Saturday, April 1, 2023

दिपव कृतीने जगा



अर्जुना, अजून हो जागा!ध्रु.

कर्म कुणाला नाही चुकले 
का न करावे कार्य चांगले 
ममतेच्या पाशात अडकुनी 
का करिशी त्रागा? १ 

यश वा अपयश नसते हाती 
'तो कर्ता' हे ज्ञानी जाणती 
सोड अहंता, मी संहर्ता 
दंभ तुझा दांडगा !२

विकारवश जे जगात होती  
घात आपला ते ओढवती 
संयम बाळग, शोध आत घे 
शमेल मग दंगा!३ 

झुंजायाचे तुज नेटाने 
आसक्तीची तोड बंधने 
हो विश्वात्मक, हो सर्वात्मक 
रडतराऊ वावगा!४ 

देहापुरते नयेच पाहू 
शस्त्रांचे आघातहि साहू 
तन मन बुद्धि लंघुनि जाई 
दिपव कृतीने जगा!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०३.२००५

No comments:

Post a Comment