Saturday, November 30, 2024

रामा, राहो अनुसंधान निरंतर तुझेच अनुसंधान!

रामा, राहो अनुसंधान 
निरंतर तुझेच अनुसंधान!ध्रु. 

चित्ति वसाया रामा यावे 
नाम सदोदित गाउनि घ्यावे 
सरू दे जगताचेही भान!१

तुझी पाउले रामा धरिता 
नुरली कसली भवभयवार्ता 
स्फुरू दे तव भक्तीचे गान!२

ठेविशी जैसे तसे रहावे
गंगा नेइल तिकडे जावे 
यातच खचित खचित कल्याण!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३३५ (३० नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

गीता तू वाचत जा

गीता तू वाचत जा, गीता तू ऐकत जा
कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत अर्जुन तू होउन जा! ध्रु.

मन प्रसन्न जग प्रसन्न जगण्याची शीक कला 
विघ्न तुच्छ करिल काय वाढव रे आत्मबला 
शर्थीने झुंज देत हरिभजनी रंगुन जा!१

ओघे जे येत काम संधि समज सेवेची 
आनंदे साध स्वये उन्नति तू आत्म्याची
यश येवो वा अपयश द्वंद्वांना लघुनि जा!२  

आचरण्या तत्त्व असे चिंतुनि जे सापडले 
सापडले चर्चेतुन पटले ते मनि रुजले
भिन्न मते दिसत जरी मेळ घालण्यात मजा!३

देह येत जात तसा त्याचा तुज मोह नको 
मरणे हे स्वाभाविक त्याचा तुज शोक नको 
आत्म्याचा कर विचार 'तो तर मी' घोकत जा!४ 

श्रीगीता हरिमुरली सूर तुझ्या भवताली 
सोऽहं तर चालतसे केवळ तू मन घाली
तेहि वळे आत कसे हरिकिमया जाणत जा!५

मी माझे विसरून जा विश्वात्मक तू व्हावे 
सर्वात्मक मीच स्वतः घोकावे उमजावे 
श्लोक श्लोक गीतेचा आनंदे विवरत जा!६ 

भारून जा उत्साहे, चपळ तुझे चरण करी 
मुक्तपणे गुणगुण तू संजीवक स्वरलहरी 
हाच पुनर्जन्म तुझा श्रीरामा जाणत जा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२५/०९/१९९८

Friday, November 29, 2024

चला भागवत वाचू या! चला भागवत ऐकू या !

ॐ नमो भगवते वासुदेवाय 

चला भागवत वाचू या! 
चला भागवत ऐकू या ! ध्रु.

मृत्युभयावर मात करू 
हरिनामाचा गजर करू 
भगवंताच्या अवतारांचे रहस्य काही जाणू या!१

कथेकथेतुन तत्त्वे भरली 
उद्यानातुनि फुले उमलली 
भावगंध हा पवन होउनी चहु दिशांना नेऊ या!२

समाधान हे आतच असते
अंतरि वळला त्याला दिसते
विकारवश ना चुकुन व्हायचे सावध प्रतिपळ राहू‌ या!३ 

श्वासाचे नियमन घडता
मन अपुलेसे हे होता 
नामाधारे प्रेमाधारे आयु सार्थकी लावू या!४

भगवद्भक्ती हा धर्म 
श्रीह‌रिपूजन निजकर्म 
कर्तव्याचे पालन घडता कृतार्थ आपण होऊ या!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२२.०७.१९९६

Thursday, November 28, 2024

श्रीगुरुदेवदत्त म्हणा हो ! श्रीगुरुदेवदत्त म्हणा!

।। श्रीगुरुदेवदत्त ॥

नसे असू‌या ती अनसूया 
गुणा लंघिले ते मुनि अत्रि 
दांपत्याने समाजपुरुषा सुपुत्र आपण दिधला हो 
दत्तनाम हे तेव्हापासुन ज्याच्या त्याच्या ओठी हो


श्रीगुरुदेवदत्त म्हणा हो ! श्रीगुरुदेवदत्त म्हणा!ध्रु.

तीन मुखे त्या त्रिविधा शक्ती 
एके ठायी वसल्या असती 
सहा करांनी सत्कृ‌तिपूजन दत्तराज उजळवी मना!१ 

औदुंबर तरुतळी विराजे
वेष यतीचा त्यांना साजे 
मस्तकातुनी विचारगंगा उसळुन पावन करी जनां!२ 

धेनु होउनी धरती आली 
चार वेद ती श्वाने झाली
निःस्पृहता निरलसता यांच्या वर्तनात उमटती खुणा!३ 

कर्तृत्वाने प्रेमे ज्ञाने 
समाज उठतो हात दिल्याने
वन्ही चेतवा राख फुंकुनी जनी जनार्दन दत्त म्हणा!४ 

नाते जोडू चराचराशी 
आत्मतत्त्व जाणू अविनाशी 
चंदनसम मज झिजावयाचे असे वाटु दे तना मना!५ 

श्रीगुरु करती जागृत शक्ती
आत्मश्रद्धा म्हणुन बलवती
खेडोपाडी घराघरातुन रंग चढतसे गुरुभजना!६

निमित्त केवळ मला व्हायचे 
कर्म नि फल श्रीगुरुदत्ताचे
विरक्तीत ऐश्वर्य विराजे गुरुचरिती पटतील खुणा!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
६/११/१९९७ गुरुवार

Wednesday, November 27, 2024

चल ऊठ ऊठ पार्था!

पराक्रमी अर्जुनाने आपल्या अनपेक्षित वागण्याने भगवान श्रीकृष्णांना विस्मयाचा धक्काच दिला.

अर्जुनाचे ते भाषण, त्याचा आविर्भाव यातून त्यांना हेच जाणवले- अर्जुनाचा हा केवळ शस्त्रत्यागच नाही तर तो स्वधर्मत्याग आहे.
भगवंताच्या दृष्टीने अर्जुनाचे ते वागणे केवळ अप्रयोजकपणाचे होते.
सोड हा मूर्खपणा! हातात धनुष्य बाण घे! आणि रणांगणात युद्धाला उभा राहा..

हे बजावताना भगवान श्रीकृष्णांच्या वाणीला खड्‌‌गाची धारच आली होती. अत्यंत निर्भीडपणाने आणि निःसंदिग्ध शब्दांत त्यांनी आपला संताप आणि अर्जुनाच्या शस्‍त्रत्त्यागाबद्दलची नापसंती
व्यक्त केली. 

क्‍लैब्‍व्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते 
क्षुद्रं  हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥३॥


भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत -

सुचे कसा तुज षंढपणा
चल ऊठ ऊठ पार्था
तू पुरुषोत्तम तुलाच रचणे नवविक्रमगाथा
चल ऊठ ऊठ पार्था! धृ

तू शत्रुंजय, वीर धनंजय
मोहपंकि रुतलासी जणु हय  
झटकून टाकी हे दुबळेपण
कर उन्नत माथा!१

शस्‍त्रत्यागे तुवा दिपविले
रणभूमीवर प्रवचन केले
शांतीपाठा तुझ्या ऐकता
संतोषेल पृथा!२

अकीर्तिकर मोहास सारुनी
कारुण्याचा मेघ वारुनी
भास्करसम तू तळप प्रतापे
सनाथ कर वसुधा!३

नाव ऐकता पळते अपयश
सकलसिध्दिही तुजलागी वश
जाणुनि हे ही हर्ष होत तुज
बृहन्नडा होता?४

युद्ध नव्‍हे हे राज्यासाठी
यज्ञ असे हा न्यायासाठी
क्षत्रिय असूनी रणा न उत्सुक
वरसि अधःपाता!५

स्वकीयकृत अन्याय रुचे जर
द्रोणांसम हो कौरव अनुचर
जन्मभरी तैनातच करता
नुरेल रणचिंता!६

उचल धनू ते टणत्कार कर
वीरवृत्ती वरेल सत्वर
पहिली वहिली नसे लढाई
सिद्ध होइ युद्धा!७

कौरव पक्षिय आप्त जाहले
पांडव सगळे परके ठरले ?
धन्य अर्जुना पारख तुझिही
सांभाळी या रथा!८

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले

Tuesday, November 26, 2024

घुटका बोधसुधेचा

ॐ राम कृष्ण हरि गात राहु दे वाचा
मनुजा तू घेई घुटका बोधसुधेचा!ध्रु.

