Sunday, December 29, 2024

सावध जीवा झडकरि हो रे स्मर रघुनाथाते!

॥ जय जय रघुवीर समर्थ ।।

धरुनि लेखणी रंगवले हे प्रापंचिक जगणे! 
रामाचा जर विसर मनाला दुःखच दे ठाणे!१

विसरे जो तो जन्म जिवाचा वासनेत झाला 
ती सुखदुःखा कारण तैसी पुढच्या जन्माला!२ 

न ये बोलता शैशवातही कौतुकात हाल 
भूक न जाणुनि मुके घेत कुणी कुस्करती गाल!३ 

खेळ मधे सोडावा लागे तडफडतो जीव 
बालमनाची जाण कुणाला सुकतो राजीव!४ 

धडपड जरि ही सुखार्थ चाले कष्टा नच गणना 
थोडेसे यश अपयश पुष्कळ बहुतांची दैना!५

कामातुर त्या ना भय लज्जा देह सर्व काही 
स्त्रीला भुलला मायपित्यांना विसरुन तो जाई!६ 

मूल नसे तरि चिंता आहे, कुणा मुले फार 
न ये पोसता तरी वाढते आहे लेंढार!७

धन मेळविण्या घर सोडुनिया परदेशी गेला 
मायापाशच पुन्हा आणवी घरच्या भेटीला!८ 

कितीहि राबा, रक्तहि ओका विश्रांती नसते 
पाठीवरती हात फिरवण्या आई नच उरते!९ 

जोवर पैसा तोवर बैसा, शक्ति हवी देही
वृद्धपणा ये चाल करुनिया उपाय ना काही!१०

रामाविण नच कोणी माझे उशिरा हे कळले 
जन्मभरी ना त्याला स्मरले मन लज्जित झाले!११ 

दक्ष न राही जीवनात तर धिंड अशी निघते 
सावध जीवा झडकरि हो रे स्मर रघुनाथाते!१२

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.०१.१९९५

नरदेहाचे दुर्लभपण ते घ्यावे ध्यानात

॥ जय जय रघुवीर समर्थ ।। १८:४

नरदेहाचे दुर्लभपण ते घ्यावे ध्यानात
हरिभजना त्या लावुनि पावन व्हावे निमिषात!१

जसे चांगले वाइट तैसे नरदेही भरले
भले बुरे ते आतुन कळते सावध ते तरले!२

प्रकटे आत्माराम यामुळे ध्यानी घ्या महिमा
आत्म्यास्तव नरदेह झिजावा रुचते हे रामा!३

पुण्यदेह तो ज्ञान वितरतो रामा भेटवतो
उपासनेचा मार्ग चालतो महंत तो बनतो!४

देही आत्मा, जनी जनार्दन पूज्यच पूजावे
ग्रंथश्रवणे योग्य काय ते आचरणी यावे!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२८/११/१९९४

Saturday, December 28, 2024

नको राग धरूं माझ्या चित्ता!

जय जय रघुवीर समर्थ

मना कोप आरोपणा ते नसावी। 
मना बुद्धि हे साधुसंगी वसावी। 
मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी।
मना होई रे मोक्ष‌भागी विभागी॥


नको राग धरूं माझ्या चित्ता!ध्रु.

हा क्रोध दुःख बहु देतो 
आप्तांसी दुःखित करतो
लुटतसे भक्तिच्या वित्ता!१

सत्संगी बुद्धि रमावी 
आवडी रामि निपजावी 
सर्वत्र प्रभूची सत्ता!२

"तो मी!" हा जाणी बोध 
आवरी आवरी क्रोध 
तर मोक्षचि आला हातां!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१२.१०.१९७४

हे मना, कोपाची आरोपणा- धारणा नसावी (क्रोधवश होऊ नको) (ह्याला एकच उपाय) सत्संगतीतच बुद्धि रमावी. मना चांडाळ - दुष्ट अशांचा संग टाकून दे आणि मोक्षाचा वाटेकरी हो.

विषयाचा संग नको नको रामा, लौकिकाची चाड नको नको आम्हा!

विषयाचा संग नको नको रामा,
लौकिकाची चाड नको नको आम्हा!ध्रु.

भोगाची आसक्ति 
देवाची विरक्ति
होते अडचण आमचीच आम्हा!१
 
तुझी तळमळ 
भक्तमत्स्या जळ 
कळूनिया कैसे वळे नच आम्हा!२

तुझे नाम यावे 
गायनी रमावे 
हेचि एक दान देई देई रामा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १३५ (१४ मे) वर आधारित काव्य.

आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची व लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. वाईट कर्म कोणाला सांगण्याची आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म आपण अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. परंतु सत्कर्माचा अहंभाव चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडेल त्याचा पत्ता लागणार नाही. विषयासाठी आपण मरमर काम करतो व तेवढे करूनही सुख लागत नाही; मग भगवंताचे नाव न घेता प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे. लग्नाआधी मुलीला दहा पाच जणांना दाखवली तरी लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे तोच एक नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहत नाही, त्याप्रमाणे आम्ही एकदा रामाचे झालो म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले? संचिताला थाप द्यावी आणि क्रियमाण भगवंताचे नामात घालावे हे आयुष्याचे खरे सार आहे.

Friday, December 20, 2024

समाधान राम ! राम समाधान!

समाधान राम ! राम समाधान! ध्रु.

विषयीं गुंतले, 
मन भांबावले 
स्थिरावले जाता रामास शरण!१

अंतरंगे श्रेष्ठ 
बाह्यांगी कनिष्ठ 
राम ठेवी त्यांत मानू समाधान!२

प्रपंचात दक्ष 
धरू सत्यपक्ष 
ठेविणे स्मरण रामाचे आपण!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २४३ (३० ऑगस्ट) वर आधारित काव्य.

तोचि खरा आनंद ! सुजनहो, तोचि खरा आनंद!

तोचि खरा आनंद ! सुजनहो, तोचि खरा आनंद!ध्रु.

रामा गावे, रामा ध्यावे 
गाता गाता रामचि व्हावे 
स्मरावा घडीघडी स्वानंद!१

दुःख न निघते कधी जयातुन 
हास्य सुमन ये नकळत उमलुन
निरुपाधिक आनंद! २

आत्मचिंतने लाभे शांती 
ध्यानधारणा ही विश्रांती 
जरी लागला छंद !३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१९ (६ ऑगस्ट) वर आधारित काव्य.

प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्यास आनंद हवा असतो, आणि हा आनंद भगवंतरूपातच आहे. स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण, तोच विषय समजावा. ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय. विषयापासून होणारा आनंद तो विषय भोगीत असेतोपर्यंतच टिकतो. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, व आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरुपाधिक असतो. कोणती वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. थोडक्यात आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान होय. मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख फार क्वचितच मिळते. परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद साधनांचे कष्ट विसरायला लावतो. जो निस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणारा मी जेव्हा देणारा होईल त्यावेळेस स्वतःला खरा आनंद होईल.

Tuesday, December 17, 2024

मी देह नव्हे, मी दुःखि नव्हे- मन बुद्धि नव्हे, मी मर्त्य नव्हे!

मी देह नव्हे, मी दुःखि नव्हे-
मन बुद्धि नव्हे, मी मर्त्य नव्हे!ध्रु.

देहासक्ती मग कुठली?
विकार-विकृति मग कुठली? 
मी भक्त असे, तनुदास नव्हे! १

नामात रहावे आवड ही 
देवास पहावे आवड ही
योगीच असे मी भोगि नव्हे!२
,
तो मीचि असे, मी तोचि असे 
भगवंती उत्कट भाव वसे 
रामाविण क्षण ही भिन्न नव्हे ! ३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३५२ (१७ डिसेंबर) वर आधारित काव्य.

मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे. मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्माचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेल्या परमार्थाचे मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे; आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्याने आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते. मुळात चूक ही की आपण स्वतःला देह समजूनच राहतो; माझाच देह समजून त्याच्यावर प्रेम करतो ही पहिली चूक. नंतर, या देहाचे गुणधर्म म्हणजे विकार आपल्याला चिकटल्यावर त्यांची जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबविता ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे व त्याकरता वेळप्रसंगी आपली बुद्धी गहाण टाकणे, ही तिसरी चूक. नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विकारांच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे. दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि "मी तुझा आहे" असे म्हणतो. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.

Saturday, December 14, 2024

घर हे मंदिर व्हावे

घर हे मंदिर व्हावे 
रामे इथे रमावे!ध्रु.

