Sunday, March 31, 2024

तुझे नाव कारुण्य नाथा, नाथा!

तुझे नाव कारुण्य नाथा, नाथा!ध्रु.

रणरणते माथी ऊन 
वाळु गेली किति तापून 
रडे मूल कुणि कळवळुन
कडे घ्यावया वत्साला धावलास आता!१

भेद‌भाव मनि ना आला 
दयाकुल आत्मा झाला 
करुणाघन की कळवळला 
तोंड स्वच्छ त्याचे पुसले जाहलास माता!२
 
हातपाय निर्मळ होता 
मुखी चार थेंब जाता 
तेजमुखी त्याच्या चढता 
भगवंता देखसि तेथ हीच धन्यता!३

कडेवरी मिरवुन नेले 
मूल माउलीस दिधले 
नेत्र तुझे रे डबडबले 
रोमरोम फुलला देही तुझा भाग्यवंता! तुझा कृपावंता!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
पिलू (कर्नाटकी ढंग)
बोल होती फोल
केरवा
(आज नाथषष्ठी निमित्त संत एकनाथांच्या चरित्रावर आधारित काव्यातील एक कविता)

Thursday, March 28, 2024

हसत रहा ईश्वरी मुला



या देहाची दशा कशीही असो तियेचे काय तुला?
अलिप्त राही कमलपत्रसम हसत राहा ईश्वरी मुला!ध्रु.

हरिची ओळख नकोस विसरू जाण तयाची नामाने
नामरसायन ऐसे नामी मना घेत जा नेमाने 
जन्म ईश्वरी मरण ईश्वरी आजारही तो देहाला!१ 

दुखण्याचे उपकार खरोखर विचार करण्या लावतसे 
पथ्य पाळणे परमहिताचे औषधास पर्याय नसे 
कडूपणातहि असे मधुरपण कळले असते काय तुला?२ 

पुरे हिंडणे मजा मारणे उधळपट्टीही पुरे पुरे 
आनंदाचा वास अंतरी आत श्रीहरी पहा बरे 
शब्देविण संवाद साधतो सद्गुरुंनी शिकवली कला!३ 

जोडी जमली विलग व्हावया शेवट आधी जाणावा 
चुका जाहल्या त्या टाळाव्या दक्षपणा तो बाणावा 
स्वभाव येतो सुधारायला सुधारेन मी म्हणे भला!४ 

चालायाचे सांजसकाळी मुक्तपणे हसुनी घ्यावे 
कुशल विचारत स्नेह वाढवत सखेसोबती जोडावे 
अर्थ भरावा निरर्थकीही जुंपुन घे सत्कार्याला ! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२३.०६.२००१

Wednesday, March 20, 2024

असता गुरु आधार विघ्ने निष्प्रभ ती ठरणार!

असता गुरु आधार
विघ्ने निष्प्रभ ती ठरणार!ध्रु.

नितांत श्रद्धा सद्गुरुवचनी
तत्पर होता वचनपालनी
भवसागर तरणार!१

कृतीस श्रद्धा पुरवी शक्ती
कृती दृढ करी सद्गुरुभक्ती
शिकवित हे व्यवहार!२

संत सांगती सावध करती
लक्ष ठेविती, ते सांवरती
वात्सल्या ना पार!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०५, २३ जुलै वर आधारित काव्य

आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल.

आपण परमात्म्याजवळ मागावे की, “ तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. "

नामास आदि नाही, नामास नाही अंत!

नामास आदि नाही, नामास नाही अंत!ध्रु.

शिव रामनाम घेतो
भजनात दंग होतो
नामात 'तो ' पहावा हे सांगतात संत!१

वेदांस वर्णवेना
नामास सोडवेना
हे प्रेमसूत्र ऐसे जे बांधिते अनंत!२

मन शुद्ध होत जाते
मन शांत शांत होते
मनि पूजिणे प्रभूला राहूनिया निवांत!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २०३, २१ जुलै वर आधारित काव्य.

इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.

Tuesday, March 19, 2024

बैसतो साधक एकांती!