महाराजा रुचला दासबोध हा ग्रंथ 
ते नित्य सांगती समजावून मग अर्थ
ते स्फुरण जसे की प्रवाह त्या गंगेचा!१

नरदेह असे तो सार्थक करुनी घ्यावे
नामा न सोडता रामा जोडुन घ्यावे
कर विचार काही शांतपणे आत्म्याचा!२

सांभाळ आचरण सुखदुःखा कारण ते
तू जसे वागशी तसे होत असते ते
जर शुद्ध आचरण संभव ना रोगाचा!३

जे आपण देतो तेच मिळे आपणाला 
द्वेषास द्वेष फळ, प्रेम मिळे प्रेमाला 
घे धांडोळा तू प्रतिपळ आचरणाचा!४

जे देवे दिधले त्यात मान संतोष 
नित शुभच चिंतुनी कर सद्‌गुणपरिपोष
तू कृतज्ञ राही नेहमीच रामाचा ! ५

परमार्थ साधणे हाच आपला धर्म
अनुकूल त्यास जे तेवढेच कर कर्म
काळजी सोड आवडता हो रामाचा!६

करितसे वृत्तिला संथ तोच रे संत
जो सहन करी तो भगवंतास पसंत
हो विशाल सागर मनुजा तू शांतीचा!७

तू हाव मनाची मोडुन टाकी आधी
मग क्रोध न येई, लागे सहजसमाधी
साधना करुन हो मालक निजदेहाचा!८

करणीने अंत:करण जिंकता येते 
वडिलांची सेवा श्रीहरिला आवडते
पुंडलीकवरदा प्रसन्न हो नित्याचा!९

गुर्वाज्ञा म्हणुनी लावत जा रे ध्यान
चित्प्रकाश बघ तू, दृष्टी होत समान
संसार न आपला समज तोच रामाचा!१०

जो स्वरूपात स्थिर स्वस्थ त्यास म्हणतात 
आनंद त्यास दे जन्मभराची साथ
पावसी गुरुपदा भरवसाच रामाचा!११

श्वासात ओवणे नाम हाच सत्संग
सद्वस्तुस्मरणे आपलासा श्रीरंग 
प्रभु करी त्यात कल्याण बोध संताचा!१२

अनुभव घे वाढव वाढव रे परमार्थ
परमात्मा स्वामी सेवक तू निभ्रांत
जगि धन्य खरा जो चाकर रघुनाथाचा!१३

हो मरणाआधी मननाने तू मुक्त 
जो विभक्त नाही देवापासून, भक्त
साधक हो अंती अधिकारी मोक्षाचा!१४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
९/९ आणि १०/९/१९९८

Sunday, November 24, 2024

गोपालकृष्णा भगवद्‌गीता समजावुन दे दे

विनवणी 

गोपालकृष्णा भगवद्‌गीता समजावुन दे दे
तूच वाचवी गाउन घेई रहस्य प्रकटू दे!ध्रु.

गीता मजला गंगामाई उसळतात लाटा 
अंधारातहि आत्मप्रकाशे दिसताती वाटा 
कृष्ण कृष्ण जय धून अंतरी संतत चालू दे!१ 

आपले आपण बंदी व्हावे ठरल्या जागेत 
नयन मिटावे एकवटावे लक्ष सर्व आत 
कर्मावर अधिकार फलाशा मना न स्पर्शू दे!२ 

या देहाची आप्तांचीही जाचत आसक्ती 
विषयाची तर ओढ अनावर ना लज्जा भीती 
पशुत्व मनिचे मनोहरा तू पिटाळून दे दे!३

यत्नावाचुन सर्व राहते करणे अभ्यास 
नामातच जाऊ दे माझा शेवटचा श्वास 
राम कृष्ण हरि ॐकारासह मलाच गाऊ दे!४ 

सोऽहं सुस्वर हे मुरलीधर ऐकव श्रीकृष्णा 
घे आकर्षुन इंद्रियधेनू, श्रीहरि कर करुणा 
मी माझेचा विसर पडो हा एवढाच वर दे!५ 

न संपणारे महायुद्ध या जीवन म्हणतात 
षड्रिपु कौरव सद्‌गुण पांडव दोन्ही पक्षात 
धर्म तिथे जय हे आश्वासन धीर वाढवू दे!६

विश्वरूपदर्शना न भ्यावे हरि हरि गर्जावे 
गुणातीत मी द्वंद्वातीतहि असे कळो यावे 
श्रीरामाला मुक्तपणाने गीता गाऊ दे!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.०९.१९९८

Saturday, November 23, 2024

गीता प्रभुची वाङ्‍‍मयी मूर्ती

गीता प्रभुची वाङ्‍‍मयी मूर्ती 
स्तवनासाठी शब्द न पुरती!ध्रु.

वेदार्थाचे करुनी मंथन 
व्यासे केले हे प्रतिपादन 
परब्रह्म जणु दिध‌ले हाती! १

माधव वक्ता अर्जुन श्रोता
सदाशिवाही रुचते गीता 
ते ही संतत चिंतन करती! २

महेश अजुनी जिथे कापडी 
तेथे बरवी नव्हे तातडी 
नित नूतन ती दिसे आकृती ! ३

मऱ्हाटीत मी कैसा विवरू 
कुठे गरुड अन् कुठे पाखरू? 
ज्ञानदेव हा करितो प्रणती! ४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२/३/७४

वरील काव्यातील कापडी या शब्दाचा अर्थ प्रवासी असा आहे.
हे असो शब्दब्रह्म जिये वाजे। 
शब्द मावळलेया निवांतु निजे।
तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे।
हा पाडु काई।९:२२

परी ऐसियाही मज धिवसा । तो पुढतियाची येकी आशा। 
जे धिटीयां करूनि भवादृशां । पढियंतया होआवे।९.२३

स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील वरील ओव्यावरील प्रवचन क्रमांक ६९ वर आधारित काव्य

Wednesday, November 20, 2024

कृष्ण कृष्ण म्हण! कृष्ण कृष्ण म्हण!

कृष्ण कृष्ण म्हण! कृष्ण कृष्ण म्हण! ध्रु.

कारागारी जरी जन्मला
बंधामध्ये नसे गुंतला 
अलिप्तता ती शिकणे आपण ! १

कर्तव्याला पुढे सरावे 
फलाशेत ना कधि गुंतावे 
अवघ्या आशा श्रीकृष्णार्पण ! २

कैसा जगला सांगे गीता 
श्रीकृष्णाचे जीवन गीता 
प्रेमाने कर गीतागायन ! ३ 

आत्मरूप ते ध्यानी धरता 
जन्ममृत्युची कुठली चिंता
असशि वेगळा देहापासुन ! ४

असुनि नसावे नसुनि असावे 
कृष्णापासुन समजुन घ्यावे
क्षणात एका मोहा झटकुन ! ५

मातांची जी माता गीता 
घरोघरी तू पोचव आता 
रहस्य सगळे पुरते जाणुन ! ६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
११ जुलै १९९५

Saturday, November 16, 2024

योगाचे सार

समत्व चित्ताचे, पार्था, सारचि योगाचे!ध्रु.

लाभाने नच हर्षित होणे 
अलाभेहि ना कष्टी होणे 
ऐक्य घडतसे जिथे अर्जुना मन बुद्धी यांचे!१
 
देह नव्हे मी, मी तर आत्मा
देहातीतच तो परमात्मा 
साक्षित्वाने सुखदुःखांसी उरे पहाण्याचे!२

मनपण नकळत नाश पावते
भगवंताचे ध्यान लागते 
चांचल्याते बघता बघता सोडे मन कधिचे!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१०/१/१९७४

खालील ज्ञानेश्वरीतील ओवीवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्र. १८ वर आधारित काव्य.

अर्जुना समत्व चित्ताचे। तेचि सार जाण योगाचे
जेथ मन आणि बुद्धीचे। ऐक्य आथी ॥२ः २७३

Thursday, November 14, 2024

नकोस टाळू विहित कर्म तू

नकोस टाळू विहित कर्म तू!ध्रु.

शास्त्र तसा व्यवहार पाहिला 
विचार आता पक्का ठरला
लाजिरवाणा नकोस ठरू तू!१

क्षात्रोचित तू युद्धच करणे
कर्म आचरी चोखपणाने 
अशास्त्र जे ते नकोस करू तू!२

कर्मप्रवृत्ती बलवत्तर 
घडविल तुजकरवी संगर
अज्ञानासी सार दूर तू!३

कर्मभार तू मस्तकि घेशी
आणि श्रमाने दुःखी होशी 
म्हणुनिच छळतो तुजसी किंतू!४

भगवत्प्राप्ती श्रेष्ठ कामना 
आत्मरूप होण्यास साधना 
हेतूविण सत्कर्मे कर तू!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
७/१/१९७४

खालील ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर आणि स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्रमांक १५ वर आधारित काव्य.

आम्ही समस्तही विचारिले। तव ऐसेचि हे मना आले 
जे न सांडिजे तुवा आपुले। विहित कर्म ।। २.२६५ 
परी कर्मफळी आस न करावी। आणि कुकर्मी संगति न व्हावी  
हे सत्क्रियाचि आचरावी। हेतूवीण ॥२.२६६

Wednesday, November 13, 2024

दीपक असता करी पंथ हा आपण उलगडतो!

रुळल्या मार्गावरी चालता अपाय ना होतो
दीपक असता करी पंथ हा आपण उलगडतो!ध्रु.
 
स्वधर्मकर्मी मन घालावे 
ईश्वरपूजन ते मानावे 
कर्मफुलांची माला मिळता परमात्मा तोषतो!१

वर्णविहित जे कर्म लाभले 
तेच पाहिजे कार्य मानले 
जे सोपविले ते करताना साधक ना अडतो!२ 

क्षात्रकर्मि तर निपुणच अर्जुन
स्वजनासक्ती ठरली बंधन 
मोहन त्याचे बंधन प्रेमे सहजपणे तोडतो!३

सत्कर्माला तीर्थ योग्यता 
अंतरंगही वरिते शुचिता 
भक्तीच्या उदयाने भगवन् अंतरात हसतो!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०४.०१.१९७४

स्वामी माधवनाथांच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे या पुस्तकातील प्रवचन क्र. १२ वर आणि खालील ओव्यांवर आधारित काव्य
 
जैसे मार्गचि चालता । अपावो न पवे सर्वथा
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ।।२ : १८७ 
तयापरी पार्था । स्वध‌र्मे राहाटतां । 
सकळकामपूर्णता । सहजें होय ॥२:१८८

Tuesday, November 12, 2024

संत नामदेव महाराज यांच्या चरित्रावर आधारित काव्य

पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी! ध्रु.
 
देव आईबाप
सेविता सरे पापताप
भक्‍तीला भुलला भाबडा देव वाळवंटी! १
 
गावच ही काशी
श्रेय त्‍या एका भक्‍तासी
प्राणमोल दिधले खिळवला जागी जगजेठी ! २
 
परब्रह्म शिणले
विटेवर युगे युगे हसले
सानथोर सगळे मनोमनि हेच हेच वदती !  ३
 
१५-७-१९७७
 

दामाशेटाचं गोणाईशी लग्‍न झालं दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. 
दामाशेटींना हरिभजनाचं वळण वाडवडिलांपासून मिळालेलं. पंढरपूर यात्रेचं गाव.  बाहेरगावी हिंडायला लागायचं नाही.  निष्‍ठेनं आपला उद्योग करावा आणि मुखी असावं देवाचं नाव. सकाळ संध्‍याकाळ रावळात दर्शनाला जावं पांडुरंगाचं श्रीमुख डोळेभरी पाहावं
 
पंढरीचा विठूत्‍याला भावभरे भेटू ! ध्रु.
 
विटेवरी उभा
कैसा चैतन्‍याचा गाभा
दर्शनाचे सुख जन पोटभर लुटू !१ 
 
सावळा सावळा
मनी भरुनि राहिला
बंधन हे गोड वाटे कधी न ये तुटू !२ 
 
दर्शन भोजन
तेच चित्‍तालागी स्‍नान
सुखाचे निधानत्‍याला पुन्‍हा पुन्‍हा भेटू !३ 



असा काळ चालला होता एकच सल होता. गोणाईची कूस उजवली नव्‍हती पोटी संतान नव्‍हतं. गोणाईने विचार केला की दीनांचा कैवारी केशीराज! जे मागायचं ते त्‍याला मागावं म्‍हणून ती रावळात गेली. देवाच्‍या पाया पडली आणि अगदी मनापासून त्‍याला म्‍हणाली
 
वेलीवर जसं फूल तसं मुल दे ! ध्रु.
 
तूच एक त्राता माझा
ऐक ऐक केशीराजा
द्यायचेच तर दान हेच हेच दे ! १
 
त्‍याच्‍या मनी भाव हवा
नामाचाच छंद हवा
दामवेद माझा बाळ नित्‍य घोकु दे ! २
 
हात जोडते जोडते
भीक मागते मागते
नवसाचे फळ मज आता लाभु दे ! ३
 
 卐
 
आई नाही बाबा नाही
देवाविण कोणी नाही ! ध्रु
 
बरी बसाया पायरी
तीच सोयरी धायरी
जनी तिथे ठेवी डोई ! १
 
नाव गाव सांगू काय
धरू विठ्ठलाचे पाय
तोच बाबा आणि आई ! २
 
दासी होईन होईन
सेवा करीन करीन
देवा ऐशी ऊब देई ! ३ 
 
 卐
 
म्‍हणे छोटा वीणेकरी
जय जय पांदुलंग हाली ! ध्रु
 
टाळ्या पिटत पिटत
वीणा छेडत छेडत
गर्जे पांदुलंग हाली ! १
 
लाल चुटुक पगडी
मूर्ति लोभस बोबडी
गाई पांदुलंग हाली ! २
 
हिररंगणी नाचता
रम्‍य शैशव हासता
विठू हासतसे गाली
नामा हासतसे गाली ! ३
 
 卐
 
देव जेवला हो
देव जेवला ! ध्रु
 
जेव ना रे देवा
ऐक ना रे देवा
बालहट्ट जगावेगळा ! १
 
अशी नाम्‍याची मात
खाली आला हात
हासला कसा सावळा 
 
हालला विठ्ठल
बोलला विठ्ठल
देव खरोखरी जेवला ! ३
 
 卐

नामयाचं लगीन
नामयाचं लगीन ! ध्रु
 
विठ्ठलाचा छंद
मुखे नाम ये गोविंद
हेच का लगीन १
 
देवासंगे बोले
नामा आनंदात डोले
पदी होत लीन ! २
 
विठू हाच पती
ऐसी नामा करी प्रीती
सदा भावलीन ! ३
 

नामा झाला वेडा
विठ्ठलाचा वेडा ! ध्रु
 
पाहावा विठ्ठल
स्‍मरावा विठ्ठल
कशाला ओढावा प्रपंचाचा गाडा ! १
 
नामा विठ्ठलाचा
विठ्ठल नाम्‍याचा
वाटते टाळावा विषयांचा राडा ! २
 
सुंदर ते ध्‍यान
हारपवी भान
नाम हे भोजन जेवतसे वेडा ! ३
 
 卐

प्रपंचाच्‍या संगे कोणा सुख झाले ?
मन नामयाचे विठ्ठलात रमले ! ध्रु
 
नामा हा उद्धव
ध्‍याई रमाधव
गोविंदाचे गुणीं मन हे वेधले !१
 
विटेवरी उभा
लावण्‍याचा गाभा
ध्‍यास सावळ्याचा मन ही सावळे !२
 
नाम विठ्ठलाचे
गान विठ्ठलाचे
सह‍जचि सुटले देहाचे ओवळे !३
 

नकोस पाहू माझी वाट
मी देवाचा झालो ! ध्रु
 
मनिं भरलासे विठू सावळा
व्‍यर्थ बोल तू तया लावला
घरास पुरता विटलो ! १
 
या ठायी तू मज सोडुन दे
विठाईकडे सोपवून दे
भेटीला तळमळलो ! २
 
हत्‍याराविणा जिवे मारले
मना माझिया नाहि जाणले
जलावीण तळमळलो ! ३  
 
 卐

मुखी नाम हाती वीणा
ऐसा करती संसार ! ध्रु
 
कोण आला कोण गेला
भान कोठले जीवाला?
सर्व विठूवरी भार ! १
 
नाही प्रपंचाची आस्‍था
धुंद होतात नाचता
घेती काळ्याचा कैवार ! २  
 
चाले विठ्ठलाचे गान
नाही लौकिकाचे भान
कोण पाळे शिष्‍टाचार ! ३
 
 卐

लोटक्‍यात घालून देव,  नामा सांभाळी विठ्ठला ! ध्रु
 
देव व्‍यापक व्‍यापक
परि मूर्तीचं कौतुक
देव रुपागुणांवेगळा हा प्रकार ध्‍यानि न्‍हाई आला ! १
 
नामा चालविता हट्ट
हृदिं धरी मूर्ति घट्ट
दिन रात कोठले भाननामा रावळी पडलेला ! २
 
वय वाढलं वाढलं
ज्ञान खुंटलं खुंटलं
जसा घाण्‍याचा बैल हो .. नामा सोडी न खुंटाला ! ३  
 
 卐

नामाचे मडके कच्‍चे  ! ध्रु
 
या या संतांच्‍या मेळी
कैसी असे खेळीमेळी
जाहले निदान रोगाचे ! १
 
थापटण्‍याचा आघात
देहभाव उसळुनि येत
लोटले प्रवाह अश्रुंचे ! २
 
भक्‍तीचा हा अवघड घाट
कोण गुरुविना दाविल वाट
गिरवणे पाठ नम्रतेचे ! ३
 
 卐
 
देव कुठे नाही ?
तो सकलां ठायी ! ध्रु
 
गुरु भेटला
देवच दिसला
देवच गुरु होई ! १
 
चरण धरले
पूजन घडले
नुरे अहं काही ! २
 
नयनी अंजन
भवभयभंजन
शुद्ध बुद्ध होई ! ३
 
 卐

आता उजाडले मज,
इथे हरी! तिथे हरी ! ध्रु
 
जग त्‍याने कोंदले
मनिं पुरते बिंबले
गुरुकृपा मजवरी ! १
 
देव खरा कळला
करुणाघन वळला
निजदेही पंढरी ! २
 
विठू न केवळ मंदिरी
चराचरी भरतसे हरी
सर्वव्‍यापी श्रीहरी !  ३
 
 卐
 
नामदेव कीर्तन करी –
पुढे नाचतसे श्रीहरी!ध्रु
 
वाजत पखवाज
नाद करित झांज
रमती वारकरी ! १  
 
राहवे न पोटी
धावला विठू वाळवंटी
भक्‍ती रिंगण धरी ! २  
 
जनी हि गलबलली
आपुली काया लोटियली
तना कोण सावरी ! ३
 
 卐

तुझं येडंबागडं लेकरू
हट्ट मी कोणापाशी धरु ध्रु
 
उन्‍ह तापले तहान लागे
दे जल मजला इतुके मागे
बघतो धरणे धरू ! १
 
प्राण जणू कंठांशी आले
निर्वाणीचे ठाण मांडले
म्‍हणतो भजना करू ! २  
 
घे जलरूपा तहान भागव
संगे ज्ञाना धर रे आठव
मिनत्‍या किति रे करू  ३
 
 卐
 
कीर्तन ऐसे रंगलं
देवानं देउळ फिरवलं ! ध्रु
 
नामा जरी पाठमोरा
देव ये सामोरा
अघटित अद्भुत घडलं ! १
 
अभिषेक गाभा-यात
महादेव भजनात
शिवरात्री शिव घडलं ! २
 
ज्ञान भक्‍तीचा संगम
गंगायमुना संगम
नागनाथास कीर्तन भावलं ! ३
 
 卐

वाटते उदास ज्ञानदेव जातो
ज्ञानदेव जातो – प्राणसखा जातो ! ध्रु
 
व्‍याकुळती प्राण
विठो तुझी आण
माध्‍यान्‍हीच सूर्य अस्‍ता कैसा जातो
 
खंत हीच वाटे
प्रेम कैसे आटे?
माऊलीच्‍या साठीं जीव पाखडतो ! २
 
मनी वेगळे हे
जगावेगळे हे
जिवाचा विसावा अज्ञातात जातो ! ३
 
 卐
 
ही भाग्‍याची वेळ नामया  -
ऊठ ऊठ झडकरी ! ध्रु
 
कुणी न येते
कुणी न जाते
नितनूतन अन् पूर्ण सनातन
आत्‍मतत्‍त्‍व धर उरीं ! १
 
नको खेद रे
खंत नको रे
निवृत्‍तीही ढळला जर का
स्थैर्य कवण पत्‍करी 
 
कर घे हाती
चाल संगती
ज्ञानीही जर करती खंती
जगबुड झाली खरी ! ३
 
 卐
 
गेल्‍या ईश्‍वरी विभूती
राहिल्‍या त्‍या कीर्ती ! ध्रु
 
पाहुणेच ते या जगती
अलिप्‍तता ऐसी चित्‍ती
जगत् परि करते खंती ! १
 
सांगतील ज्ञान ऐसे
कोण ज्ञानदेवा ऐसे
विवेकाच्‍या ज्‍योती ! २
 
मुक्‍ताईची गाता गाथा
वाणी वरते मूकता
नामा राहिला शेवटी ! ३
 
 卐

अभंग नामदेवाचा
गाता धन्‍य धन्‍य वाचा ! ध्रु
 
देवाशी खेळावे
देवाशी भांडावे
लागे लळा खेळियाचा ! १
 
भजनीं रंगावे
कीर्तनि नाचावे
छंद लावी नामाचा ! २
 
विठ्ठल ये कानीं
विठ्ठल ये नयनी
हा चमत्‍कार संतांचा ! ३
 
 卐
 
पांडुरंग भेटीसाठी पंचप्राण कंठी येती –
बळ सारे हारपले देह लोटोनियां देती!ध्रु.
 
भाववेडा नामदेव
स्‍मरू लागे ज्ञानदेव
अदृश्‍याची ओढ जीवाआतां पाहिजे विश्रांती ! १  
 
आता पावलो पंढरी
दिसे सावळा श्रीहरी
वृत्‍ती झाल्‍या अंतर्मुख नाही उरली आसक्‍ती ! २
 
आषाढाचा धुंद मास
लावी वेधु मानसास
मूळ आले माहेराचे बाहे चैतन्‍याची मूर्ती ! ३
 
चिरा पायरीचा व्‍हावे
संतें वरी पाय द्यावे
काय पाहिजे आणीकनको स्‍वर्ग नको मुक्‍ती ! ४
 
धाव पाव गे विठ्ठले
प्राण माझे व्‍याकुळले
आधारास दे गे हात हाका तरी मारू किती ! ५   
 
 卐
 
अरे पायरीच्‍या चिऱ्या 
तुला कोटिदां प्रणाम ! ध्रु
 
कथा अवघ्‍या अंगी गोड
केलिस विठ्ठलाची जोड
पायी बांधुनी घुंगरु
गासी देवाजीचे नाम ! १
 
वीणा तारा झांकारती
चिपळ्या साथ सुंदर देती
गासी नामाचा त्‍वां देव
भक्‍त कुळा तू ललाम ! २
 
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जगी
अरे ज्ञानियाच्‍या सख्‍या
मोले घेतलास श्‍याम ! ३
 
 卐

विठ्ठल विठ्ठल नाम घेता नामदेव जागे
मन्‍मनी नामदेव जागे
असे जाणवे एका वेळी विठ्ठल पुढती मागे ! ध्रु
 
नामासाठी जो अवतरला
नामी रमला नामे तरला
भक्ति वेढिते देवाभवती चिवट रेशमी धागे ! १
 
भाव ओतला मूर्ति हालली
नाम्‍यासाठी दूधही प्‍याली
अगाध लीला देवाजीची पिढी पिढीला सांगे ! २
 
मनास नामे उलटे केले
आत वळविले आत रमवले
सोहं अनुभव येत भाविका सहज समाधी लागे 
 
 卐

नामया देशिल का सहवास ध्रु
 
संगे बोलू
संगे चालू
तीर्थे बघणे हीच मनीची
पुरवशील ना आस ?
 
नाना तीर्थे
विविध दैवते
श्रीहरि नटला परोपरींनी
त्‍या बघण्‍याचा ध्‍यास !२  
 
देह झिजू दे
देव दिसू दे
आलस्‍याचे सुख ते कसले
आयुष्‍याचा ऱ्हास!

 

Monday, November 11, 2024

सांब सदाशिव पाव मला!

ॐ नमः शिवाय 

हे करुणाकर, पापतापहर, 
निरंजना अवनीपाला! 
सांब सदाशिव, सांब सदाशिव, 
सांब सदाशिव पाव मला!ध्रु.

कधी स्मशानी तू वसतोसी!
नगाधिराजा तू भूषविसी
अशिव नाशिणे मदनदाहका 
हे गंगाधर तव लीला!१ 

नागभूषणे कंठी रुळती 
वेध लाविते निश्चल मूर्ती 
चंद्रकोर भाळी तव झळके
हे उमावरा वेल्हाळा!२ 

तू नंदीला वाहन केले 
हालाहलाते कंठी धरिले 
हसत साहल्या सकल वेदना
तोषविलेसी जगताला!३ 

डम डम डम डम डमरू वाजे 
त्रैलोक्यी तव महिमा गाजे 
आदिनाथ तू, आदिगुरू तू 
मुनिजन करिती स्तवनाला!४

स्मशानातली रुचे विभूती- 
दिगंबरा तुज वरे विरक्ती 
अर्धांगिनि शोभली पार्वती 
रुचे तुला गायनी कला!५
 
त्रिशूलधारी, त्रिनेत्रधारी 
भक्तजनांचा तू कैवारी 
जे शिव मंगल ते रुचते तुज 
कर्मफुले वाहिन तुजला!६

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
५.१/०७.०१.१९७६

Wednesday, November 6, 2024

मेळ न मुळी बसेना!

जय जय रघुवीर समर्थ

अगणित शास्त्रे शोधू जातां-
निश्चय एक दिसेना
मेळ न मुळी बसेना!ध्रु.

वृथा भांडती वृथा तंडती
सकल आंधळे एकच हत्ती 
विविध विधाने, विविध दर्शने
निर्णय एक ठरेना!१ 

अभिमानासी कारण मिळते
ज्ञान तेवढे लपूनि बसते
अंधाराच्या कृष्णाकाशी 
वाव न प्रकाशकिरणां!२ 

गुरुकृपेने प्रबोध होतो 
अहंभाव तै लोप पावतो
गती मनाची कुंठित होता
गहन अर्थ ये मौना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.०७.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे। 
जया निश्चयो येक तोही न साहे॥
मती भांडती शास्त्रबोधें विरोधे
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधे॥


शोधू गेल्यास शास्त्रे पुष्कळ आहेत. पण त्यांचा एकही निश्चय नाही. शास्त्राचा परस्परविरुद्ध अर्थ करून मताभिमानी लोक भांडत असतात. परंतु ज्ञानाचा यथार्थ बोध होऊन मतिप्रकाश झाला म्हणजे मनाची गति कुंठित होते.

Tuesday, November 5, 2024

बोल तुझे तत्त्वाचे, ठरत जगति फोल!

जय जय रघुवीर समर्थ

बोल तुझे तत्त्वाचे, ठरत जगति फोल!ध्रु.

पंडित तू जगि ठरशी
गर्व मनी साठविशी
मी मोठा! हे सुचवत बडविशि जर ढोल!१

अंतरात मळ साठत-
रामचंद्र नाहि दिसत
क्रियेवीण बडबड तव काय तिजसि मोल?२

सुविचारे हो सावध 
षड्रिपूंस करि गारद 
कर्तव्या करित, भजन गात गात डोल!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.१०.१९७४

खालील श्लोकावर आधारित काव्य.

फुकाचे मुखीं बोलता काय वेचे 
दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे॥ 
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे 
विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे।।

फुकटचे (तत्वज्ञानाच्या गोष्टी) बोलण्यात काय खर्च होते? काही नाही. दिवसेंदिवस अंतरात मात्र गर्व साचत जातो. कृतीविना बडबड व्यर्थ आहे. विचारानेच तुझा तूच सर्व शोधून पाहा.

Monday, November 4, 2024

स्वरूप- चिंतन अर्थात् स्वरूप गीता

ॐ तत् सत्

स्वरूप- चिंतन अर्थात् स्वरूप गीता

श्रावण शु.११ १८९६

स्वामी अत्यवस्थ असल्याचे कळल्यावर निर्माण झालेली आंदोलने.
प्रत्यक्ष निर्याण १५ ऑगस्ट १९७४ श्रावण वद्य १२ शके १८९६ गुरुवार सकाळी ९.


कृतज्ञता!

श्रावण शु. ११ शके १८९६! सोमवारचा दिवस ! मनाला फार हुरहूर लागून राहिली होती. बहुतेक स्वामी भक्त मिळेल त्या वाहनाने पावसला गेलेले. अत्यंत असहाय वाटले- कर्तव्यात लक्ष लागेना.
मनी उसळलेले कल्लोळ जाता येता उतरवीत गेलो. मन शांत शांत होऊ लागले.

मला पुण्यातच त्यांचा सहवास लाभण्याचा सुयोग असावा!
यात मांझे काहीच नाही! सर्व काही सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांचे!

लेखन समाप्ती कृष्णाष्टमीला! आणि साक्यांची संख्याही नेमकी १६२! सर्वच काही विलक्षण!

खरोखर श्रीगुरुलीला अतर्क्यच म्हणायला हवी. सर्व स्वामी भक्तांना ही स्वरूप गीता शांतिदायक, पुष्टिदायक उत्साह संवर्धक होऊ दे हीच श्रीस्वामी चरणी प्रार्थना!!

मी कृतज्ञ आहे! 
ॐ तत्सत् सोऽहं हंस:

- श्रीराम बाळकृष्ण आठवले 

+++++++++++++++++++
हरि:ॐ

"देह नव्हे मी "मनीं ठसू दे 
स्वामी शिकवा आम्हां 
"सोऽहं, सोऽहम्" ज्ञान होउं दे 
धरितों अपुल्या चरणां! १

卐 

ज्ञान माउली अपुल्या रूपें 
पावस नगरा आली!
शिकवण ठरलें अवघे जीवन 
देहिं अहंता नुरली!२

卐 

शब्दाविण जप अम्हां शिकविला 
चित्त कराया शुद्ध!
स्थिरावतां मन सोऽहं ध्यानी 
नुरला कोणी बद्ध !३


राम कृष्ण हरि मंत्र आपुला 
उच्चारित राहूं !
सगुणीं तैसे निर्गुणिं अपणां 
गुरुदेवा पाहूं !४


देह विनाशी जाइल जावो 
अम्हां आकळो आत्मा!
जो अज-अव्यय - सर्वव्यापी 
तोच तोच परमात्मा!५


स्व-रूप चिंतन करितां करितां 
ऐसें तन्मय व्हावें ! 
मनासि मनपण उरलें नाहीं 
हेच प्रत्यया यावें!६


अश्रू आले जरि नयनांतुनि 
परी तयांची दीप्ती! 
कथील जगतां या बिंदूतही 
दयासिंधुची वसती !७

卐 

"जितकी भक्ती तितकी प्राप्ती"
सद्‌गुरुनी म्हटलेले!
सोऽहं साधन प्रखर व्हावया 
प्रेरक तें ठरलेले!८

卐 

अंतर्यामी येउनि स्वामी लिहवुनि 
कांहीं घ्यावे!
लिहिता लिहितां मलाच नकळत 
उन्मनपण लाभावें!९

卐 

निजकर्तव्या द्यावी निष्ठा 
चराचरावर प्रेम!
विरक्तिविषयीं दृढ अनुरक्ती 
भावभरें द्या क्षेम !१०

卐 

व्यक्तित्वाते वाहियले पदि 
सांभाळा मज आतां !
उठता बसता रहा पाठिंशी 
स्वामी स्वरूपनाथा!११

卐 

देहीं कधिं मन नच गुंतावें 
इतुकें द्यावें दान !
वैराग्याची हीच एकली 
दिसो जगातें खूण!१२

卐 

जायचेच जर म्हणतां आपण 
जावें संतोषाने! 
कृतार्थ झालें अवघे जीवन-
नरजन्माचे सोनें!१३

卐 

अम्हां साधकां हसवा, रिझवा
जातांनाही स्वामी!
हृदयोंहृदयी यावे देवा- 
निरंतरी परि स्वामी!१४

卐 

पांचा भूतीं ऋण जे दिधले 
आज भार का होते? 
शिकविलेत तें कळुनी सगळे 
थोडेही नच वळते!१५


ज्ञानमाऊली घरां चालली -
आळंदीला दाटी!
भर माध्यान्हीं भानु मावळे
तमें ग्रासली सृष्टी!१६

卐 

श्रावणातल्या अमृतधारा- 
संपविती तापाला! 
"अमृतधारा" तशा आपुल्या 
संजीवक हृदयाला!१७


जगदंबेचा कुमर लाडका 
साद घालतो "आई!" 
तीही त्याला धरूनि हृदयीं 
पान्हा पाजत राही!१८


'दत्त-अंश' जो अपुल्या 
मधला हाच देतसे बोध !
सुख-निधान तर वसे अंतरीं 
तुझा तूंच घे शोध!१९


कां बावरसी ? विव्हळ होसी ?
खुळ्याच माझ्या जीवा ! 
हे शिकलासी परमार्थी का ? 
शांत शांत हो जीवा !२०

卐 

मी नच गेलों, विश्वी भरलों 
डोळे मिटुनी पाही !
सोऽहं सोऽहं तुला आंतला 
देइल याची ग्वाही!२१

卐 

तूं म्हणजे मी, मी हि तोच तूं 
यासि म्हणावें ज्ञान !
अद्वैताचा घेई अनुभव करी 
सुधारस पान !२२


उघडी डोळे, हांस जरासा 
प्रसन्न मुद्रा व्हावी !
तूं स्वरूप, आनंद तूंच ही 
वृत्ती तनि बाणावी!२३

卐 

देई प्रेमा, घेई प्रेमा 
लूट लूट आनंद !
तुझ्याच हृदयीं प्रसन्न हांसे 
आनंदाचा कंद !२४

卐 

मतिमंदचि जो शोक करी तो 
देहाच्या अंताचा !
शोध घ्यायचा तुला परंतू 
व्यापक चैतन्याचा! २५


स्व-स्थ राहुनी अपुल्या स्थानीं 
भजनीं रंगुनि जावें!
दया-क्षमा-शांतींनी तेव्हां 
अंतरि वसण्या यावें!२६

卐 

स्वीकारावी स्वामी आपण 
भावफुलांची माला!
शब्द आपुले रस हि आपला 
गंध आगळा आला ! २७

卐 

मार्दव द्या हो, द्या निर्मलता
हिमालयाचे स्थैर्य!
भक्त आपला संकटांतही
सदैव राखो धैर्य!२८

卐 

तोल मनाचा मुळि न सांवरे 
द्या श्रद्धाबल स्वामी !
मलिन मानसा निर्मल करण्या 
अम्हां गुंतवा नामीं!२९


मन हे वेडें किति भिरभिरतें 
अगणित गोते खातें!
पाऱ्याहुनिही अधिक निसटतें 
केवळ फरफट होते!३०


आत्मा अमुचा कधि न खचावा
हिंमत ऐसी यावी !
शीलरक्षणा प्रगाढ भक्तचि 
प्राण पणाला लावी ! ३१

卐 

वासुदेवमय विश्व आपणां 
कसें जाहले स्वामी?
मरणावरही उत्कट प्रेमा 
कैसा केला स्वामी!३२

शरण शरण मी आलो अपणां 
चरणिं ठाव द्या स्वामी!
कुरवाळा मुख, स्नेह दृष्टिनें- 
रिघा अंतरी स्वामी!३३


ताटी उघडा स्वरूपनाथा  
कितितरि दाटी झाली! 
एकदांच तरि द्या दर्शनसुख 
'मुक्ता' दारी आली!३४

卐 

निज देहाचा मोह मिटू दे 
वितरा आत्मानंद ! 
अनुग्रहाने मनास जडु दे 
सोऽहं सोऽहं छंद!३५

卐 

स्वरूप ज्ञानदा, स्वरूप ज्ञानदा' 
समीकरण हे रुजलें!
ज्ञानाईने मुक्त करांनीं 
ज्ञानधनासी लुटलें!३६

卐 

जीवितवैभव तुमचें अवघे-
काय तुम्हांसी द्यावें? 
गुरुस्वरूपा, ईशस्वरूपा 
"दर्शन" कैसें घ्यावे?३७

卐 

सोऽहं सोऽहं प्रेमसूत्र परि 
तुम्हीच हाती दिधले!
हृदय बंदिशालेंत आपणां 
स्थानबद्ध जणु केले!३८

卐 

'स्पर्श' हि आपण, दृष्टी आपण 
'रस' झाला गुरुवर्या !
'श्रवण' हि आपण, गंध हि आपण 
सर्व सर्व गुरुवर्या !३९

卐 

चैतन्याहुनि भिन्न दिसे जे
तो सगळा आभास! 
आत्मारामचि असे विनटला 
दिसे ज्ञाननयनांस!४०

卐 

सूत्ररूप आदेश असे जो 
महावाक्य त्या म्हणती ! 
जप ना करणे कधी तयाचा 
तशी बनावी वृत्ती!४१

卐 

नव्हें देह मी, विश्वरूप मी 
उंच उंच विहरावें ! 
नच दुर्बळ मी, नव्हे रुग्ण मी 
तट सारे लंघावे !४२

卐 

देहासक्ती दुःख देतसे 
मनास करिते मूढ 
"स्वरूप-गीता" परि उकलिते 
जें जें गमतें गूढ !४३

卐 

आत्म-पणे नांदणे आपणां 
सर्व ठिकाणी ठावें ! 
जन्म न ज्या त्या मृत्यू कैसा 
वृथा कष्टि कां व्हावें?४४

卐 

पुन्हा पुन्हा ही कढत आसवे
पाझरताती गाली! 
छे! छे! गंगा तनामनाच्या 
मळास सगळ्या क्षाळी!४५


कृतज्ञ आम्ही स्वामी अपुले 
सावध ऐसें केलें!
ध्यान- ध्येय-ध्याता ही एकच
सहजपणे दाखविलें!४६

卐 

स्वामी! स्वामी ! अंतर्यामीं 
"रामकृष्ण हरि" स्वामी! 
स्वामी ! स्वामी! 'सोऽहं, सोऽहम्
भाव हि आपण स्वामी!४७

卐 

मऊ मेणाहुनि करा अम्हांतें, 
वज्राहुनही वज्र! 
देहभाव विच्छिन्न कराया
द्या सोऽहं तरवार!४८

卐 

सोऽहम् खड्‌गहि असे आगळे
नच तोडी परि सांधे!
सूत्र असे जरि, कधीहि ना परि
जिवास मोहीं बांधे!४९


जो जो बुडला येथे तरला 
अशी भक्तिची गंगा! 
जो गहिवरला तो तर फुलला
आवडला श्रीरंगा!५०

 卐

तापहीन मार्तण्डहि आपण 
चंद्र अलांच्छन स्वामी! 
निशिदिनि बरसा प्रकाशधारा 
चकोर झालो आम्ही!५१


रामकृष्ण हरि! रामकृष्णहरि! 
राम कृष्ण हरि गाऊ! 
अम्ही गोपिका "स्वरूप - कृष्णा"
भावफुले पदि वाहूं!५२

कृपावंत सद्‌गुरु लाभला- 
स्वरूपनाथा तुम्ही!
असंख्य लहरी आम्ही उसळत्या 
नीलगगनि शशि तुम्ही!५३

卐 

उठता बसता, ज्ञाना ध्याता
ज्ञानदेव जणु झाला!
वात्सल्याने, हळुवारपणे 
घास भरविले बाळा!५४


विदेहत्व देहीच पावला
पर-तत्त्वा देखियले!
भोग-मोक्ष अर्पिले हरीला 
ऋणी तयासी केले!५५

卐 

आत्म-ज्ञानी अमर जाहला 
कधी न काळा भ्याला!
पुनः पुन्हा लावियला ओठां 
आत्मसुधेचा प्याला!५६

卐 

माझे माझे म्हणुनि वाहिले 
शिरावरी जर ओझे!
दुःखच आपण मोल देउनी 
विकत घेतले चोजें!५७

卐 

प्रारब्धाची फेड न चुकते 
सत्पुरुषा ही जगती! 
शांत, दांत तो स्वस्थ निरंतर 
रमे सदा एकांती!५८


लेखणीतुनी झरति अक्षरे 
ती तर अपुले बोल!
मंत्रमोहिनी घालुनि भारुनि 
जिवा आणती डोल!५९


उणे न काही अपणालागी
निवांत ठायी बसता! 
अद्वयत्व खंडिता न हलके
मधुर द्वैत अनुभविता!६०

卐 

प्रातः संध्या, सायं संध्या 
स्वरूप-चिंतन झाले!
कृपा आपली उदार ऐसी 
मजला अपुला म्हटले!६१


नेति, नेति जर वेद बोलले 
तिथे काय मी बोले?
शुक मी केवळ अपुला स्वामी 
व‌दविलेत ते बोले!६२


सर्वस्वाचे दान कराया
दान वृत्ति द्या आम्हां!
अहंपणाचा बंध तोडण्या
तीक्ष्ण शस्त्र द्या आम्हां!६३


स्वरूप-महिमा गाता गाता 
शब्दावाचुनि अडले!
मनास आला मोहक थकवा 
मौनच मग आवडले!६४

卐 

स्वामी अपुले चरण पाहता
काळाचे भय सरले!
देहाचा संबंध कोठला? 
अलिप्तपण ते कळले!६५


आले अश्रू लाज न आम्हां 
हांसू नाचू गाऊ!
अत्र-तत्र - सर्वत्र आपणा 
गुरुकृपेने पाहूं!६६


दुःखी कष्टी खिन्न न होणे 
विषयलाग तोडावा!
अनित्य जे ते होते जाते 
बोध ठसावा बरवा!६७

卐 

विवेक आणिक वैराग्याचे 
स्वामी द्यावे दान! 
कोण मी असे? करू काय मी?"
याचे व्हावे भान!६८


रामकृष्ण तुम्ही, रामतीर्थ तुम्ही
अक्कलकोट निवासी!
कबीर आपण, मीरा आपण 
रामभक्त श्री तुलसी!६९

卐 

सोऽहं, सोऽहं, दिड् दा, दिड् दा 
दिड् दा, सोऽहं सोऽहम्! 
हृदयतंत्री ही गाऊ लागली
सोऽहम् सोऽहम् सोऽहम्!७०

卐 

गुरुदेवा हे कळून आले 
सद्‌गुरु नसतो देह! 
शुचितेचे ते, आनंदाचे 
प्रसन्न हसरे गेह!७१

卐 

सद्‌गुरु असते तत्त्व आगळे 
सुदृढ करि जे सत्त्व!
सद्‌गुरु असते स्थान असे
ज्या स्वयंसिद्ध तीर्थत्व!७२

卐 
 
स्वरूपेश, ज्ञानेश, महेशा 
शिकविलेत हे तत्त्व!
अजर-अमर मी, आनंदी नित 
लक्ष्य हेच पूर्णत्व!७३

卐 

भक्तीलागी ओढ लागली 
सहजपणे ज्ञानाची!
ज्ञानाला ही कळली गोडी 
मधु-मधुरा भक्तीची!७४

卐 

हृदयामधि ज्या होत्या खंती 
सनया त्या झाल्या! 
"स्वरूप-गीता" प्रेमभराने
आळवित्या झाल्या!७५

卐 

स्वरूप-देवा स्वरूप-सुमने
स्वरूप होउनि वाहू!
स्वरूप-सूर्या स्वरूप - नदिचे
स्वरूपार्घ्य वाहू!७६

卐 

आत्म वस्तु जी असते केवळ
तिथे काय बोलावे?
स्वयंसिद्ध जे त्याविषयी का 
वृथाच शंकित व्हावे?७७


बावरते मन, झरती लोचन 
कंठ किती तरी दाटे!
आत्मबुद्धिला स्वरूपनाथा 
फुटू न द्यावे फाटे!७८


वाणी मजला होत अनावर 
कशास घालू आळा?
सजतो जर हा गेंद फुलांचा- 
कशास गुंफूं माळा?७९


चंद्र चांदणे पांघरितो परि
एकपणा लोपेना!
भक्त पूजितो जरि भगवंता 
अद्वयत्व, खंडेना!८०

卐 

येथे कोणी गावे कोणा 
पूजावे तरि कोणी? 
जरी उसळले तरी मिसळते 
पाण्यामध्ये पाणी!८१


चुकतो आम्ही, ठेचकाळतो 
क्षणैक विव्हल होतो!
ध्येयध्रुवावर दृष्टि ठेवुनी 
पथ पुढचा परि क्रमितो!८२


जरी गुंतलो देही आम्ही
बुडालोच संदेही!
समाधान मग कुठले लाभे
भाव-भक्ति जर नाही!८३


समस्त जावुनि दोष आमुचे 
चित्त करा हो शुद्ध!
कधी थोपटा कधी धोपटा
तरीच होऊ सिद्ध!८४

 卐 

धोपटाल परि कैसे आम्हां? 
लोण्याहुनि मऊ तुम्ही!
अन्य देह जरि पोळत तापे 
झणि कळवळता तुम्ही!८५


हे हिमगौरा, गुणगंभीरा 
मुसावल्या सौंदर्या!
तुझ्याच प्रतिमा असति उमटल्या
जितक्या अमुच्या चर्या!८६

卐 

परा शांति देतसा भाविका 
गौरव किति वानूं?
ब्रह्मरूप जाहल्या आपणां 
घरी कसे आणू?८७


भावविवश का होतो आम्ही?
मन सुस्थिर का नाही?
आपण असला परीस तरीही
लोह न आम्ही काही!८८


परीस ज्याते स्पर्श करी ते
लोह होतसे सोने!
संत ज्या परी सहजचि स्पर्शे 
सपदि संत हो तेणे!८९


स्थूलांतुनि सूक्ष्मांत पदोपदि 
प्रवास अपुला चाले! 
"स्वागत करितो, अंतरि यावे" 
भाविक प्रेमें बोले!९०


अम्हीच बनलो स्वरूप ज्या क्षणि 
विश्व विष्णुमय झाले! 
आम्हीच बनलो "स्वरूप" तत्क्षणि
मरण अमरपण ल्याले!९१


द्वैताचा आभास मावळे 
अद्वय उदया आले! 
मलयानिल वाहता रुणझुणा 
चंदन गंधित झाले!९२

खूण मौन जरि असली तरिही 
वटवट अमुची चाले! 
खटपट सगळी शांतीसाठी 
म्हणून मन बडबडले!९३

卐 

बोलविता धनी असे वेगळा 
हेंच जाणुनी बोलू!
सूत्रे विधिकरि अम्हीं बाहुल्या 
हांसू नाचू डोलू !९४


प्रवेश अमुचा स्व-रूपी होता 
ठायी बसू निवांत ! 
ज्योत प्रीतिचि राहिल तेवत 
सुमंद आणि प्रशांत!९५ 


आम्ही अपुले, आपण अमुचे 
झालो एकाकार! 
सोऽहं सोऽहं ध्वनी अनाहत- 
दुमदुमवी प्राकार!९६

卐 

आघाताने अशा तीव्रतर 
सुख-फल हाती आले!
रडणे झाले सुखद सुखदसे 
स्मित सुमनांचे झेले!९७

卐 

आत्म-रूप सर्वत्र दिसूं दे 
दिव्या दृष्टी द्यावी!
कंटकपथिं चालतां अम्हांसी 
कंटक सुमनें व्हावी!९८


स्वरूप - साक्षात्कार होउ दे 
देहाहंकृति जावो !
अपुल्या चरणी अवखळ मानस 
लडिवाळासम राहो!९९

卐 

शिरावरी जरि आले घाले 
हासत हासत साहूं!
गळ्यांत पडले पुष्पहार तरि
तटस्थतेने पाहू!१००

卐 

सद्‌गुरू असता उभा पाठीशी
कशास करणें खंत ? 
दाखवीतसे अंतरांतला 
प्रसन्न श्री-भगवंत!१०१

卐 

गंगेमाजी जलौघ मिळतां 
गंगा होउन राही! 
आम्हीं मिळलो तसे स्व-रूपी
भिन्नभाव मग नाही!१०२ 

卐 

असू शरीरी, नसू शरीरी
देह- बंध ना आम्हां!
घटात जे जल, सागरि ते जल 
एक एक परमात्मा!१०३

卐 

हंसच आम्ही परमविवेकी 
क्षीर तेवढे घेतो!
नीर न मोही क्षणभर आम्हां 
सार तेवढे घेतो!१०४


किति सांगावे, किति बोधावे
शिवे न कधि कंटाळा! 
देतां वाढे आत्म-बोध परि 
देहबुद्धिसी टाळा!१०५

卐 

काया गेली म्हणाल कोणी 
रडाल धाई धाई! 
हसेन दाटुनि करुणा पोटी
माय कधी का जाई?१०६

卐 

ज्ञान-माउली गेली कां कधिं? 
ती आहे सुखरूप! 
तसे पहावे मला अंतरी 
भोगा शांति अमूप!१०७

卐 

अपुले असते अपुल्या पाशी- 
हवी कशाला काशी? 
गंगा-यमुना झरती नयनीं 
संगम हो हृदयाशी!१०८

卐 

"आनंदाचे लाडू खातों!" 
तुकया सांगे जगतां!
देहासी कां कवटाळुनि मग 
ध्यानि न घेत अनंता!१०९

卐 

रडे लेकरू मातेला तधि 
येत अनावर भरते!
हसे लेकरू तदा माउली 
प्रसन्न गाली हसते!११०


वदनावरती शरद - पौर्णिमा
सदा सदा विलसावी
अज्ञानाची अमा-काजळी 
सदा सदा निरसावी!१११


जनी जनार्दन, मनी दयाघन
नयनी श्रावण यावा! 
ऊन कोवळे, सरसर शिरवे
हवा वचनि ओलावा!११२


गीता-मुरली श्रीकृष्णाची 
पुन्हां पुन्हां ऐकावी!
सोऽहंचा स्वर पडतां कानी
विवेक वाणि फिटावी!११३

卐 

जीव तळमळे, सुशांत 'शिव ' परि 
निवांत ठायी बैसे ! 
जिवा-शिवांचे मीलन होतां
अमृतधारा वर्षे!११४


पूजितसे परि मी कवणाला? 
माझी पूजा चाले! 
मीच आजला माझ्या कानी 
माझे गाणे श्रवले!११५

卐 

एकान्ताची मला आवडी 
अंतर्मुख मी होतो! 
डोळे मिटुनी हृदयस्थासी
श्रीविष्णूसी बघतो!११६

卐 

मी ध्रुव, झालो, नारायण मी 
नारद मुनिवर तो मी 
प्रल्हादहि मी कयाधु माय हि 
नारसिंह ही तो मी!११७

卐 

दाता आणिक याचक बनता 
आपण एकचि वेळीं!
हसत पहावे जगी वाढते 
कैसी खेळीमेळी!११८

卐 

यन्त्रालय मी, रुग्णालय मी 
विद्यालय ही झालो!
रणाङ्गण तसे व्यासपीठ ही 
न्यायालय मी झालो!११९ 


दुष्टावा का जगात चाले ?
प्रेमभाव का लोपे?
दृष्टी बदला - जाणवेल की 
देव कधी नच लोपे!१२०


सद्‌भावासी करु आवाहन - 
कृतज्ञतेसी पूजू!
आपण मनिच्या तिमिरासंगे
सावध होउनि झुंजू!१२१

卐 

 भगवंताच्या इच्छेवाचुनि 
पान न एकहि हाले!
माय शिकविते म्हणुनि लेकरू 
अर्धस्फुट से बोले!१२२


दुःखी होता आपण अपुल्या 
मनास द्यावा धीर!
तोल जर सुटे हात देउनी 
मनास करू सुस्थिर!१२३


सागर आपण, लहरी आपण 
चंद्र तशी शशिकिरणें! 
मायहि आपण, अर्भक आपण
एकपणे अनुभविणे!१२४


कशास आता रुसवा-फुगवा? 
उणे दुणे काढावे?
देता घेता प्रेम स्वर्णमय 
उदंड से वाढावे!१२५

विषयांतर ही मना मोहवी 
बरवा "विषय" त्याग 
मुक्त हिंडणे शिकवित जीवा 
ईश्वरीय अनुराग!१२६

卐 

भंडाऱ्यावर जाउनि गावा 
श्री तुकयाचा गाथा! 
ओवी गाता ज्ञानेशाची 
"नम्रोन्नत" हो माथा!१२७

卐 

करणी केली कुणी म्हणावी? 
मीरा वेडी झाली!
कोण साधिका मुरली होउनि 
श्रीहरिच्या करि आली?१२८

卐 

वेड शहाणे असते हरिचे
वेडे गाणे स्फुरते! 
वेड भक्तिचे जिवा लागतां 
मानस शिवमय होते!१२९

卐 

सागरपृष्ठावरी उसळती 
लाटांवरती लाटा!
दृष्टी फुटतां अंधालागी 
उलगडताती वाटा!१३०

卐 

धनंजयाची नसे न्यूनता
एकमेव भगवंत!
कुरुक्षेत्र प्रतिचित्ती असते- 
माधव गीता गात!१३१

卐 

कान हवा परि हे ऐकाया, 
हवी तीव्र जिज्ञासा! 
पार्थ हि आपण, माधव आपण 
लक्ष देउनी परिसा!१३२

卐 

देहोऽहं ची सरता भ्रांती 
सोऽहं सोऽहं स्फुरते ! 
अहं हि अलगद गळून पडता 
"तो केवळ" हे उरते!१३३

卐 

थकवा आला जरी तनाला 
मन राही उत्साही! 
जो थकतो तो नव्हेस तू रे 
तूंच आपणा पाही!१३४


मरण आपुलें पाहुनि डोळा
शंभू फुलुनी आला! 
मरण-सोहळा परी तयाचा 
सार सांगुनी गेला!१३५


शरीर मृण्मय दिसते चिन्मय
आत्मसूर्य जधि तळपे! 
आत्मसूर्य परि तया सोडिता 
ठायीच ठायी करपे!१३६

卐 

तथागतांच्या मुद्रेवरचे 
मंद हास्य जे ते मी!
येशू ख्रिस्ताच्या नयनींचे 
कारुण्य हि जे ते मी!१३७

卐 

गोळ्या घुसल्या शरीरात जधि
'रामा' चिंतित होतो!
"क्षमा तयांना.. असे अनंता 
तेव्हां प्रार्थित होतो!१३८


फास फळीवर उभे राहू‌नी  
मीच चुंबिले फांसा!
अनंत मरणे जगुनि घडविले
भारतीय इतिहासा!१३९

卐 

सुवासिनींच्या कुंकुमतिलकामध्ये - 
माझा वास!
प्रसन्न शैशव जे हसते ते- 
माझा सर्व विलास!१४०


हताश होणे शोभत नाही
पौरुष प्रेमी मनुजा! 
दया जयाच्या हृदयीं वसते 
क्षमा तयाची तनुजा!१४१

रहस्य भगवद्गीतेचे मी
कथितो या शब्दांत!
"देहोऽहं नच सोऽहं, सोऽहं"  
वागविणे ह्रदयात!१४२


ईशकारणी पडली तनु जर 
सतेज कांचन झाले!
झिजता झिजतां खोड चंदनी 
अधिक सुगंधित झाले!१४३

卐  

नमितों योगी थोर विरागी
स्वरूप - आनंदाते
कृतज्ञतेने लेखणि माझी
शिकवण त्याची लिहिते!१४४


हात जोडितो स्वरूप नाथा 
करुनि घेतली सेवा!
झरत आंसवे तीर्थोदक ते
प्राशिन मी गुरुदेवा!१४५

卐 

शरीर पडतां धरणीवरती
'स्वरूप-गीता' गावी!
आत्मानंदी रमती सगळे 
अशी प्रचीती यावी!१४६


' जो हसला तो अमृत प्याला' 
ऐसे कविवर वदती! 
अनुभविता मग मोदसोहळा 
कोडी सगळी सुटती!१४७


लहान बीजांतुनी विकसतो 
कैसा हा वटवृक्ष? 
थक्कित होउनि कर जुळती त्या
म्हणती जया अलक्ष!१४८

卐 

स्वरूप ध्याता, स्वरूप झालो 
स्वरूप सगळे बोले! 
स्वरूप वक्ता, स्वरूप श्रोता 
स्वरूप प्रेक्षक झाले!१४९

卐 

अमृतधारा तुझी शांतिदा 
देते जीवन-सार!
गाथा संजीवनि तव नेते 
भवोदधीच्या पार!१५०

卐 

तुझ्या कृपेसी अंत नसे गे 
ठाव दिलासी चरणी!
घन अंधारी झळकविलासी 
तू ज्ञानाचा तरणी!१५१

卐 

असाच येवो गुरुभक्तीसी 
कृपावृष्टिने पूर!
अंतर्बाह्य मी व्हावे चिन्मय 
बदलो सगळा नूर!१५२

卐 

हात जोडुनी उभा राहिलो 
क्षणभर डोळे मिटले!
पसरूनि कर तू मज छातीशी 
घट्ट घट्टसे धरले!१५३

ज्ञानांजन तू घालुनि नयनी
शिकविलेस संगीत!
बहरुनि आली अंतःकरणी 
उदात्त मंगल प्रीत!१५४

卐 

कार्पण्यासी उरला नाही 
अंतःकरणी थारा!
नुरे अहंपण, सरे खिन्नता 
छिन्न भिन्न हो कारा!१५५

卐 

असे वाटते मिरवावे शिरि- 
तुझ्या कृपेचे ओझे!
जन्मोजन्मी ऋणी असावे
तुझाच डिंडिम वाजे!१५६

卐 

कृतार्थ झाली कविता शक्ती 
कृतार्थ झाले गान!
कृतार्थ झाली असे लेखणी 
कृतार्थ झाले कान!१५७

卐 

'तू जे गाशी मला पोचते' 
कोणी कानी बोले!
सुचेल तैसे लेखन झाले 
पारायणही घडले!१५८


अभ्यासाविण यश ना मिळते 
श्रद्धेवाचुनि दृष्टी!
गुरुकृपादृष्टीने तत्क्षणि
झाली हिरवी सृष्टी!१५९


विवेक भास्कर उगवो म्हणुनी
स्वरूप-गीता स्फुरली!
विनम्रतेने आनंदाने
तये लेखणी धरली!१६०


"स्वरूप-गीता" तुला अर्पिली 
हे स्वरूप-आनंदा! 
सोऽहं महिमा तुवा लिहविला 
धरुनी माझ्या हाता!१६१

卐 


स्थिरावले मन तुझ्या कृपेने
लेखन येथे सरले!
अधिक काहि बोलवे न म्हणुनी 
मौन मनाने वरिले!१६२

तत् सत्