Saturday, July 29, 2023

तोच हो संन्यासी झाला!

नुरला आठव "मी, माझे" ज्या, संन्यासी झाला!
तोच हो संन्यासी झाला!ध्रु.

देह नव्हे मी पूर्ण बिंबले
निरहंकारी मानस झाले
सुशांत, स्थिर झाला!१

कर्तृत्वाचा भार न उचले
फलासक्त मन कधी न झाले
आत्मरंगिं रंगला!२

विवेक भानु हृदी उगवला
' मी परमात्मा ' कळले त्याला
नि:संगच ठरला!३

कर्तव्याचे भान प्रत्यही
अशा साधका होतच राही
जन म्हणती "हा भला"!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०१.१९७४

(आणि मी माझे ऐसी आठवण
विसरले जयाचे अंतःकरण
पार्था तो संन्यासी जाण
निरंतर

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधव नाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे या पुस्तकातील प्रवचन ३८ वर आधारित काव्य)

Thursday, July 27, 2023

कर्मयोग सोपा!

कर्मयोग सोपा सकळा! 
कर्मयोग सोपा!ध्रु.

जाणत्यास, नेणत्यास
पैलतीरा नेतो खास
चित्तशुद्धि नकळत करतो
निवारुनी तापा!१

नदी पाण्याने भरली
स्त्रिया मुले संगे असली
होतो स्वये नौका जणु तो
ओलांडीत आपा!२

कर्मयोगाची ही वाट
परब्रह्मा नेते थेट -
साधकास सांगे देव
मारुनिया हाका!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०१.१९७४

(तरी जाणा नेणा सकळा
हा कर्मयोगु कीर प्रांजळा
जैसी नाव स्त्रिया बाळा
तोय तरणी

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ३७ वर आधारित काव्य)

Wednesday, July 26, 2023

संग नको विषयांचा!

मनुष्याचा जन्म हा आत्मज्ञानप्राप्तीसाठीच आहे. आत्मज्ञानासारखे पवित्र व आनंददायी दुसरे काही नाही. जागृती याविषयी हवी-  आपण कोण आहो? कोठून आलो? आपल्याला कोठे जायचे आहे? आत्म्याचे असे काही वेगळेच सुख आहे. परंतु परमशांति ज्ञानानेच प्राप्त होते. विषयाचा संग त्यासाठी सुटावा -  सद्गुरुकृपेने कळेल - मी तोच आहे! 

*********

संग नको विषयांचा!ध्रु.

ते सुख नश्वर 
जाळत अंतर 
पेला जणु जहराचा!१ 

कोण असे मी?
तोच तोच मी - 
चल, म्हण "मी देवाचा!" २

संग सोडता 
ज्ञान भेटता
ध्यास जडे भजनाचा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१०.०६.१९७८

(तरी आत्मसुखाचिया गोडिया 
विटे जो का सकळ विषयां 
जयाच्या ठायी इंद्रियां  
मानु नाही

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ३६ वर आधारित काव्य)

Sunday, July 23, 2023

पसायदान करावे..

विश्वात्मक देवाने येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषुनिया अंतरी तयाने पसायदान  करावे!ध्रु.

हे लेखन ही त्याची सेवा
सुमधुर सुखदा वाटो देवा
सर्वात्मक भगवंते, माझे अंतरंग उजळावे!१

दुर्जन मनिंची नुरो वक्रता
प्रेम स्वकर्मी वाढो आता
हासत खेळत आनंदाने जगी नांदता यावे!२

कुणी नसावे दुःखी जगती
सुख लाभावे सकलां जगती
जो जे वांछिल ते ते त्याला सहजपणे लाभावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.१२.१९७४

(आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे
पसायदान हे

जे खळांची व्यंकटी सांडो
तयां सत्कर्मी रति वाढो
भूतां परस्परे पडो
मैत्र जीवाचेे

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २०४ वर आधारित काव्य).

त्याचा गळला अभिमान

देह नव्हे मी, मी ' तो ' आहे
ऐसे ज्यासी ज्ञान! 
त्याचा गळला अभिमान!ध्रु.

जी जी हातुनि कर्मे घडली
ज्ञानाग्नीच्या मुखी जाळली
अंकुरतीच पुन्हा न!१

सहजस्फुरणचि विश्व प्रभूचे
विश्वंभर बहुरूपी नाचे
राखी ऐसे भान!२

कर्माकर्मातीत असे ' तो '
जीव स्वतः भगवंतच असतो
ठेवी अनुसंधान!३

अलिप्तता अंगात बाणता
हळूहळू ये ब्रह्मरूपता
जो नर असे सुजाण!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०१.१९७४

(ज्ञानाग्नीचेनि मुखे
जेणे जाळिली कर्मे अशेखे 
तो परब्रह्मची मनुष्यवेखे
वोळख तूू

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथाच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ३१ वर आधारित काव्य).