जो जो यावा 
इथला व्हावा 
सेवाकार्य घडावे!२

रामची कर्ता 
रामची भर्ता 
नामामृत प्राशावे!२ 

विरो अहंपण
सरो अज्ञपण 
निवांतपण लाभावे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३३१ (२६ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

घर हे मंदिराप्रमाणे आहे तेथे वागताना भगवंताचे अस्तित्व ध्यानात ठेवून वागावे. व्यावहारिक दृष्ट्या जास्त शिकलेला मनुष्य असमाधानी असायचाच.  शिक्षणाने वृत्ति रुंदावली पाहिजे. आकुंचित वृत्तीच्या माणसाला समाधान मिळणे शक्य नाही. राम आपल्या जरुरीपुरते कोठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण खरा अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा व तेवढेच खाणे याचे नाव सात्विक आहार होय. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. भगवंताच्या नामात राहिल्यावर भगवंतांना आपलेसे करून घेण्याकरिता निराळे काही करण्याची जरुरी नसते.

Thursday, December 12, 2024

जयदेवी जयदेवी जय भगवद्‌गीते..

जयदेवी जयदेवी जय भगवद्‌गीते
आरति तव गाता ये हृदयी भरते! ध्रु.
 
जीवन ही गमले मज चाले रणघाई
चालुनि जावे कैसे बंधन जर पायी
मी कर्ता ही बेडी तू काढुनि घेते! १

अंतरिचा निर्णय जो तो तर कृष्णाचा
विवेक होतो बंधु अंती भक्तीचा 
तू भक्ती ज्ञानहि तू सत्कर्मी रमते!२

अशक्य जगती नाही ऐसा तव घोष
फलचिंता सुटताक्षणि आत्म्याला तोष 
लोकांच्या कल्याणा मन्मन आतुरते!३

नित नूतन दर्शन तू पठणातुन देशी
स्वार्थातुन श्रोत्याला परमार्थी नेशी
कोऽहं प्रश्ना उत्तर सोऽहं सापडते !४
 
परिचय प्रवेश ऐसा चढता सोपान
दिव्यत्वाच्या स्पर्शे हारपले भान
श्रीरामा वात्सल्ये जवळी तू घेते!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२१.१२.१९८२

देवा असशी जरि निर्गुण पूजू सगुण खरे मानुन!

देवा असशी जरि निर्गुण 
पूजू सगुण खरे मानुन! ध्रु.

अनंतरूपे तुझी द‌याळा
भावभक्तिच्या वाहू माळा 
प्रेमे करू गुणसंकीर्तन ! १
प्रेमे करू नामकीर्तन!

सगुणोपासनि विसरु स्वतःला
देव जाणवे अंतरि भरला
ऐसे घडो आत्मदर्शन!२ 

तू कर्ता हा बोध ठसावा 
तू मी एकच अनुभव यावा
वंदितो तुझे विमलचरण!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३३२ (२७ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.

निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. म्हणून सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो व शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून सगुणात राहावे.  देव नाही असे म्हणणाऱ्यांना सुद्धा त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण देव नाही असे म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. खरोखर मनुष्याला जितके येते तितके लिहिता येत नाही, जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणाऱ्याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. भूतकाळ आणि भविष्यकाळ हे जर आपल्या हातात नाहीत, तर वर्तमानकाळ तरी आपल्या हातात कसा असेल? म्हणून परमात्मा करत आहे असे समजून आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

Sunday, December 8, 2024

मज नको नको अभिमान!

हे करुणामय भगवान्
मज नको नको अभिमान!ध्रु.

सहज न दिसतो 
कधी उसळतो 
मग व्याकुळ पंचप्राण!१

चित्त मळतसे 
हित न कळतसे 
मज वाचव भगवान्!२

नुरो फलाशा
मज परमेशा 
गाइन तव महिमान!३ 


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १२६ (५ मे) वर आधारित काव्य.

खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही. तो दिसत नाही, आणि म्हणून तो केव्हा आणि कसा डोके वर काढील याचा पत्ताच लागणार नाही. चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोंड कोणती असेल तर ती अभिमानाची आहे. त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरुला अनन्यभावे शरण जाऊन, अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हेच होय. विनाशी फलाशेने केलेले कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते. याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्यकर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे. भगवंताची भक्ती करता करता भगवत्प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा, म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवतप्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल.

Saturday, December 7, 2024

प्रपंच अपुरा, समाधान तो देइल कोणाला? गड्या रे, राम हवा भजला!

