Saturday, September 30, 2023

जिभेवर ताबा हवा



जिभेची खोड मोडल्याशिवाय जीभ ताब्यात येणारच नाही. जिभेचे लाड केले तर ती डोक्यावर बसलीच म्हणून समजावं!

बोलण्याच्या आधीच विचार व्हायला पाहिजे.  बोलून मग विचारात पडण्यात काय अर्थ आहे? वाणीचा संयम न ठेवल्याने आपले शत्रू जे षड्विकार त्याचेच आपण पोषण करतो. 

अहंकारापायी माणूस स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वास्थ्याची राखरांगोळी करतो.

मी कोण हे कळण्यासाठी गुरूंच्याकडेच धाव घ्यायला पाहिजे. ज्ञान प्राप्त झाले पाहिजे.

**********

सुजनहो, हे ध्यानी घ्यावे
हवा जिभेवर ताबा अपुला
जो रसनांकित तो तो बुडला
रहस्य उमजावे!ध्रु.

काय खात मी, काय वदत मी
विचार आधी करू नेहमी
विवेक अपुला जीवनसाथी त्याचे ऐकावे!१

नव्हे देह मी हे बाणावे
सद्गुरुचरणी लीन असावे
चराचरा जो व्यापुनि उरतो तो मी समजावे!२

अरे जिभेचे नका बघू सुख
चला गड्यांनो व्हा अंतर्मुख
षड्विकार का आपण अपुल्या कृतिने पोसावे?३

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

जर भक्त जाहला मूल, भगवंतही होतो माता!

जर भक्त जाहला मूल, भगवंतही होतो माता!ध्रु.

मीपणा सकल सोडावा
अनुभवहि आगळा घ्यावा
ओळख मग देवाजीची संजीवन देते चित्ता!१

मन भगवंताच्या ठायी
तन भगवंताच्या पायी
अर्पिली जरी ही सुमने संतोष होय भगवंता!२

निश्चिंत स्मरणि असावे
धैर्याने वागत जावे
देहाचे भान हरपता ये आत्मज्ञानच हाता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलकर महाराज प्रवचन क्र १८९, ७ जुलै वर आधारित काव्य)

Monday, September 25, 2023

कळसूत्री बाहुली एक मी - सूत्रधार श्रीहरी

सूत्रचालक परमेश्वर आहे

वाहवले जावो, राहिले सांभाळा ।
आठवा गोपाळा आता तरी  । (संत नामदेव) 

एकदा मी म्हणजे देह नाही, हे अभ्यासाने पटवून घ्यायला पाहिजे, म्हणजे जीवनातली दुःखे मनाला यातना देणार नाहीत. 
परमेश्वरच सर्वत्र भरून राहिला आहे.
कर्माचा लेप जिवाला लागू नये अशी इच्छा असेल तर कर्म केले नाही असे प्रामाणिकपणे मान व केलेले प्रत्येक कर्म ईश्वरालाच अर्पण कर म्हणजे हा जीव कर्मापासून मुक्त होतो.
सूत्रचालक परमेश्वर आहे, मी त्याच्या हातातले बाहुले आहे, मला वेगळी अशी काही सत्ता नाही. 
*********

कळसूत्री बाहुली एक मी - सूत्रधार श्रीहरी!ध्रु. 

देहभाव वाढला, वाढला 
दुःखाला तो कारण झाला 
अता बोध घे तरी!१

संतांनी मज जागे केले
भक्तिपथावर संगे नेले 
कानी हरिबासरी!२ 

आवड लागो मज नामाची
तुटो शृंखला अज्ञानाची 
सार्थ जन्म हा तरी!३ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(परमपूज्य ताई दामले यांच्या माजघरातली ज्ञानेश्वरी या प्रवचनांवर आधारित काव्य).

Sunday, September 24, 2023

माझे काही नाही येथे

ईश्वरनिष्ठा नसेल तर जीवनवेल सुकेल!

मन स्वस्थ असेल तरच शांत झोप लागेल. गाढ झोप येण्यासाठी कर्मे चोख व्हायला हवीत. 
श्रद्धेवाचून आपले जीवन उदास आणि दैन्यवाणं. 
परमेश्वर फार कृपाळू आहे तसाच तो न्यायनिष्ठुर पण आहे. एकदा देवाबद्दल प्रेम वाटू लागले की तो सर्व विश्वात भरून राहिला आहे, असा भाव होतो. जो जगन्नियंता आहे; तो आपले चांगले केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पाहिजे.