Saturday, July 22, 2023

हनुमंता मी तनामनाने कार्यक्षम व्हावे

हनुमंता मी तनामनाने 
कार्यक्षम व्हावे!ध्रु.

चाल चपळ दे, मन निश्चल दे
रामी रमवावे!१

कृतीत युक्ती, वचनी प्रीती
ऐसे घडवावे!२

ऐकत स्पंदन, अमृतभोजन
बलभीमच व्हावे!३

असा गारवा थकेल थकवा
भिरुपण जावे!४

ऐसा निश्चय, घेता निर्णय 
मेरुगिरी व्हावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०१.२००४

तू परत ये धन्वंतरी!

तू परत ये धन्वंतरी!ध्रु.

हा देह आहे साधन 
परि मोह दुःखा कारण 
कर यज्ञ जीवन झडकरी!१ 

तू चक्र धरले, शंख ही 
जळू, अमृतकुंभ तसाच ही 
अज्ञान लोपव सत्वरी!२ 

शंका कुशंका घालव 
सुप्त शक्ती जागव 
बलवंत आता तरी करी!३

हसतमुख जग वश तुला 
स्वर्गीच्या ताज्या फुला 
मन सुमन कर धन्वंतरी!४ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.१०.२००४

विष्णुबुवा ब्रह्मचारी

विष्णुबुवा ब्रह्मचारी

दत्तात्रेयाचा वर मजला
तोच वदवितो तसे वदे
प्रश्न असो कोणता कधीही - 
देतो उत्तर झणी मुदे!

वेदधर्म तो वंद्य सर्वदा
आचरणी तो सदा असो
मना मान रे प्रमाण शास्त्रा
धार्मिक वर्तन तुझे असो

शिव्या जर दिल्या त्या परिसाव्या
शुद्ध अर्थ ध्यानात धरा
तरणोपाय आत्मज्ञानच 
तिथे झुळझुळे शांतिझरा

सहज बोलणे, उपदेशाचे
किमया दत्ता तुझी कशी? 
असो नसो मी देहाने या
ऋणी राहणे रे मजशी

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१९.१२.१९८९

Friday, July 21, 2023

परमार्थाची आस्था ज्यांसी अगणित जन असती परि एखादा साधक विरळा मोक्षासी गाठी!

परमार्थाची आस्था ज्यांसी अगणित जन असती
परि एखादा साधक विरळा मोक्षासी गाठी!ध्रु.

केवळ आस्था भक्ति नव्हे!
केवळ उर्मी शक्ति नव्हे!
चंचल मानस सातत्याने ध्यान कुठे करती?१

सुखदुःखांच्या झंजावाती
पामर सगळे गडबडताती
नाचविते लहरीवर लोकां अधोगामी वृत्ती!२

श्रद्धेचा हृदि लेश नसे
अभ्यासाते कोण बसे?
आत्मचिंतनी होणे कैसी ऐशांची प्रगती?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०२.१९७४

(तैसे आस्थेच्या महापुरी
रिघताती कोटिवरी
परी प्राप्तीच्या पैलतीरी
विपाइला रिगे

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ६१ वर आधारित काव्य.)

Tuesday, July 18, 2023

सोऽहं सोऽहं स्मरण असो!

' मी हे केले ' भाव नसू दे
' मला फळ हवे ' लोभ नसू दे
अभिमाना चित्ती वाव नसो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!१

देह नसशि तू, तू नच कर्ता
शिवो न लव चित्तास अहंता
"मी, माझे" येणे मुळी नसो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!२

सत् चित् आनंदाचा धनि तू
देहाचा तर दास नसशि तू
मी केवळ साक्षी भाव असो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!३

कर्मे करणे! कशास डरणे?
कर्मबंधनी नच सापडणे
कौशल्य राखणे भान असो
सोऽहं सोऽहं स्मरण असो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.०१.१९७४

(आणि हे कर्म मी कर्ता
का आचरेन या अर्था
ऐसा अभिमानु झणे चित्ता
रिगो देसी
तुवा शरीरपरा नोहावे
कामना जात सांडावे
मग अवसरोचित भोगावे
भोग सकळ

वरील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २७ वर आधारित काव्य)

