Wednesday, February 26, 2025

लाभण्या समाधान चित्ता स्मरावे रामा भगवंता!

लाभण्या समाधान चित्ता 
स्मरावे रामा भगवंता!ध्रु.

स्मरायचे जर असेल देवा
परिस्थितीचा कुठला केवा
उकलण्या देहभावगुंता!१ 

देह जरी हा विकल जाहला
नामस्मरणा आड न आला 
साक्ष ही देते श्रीगीता!२ 

परमार्थामधि द्रव्य अडथळा
स्वर्णमृगा त्या पामर भुलला 
खरोखर श्रीरामच त्राता!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५७ (२६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने त्या समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे.  देहाची अवस्था कोणतीही असली तरी, त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल?आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. सुख, समाधान हे पैशावर अवलंबून नाही. भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया क्षमा व जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायची.  त्याप्रमाणे पैसा आला, की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान, ही यायचीच.

Saturday, February 22, 2025

चिंता करितो विश्वाची!

जय जय रघुवीर समर्थ ॐ

आई गं, चिंता करितो विश्वाची!ध्रु.

चित्तासी या नसे स्वस्थता 
ध्यानी रमलो म्हणुनी आता
जाण मग सरली काळाची..!१

तू सांगितले, मिया ऐकिले 
निश्चल बसुनी डोळे मिटले 
आकृती दिसली तेजाची..!२

खोड्या करणे विसरुनि गेलो
रामरंगि रंगलो, रंगलो
ओढ मज लागत रामाची..!३

प्रभुराया मज मार्ग दाखविल 
सहजच सगळा गुंता उकलिल
आस का पुरी न व्हायाची..?४

विस्फारिसि का ऐसे डोळे? 
नवल कशाचे तुला वाटले? 
लागली गोडी ध्यानाची..!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०७.०२.१९७४

Friday, February 21, 2025

श्रीराम म्हणा श्रीकृष्ण म्हणा

॥ श्रीगजानन प्रसन्न ।।

श्रीराम म्हणा जयराम म्हणा जय जय जय जय राम म्हणा
श्रीकृष्ण म्हणा जयकृष्ण म्ह‌णा जय जय जय जय कृष्ण म्हणा!ध्रु.

गाता गाता सापडेल स्वर 
प्रसन्न दर्शन देइल शंकर 
भैरव वा केदार कधी कुणि मल्हारहि तो आळवा ना!१

निराशेतुनी उमले आशा 
आरंभच अशिवाच्या नाशा
आशावादी असतो आस्तिक सदा सिद्ध तो हरिभजना!२

शिवलीलामृत वाचत जावे
हरिविजयी वा मन रमवावे 
ओवी अथवा अभंगवाणी संतांच्या पाऊलखुणा!३ 

देह भले हा राहो जावो 
हरिचरणी मन सुस्थिर होवो 
गाय न सोडी पाठ हरीची रसग्रहण हे रुचो मना!४

ज्ञाना एका नामा तुकया 
रामदास बरवाच स्मराया
नाम जिभेवर, प्रेम पोटभर उरू न देते उणेपणा!५ 

एकांताच्याही एकांती 
गुरुशिष्यांच्या घडती भेटी
समाधान ये माहेराला, फुले मोगरा क्षणक्षणा!६

साध्य नि साधन नामच आहे
दास नि राघव नामच आहे  
स्वरूपीच श्रीराम विसावे गती अन्य त्या उरेचि ना!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
१८.०३.१९९७

Wednesday, February 19, 2025

मनी निरंतर भाव असू दे - रामाचा मी, रामाचा!

मनी निरंतर भाव असू दे -
रामाचा मी, रामाचा!ध्रु.

नाम स्मरा हो नाम स्मरा 
स्मरा स्मरा त्या रघुवीरा 
बोध असे हा संतांचा!१

भाव धरा हो भाव धरा 
अपुलासा तो राम करा 
अपार महिमा नामाचा!२

घट्ट धरावे नामासी
पोचविते रामापाशी 
धरा भरवसा नामाचा!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ५० (१९ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मी कोणीतरी आहे असे वाटण्यापेक्षा मी कोणाचा तरी आहे असे वाटणे हिताचे आहे. विषयात राहणे हा आडमार्ग आहे नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे, त्यात राहिले की कोणीतरी संत भेटतो व आपले काम करतो. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. खरेदीपत्रातील नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व इस्टेटीची मालकी मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी इस्टेटच आहे.