******

माझे काही नाही येथे, 
माझे काही नाही!ध्रु. 

श्रीहरि सारे करवुनि घेतो 
दूर राहतो कौतुक बघतो 
ईश्वरनिष्ठा हे संजीवन शक्ती पुरवत राही!१ 

शरीर आहे ठेव तयाची 
ज्याची त्याला परत द्यायची 
नाम दाखवी राम आतला शीणभाग तो जाई!२

मी रामाचा रामहि माझा 
पहिला पाढा घोकायाचा 
गणित बरोबर तरीच सुटते ताळा करुनी पाही!३ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले (माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य)

Saturday, September 23, 2023

चल मना, पहा सर्वत्र हरि!



सर्वत्र हरिरूप पाहावं!

परमार्थात ' मी ' ला विसरायला शिकायचे असते!
तेजोमय भगवंताशिवाय जगात काहीच नाही. जग रूपाने तोच नटला आहे. 
बोलणारा परमेश्वर, ऐकणारा परमेश्वर ही खुणगाठ मनाशी बांधावी!
जे जे निर्मळ, सोज्ज्वळ त्यात देव दिसवून घ्यायचा, हा अभ्यास सतत व्हायला पाहिजे. जीवनात उन्हाळे पावसाळे असतातच. हरिरूप डोळे भरून पाहिलं पाहिजे. कान भरून ऐकले पाहिजे, तोंड भरून गायिले पाहिजे. तरच ते अंतरात ठसेल.


*********

चल मना, पहा सर्वत्र हरि!ध्रु.

विसर तनाला, विसर स्वतःला 
तेजोमय भगवंतच भरला
घे अनुभव आपण निमिष तरी!१

जगरूपाने ईश्वर नटला
अंतरातही तोच विनटला 
तू वळुनि अंतरी पहा तरी!२

सुख येऊ दे, दुःख येउ दे
तेच श्रीहरि - श्रद्धा असु दे
तू निशिदिनि ऐसा भाव धरी!३

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(माजघरातील ज्ञानेश्वरी या प. पू. ताई दामले यांच्या प्रवचनावर आधारित काव्य)