Sunday, July 16, 2023

विजय अपनी अटल ही है काम अपना हम करें।

कमल जैसा हम खिलेंगे 
भीख ना मांगे कभी 
मुक्त भय से नित्य होंगे 
ना कसर छोड़े कभी। 

हो विलासों पर नियंत्रण 
सभ्यता बनती रहे 
जन्मभूमि का आमंत्रण 
ज्योंही त्यों स्मृति में रहे। 

स्वावलंबन संघजीवन 
शास्त्र है वैसी कला 
भावभीगा मूल्यचिंतन 
जो करे वह नर भला। 

यह लड़ाई खुद को लड़नी 
मोह भय से ना डरे  
विजय अपनी अटल ही है 
काम अपना हम करें। 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.१२.२००३

सिद्धिविनायक मोदी गणपति प्रसिध्द देवस्थान

सिद्धिविनायक मोदी गणपति 
प्रसिध्द देवस्थान
जेव्हा जेव्हा घडते दर्शन 
हारपते हो भान!ध्रु.

मागायाला काही यावे
मागायाचे विसरून जावे
ब्रह्मानंदच मोदक मिळतो
ज्याला ना उपमान!१

अथर्वशीर्षाचे आवर्तन
मांगल्याला ते आमंत्रण
विघ्नांचे विघ्नत्व संपते
गाती भाविक गान!२

तेज तनावर, मूर्ति मनोहर
भाव जागवी मनी शुभंकर
ॐकाराच्या आकारात
रहस्य गवसे छान!३

चारी पुरुषार्थांची प्राप्ती
करून देई मंगलमूर्ती
संघटनेचा पाठ गिरवता
भारत हो बलवान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.०२.१९८९
(पुण्यात मोदी गणपति हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. येथिल श्री गणेशांवर  आधारित हे काव्य)

Saturday, July 15, 2023

वाट्याला जी आली कर्मे सहज आचरावी!

भगवत्प्राप्ती होण्यासाठी वाटचाल व्हावी 
वाट्याला जी आली कर्मे सहज आचरावी!ध्रु.

हळूहळू विसरावे ' मी पण '
सद्भावांचे करिता पोषण 
जाते घडि ही धर्माचरणि सार्थकि लावावी!१

हेतुरहित कर्मांची सुमने 
ईशचरणि अर्पिणे भक्तिने 
बसल्या स्थानी सोऽहं भावे पूजा बांधावी!२

विवेक औचित्यांची जोडी 
ओढे आयुष्याची गाडी 
अंत:करणी शुचिता कर्मे आपण आणावी!३

फुटेल तेव्हा ज्ञानपहाट 
खुलेल मग मोक्षाची वाट 
भगवत्प्राप्ती पक्व फळासम साधकास व्हावी!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०१.१९७४

(म्हणोनि जे जे उचित 
आणि अवसरेकरूनि प्राप्त 
ते कर्म हेतूरहित आचरे तू 

देखे अनुक्रमाधारे 
स्वधर्मु जो आचरे 
तो मोक्षु तेणे व्यापारे 
निश्चित पावे 

या ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आधारित हे काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २४ वर आधारित काव्य)

चिंतित ' आत्माराम ', घाल मनास लगाम

चिंतित ' आत्माराम ', घाल मनास लगाम!ध्रु.

सुस्थिर होईल तेव्हा मानस
गाई निकटी जैसे पाडस
सुखेनैव जरी घडली कर्मे तोषे आत्माराम!१

नरदेह न हा केवळ कर्मा
पार्था घे रे जाणुनि वर्मा
तरीच सार्थक नरदेहाचे वश जर आत्माराम!२

कर्मव्याप्ती सीमित व्हावी
निर्मळ शांती हृदी मुरावी
सोऽहं भावी रमावयाचे तूच स्वतः भगवान्!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०१.१९७४

(तू मानसा नियमु करी
निश्चळु होय अंतरी
मग कर्मेंद्रिये व्यापारी
वर्ततु सुखे

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन २३ वर आधारित काव्य).

Thursday, July 13, 2023

कळेना कैसा भगवंत?

नामे रूपे जे नटले ते विश्व मधुर भासत
कळेना कैसा भगवंत?ध्रु.

जोर अनावर या विषयांचा
परमार्थहि कडु लागायाचा
पुरी वाताहात!१

क्षणभंगुर विषयांत रंगली
वृत्ति विष्णुरूपी नच रमली
लज्जा नच वाटत!२

विकारविलसित उडवी दैना
गढूळ जीवन तृषा शमेना
जीव खुळा रडत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२९.०३.१९७४

विषय विषाचा पडिपाडू
गोड परमार्थु लागे कडू
कडू विषय तो गोडू
जीवासी जाहला
या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ९६ वर आधारित काव्य.)