घराजवळि त्या श्रीविश्वेश्वर
तिथे नांदतो स्वयंभू शंकर
एकलेच गाठूनिया मंदिर
भोगत विश्रांती -
बैसतो साधक एकांती!१

मिटुनी घेई दोन्ही लोचन
प्रतिपळ स्मरतो पापविमोचन
मनी हासतो श्रीशशिभूषण
भावफुले फुलती
बैसतो साधक एकांती!२

चित्ती एकाग्रता प्रवेशे
भक्ति शोभली सुंदर वेषे
आत्माराम हृदीचा तोषे  
भावनोर्मि उसळती-
बैसतो साधक एकांती!३

कीर्तनि प्रवचनि भजनि ऐकले
ते सगळे या चित्ती रुजले
वरती आले कोंभ कोवळे
प्रसन्न डुलताती
बैसतो साधक एकांती!४

बालमूर्ति रिझविते मन्मना
परमात्म्याची कोमल करुणा
अद्‌भुत भक्ती तशी धारणा
शब्दहि पांगुळती-
बैसतो साधक एकांती!५

बालभक्त हा सदाशिवाचा
सोऽहं ध्यानी रमावयाचा
सुधामाधुरी वरिते वाचा
गुरुलीला रंगती-
बैसतो साधक एकांती!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनावर आधारित काव्यातील एक कविता..

Wednesday, March 13, 2024

ही प्रतिज्ञा स्फुरव रे तूच पाळुनि घेई रे!

ही प्रतिज्ञा स्फुरव रे
तूच पाळुनि घेई रे!ध्रु.

नच भुले मोहा कदा
नच डरे विघ्ना कदा
मज करी सश्रद्ध रे!१

नीतिने धन मिळवीन
यत्न कधी ना सोडीन
मज चिकाटी तूच दे रे!२

मज समष्टी देवता
भिन्न ना व्यक्ती आता
सुप्रभाती स्फुरण दे रे!३

देहबुद्धी टाकीन 
मीच मजला घडवीन
प्रेरणा ही तूच दे रे!४

सत्य ना मरते कदा
हसत साहिन आपदा
निकट नित ओढूनि घे रे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
जुलै १९८२

Saturday, March 9, 2024

हे प्रभो भारतात रामराज्य येऊ दे!

स्वप्न हे मनातले सत्य सत्य होऊ दे
हे प्रभो भारतात रामराज्य येऊ दे! ध्रु.

वह्नि तूच चेतवी, आत राम जागवी
जे स्वराज्य आत्मराज्य हा प्रसाद लाभु दे!१

उद्यमी रमो मन, तनु तुझेच साधन
देह देह देउळे - भावना अशीच दे!२

मृत्तिका गमो धन, काय ते प्रलोभन
अस्मितेस जागवी संतसंग नित्य दे!३

भेद‌भिंत पाड तू, ऐक्यमंत्र देई तू
राम राम नामघोष श्वास श्वास ऐकु दे!४

भीति ही भये पळो, तत्त्व तत्त्व आकळो 
शौर्य धैर्य स्थैर्य हे रघूत्तमा जनांस दे!५

संघभावना फुलो, सुमन सुमन ते डुलो
संघकार्य धर्मकार्य राष्ट्रकार्य होऊ दे!६

कोण मी मला कळो, देहभाव मावळो
मीहि तूच - तूच मी अद्वयत्व भान दे!७

अहंपणाच रावण रणांगणात मारून 
दैत्यराज्य संपले शांतिसौख्य येउ दे!८

शील हीच संपदा रक्षणीय सर्वदा
मातृभूमि हीच राम - भक्तिभाव जागु दे!९ 

मने मनास जोडता मनामनात तृप्तता 
प्रांत प्रांत जोडले एक देश भाव दे!१० 

हाव हावरी नसो, कुवासना नसो नसो
मद्य द्यूत वर्ज्य ते सद्‌विचारलक्ष्मी दे!११

नियम नित्य पाळिन, शिस्तबद्ध राहिन
मी प्रजा नि शासक कळतसे वळू च दे!१२

पसायदान मागतो, तुझ्या पदांस वंदितो 
एक सूर एक ताल राष्ट्रगीत तूच दे!१३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.०४.१९८७

Thursday, March 7, 2024

मी देहाचा जाणिव ऐसी अभिमानाचे मूळ !

‘ मी म्हणेन तसे होईल, ’ असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच.
 
'मी देहाचा जाणिव ऐसी अभिमानाचे मूळ !ध्रु.

देह न माझा, मी देवाचा 
संतबोध हा ठसावयाचा
ठसल्यावरती नुरेल काही अभिमानाचे खूळ!१

मी नच कर्ता, कर्ता राम
उठता बसता घेतां नाम
हासत हासत थुंकायाची अहंपणाची चूळ!२  

भगवद्‌भजनी नित्य राहणे
" तो मी तो मी " हे अनुभविणे
जो ज्ञानी तो मिरवित नाही पांडित्याची झूल!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २७२, २८ सप्‍टेंबर वर आधारित काव्‍य