संतांचे संगती मनोमार्ग गती



साधकाचे हित पाळावे नियम 
मनाचा संयम कळो यावा १

देहाने, मनाने रहावे पवित्र 
पहावा सर्वत्र गुरुराव २

शुभ आठवावे अशुभ वर्जावे 
दुःख विसरावे नाम घेता ३

नाम घेता कळे आतच श्रीराम 
मंगल ते धाम हृदय हे ४

भजन सहज कर्म ही सहज 
अध्यात्म सहज साधुबोध ५

चाललासे खेळ जगात द्वंद्वांचा 
बाऊ संकटांचा मानू नये ६

सुखात, दुःखात हर्षात, शोकात
छायेत, उन्हात जैसा, तैसा ७

संकल्प, विकल्प कैसे छळतील?
पापे पळतील श्रद्धा ठाम ८

माझे समाधान नक्की मजपाशी
सद्गुरु मजशी शिकवीती ९

 
नित्य सुसंगती बोलात, कृतीत 
झाला द्वंद्वातीत गुरुपुत्र १०

तोच मी हा बोध तोच मी हा भाव
यात अंतर्भाव संतत्वाचा ११

आतला जो बोध कधी न सुटतो
दक्षता जो घेतो तोच शिष्य १२

मोकळ्या मनाने संतांपाशी जावे
बोधामृत प्यावे आवडीने १३

मन ते विशाल बोलणे रसाळ 
पाहणे प्रेमळ साधकाचे १४

स्वानंदी असावे स्वार्थांध नसावे 
स्वरूपी राहावे साधकाने १५

सत्य ते सद्गुरु शिव ते सद्गुरु 
सुंदर सद्गुरु भाव असो १६

लोकांचा कंटाळा कधी न मानावा
देव तो पहावा लोकांतही १७

वर्तनावरून पारख ज्ञानाची 
महती गुरूची शिष्यामुळे १८

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२८.१०.१९९४

 भावे अवलोकिता ज्ञानेश्‍वरी।  स्‍वरुपानंद येत घरी।  

ओवी ओवी आपण विवरी।  ज्ञानदेव ॥ १ ॥ 


माधव सुपुत्र माऊलीचा।  त्‍याची प्रेमपूर्वा वाचा।  

लोटे पूर अमृताचा।  मंगलधामा ॥ २ ॥ 


अलंकापुरी पावस येथे।  पुण्‍यनगरी साक्ष देते।  

कृपा केलिया माधवनाथे। पटे खूण ॥ ३ ॥ 


होता स्‍पर्श परिसाचा।  भाविका केवळ माधवाचा।  

अध्‍यात्‍माचा सुराज्‍याचा।  होय अधिकारी ॥ ४ ॥ 


सुषमा, माधव, मकरंद।  सर्वा हृदयी परमानंद।  

हंस मानसी स्‍वच्‍छंद।  लागे विहरु ॥ ५ ॥ 


तन्‍मय व्‍हावे वाचताना।  तन्‍मय व्‍हावे बोलताना।  

तन्‍मय व्‍हावे पाहताना।  आवर्जून ॥ ६ ॥ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

१३.१०.१९९७ 

हे जगदंबे माय भवानी पाव मला लवलाही पसरते पदर मी आई

 
पसरते पदर मी आई 

हे जगदंबे माय भवानी पाव मला लवलाही
पसरते पदर मी आई!ध्रु.

लाडकी लेक विनवीते 
तुजपाशि हट्ट हा धरिते 
चुडेदान दे, स्वराज्य ही दे, दे दे ग पुण्याई!१

शिवबा हा बघ बावरला 
तव चरणी शरणहि आला 
पिता आणि गे स्वराज्य त्याते तीर्थरूप की होई!२

रिपुपुढे न घाशिन नाक
वाटे न तयाचा धाक 
शरण शरण परि तुजला माते धावत ये ग आई!३

का स्वराज्य दृष्टावले 
ग्रासण्या दैत्य हे टपले 
झुंज द्यावया कडो निकडीची शक्ति शिवाला देई!४

तव चरणी श्रद्धा माझी 
लावीन जिवाची बाजी 
हा करारीपणा टिकण्यासाठी देई मजसि धिटाई!५ 

सुखदु:खी तुजला स्मरते 
हा पदर नित्य पसरते 
कधि विसरणार ना तुजला आई हसता रडतानाही!६ 

धैर्याची देउनि ढाल 
लेकरू तुझे सांभाळ 
स्वराज्य व्हावे तुझीच इच्छा कौल तुझा दे आई!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले



(छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता  )

माझा शिवबा शिवबा


माझ्या प्राणांचा विसावा, माझा शिवबा शिवबा
मनगगनी चांदोबा, माझा शिवबा शिवबा!ध्रु.

बाळ रांगे तुरुतुरु, जीभ बोले चुरुचुरु
बाळ ओलांडे उंबरा, किती कौतुक मी करू?
सावलीते धरू पाहे, माझा शिवबा शिवबा!१

लालसर तळहात, मोत्यांसम शुभ्र दात
टाळ्या वाजविता बाळ, डोलडोलतो नादात
भारी खोडकर गोड माझा शिवबा शिवबा!३

जरि केले उष्टावण, खाई माती चुकवून
उधळितो माती माथी पृथ्वि करिते प्रोक्षण
रागवता हासवीतो माझा खट्याळ शिवबा!३

पाय फुटता बाळाते नच अंगण पुरते
दुडदुडा धावे शिवा मन बागडते गाते
आज चंद्रकोर छोटी उद्या व्हायची चांदोबा!४

खेळे मातीच्या घोड्यांशी खेळे मातीच्या हत्तींशी
खेळे झुंज खोटीखोटी माझ्या मनाची मिराशी
आज खेळातला राजा पुढे सम्राट शिवबा!५

मृत्तिकेचा छोटा किल्ला, मृत्तिकेचे सिंहासन
खेळातले राज्य याला वाटे मानाचे भूषण
उंच निशाण धरता खाली शोभतो शिवबा!६

नाकेबंदी मोर्चेबंदी शब्द जाहलेत पाठ
बडी जोखीम म्हणून राजे होत चिंताक्रांत
व्यूह रचण्या पाहतो माझा शिवबा शिवबा!७

एक बरी अडचण हत्ती घोड्या गती नाही
बाळ हालविती त्यांना नुरे प्रश्न थोडासाही
उभा सैन्याच्या पुढती माझा शिवबा शिवबा!८

फुलपाखरे आजची उद्या गरूड होतील
गड किल्ले जिंकतील नील नभ जिंकतील
देतो दिलासा दिलाला माझा शिवबा शिवबा!९

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता महाराजांच्या बाललीलांवर)

Sunday, September 17, 2023

जय जय स्वामी स्वरूपानंद जय जय स्वामी माधवनाथ!

