर्म करितसे ज्ञानी, गुंते नच बंधनी!ध्रु.
दीप तेवता घरात असतो
साक्षित्वे व्यवहार पाहतो
अलिप्त त्यापरि नित्य राहतो,
निरहंकारी ज्ञानी!१
कमलपत्र पाण्यात राहिले
तरी जलाने नाही भिजले
देह प्रकृतीनुसार वागे
न्याहाळे हा दुरुनी!२
ज्या आधारे विश्व चालते
स्मरे नित्य हा त्या स्वरुपाते
आनंदाने विहरे जगती
सोऽहं सिद्ध ज्ञानी!३
देहभाव लोपला जयाचा
भाव बिंबला साक्षित्वाचा
नंदादीपासम हा हसरा
जनांत अथवा विजनी!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३१.०१.१९७४
(दीपाचेनि प्रकाशे| गृहीचे व्यापार जैसे
देही कर्मजात तैसे| योगयुक्ता ||५.४९||
तो कर्मे करी सकळे| तरी कर्मबंधा नाकळे
जैसे न सिंपे जळी जळे| पद्मपत्र||५.५०||
ज्ञानेश्वरी मधील या ओवीवरील काव्य)
ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या विवरणावर आधारित