Sunday, February 16, 2025

नामाची मनाशी संगत जोडावी!

नामाची मनाशी संगत जोडावी!ध्रु.

"माझे माझे" सोडावे 
भजनानंदी डोलावे 
"मी रामाचा" अशी भावना - अंगी बाणावी!१ 

कर्तव्यासी चुकू नये 
हाव ऐहिकी धरू नये 
नामस्मरणे तीर्थयोग्यता तनुलागी यावी!२ 

जाणुनिया वृत्ती 
संत जसे सांगती 
तनु गुरुकार्यी तुलसीदलसम मोदे अर्पावी!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४७ (१६ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. मिळण्याची व मिळवण्याची हाव वाढल्यामुळे आपल्याला खरे दुःख होते. आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीस किती येते याचा कधी आपण विचार करतो का? भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. नामात जो राहिला सो सत्संगतीत राहिला. मनाची व नामाची संगत जोडून द्यावी. आपण भगवंताच्या आधाराने रहावे. नेहमी लीनता ठेवावी. भगवंतांना ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे. संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगतात. आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे.

Saturday, February 15, 2025

नाम घ्यावे, नाम गावे, आनंदासाठी

नाम घ्यावे, नाम गावे, आनंदासाठी!ध्रु.

निष्ठेने जो नाम घेतसे
उद्दिष्टाते तो गाठतसे
अगाध महिमा नामाचा त्या संत सांगताती!१

उगमच नामी मोदाचा
वासच नामी मोदाचा
नित्य दिवाळी त्याला ज्याची नामि रमे वृत्ती!२

अनन्य देवासी व्हावे
नामी मीपण ओतावे
आनंदी आनंद वितरते नामाची संगती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४५ (१४ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

पारंपारिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतील ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून प्रगतीचा मार्ग भगवंताचे नाम मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे बिनचूक काम होऊन तो ध्येय गाठतो, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे ज्याला आनंद हवा असेल, त्यांनी सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, म्हणून ज्यांना जगायचे आहे त्याने नाम घ्यावे. जिथे भगवंत तेथे आनंदी आनंद असतो. आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.

Tuesday, February 11, 2025

माया भगवंताची छाया..

माया भगवंताची छाया 
का घाबरशी वाया?ध्रु.

रामनाम प्रेमाने घेणे 
तरीच मायेमधुनी सुटणे 
आळवि रे प्रभुराया!१ 

भगवंतावर तिची न सत्ता 
रामाची आगळी महत्ता 
प्रभुच्या आधिन माया!२ 

अवघी दुनिया आहे माया 
श्रीरामाची आहे छाया 
स्मर प्रभुनाम तराया!३


रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले.

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ४२ (११ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे? माया ही भगवंताच्या सावली सारखी आहे. या प्रश्नाचे उत्तर एकच, भगवंताचे नाव घेणे. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही, तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही. मायेची सत्ता भगवंतावर नाही. माया भगवंताच्या आधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे; म्हणजे ती परमेश्वराची छाया आहे. याचा अर्थ या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे? भगवंताचे नाव, म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र, जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील व भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरून जाण्यास भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे.

Wednesday, February 5, 2025

घडत ना प्रत्यक्षच दर्शन!

दिवसांमागुनि दिवस लोटती व्यर्थ गमे जीवन 
घडत ना प्रत्यक्षच दर्शन!ध्रु.

