Tuesday, April 30, 2024

तुझि जिज्ञासा पार्था, मज आवडते.

भगवंत अर्जुनाला म्हणाले होते - प्रत्येक युगात मला असे अनंत अवतार घ्यावे लागले आहेत. मुक्तही व्यवहारात वागतच असतो पण अगदी अलिप्तपणे.  परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी तो अगदी रमलेला असतो. कर्म म्हणजे काय? विकर्म कोणते? अकर्म कशाला म्हणावयाचे? अर्जुनाने जिज्ञासेने प्रश्नामागून प्रश्न विचारले. भगवंतांना अर्जुनाची ही जिज्ञासा फार फार आवडली ते समाधानाने म्हणाले -

++++++++

तुझि जिज्ञासा पार्था, मज आवडते, मज आवडते!ध्रु.

विश्व व्हावया ठरले कारण
' कर्म ' तयाते म्हणती बुधजन
कर्मि कुशलता आणायाते सदैव चालो धडपड येथे!१

निजवर्णाते निजाश्रमाते
अनुसरिता जे हातुनि घडते
' विकर्म ' जाणी तेच अर्जुना निष्ठापूर्वक आचरि ते!२

शास्त्र जयाला निषिद्ध ठरवी
साधकास जे निश्चित भुलवी
' अकर्म ' म्हणती तयास बुधजन तत्परतेने टाळी ते!३

चित्ताचा समतोल राखुनी
अलिप्त राही सदा जीवनी
व्हावे चित्ते जगद्रूप तू, सहज स्थिति ती लाभू दे!४

आत्मा स्थिर भास्कराप्रमाणे
देहकर्म जणु त्याची किरणे
' करतो मी ' हे मनी न आणी, प्रकृति सगळे खेळविते!५

ज्ञानरूप अग्नीची ज्वाला
सिद्ध जाळण्या फलासक्तिला
मनुष्यरूपे ब्रह्म तेधवा या भुवरती अवतरते!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०१.०१.१९७३

Friday, April 26, 2024

तुजविण मजला कोणी नाही भगवंता मी तुझा!

तुजविण मजला कोणी नाही
भगवंता मी तुझा!ध्रु.

न मागताही मिळे विषयसुख
का करणे परि त्याचे कौतुक?
मिळत तयाने सजा!१

उभा रहा रे माझ्या मागे
दास तुझा एवढेच मागे
भजनी वाटत मजा!२

तुज आठविता नित्य दिवाळी
भावफुले किति उमलुनि आली
उभयहि करु हितगुजा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २१५, २ ऑगस्ट वर आधारित काव्य.

भगवंता, तुझ्यावाचून माझे कोणी नाही ’ हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल, त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी, तितके दु:खच पदरात येते. विषयसुख न मागताही येते; परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे, ते मागत कशाला राहायचे ? माझ्या मागे राम आहे म्हटले, म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. 
आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये ? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी; आपण नेहमीच आनंदात असावे; आणि त्याकरिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा.

सद्‌गुरु सदैव असती जवळी

सद्‌गुरु सदैव असती जवळी श्रद्धा धरणे विमला!ध्रु. 

संतांचे घरि नुसते पडले
तरी न कांहीं वाया गेले
शुद्ध भाव येईल अंतरी वाणीही कोमला!१

देहांतरि वा देहातीत
सद्‌गुरु असती कालातीत
भगवन्नामी निवास त्यांचा नित्याचा राहिला!२

वृत्ती रामाकडे लावणे
स्वास्थ्य मनाचे नित्य राखणे
सदा हसत‌मुख राही तो नर रामरूप झाला!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्र. १८८, ६ जुलै वर आधारित काव्‍य.

Sunday, April 21, 2024

काकड आरती करितो गजानना तुजला

काकड आरती करितो गजानना तुजला 
करितो गजानना तुजला
पाच प्राण जणु पाच दीप हे ओवाळित तुजला । ध्रु. 

अघटित माया, विवस्त्र काया विकार नाहीत 
मानवतेचे बालक नच त्या कृत्रिम माहीत 
सुमने सुमने पूजितात जन स्वामी पदकमला!१

श्वासावरती पूर्ण नियंत्रण भरून ये छाती 
आघातांना हसत सोसणे चिलीम विश्रांती
धूर सोडता अनंत वलये चेतवती तुजला!२

मरणाचे नित स्मरण असावे संयम दे साथ 
कलही त्याला सदैव कटकट प्रेमळ नित शांत 
मौनांकित तव हसरी मुद्रा आवडते मजला!३

माघ मास ती वद्य सप्तमी प्रकट जाहलास 
योगिराज तू अतर्क्य लीला जनां दाविल्यास 
जनी प्रकटणे तसे लोपणे दोन्ही सहज तुला!४

माया ममता मोह टाकणे सत्यच पत्करणे 
असार ते ते दूर सारूनी सार तेच घेणे
विवेक होउन अंतरातुनी बोध करी मजला!५

बहिरंगाला महत्त्व नसते पहा आत आत 
देव पहावा न दिसे सहसा तो तर देहात
तुझी कृपा ही प्रतिभा होऊन आली बहराला!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९९४

Sunday, April 7, 2024

अर्जुन कर हे वासुदेव मज विनवा त्या जुळवून करा!

श्रीकृष्णाचे स्मरण करा, नमन करा, भजन करा,
अर्जुन कर हे वासुदेव मज विनवा त्या जुळवून करा!ध्रु.

