ॐ
भावे अवलोकिता 'ज्ञानेश्वरी'
स्वरूपानंद येत घरी
ओवी ओवी आपण विवरी
ज्ञानदेव !१
'माधव' सुपुत्र माऊलीचा
त्याची प्रेमपूर्ण वाचा
लोटे पूर अमृताचा
मंगल धामी !२
अलंकापुरी, पांवस, येथे
पुण्यनगरी साक्ष देते
कृपा केलिया माधवनाथे
पटे खूण!३
पुनःपुन्हा वाचत जावे
गोड नाम मुखी यावे
आनंदाश्रू वाहू द्यावे
निःसंकोच!४
होता स्पर्श हा परिसाचा
भाविक केवळ माधवाचा
अध्यात्माच्या सुराज्याचा
अधिकारी!५
सुषमा, माधव, मकरंद
सर्वाहृदयी परमानंद
हंस मानसी स्वच्छंद
लागे विहरू!६
तन्मय व्हावे वाचताना
तन्मय व्हावे बोलताना
तन्मय व्हावे पाहताना
आवर्जून!७
अंतर्बाह्य सुधारणा
अमृतानुभव ज्यांना त्यांना
आचरिताती नामा ध्याना
निरंतर!८
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१३/१०/१९९७
No comments:
Post a Comment