अश्रूसरिता वाहु लागते 
हृदिची तळमळ ना आवरते
विरह व्याकुळ मम चित्ताचे कसे करू सांत्वन?१ 

रूप अलौकिक दिसु दे डोळा 
ध्यास जिवा लागला लागला 
स्वास्थ्य न लाभे तिळभर चित्ता का न गळे मीपण?२  

दुर्बळ शरीर होउनि बसलो
प्राप्तिसाधना वाटे मुकलो
खंत हीच जाळते निशिदिनी जलावीण मीन!३

ही बेचैनी साहू कैशी 
धावत येई हे हृषिकेशी 
मी ऐकियले रडत्या वत्सा माय घेत उचलुन!४ 

अनेक भक्तांसाठी शिणला
माझा का नच तुला कळवळा
सत्यस्थिति मी माझी केली तुज‌ला निवेदन!५ 

एकदाच दे हरी दर्शना 
लोटांगण घालू दे चरणा
सुहास्यवदना दयाघना मी कधी तुला पाहिन?६

मला न कसली दुसरी आशा 
तुला पाहता मूकच भाषा
पुरव पुरव रे माझी मनिषा त्वत्पादे मी लीन!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनावर आधारित काव्य)

Sunday, February 2, 2025

स्वामींनी तुज नाम दिले

स्वामींनी तुज नाम दिले 
ॐ राम कृष्ण हरि! ॐ राम कृष्ण हरि!
नाम सदा हे गात रहा 
ॐ राम कृष्ण हरि ! ॐ राम कृष्ण हरि!ध्रु.

गाता गाता वाढू दे लय 
वाढू दे लय बाणो निश्चय
आत्मारामच कैवारी!१ 

इथे कुणाचे भय कोणाला? 
इथे कुणाचा द्वेष कुणाला? 
सोऽहं हा दृढभाव धरी!२

निजधामाला स्वामी गेले 
नाम होऊनी अंतरि आले 
पूजेचा क्षण साध तरी!३

पावसची ही ज्ञानमाउली 
सर्वांच्या शिरि धरी सावली 
वरप्रार्थना ध्यानि धरी!४

अभंग ज्ञानेश्वरी वाच तू 
हरिपाठांतरि जा रंगुनि तू
अमृतधारा झेल शिरी!५

कण कण नामाने भारू दे
नामरसायन तनी भिनू दे 
कायापालट होय तरी!६

सात अंतरे सप्तपदी ही
वज्रकवच तू चढवुन घेई
श्रीगुरुरक्षा हीच खरी!७

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१७.०१.१९९४
[श्री स्वामींच्या (स्वामी स्वरूपानंद, पावस) खोलीतून बाहेर आल्यावर]

Saturday, February 1, 2025

नाम हे स्मरा चला, देहबुद्धि विस्मरा!

नाम हे स्मरा चला, देहबुद्धि विस्मरा!ध्रु. 

देह मी कधी नव्हे 
देहदास मी नव्हे -
छाती ठोकुनि म्हणा रामदास मी खरा!१ 

मीच राम राम मी
नाम सूर्य या तमी
भाव नामि राहण्या करा त्वरा, त्वरा करा!२

स्वतः स्वतःस ओळखा
सुवर्ण नीट पारखा 
राम हाच रक्षिता भाव अंतरी धरा!३

रचयिता  : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२ (१ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.

आपली स्वतःची ओळख करून घेण्याला नामस्मरण हाच उपाय आहे. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे पण हे जाणण्याची बुद्धी मात्र फक्त मनुष्य प्राण्याचेच ठिकाणी आहे. प्रथम मी तो परमेश्वर आहे येथपासून घसरगुंडीला सुरुवात होते. नंतर मी त्याचा (परमेश्वराचा) आहे व शेवटी त्याचा माझा काही संबंध नाही येथपर्यंत आपण खाली येतो. याला कारण देहबुद्धीचा पगडा बसत जाऊन शेवटी, देह म्हणजेच मी अशी भावना होते. आपण स्वतः म्हणजे माझा देहच असे तो आपल्या स्वतःच्या बाबतीत समजतो.  याला कारण मी ज्याचा आहे त्याचा विसर पडून देहबुद्धि बळकट होत गेली. याकरिता उपाय म्हणजे ज्या मार्गाने खाली घसरत आलो त्याच मार्गाने पुन्हा वर जाणे. म्हणजेच पहिली गोष्ट, आता मी देहरूपच बनलो आहे, तो मी त्याचा  (परमेश्वराचा) आहे ही जाणीव करणे. दुसरी गोष्ट, या जाणीवेची परमावधी म्हणजे मी तोच परमेश्वर आहे ही भावना होणे. यावर उपाययोजना म्हणजे, ज्याच्या विस्मरणामुळे ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे ही होय. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी कोण हे कळेल; व स्वतःची ओळख होईल. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.