जय जय स्वामी स्वरूपानंद 
जय जय स्वामी माधवनाथ!ध्रु. 

घरीच ज्ञानेश्वरी सांगता पावसेत ऐकतो 
अवघड सोपे करुनि सांगणे प्रसादगुण मानतो 
देहातुन चल देवापाशी मना मज करी साथ!१

अनुग्रहच हा स्वामीजींचा निष्ठा तारतसे 
अभ्यासाला प्रेमे बसणे सद्गुरु पाहतसे 
प्रपंच परमार्थांचे नाते विवरुन वर्णित नाथ!२ 

कृपाच असते नित शिष्यावर दृष्टि हवी तेथे 
सुख:दुखी सम होता येणे योग म्हणत ज्ञाते 
स्वये तरावे जनहि तरावे हेतु स्वामी धरतात!३ 

सद्ग्रंथांच्या पठणे श्रवणे पालट जो घडतो 
तो आप्तांना सुहृदांनाही सहजच जाणवतो 
त्रिगुणातीतहि होता येते कर द्वंद्वावर मात!४ 

थेंब सागरी कधी बुडाला हे नाही कळले 
असंख्य जन हे गुरुकृपेने तरले भव तरले 
श्रीरामा मनि भावच केवळ हळवेपण हृदयात!५ 

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Saturday, September 16, 2023

श्रीकृष्णाचा पोवाडा



कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय
कण कण तनुचा नाचावा!
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!ध्रु.

अंधारातुन प्रकाश उमले, बंधातुन गवसे मोक्ष
निराशेमधे फुलते आशा, अतूट सुयशाची आस
कारागारी स्वातंत्र्याचा दाता जन्मा का यावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!१

मामा जुलमी नयेच कामा, ऐशी सत्ता उखडावी 
आत्मबलाला जोपासावे, निपटे विघ्ने मायावी 
विक्रमातही कसे सहजपण, जनां अचंबा वाटावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!२

शिशुपण बरवे कैसे हरवे शिरावरी ये कर्तव्य 
संकटात कस पराक्रमाचा, उजळे युद्धी भवितव्य 
युवकांना यदुनाथ हवासा, गोपींचा किमती ठेवा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!३

वेणु वाजवी रानोमाळी, रणभूमीवर चक्र धरी 
कुसुमाहुन अति मृदुल परंतू वज्रावरही मात करी 
बंध कसे अलगदच तुटावे पाठ इथे हो गिरवावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!४

हरिभगिनी जरि असे सुभद्रा, पाठ राखली कृष्णेची 
मान राखतो आतेचा परि कथा वेगळी पार्थाची 
ज्या त्या मनुजे कौशल्याने कर्मांनी हरि पूजावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!५

समाजास ना विसरायाचे मंथन करुनी द्या लोणी
नको फलाची मनात आशा, देव पहावा जनार्दनी 
कर्मयोग आचरून दावी मुक्तीचा हा मार्ग नवा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!६

जन्ममरण स्वाभाविक त्यांचे काय मानणे सुखदुःख 
समाज मोठा व्यक्तीपेक्षा त्यागे शांती आपसुख 
आचरणाने महाजनांनी धडा स्वये घालुन द्यावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!७

गीताभ्यासे माधव भेटे चरित्र सगळे उलगडते 
आपण सगळे अर्जुन माधव गीतेतुन बोले भेटे 
सुदर्शनाचे दर्शन, बन्सीस्वर हळवा कानी यावा
श्रीकृष्णाचा पोवाडाही पुढती पुढती रंगावा!८

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०५.१९९९

गीता संदेश


श्रीकृष्णाला शरण जायचे देहविस्मरण ही भक्ती 
भक्ती करिता ज्ञान लाभते कर्माची कळते युक्ती!ध्रु.