जीवन आहे एक रणांगण, इथे लढावे लागे क्षण क्षण
शत्रुमित्र दोन्‍ही निष्कारण, काय करावे नुमजे आपण
रथी करशि तर होइ सारथी सूत्र धर रे करी त्वरा!१

घालव रे संकोच मनाचा, जना करी या जनार्दनाचा
लोप करी रे घनतिमिराचा, प्रवेश होवो रविकिरणांचा
कार्याकार्या आतुन उमजवि विवेक होउन मनोहरा!२

भय मरणाचे, भय पापाचे, भय राज्याच्या अधिकाराचे
भय संहारक क्षात्रत्वाचे भय प्रलयाचे फारच जाचे
कर्तव्यास्तव कठोर कर केशवा दयाळा रमावरा!३

अभेद्य देहाची तटबंदी तिच्यात झालो आम्‍ही बंदी
मी माझेपण जडली व्याधी समाधान नच जीवा आधी
तळमळ खळबळ क्षुद्रपणाची कर घाणीचा या निचरा!४

समाज आहे विशाल सागर, थेंब जगे जर भरली घागर  
हव्यासा घालावा आवर, मुक्त असू दे जगती वावर
मने मोकळा तने ढाकळा असे करा रुक्मिणीवरा!५

शरीर नश्वर आत्मा शाश्वत तो ना जन्मत तो ना नासत
सोसा घावहि हासत खेळत, करा प्रहारा संधी साधत
दक्ष तोच लक्ष्यास टिपतसे हृदयि धरा हा बोध खरा!६

परिश्रमांनी मरे न कोणी सर्व राहते यत्‍नावाचुनी
संप सपवे तो तर ज्ञानी, खणतो खड्डा वृथाभिमानी
कल्याणाचे कळु दे थोडे संघटकांना धुरंधरा!७

दिव्यत्वाची जिथे प्रचीती तेथे कर सगळ्यांचे जुळती
प्रश्न सोडवी सहानुभूती, श्रीहरि नांदे सर्वांभूती
बरवी श्रद्धा, बरी सबूरी ती देण्याची कृपा करा!८

सहकाराची गाणी गाणे खेडोपाडी भेटी देणे 
स्वावलंबने जीवन सोने विश्वासाचे चलनी नाणे 
स्वाध्यायाच्या स्वीकाराने सुजला सुफला भूमि करा!९

साधे जीवन उच्च विचार तसे आचरण हाच प्रचार 
या सम ना दुसरा संस्कार मूर्ती घे सुंदर आकार 
सुदर्शनाचे दर्शन व्हावे भाग्यावर द्या अधिकारा!१० 

भेटीगाठी विरंगुळा साफसफाई विरंगुळा 
गीतागायन विरंगुळा सुखसंवादहि विरंगुळा 
स्वभाव येतो सुधारायला प्रयोगास या साह्य करा!११
 
रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
१३.०७.१९९९

रामा, तुझे नाम गाऊ! आनंदात राहू!

रामा, तुझे नाम गाऊ!
आनंदात राहू! ध्रु.

तुझाचि आधार
वाटतो साचार
इथे तिथे पाहू!१

सोडुनी आसक्ती
करू तुझी भक्ती
शीलवंत होऊ!२

आईबाप देव
घरांत सदैव
तयां सौख्य देऊ!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २६८, २४ सप्टेंबर वर आधारित काव्य.

कोणता काल कुणाच्या भाग्याने येतो हे सांगता येत नाही. म्हणून आपण कधी कष्टी होऊ नये. सत्कर्म जेवढे मोठे तेवढी विघ्ने अधिक; भगवंताचे अनुसंधान हे सर्वांत मोठे सत्कर्म आहे. आपण निश्चयाने आणि नि:शंकपणे त्याचे नाव घेऊ या आणि आनंदात राहू या.

Saturday, April 6, 2024

भगवंताच्या नामें दुरित नाश पावें

भगवंताच्या नामें दुरित नाश पावें!
उठता बसतां सुजन म्हणूनि रामासी गावें!ध्रु.

रामा स्मरणे
तनु विस्मरणे
मिटुनी डोळे घननीळातें प्रेमें देखावे!१

शुद्ध भावना
तीच अर्चना
कल्याणास्तव श्रीरामातें शरण शरण जावे!२

रामा गातां
तया चिकटता
नामाधारे सहज साधके रामा जोडावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २५९, १५ सप्टेंबर वर आधारित काव्य.

भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो.  
‘ परमात्मा सर्व करतो ’ ही भावना ठेवायला शिकावे. जिथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो. तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्वकाळ माझ्या संगतीचा लाभ घडेल.

Thursday, April 4, 2024

राम कैसा भेटणार?

मनी जर वासना -विकार
राम कैसा भेटणार?ध्रु.

नाम का न ये या ओठी?
प्रेम का न दाटे पोटी
कोंडितो अहंकार प्राकार!१

संत सांगती का न रुचे?
उपदेशामृत का न पचे?
अनीति घात खचित करणार?२

नामाचा जादुचा दिवा
सत्संगाचा स्नेह हवा
नसे जर नीतीचा आधार?३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलकर महाराज प्रवचन क्रमांक २४९, ५ सप्टेंबर वर आधारित काव्य.

संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. 

नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वाचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही.