Tuesday, November 5, 2024

बोल तुझे तत्त्वाचे, ठरत जगति फोल!

जय जय रघुवीर समर्थ

बोल तुझे तत्त्वाचे, ठरत जगति फोल!ध्रु.

पंडित तू जगि ठरशी
गर्व मनी साठविशी
मी मोठा! हे सुचवत बडविशि जर ढोल!१

अंतरात मळ साठत-
रामचंद्र नाहि दिसत
क्रियेवीण बडबड तव काय तिजसि मोल?२

सुविचारे हो सावध 
षड्रिपूंस करि गारद 
कर्तव्या करित, भजन गात गात डोल!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२०.१०.१९७४

खालील श्लोकावर आधारित काव्य.

फुकाचे मुखीं बोलता काय वेचे 
दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे॥ 
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे 
विचारे तुझा तूंचि शोधूनि पाहे।।

फुकटचे (तत्वज्ञानाच्या गोष्टी) बोलण्यात काय खर्च होते? काही नाही. दिवसेंदिवस अंतरात मात्र गर्व साचत जातो. कृतीविना बडबड व्यर्थ आहे. विचारानेच तुझा तूच सर्व शोधून पाहा.

No comments:

Post a Comment