नाम हे स्मरा चला, देहबुद्धि विस्मरा!ध्रु.
देह मी कधी नव्हे
देहदास मी नव्हे -
छाती ठोकुनि म्हणा रामदास मी खरा!१
मीच राम राम मी
नाम सूर्य या तमी
भाव नामि राहण्या करा त्वरा, त्वरा करा!२
स्वतः स्वतःस ओळखा
सुवर्ण नीट पारखा
राम हाच रक्षिता भाव अंतरी धरा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२ (१ फेब्रुवारी) वर आधारित काव्य.
आपली स्वतःची ओळख करून घेण्याला नामस्मरण हाच उपाय आहे. प्रत्येक प्राणिमात्राच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश आहे पण हे जाणण्याची बुद्धी मात्र फक्त मनुष्य प्राण्याचेच ठिकाणी आहे. प्रथम मी तो परमेश्वर आहे येथपासून घसरगुंडीला सुरुवात होते. नंतर मी त्याचा (परमेश्वराचा) आहे व शेवटी त्याचा माझा काही संबंध नाही येथपर्यंत आपण खाली येतो. याला कारण देहबुद्धीचा पगडा बसत जाऊन शेवटी, देह म्हणजेच मी अशी भावना होते. आपण स्वतः म्हणजे माझा देहच असे तो आपल्या स्वतःच्या बाबतीत समजतो. याला कारण मी ज्याचा आहे त्याचा विसर पडून देहबुद्धि बळकट होत गेली. याकरिता उपाय म्हणजे ज्या मार्गाने खाली घसरत आलो त्याच मार्गाने पुन्हा वर जाणे. म्हणजेच पहिली गोष्ट, आता मी देहरूपच बनलो आहे, तो मी त्याचा (परमेश्वराचा) आहे ही जाणीव करणे. दुसरी गोष्ट, या जाणीवेची परमावधी म्हणजे मी तोच परमेश्वर आहे ही भावना होणे. यावर उपाययोजना म्हणजे, ज्याच्या विस्मरणामुळे ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे ही होय. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी कोण हे कळेल; व स्वतःची ओळख होईल. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.
No comments:
Post a Comment