देह येतसे देह जातसे नकोस गुंतू मोहात
सत्कर्मच ते खरे अमरपण आत्मा ओती कर्मात
ज्ञानयुक्त जे कर्म घडतसे तीच तीच रे हरिभक्ती!१

सज्जनरक्षण खलनिर्दालन प्रभू अवतरे यासाठी
धर्मस्थापन पवित्र हेतू हे जाणतसे शुद्धमती
अवताराचे रहस्य ज्ञाते सदैव ध्यानी जपताती!२

सोड फलाशा तरी शांत मन गीताईचे तू बाळ
तुझे कर्म हे हरिची पूजा आनंदाने तू खेळ
तुला पाहुनी लहान बाळे धडे आपुले गिरवीती!३

सदैव स्मर मज, चित्त शुद्ध मग यावर ठेवी विश्वास
सर्वाभूती प्रेम स्फुरते मुद्रेवरती उल्हास
याहुन दुसरे काय हवेसे? देहातच मोक्षप्राप्ती!४
 
मने मनाला जिंकायाचे, आपला आपण उद्धार 
स्वावलंबने होते प्रगती-  तिच्या मुळाशी निर्धार 
ही गुरुकिल्ली तुझिया हाती देवही हेवा करताती!५

सद्गुण मिळवी एक एक तू गुणातीत तुज व्हायाचे 
या देही या जन्मी  तुजला मोक्षपदा पोचायाचे
हवी सचोटी हवी चिकाटी गीता देई ही स्फूर्ती!६

मनुष्य आहे भगवंताने रचलेला सुंदर ग्रंथ
भगवद्गीता श्रीव्यासांनी दाखविला दुसरा पंथ
आदर्शाचे ध्येयगीत गा विश्रांतीची विश्रांती!७

कवी : श्रीराम बाळकृष्ण आठवले
चिंतक : ज कृ देवधर (गिझरवाले)
०१.१२.१९८७

Wednesday, September 13, 2023

अहंभाव विसरताच साधक मजजवळी येतो

अहंभाव विसरताच साधक मजजवळी येतो
तो माझा होतो, मी त्याचा होतो!ध्रु.

थोरपणाचा विसर पडावा
जगा धाकुटा साधक व्हावा
विनम्रतेने भक्त लाडका मज जिंकुनि घेतो!१

मी सर्वांची अंतगती
भक्तां वाटे विश्रांती
परमसुखासी अपुल्या परिने जो तो मज भजतो!२

देहोऽहं हे दुःखा मूळ
हृदयांतरि सलताहे शूल
सोऽहम् एकच अमोघ औषध भक्तराज सेवितो!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१६.०३.१९७४
पहाडी मांड

(म्हणोनि थोरपण पऱ्हांचि सांडिजे
एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे
जै जगा धाकुटे होईजे
तै जवळीक माझी

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ८३ वर आधारित काव्य).

Tuesday, September 12, 2023

मी अजन्मा, घेत जन्मा याचसाठी अर्जुना!

जिज्ञासू पार्थाच्या भाषणानंतर भगवान् श्रीकृष्ण मनमोकळे पणाने हसले. सुयोग्य श्रोता मिळाला तेव्हा वक्त्याला आनंद का न वाटावा?
आपण वारंवार या जगात अवतार का घेतो? याचे विवेचन ते करू लागले.

सद्धर्माची स्थापना व्हावी, सज्जनांचे रक्षण व्हावे, दुष्टांचा नाश व्हावा हेच तर भगवंतांनी जन्म घेण्याचे कारण.
भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला ममताळू पणाने म्हणाले -

**********

मी अजन्मा, घेत जन्मा याचसाठी अर्जुना!ध्रु.

धर्मबंधन शिथिल होता स्वैरवृत्ती वाढते
धर्म ग्रासू पाहते, दुष्टता ही माजते
राहवेना स्वस्थ मजसी धाव घेतो रक्षणा!१

जन्म ज्या नच मृत्यु कैसा धृष्ट होउनि स्पर्शितो
अज्ञ हे परी काय जाणे बद्ध मजसी मानितो
सज्जना पुढती करूनी देत धर्मा चालना!२

पातकांचे तिमिर जाता पुण्यभास्कर उगवतो 
धर्म - नीती जोडि जमता मोद नभि ना मावतो
हेतु माझा दिव्य घडवी नकळता तनुधारणा!३

जे जसे भजती मला मी तसा भजतो तया
भूतमात्रा सदय जे दाखवी मी त्यां दया
धर्मपालन नित्य घडण्या देत राही प्रेरणा!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

Monday, September 11, 2023

मी देह नव्हे मज जन्म कुठे मज जन्मचि ना मग मरण कुठे?

