Saturday, June 29, 2024

पुरे पुरे आता प्रपंचाची चिंता

पुरे पुरे आता प्रपंचाची चिंता 
झुरावे झुरावे देवभेटिकरिता!ध्रु.

सर्व सृष्टि जो सांभाळे 
का न तोच अपणा पाळे?
भक्तिभावे जावे शरण अनंता!१

देव चरणी राहो भाव 
झेलू संकटांचे घाव 
शांतिलाभ होतो राम आळवीता!२

अभिमान हरळी खुडणे 
रामनाम खुरपे घेणे 
सहाय्य ती देते निष्ठा नाम घेता घेता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ७३ (१३ मार्च) वर आधारित काव्य.

समाधानाकरिता, आनंदाकरिता, धडपडणारा आपला जीव, परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी होईल याची काळजी करा.
सर्व जगताचा जो पालनकर्ता, तो आपले पालन नाही का करणार ? प्रत्येक गोष्ट त्याच्याच सत्तेने होते हे लक्षात ठेवा, मग प्रपंच कधीही बाधक होणार नाही.
परमात्म्यावर पूर्ण निष्ठा पाहिजे. या निष्ठेच्या आड जर काही येत असेल तर तो म्हणजे आपला अभिमान. हा अभिमान सर्वांना घातक आहे. तो घालवण्यासाठीच परमात्म्याला वारंवार अवतार घेणे भाग पडले. ही अभिमानाची हरळी नाहीशी व्हायला भगवंताच्या नामासारखा दुसरा उपाय नाही.

Thursday, June 27, 2024

निळोबा

 
तुझे नाम निरंतर गाऊ दे!
हा निळा तव पदी राहू दे!ध्रु.

धनवित्त नको श्रीहरि मजला
ते शहाणपणही नको मला
नामाची आतून आवड दे!१

हुरहूर लागली आतुरलो
दर्शनास देवा तळमळलो
अनुताप असा मज पोळू दे!२

ते रूप तुझे मग स्‍मरेन रे
ते नाम सदोदित गाइन रे
हरिरूपच नामे प्रकटू दे!३

स्वप्नात सद्‌गुरु पाठविले
प्रेमाने मजला नाम दिले
निशिदिनी नाम मज घोकू दे!४

जनीवनी सावळा निळा दिसे
द्रष्टा न कुणी वेगळा असे
तनमनधन चरणी वाहू दे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

जनाबाई


नामयाची जनी, म्हणते-
विठ्ठल मज सापडला!ध्रु.

झाली विठ्ठलाची जोड
नाम सुधेहुन गोड
विठुराया आवडला!१

गेले शरण तयाला
सर्व वाहिले तयाला
भक्तीला प्रभु भुलला!२

दळू लागे मजसंगे
तोहि नाम घेउ लागे
बंदीच असा जाहला!३

पालटला देहभाव
जागा झाला आत्मभाव
अंधार लया गेला!४

बाप विठ्ठलाचा बोध
मावळले कामक्रोध
मम ठाव पुसुन गेला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
०९.१२.१९८९

सरू दे आता निष्फळ वटवट सेवा काही घडावी!

सरू दे आता निष्फळ वटवट 
सेवा काही घडावी!ध्रु. 

जी जी वचने श्रवणी आली
कृतीविना ती वाया गेली 
कृतीस स्फूर्ती द्यावी!१

एक नाम परि मुखी असू दे 
राम स्मरता राम होऊ दे 
आशा ही पुरवावी!२

संयमनाची लागो गोडी
सहज तुटू दे विकारबेडी 
शांति मना लाभावी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९८ (७ एप्रिल) वर आधारित काव्य.

पुष्कळ वाचले, ऐकले पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो.
स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे अर्थात घाणेरडे आहे.

Wednesday, June 26, 2024

ठेवणे रामावर विश्वास!

जोवरि आहे सोडायाचा अपणां अंतिम श्वास -
ठेवणे रामावर विश्वास!ध्रु.

निष्ठा तारत जगि भक्ताला
ती आवडते श्रीरामाला -
रामी निष्ठा ज्या मनुजाची, वंदनीय विश्वास!१

देहबुद्धि अभिमाना कारण
तिला नाशिण्या नामोच्चारण
श्रद्धा ऐसी बळकट शक्ती करिते दुःखनिरास!२

श्रद्धेपासुनि धीर लाभतो
रामदास जगि समर्थ ठरतो
नाम - भक्त - भगवंत त्रिमूर्ती सुखद सुखद नयनांस!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२३ (१८ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी.
जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर जगाची निष्ठा बसेल.
आपण दुःखी का? याचे उत्तर असे की ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास.
श्रद्धा ही फार बळकट व मोठी शक्ति आहे.
आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे.
नाम भक्त अन् भगवंत वेगळेपणाने राहूच शकत नाहीत.
म्हणून अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा.

Sunday, June 23, 2024

मी न खरा, तूच खरा तुझीच सत्ता प्रभुवरा!

मी न खरा, तूच खरा!
तुझीच सत्ता प्रभुवरा!ध्रु.

नाम तूच रे
नामी तूच रे
आत झुळझुळे मोदझरा!१

शरणागत मी
अज्ञानी मी
हात धरुनि चालवी जरा!२

सुख येऊ दे
दुःख येऊ दे
भाव करी दृढ रमावरा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१९.१०.१९७७
दरबारी कानडा, एकताल

रामा, तुझ्या सत्तेने मी जगतो. तुझ्या सत्तेनेच सर्व घडते.

Saturday, June 22, 2024

धरितो विषयांची आस तो त्यांचा बनतो दास!

धरितो विषयांची आस
तो त्यांचा बनतो दास!ध्रु.

हवे हवे हा हव्यास 
मान आवळी जणू फास 
शांति कोठली चित्तास!१ 

सुख लाभाया जे केले 
दुःख तयाने ओढविले 
विषयी दुःखांची रास!२ 

लाल निखारे गमति फुले 
मन त्यांना वेचु धजले 
कळवळला आत्मा खास!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील १७४ व्या प्रवचनावर (२२ जून) आधारित काव्य.

विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे. मनुष्य सुखाकरिता धडपड करतो, आणि अंती दु:खमय अशा विषयाची आशा करतो. 

आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यांत आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हांला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? जे दु:खमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ?

Thursday, June 20, 2024

मुखे राम, चित्ती राम त्याचे मनासी आराम!

मुखे राम, चित्ती राम 
त्याचे मनासी आराम!ध्रु.

एक असू द्यावे चित्ती 
सोडणे न रघुपती 
रामनाम उत्तम नेम!१

प्रपंचास सोडू नये 
विकारास जोडू नये 
कर्तव्यात समाधान!२ 

राम शेजारी शेजारी 
राम राहिला अंतरी 
सर्व सौख्यदाता राम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७२ (२० जून) वर आधारित काव्य.

ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडला ॥
शेजार असता रामाचा । दु:खाची, काळजीची, काय वार्ता ? ॥
जे जे काही माझे । ते ते जाणावे रामाचे ॥
मुखाने नाम, चित्तांत राम,। त्याचे मनाला होईल आराम ॥
सतत ठेवावे एक चित्तीं । न सोडावा रघुपति ॥

Wednesday, June 19, 2024

राजा झाला पतितपावन

झाले गेले सगळे विसरून
राजा झाला पतितपावन!ध्रु.
 
नउ वर्षांचा काळ लोटला
चुकला नेता घरा परतला
माणुस अपुला नुरु दे परका
ऐसे करूनी विचारमंथन!१

अपराधांची खंत जयाला
अश्रुजलाने पावन झाला
पुनर्जन्म जणु खचित लाभता
तनमन आले झणी मोहरून!२

निवळे दृष्टी, बदले सृष्टी
नुरला कष्टी, करुणावृष्टी-
ऐसी घडली मुसळधार की
नेत्याच्‍या मनि वाढत कंपन!३  

बादशहाचा कावा फसला
शिवनृपतीने धक्का दिधला
नेताजीची शुद्धी केली
नव्हे कृपा ही हे उद्‌बोधन!४

श्रेय हरपले पुन्हा गवसले
भाग्ये पुनरपि चरण लाभले
धार्मिक क्रांती अशी पाहता
कंठ जनांचा आला दाटुन!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

रामा दान हेचि द्यावे!

मीपण विसरावे, रामा दान हेचि द्यावे!ध्रु.

देहबुद्धि ही घात करतसे 
परमार्थाच्या आड येतसे 
सोहम बिंबावे!१

नकोच धन हे कांचनमृगसम
जे वाढविते अंतरंगि तम 
लोभा खंडावे!२

भोग न सुटला जगी कुणाला 
हसत पाहिजे नरे सोसला 
सोशिकपण यावे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७१ (१९ जून) वर आधारित काव्य.

Sunday, June 16, 2024

चिरंतन भगवंताचे नाम!

पूर्वी होते, आज आहे, पुढेहि राहिल नाम 
चिरंतन भगवंताचे नाम!ध्रु.

रूप विनाशी, हे अविनाशी 
नामांतरि सौख्याच्या राशी 
शक्ती निरंतर राही वितरत भगवंताचे नाम!१

अस्तित्वाने नाम जाणवे 
नैराश्याते दूर घालवे 
अनेकात एकत्व आणते भगवंताचे नाम!२

रूपाहुनि हे आहे बरवे
प्राणप्रणाने नाम जपावे
प्रलय जाहला तरीहि राहिल भगवंताचे नाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील, प्रवचन क्रमांक ४३ (१२ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. 
टेकडीवरून आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इ. सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, ‘ही सृष्टीची शोभा आहे’ असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. 
ॐकारांतून सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. अर्थात्, नाम म्हणजे सत् होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच.

Saturday, June 15, 2024

नाम येता मुखावाटे, देहबुद्धी कमी होते!

नाम येता मुखावाटे, देहबुद्धी कमी होते!ध्रु.

देह नव्हेच आपण -
सुखदुःखे ही कोठून? 
मग प्रारब्धाचे भोग भोगता न काही वाटे!१

नाम अमोघ साधन 
नाम दिव्य संजीवन 
जेथे नाम तेथे राम हे तो प्रत्ययास येते!२

नाम आहे पराभक्ती 
नाम मनासी विश्रांती 
नाम जपता जपता कली-सत्ता नष्ट होते!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराजांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९ म्हणजे १९ जानेवारीचे प्रवचनावर आधारित हे काव्य.

बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात.  प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते;  म्हणून, ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदु:खाने सुखी वा दु:खी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते. म्हणून, नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय, आणि ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय.  देह प्रारब्धावर टाकून, आणि आपण त्याहून निराळे राहून, जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असे म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असे म्हटले की समाधान मिळेल.

भगवंताचे नाम स्मरता विकल्प जरि उठले - भिऊ नये साधके कार्य सुरु नामाचे जाहले!

भगवंताचे नाम स्मरता विकल्प जरि उठले -
भिऊ नये साधके कार्य सुरु नामाचे जाहले!ध्रु.

धास्ती घेउन विकल्प चळवळ करताती बापडे
नामापुढती काहि न चालुनि गाडे त्यांचे अडे
प्रभुनामाच्या नौकेतुनि नर भवसागर तरले!१

सुचिन्ह समजा, नका गांगरू, नाम जपा हो जपा
दिवाभिते तर घाबरताती सूर्याच्या आतपा
विकल्प उच्चाटना प्रखरतर साधन सापडले!२

विकल्प वेधिति लक्ष तरीही नामा नच सोडणे
नामचि शंका निरशिल सगळ्या हे ध्यानी घेणे
सत्संकल्पा प्रवेश मिळता ध्येय प्राप्त झाले!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक ९ वर आधारित काव्य (९ जानेवारी).

मनुष्य नाम घेऊ लागला की विकल्पांना असह्य होते, आणि आता हा नाम घेऊ लागला, आता आपली धडगत नाही, अशा धास्तीने त्यांची चळवळ चालू होते, आणि मनुष्याला नामापासून परावृत्त करण्याचा ते प्रयत्न करतात. विकल्प हे अती सूक्ष्म आहेत. त्यांचे उच्चाटन करायला त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आणि तितकाच सूक्ष्म असा उपाय पाहिजे. तो उपाय म्हणजे भगवंताचे नाम.  

नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागले तर गांगरून न जाता, हे सुचिन्ह आहे असे समजून, विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्‍ली मिळाली अशा जाणिवेने, जास्त आस्थेने नाम घेण्याचा निश्‍चय करावा.विकल्प जाऊन भगवंताचे संकल्प उठू लागले की आपले काम झाले. आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच; पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे, विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये.

Friday, June 14, 2024

तुकामाई ऐसे होते हो!

तुकामाई ऐसे होते हो! ध्रु

वर्ण केतकी, शरीर भरले
दिव्य तेज नेत्रांतरि वसले
फटकळ वाणी, हृदय कोवळे
प्रभुचिंतनि रतले हो!१

भक्तजनांची घेत परीक्षा
पारखल्याविण देत न दीक्षा
कसा लावती पूरी तितीक्षा
विरक्तिभास्कर होऽऽ २

आडरानी वा मळ्यात वसती
केव्हा बसती ओढ्याकाठी
डोई टोपडे, कटि लंगोटी
करि चिलिम रिकामी हो!३

योगाभ्यासी खंदे साधक
भक्तिपथावरि चालत भाविक
प्रसन्न मुद्रा भाषण मार्मिक
निःस्पृह, वत्सल होऽऽ ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले
(गोंदवलेकर महाराज चरित्रावर आधारित काव्‍य)

Tuesday, June 11, 2024

कष्ट किती हे कल्पवेना न्यूनता काही सरेना!

कष्ट किती हे कल्पवेना 
न्यूनता काही सरेना!ध्रु.

मनच आहे हे मुळाशी 
दुःख म्हणुनी या जीवासी
नाम मोफत घेववेना!१ 

औषधी देणे मनाला 
बोध करणे मानसाला 
विषयसुख परि सोडवेना!२ 

वासनाही नाचवीते 
ती शिवाहुन दूर नेते 
"मीपणा" का टाकवेना!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक १६३ (११ जून) वर आधारित काव्य.

सुखदु:खे कोणालाही सुटली नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानेसुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दु:खावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दु:खाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत.

सुखदु:ख हे वस्तूत नसून आपल्या मन:स्थितीवरच अवलंबून आहे
प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदु:ख देतो. ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय.

Saturday, June 8, 2024

श्रीकृष्ण कसा, तो गीतेमधुनी दिस‌तो संवाद सुखाचा भक्तासंगे करतो!

श्रीकृष्ण कसा, तो गीतेमधुनी दिस‌तो
संवाद सुखाचा भक्तासंगे करतो!ध्रु.

' हा देह न मी ' ही पहिली शिकवण त्याची
घालवी मरणभय अमृतवल्ली साची
जो स्थितप्रज्ञ तो स्वयेच माधव असतो !१ 

सुखदुःखे सम त्या मान तसा अपमान
आत्म्याचे असते सुज्ञाला नित भान
जो स्वस्थ तो न कधि क्षणभर विचलित होतो!२ 

नामात प्रेम त्या माधव जरी अनाम 
ये आकाराला निर्गुण मुळचा श्याम
आनंद स्वरूपी अक्षय अनुभव देतो!३

जे कर्म विहित ते सुवर्णसंधी असते 
ते घडता हातुन भगवत्पूजन घडते 
तो ज्ञानयज्ञ तर अखंड चालू असतो!४

अविनाश अनादि धरा हातचा नित्य
चुकणार गणित नच त्रिवार सांगे सत्य
परमात्म‌गिरीतुन मोदझरा झुळझुळतो! ५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२४/११/१९९७

मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास!

व्हावी आशेची निराशा, व्हावे रामाचा मी दास 
मज लागो हाची ध्यास, माझा सुटावा हव्यास! ध्रु.

मुळी प्रपंच फाटका 
तरी करावा नेटका 
तर साधे परमार्थ जगी रंकास, रावास!१

सुख बाहेर कुठले? 
आत आत दडलेले 
हवी अंतरी स्वस्थता, ही ची पुरवावी आस!२ 

माझा भार रामावरी 
देह प्रारब्धाच्या वरी 
आता बसू दे निवांत, आता स्मरू राघवास!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक १६१ (९ जून) वर आधारित काव्य.
प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यासवृत्ती होय. 
आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. 
हवे व नको याचा आग्रह नसावा. यातच वासनेचे मरण आहे.

Thursday, June 6, 2024

विषयाकडची ओढ लागु दे भगवंताच्याकडे!

विषयाकडची ओढ लागु दे भगवंताच्याकडे!ध्रु

बहुत नाचलो, बहु आरडलो 
बहुत भटकलो, बहु व्याकुळलो
सदया देवा म्हणुनि उभा मी हात जोडुनी पुढे!१ 

भगवत्स्मरणी जे सुख आहे 
मना माझिया घेउनि पाहे
विषयाकर्षण बळे खेचते नेण्या नरकाकडे!२

लोभ नसू दे धुंदि नसू दे 
विठ्ठलछंदे सुखे नाचु दे 
भक्तभार घे राम मस्तकी नुरती कुठले तिढे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक १६० (८ जून) वर आधारित काव्य.

आपला ओढा जो विषयांकडे आहे तो भगवंताकडे लावा की परमार्थ साधला.  साठा करावा पण लोभ असू नये.

Tuesday, June 4, 2024

जे जे घडते ते ते सगळे त्याच्या इच्छेने!

जे जे घडते ते ते सगळे त्याच्या इच्छेने!ध्रु.

कर्तृत्वाची नको अहंता 
भार न घेणे कारण नसता 
रामनामजप करता होते जन्माचे सोने!१

जिथे तिथे रामाची सत्ता 
तो चालविता तो बोलविता 
मी माझे करणे रामार्पण रामाचे होणे!२

अहंपणाची घडो विस्मृती 
उपाधिविरहित व्हावी वृत्ती 
भगवंताचे होणे लाभे समाधान येणे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधील प्रवचन क्र. १६२, १० जून वर आधारित काव्य.

Sunday, June 2, 2024

प्रत्येकाला गाता येते श्रीरामायण गाऊ चला!

प्रत्येकाला गाता येते श्रीरामायण गाऊ चला!
यत्नाने नर हो नारायण सोऽहं भजना करू चला!ध्रु. 

रामकथा ही अतिशय सोपी, मनामनाला आवडते 
न पाहिलेला राम दाखवी स्वप्नामध्ये भेटवते 
सुखदुःखेही समान दोन्ही कर्तव्या नरजन्म भला!१ 

जीवनातला राम पहाया डोळे मिटुनी बैसावे 
श्वासाला त्या जोडुनि नामा अपुले आपण ऐकावे 
रामभक्तिला साह्य मारुती धरतो अपुल्या हाताला!२

घराघरातुनि सीतामाई माता भगिनी वा वहिनी 
भरत नि लक्ष्मण सान थोर ते बंधू वावरतात गुणी 
विकार शत्रूंना नाशाया शत्रुघ्नही तो सजलेला!३ 

शबरीची बोरे रामाने प्रेमाने सुमधुर केली 
मित आहारे आपण बनवू अन्ना अमृत या वेळी 
खेळीमेळी करी अयोध्या सहजच नगरानगराला!४ 

कर्तव्याचे पालन करण्या कठोरही लागे व्हावे 
बंध रेशमी प्रसंग येता  बुद्ध्या लागत तोडावे 
जीवनमूल्यांचे संरक्षण धडा हवा गिरवायाला!५ 

एका रामाभवती सारे पहा कसे जन जमलेले 
देहा बघती आत्म्याला परि एखाद्याने ओळखले
आत्मारामा ओळखण्याला चला साधना करू चला!६

रामराज्य कर्तव्यपालनी मनसिंहासन मोलाचे
रामायण हे हो आवडते ज्याच्या त्याच्या हृदयाचे
युगे लोटली तरी वर्णिती भाविक रामाच्या लीला!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१/२.०३.२०००