प्रपंच अपुरा, समाधान तो देइल कोणाला? 
गड्या रे, राम हवा भजला ! ध्रु.

प्रपंच करता देवा विसरे 
घसरणीवरी संतत घसरे 
प्रभुनामाचा खुंटा बळकट, जो धरि तो वाचला!१

हवे हवे हे कधी सरेना 
तृप्ति जिवासी लव लाभेना 
नाममेघ परि सदय विझविती तृष्णेच्या ज्वाला!२

जे जे गमले मना सुखाचे 
ते ते कारण हो दुःखाचे 
अपूर्ण का कधि नरास जगती ने पूर्णत्वाला!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ६८ (८ मार्च) वर आधारित काव्य.

प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टीत केव्हाही समाधान मिळणार नाही. 
आत्मप्रचितीने जागरुकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल व भगवत्प्राप्ती लवकर होईल. प्रपंच करीत असताना भगवंताची आपल्याला आवश्यकता वाटते का? आपण जर असा विचार केला की, आपण लहानाचे मोठे झालो, विद्या संपादन केली, नोकरी मिळाली, लग्न झाले, मुलेबाळे झाली, घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे; हे आपले हवेपण केव्हा संपणार? आपण जन्मभर पाहतोच की सर्व काही केले, आयुष्यही संपले, तरी काहीतरी करण्याचे राहूनच जाते. त्याला पूर्णता येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की आता ह्यापुढे काही करण्याचे उरले नाही, असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, असे कधी वाटते का? पुढे कसे होईल? हे सर्व टिकेल का? आणखी ह्यात कशी भर पडेल याची विवंचना कायमच. तेव्हा या प्रपंचाच्या गोष्टी अपूर्ण आहेत, त्यातून समाधान लाभेल हे कसे शक्य आहे? ह्या गोष्टी एकातून एक निर्माण होणाऱ्या आहेत. ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या त्या सर्व जरी एकत्र केल्या तरी त्यातून समाधान निर्माण होणार नाही. ज्या गोष्टी अपूर्णच आहेत त्यातून पूर्णत्वरूप असलेले समाधान कसे लाभेल?

Thursday, December 5, 2024

दे हवा तसा आकार !

दे हवा तसा आकार !

मी तुझ्या करातिल माती 
दे हवा तसा आकार ! ध्रु.

तू तुडव तुडव चरणांनी 
तू थापट दोन करांनी 
नच करीन मी तक्रार ! १ 

ना कसलीही मज चिंता 
तू दिधली श्रद्धा ऋजुता 
हा थोर थोर उपकार! २

नच हट्ट धरिन कसलाही 
कुरकुर ना करिन जराही 
तू एकमेव आधार ! ३

सांगते घेउनी आण 
तव करीच मम कल्याण 
तू निर्माता कुंभार ! ४

हे फिरते चाक कधीचे 
मी त्यावर बैसायाचे 
ना स्वतंत्र काहि विचार! ५

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०-१०-७८
मातीचा धर्म ! या लेखावर आधारित (पुस्तक हृदयोद्‌गार - फादर वॅलेस)

Wednesday, December 4, 2024

उमगत नाही स्वहित माणसा अज्ञानाच्या मुळे!

जय जय रघुवीर समर्थ

अविद्यागुणे मानवा ऊमजेना । 
भ्रमें चूकलें हीत तें आकळेना ।। 
परीक्षेविणे बांधिले दृढ नाणे । 
परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥

वरील श्लोकावर आधारित हे खालील काव्य

उमगत नाही स्वहित माणसा 
अज्ञानाच्या मुळे!ध्रु. 

भ्रमेच चुकला
स्वहिता मुकला
परमार्थाच्या मार्गावरूनी ढळली मग पाउले!१

परीक्षेविणे 
कटीस नाणे
खरे म्हणुनि बांधले तरी का ठरते ते चांगले?२

गुरु न लाभले 
येथे अडले
सत्य काय आणि मिथ्या काय न भेद कुणासी कळे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
२६.०३.१९७५

अविद्यागुणे म्हणजे अज्ञानाच्या योगाने मनुष्याला (स्वहित) उमगत नाही. भ्रमाने चुकल्यामुळे आपल्या हिताचे आकलन होत नाही. एखाद्याच्या कमरेला खरे म्हणून परीक्षेशिवाय बांधलेले बद्द नाणे असावे असा हा प्रकार आहे. पण सत्य काय, मिथ्या काय हे कोण जाणतो.