मी देह नव्हे मज जन्म कुठे 
मज जन्मचि ना मग मरण कुठे?ध्रु.

मी केवळ सत् चित् आनंद 
करतील काय मज हे बंध?
सोऽहं बोधे तर भ्रांति फिटे!१

भगवंताशी समरसता
सागरी मिसळली जणु सरिता -
मन तदाकार होते होते!२

सुखदुःखांच्या अतीत मी
जन्ममृत्युच्या अतीत मी
परब्रह्मतत्त्व अंगी भिनते!३

आजन्म साधना जी घडते
ती नरा आत्मबोधी नेते
मग जन्ममरण फेरी चुकते!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१५.०३.१९७४
पूर्वी केरवा 

(ते मरणा ऐलीच कडे
मज मिळोनि गेले फुडे
मग मरणी आणिकीकडे
जातील केवी

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ८२ वर आधारित काव्य).

Sunday, September 10, 2023

विश्वाच्या अंतरी, विश्वाच्या बाहेरी भरून राहीलो, भरुनि राहिलो!

विश्वाच्या अंतरी, विश्वाच्या बाहेरी
भरून राहीलो, भरुनि राहिलो!ध्रु.

धरेस तापवी, धरेस निववी
धरेस भिजवी, धरेस सुकवी
सर्व पालटांचे कारण जाहलो!१

उदंड जी रूपे, उदंड जी नामे
वस्तु असंख्यात सर्व माझी धामे
परब्रह्म मीच त्यात कोंदलेलो!२

जळांत, स्थळांत, काष्ठ पाषाणात
दऱ्यांत, खोऱ्यांत, ऊन पावसात
चराचर सृष्टी व्यापुनी उरलो!३

कर्म आड येता, ज्ञान हे न होता
डोळस माणसे पावती अंधता
भ्रमाने तयांच्या ध्यानी नच आलो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१४.०३.१९७४ (पिलू थाट) नीलांबरी केरवा

(हे आतबाहेर मिया कोंदले
जग निखिल माझेचि वोतिले
की कैसे कर्म तया आड आले
जे मीचि नाही म्हणती

या ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ८१ वर आधारित काव्य).

Saturday, September 2, 2023

नकाच दवडू वेळ फुका सावधान हा मंत्र शिका!

नकाच दवडू वेळ फुका
सावधान हा मंत्र शिका!ध्रु.

सुवर्ण संधी चालुन येते
तत्पर त्याला आपण वरते
सामोरे व्हा आत्मसुखा!१

विश्वासे विश्वास वाढतो
भाग्यवंत तो संधि साधतो
कुणा न द्यावा उगा धका!२

निर्व्यसनी जो, हवा जगाला
सत्यनिष्ठ तो प्रिय विश्वाला
आत्मारामा करा सखा!३

कृतज्ञता ही घ्या गुरुकिल्ली
सद्भाग्याची दारे खुलली
संघभावना शिका शिका!४

जे जेव्हाचे तेव्हा करता
आरंभी घे रूप सांगता
चालु क्षण साधण्या शिका!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(सुखाचा प्रपंच हाच परमार्थ मधून)

Friday, September 1, 2023

माझे नामघोषे विश्व दुःखे नाशिती!

माझे नामघोषे विश्व दुःखे नाशिती!ध्रु.

उदार ते संत
थोर कृपावंत
आवडी भक्तीची जनां लावताती!१

उपदेश देती
आसवे पुसती
कृपेने तयांच्या नुरे काही भ्रांती!२

देहातीत भाव
तयांचा स्वभाव
आपणासारिखे साधकास करती!३

दुःखमूळ जाते
विश्व सुखें भरते
आनंद तरंग उंच उसळती!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०९.०३.१९७४
देस. आधा. भजनी धुमाळी 

(ऐसे माझेनि नामघोषे
नाहीचि करिती विश्वाची दुःखे
अवघे जगचि महासुखे
दुमदुमित भरले

या ज्ञानेश्वरीतील ओवी वर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक ७६ वर आधारित काव्य.)