Wednesday, November 6, 2024

मेळ न मुळी बसेना!

जय जय रघुवीर समर्थ

अगणित शास्त्रे शोधू जातां-
निश्चय एक दिसेना
मेळ न मुळी बसेना!ध्रु.

वृथा भांडती वृथा तंडती
सकल आंधळे एकच हत्ती 
विविध विधाने, विविध दर्शने
निर्णय एक ठरेना!१ 

अभिमानासी कारण मिळते
ज्ञान तेवढे लपूनि बसते
अंधाराच्या कृष्णाकाशी 
वाव न प्रकाशकिरणां!२ 

गुरुकृपेने प्रबोध होतो 
अहंभाव तै लोप पावतो
गती मनाची कुंठित होता
गहन अर्थ ये मौना!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.०७.१९७५

खालील श्लोकावर आधारित काव्य.

बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे। 
जया निश्चयो येक तोही न साहे॥
मती भांडती शास्त्रबोधें विरोधे
गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधे॥


शोधू गेल्यास शास्त्रे पुष्कळ आहेत. पण त्यांचा एकही निश्चय नाही. शास्त्राचा परस्परविरुद्ध अर्थ करून मताभिमानी लोक भांडत असतात. परंतु ज्ञानाचा यथार्थ बोध होऊन मतिप्रकाश झाला म्हणजे मनाची गति कुंठित होते.

No comments:

Post a Comment