Tuesday, December 3, 2024

विसर मना देह‌भाव रामाच्या गुणगानी!

जय जय रघुवीर समर्थ
 
विसर मना देह‌भाव रामाच्या गुणगानी!ध्रु.

तूं न देह, रामगेह 
सौरभास सुमन गेह- 
सोड लाज, नाच मुक्त, ताल धरी टाळांनी!१ 

करिशिल जधि निरूपणा 
ठेव दुरी अहंपणा 
सोऽहं ची सोय धरुनि सुस्थिर बस आसनी!२ 

जी दिसेल परनारी 
माता ती ध्यानि धरी 
परवित्ती नकोच लोभ विरक्त तोचि ज्ञानी!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०८.१०.१९७४

चाल : यतिमन मम मानत त्या....

खालील श्लोकावर आधारित काव्य

हरीकीर्तने प्रीति रामी धरावी। 
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी। 
परद्रव्य आणीक कांता परावी। 
यदर्थी मना सांडि जीवी करावी।

 卐

कीर्तन प्रसंगी रामाविषयी अत्यंत प्रीति धरावी. आणि निरुपण प्रसंगी देहबुद्धि पार विसरावी. परद्रव्य व परनारी ह्यांचा मनातून सर्वस्वी त्याग करावा.

Monday, December 2, 2024

मनी पूजुनी नित्य राघवा प्रपंचास परमात्मा बनवा!

मनी पूजुनी नित्य राघवा 
प्रपंचास परमात्मा बनवा!ध्रु.
 
अभिमानाचा नुरु दे आठव
जागृत असु दे निर्मल शैशव 
उठता बसता राघव ध्यावा!१

परनारी, परद्रव्य विषारी 
परमार्थाचे उघडचि वैरी 
मनातला शिव सांभाळावा!२ 

क्रोध जाऊ दे, प्रेम येऊ दे 
स्पर्शनी हळवेपणा असू दे 
जो जो भेटे राम दिसावा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३८ (७ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा हीहि अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा व भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच परमार्थरूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा भरवसा तुम्ही बाळगा. सर्व प्रकारच्या मानसिक शक्ति असून तेथे भगवंत नसेल तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा यातच जन्माचे सार्थक आहे.

Sunday, December 1, 2024

सुखाचे निधान..

तुझे आहे तुजपाशी, सुखाचे निधान
रामनाम! रामनाम!ध्रु.

नाम तुझ्या पाठीशी, नाम तुझ्या हाताशी 
नाम तुझ्या उशाशी, नाम मनाच्या आकाशी 
नको करू कासाविशी!  
भज रामनाम! रामनाम!१

नाम पुरात तारील, नाम ताप निवारील 
नाम पाखर घालील, नाम घास भरवील 
नको करू ऊलघाल, 
भज रामनाम! रामनाम!२

नाम घेता न लगे मोल, नामाविना जन्म फोल 
राम राम हेच बोल आणतील तुजला डोल
नाम रत्न अनमोल,  
भज रामनाम! रामनाम!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १७ (१७ जानेवारी) वर आधारित काव्य.

नामस्मरणाची बुद्धि झाली की आपले काम झाले. नामात प्रेम येणे जरूर आहे; त्याकरिता ते नाम अत्यंत आवडीने, व त्याच्याशिवाय दूसरे काही साधायचे नाही अशा भावनेने घेतले पाहिजे, म्हणजे त्यात प्रेम येईल. नाम हे अत्यंत उपाधीरहित आहे, त्याला कोणत्याहि उपकरणाची गरज नाही. रोगी-निरोगी, विद्वान्-अडाणी, श्रीमंत; गरीब, लहान-थोर, स्त्री-पुरुष, जात-गोत, यांपैकी कोणतीहि गोष्ट असली तरी अडत नाही- व नसली तरी अडत नाही. नामाशिवाय दुसऱ्या कोणत्याहि साधनाला शक्ति, बळ, पैसा, वगैरे कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची मदत लागते. म्हणून असे हे अत्यंत उपाधीरहित नाम, त्यात प्रेम येण्यासाठी, आपण उपाधीरहित होऊन घेतले पाहिजे. नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिति आहे. ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही. म्हणून त्यातील वर्म ओळखून योग्य तन्हेने व चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे. "भगवंताच्या नामाशिवाय मला कांही कळत नाही" असे ज्याला कळले त्याला सर्व कळले.