Tuesday, July 11, 2023

अमित हे- सद्गुरूचे उपकार

सद्गुरूचे उपकार! अमित हे- 
सद्गुरूचे उपकार!ध्रु.

अंतःकरणी होते वसले
गुरुकृपेने दिसे उदेले
परमार्थाचे ज्ञान लाभता
खुलते मुक्तिद्वार!१

अंतर्मुख वृत्तीस करविती
मौक्तिकचारा खाऊ घालती
विषयांची आवडीच नुरता
मन हो आत्माकार!२

बहिरंगाचे प्रेम मावळे
मूळ तत्त्व दृष्टीला पडले
अनुसंधाना तेच राखती
देउनि सोऽहं सार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०३.१९७४

(मोटके गुरुमुखे उदैजत दिसे
आणि हृदयी स्वयंभचि असे
प्रत्यक्ष फावो लागे तैसे
आपैसियाची
या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आधारित काव्य. स्वामी माधव नाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन ७१ वर आधारित काव्य)

Saturday, July 8, 2023

साईराम साईराम मुखे म्हणा

साईराम साईराम मुखे म्हणा हो मुखे म्हणा
श्रीसाईला ये पान्हा!ध्रु.

भार घेत निज शिरावर
भक्तसखा श्रीरमावर
उत्कटतेने गा भजना!१

न कळे कुठल्या रूपाने
देव धावतो प्रेमाने
प्रेमरूप साई जाणा!२

देहदु:ख सुख मानावे
हासत घावहि सोसावे
रंग चढू दे गुरुभजना!३

आत आत जे दडलेले 
शोधा शोधा ते पहिले
बसा आसनी याच क्षणा!४

सुख साईला मागावे
दुःखहि त्याला सांगावे
आईलागी प्रिय तान्हा!५

भाव हृदयि दृढ धरा धरा
सोऽहं भावे भजन करा
शांतिच शांती ये सदना!६

साधक बसता ध्यानाते
सदनच शिरडी झणि होते
भिऊ नका मुळि विघ्नांना!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.१०.१९७६

गीता जावो घरोघरी!

ॐ राम कृष्ण हरि, गीता जावो घरोघरी!ध्रु.

ज्ञानेश्वरी वाचताना, ओवी झालीसे अभंग
भजनाला टाळ साथ, ताल देतसे मृदंग
गीते घेती लिहवुनि स्वामीकृपा खरोखरी!१

गुणगुणताना गाणी आपोआप चाल लागे
समरसता भावाशी सोऽहंभावनाही जागे
कोणी दिसेना परंतु कानी कृष्णाची बासरी!२

जावे उगमापाशीच, तेथे उदक निर्मळ
घ्यावे ओंजळीत जळ, अर्घ्य स्वीकारी गोपाळ
पावसेचा रामचंद्र, ठेवी हात माथ्यावरी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Tuesday, July 4, 2023

सत्संग लाभ मोठा!

सत्संग लाभ मोठा!
सत्संग लाभ मोठा!ध्रु.

मी कोण? होत बोध
घेणे मलाच शोध
ये जागृतीच भ्रांता!१

भाग्येचि संत भेटे
जो चालवीत हाते
ये ज्ञानदीप हाता!२

ध्यानी निवांत बसणे
निजरूप ध्यानि घेणे
मिळतो विराम द्वैता!३

देहाभिमान गळतो
नरजन्म हेतु कळतो
सौख्या इथे न तोटा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४.११.१९७४
भूप, दादरा

(तैसे हारपले आपणपे पावे
तै संताते पाहता गिवसावे
म्हणोनि वानावे ऐकावे
तेचि सदा
या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १७५ वर आधारित काव्य.)

Saturday, July 1, 2023

करावी गीतेची सेवा!

करावी गीतेची सेवा!ध्रु.

मोह मारिते
चित्त उजळिते 
खरोखर असे दिव्य ठेवा!१

गीता शिकणे
तत्पर होणे
उद्धरित असंख्य दीन जिवा!२

नव्हे देह मी
तो मी! तो मी!
लाविते जीवनपंथि दिवा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.१२.१९७४

म्हणोनि मने काये वाचा
जो सेवकु होईल इयेचा
तो स्वानंदसाम्राज्याचा
चक्रवर्ती करी
(या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आधारित काव्य. ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या स्वामी माधवनाथांच्या पुस्तकातील प्रवचन क्र. २०१ वर आधारित काव्य.)