Monday, July 28, 2025

माझे सर्वस्व नाम!

माझे सर्वस्व नाम!ध्रु.

नामच साधन
नामच जीवन
नामच आत्माराम!१

नाम घेतसे
मुक्त होतसे
नामच शांतिनिधान!२

नामच ध्यावे
नामच गावे
सामवेद जणु नाम!३

नामच तारु
नाम सद्गुरु
करि मुक्तीचे दान!४

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २१० (२८ जुलै) वर आधारित काव्य.

Tuesday, July 22, 2025

सद्गुरु अंतिम सुख दाखविती!

सद्गुरु अंतिम सुख दाखविती!ध्रु.

गुरुवचनी विश्वास ठेवणे
तसे चालणे, तसे वागणे
सोऽहं सिद्धी लळे पुरविती!१

विषयाचे सुख मोहक, दाहक
साधनेस ते खचितच मारक
विषकुंभा त्या उलथुनि देती!२

समाधान ते देती शाश्वत
कृपादृष्टि करि मार्गी सोबत
अवघड गुंता सहज उकलती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २०४ (२२ जुलै) वर आधारित काव्य.

अंतिम सुख काय हे गुरूस कळत असते. गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याचे आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे आणि तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपले मन जेथे गुंतले असेल तेथून त्यास काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही, ती काय सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो.

Sunday, July 20, 2025

ऐसा संत होणे नाही!


ऐसा संत होणे नाही! ध्रु.

मन निर्मळ निर्मळ, जैसे शुद्ध गंगाजळ 
तुका झालासे विठ्ठल, जणु ब्रह्म हे अविचल 
मन जडु दे विठ्ठलपायी!१

घेत विठ्ठलाचा छंदु, करि देवाशी संवादु 
तुटे संसारसंबंधु देही नांदता गोविंदु
चित्त ब्रह्मी लीन राही ! २

तुका नुरला तुकोबाचा, तुका नुरला या विश्वाचा 
भक्तिभाव तुकोबाचा करि मूक मूक वाचा 
देहि देव राही पाही!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(जगत्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरित्रावर आधारित काव्यातील एक काव्य)

पंचम, मालकंस, ताल भजनी धुमाळी

जगाच्या कल्याणाकरताच या संतांचा अवतार। वैकुंठाला जाणारी सोपी पायवाट दाखवली संत तुकाराम महाराजांनी! त्यांनी भक्तीचा डांगोराच पिटला, त्यांचा मोठेपणा कृतज्ञतेने गाऊ या!

लुटु या आनंद


मी नर नारी भेद विसरु या साधू संवाद 
शिवशक्तीचा खेळ सनातन लुटु या आनंद!ध्रु.

दोन करांनी वाजे टाळी दोन ओठ गाती 
बघती डोळे दोन तसे ते चरण दोन चालती 
परस्परांना पूरक आपण सादा प्रतिसाद!१ 

मायतात का कधी वेगळे समरस ते असती 
वेल कशी ती सरसर चढते वृक्षाच्या वरती 
घराघरातुन एकच घुमतो प्रणवाचा नाद!२ 

असो पुत्र वा असु दे कन्या ऐक्याची खूण 
भगवंताचे रूप आगळे घ्यावे निरखून 
देहाचा अभिमानच मोठा असतो अपराध!३

भाऊबहिणी खेळ खेळती आनंदे हसती 
आनंदाच्या अनंत मार्गी करताती प्रगती 
सीताराम जय सीताराम तोडत भवबंध!४ 

अभ्यासाचा छंद लागला देहातच मुक्ती 
वाढत जाते नित्य निरंतर देवाची भक्ती 
मी राधा मी कृष्णच गाते मन मग बेबंद!५

प्रवास येथे आहे उलटा बाहेरुन आत 
विकारावरी विवेक करतो कौशल्ये मात
संतकृपेचा साधक सगळे सेवू मकरंद!६ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
८ मे १९९१
उगवती पहाट २.२५

रामापायी ठेवी मन! त्याते लाभे समाधान!

रामापायी ठेवी मन! त्याते लाभे समाधान!ध्रु. 

घेई नाम ज्याची वाचा 
तोचि जाहला रामाचा 
देह‌भोग भोगे सुखें, कृपा करी दयाघन!१ 

सुख ज्याचे त्याच्यापाशी 
गुरु दाखवी शिष्यासी 
अंतरांत नांदे देव रमापति नारायण!२ 

नामसाधनी रंगला 
नव्हे राम दूर त्याला 
नामी राहे समाधान! गुरुकृपेची ही खूण!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २०२ (२० जुलै) वर आधारित काव्य 

नामातच राहे समाधान! ही सद्‌गुरुची आहे खूण!

Thursday, July 17, 2025

नाम हेच साधन, साध्य ही नाम!

नाम हेच साधन, साध्य ही नाम!ध्रु.

नरदेह प्राप्ती लाभ थोर झाला
राम ओळखावा ध्यास हा जिवाला
कृपावंत सद्गुरु देती वाट दाखवून!१

विषयकर्दमी अज्ञ जीव लोळे
अनुताप अंती तयालागि पोळे
सद्गुरु स्नेहल लाविती चंदन!२

पतिव्रतेसाठी पती हाच देव
साधकास जैसा गुरु हाच देव
आज्ञेचे पालन श्रेष्ठ हे पूजन!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९९ (१७ जुलै) वर आधारित काव्य

आपण येथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. विषयच  जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. गुरु हा सर्वज्ञ आहे व तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. गुरु तरी नाम हेच सत्य सांगतो आणि नामस्मरणास आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हे साधन व तेच साध्य होय. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.

Monday, July 14, 2025

विठ्ठला, विठ्ठला, लाविलासी तू लळा!


विठ्ठला, विठ्ठला, लाविलासी तू लळा!ध्रु. 

ध्यान तूझे सुंदर 
चित्त झाले आतुर 
भक्तिचा तू दिवा, अंतरंगी लाविला!१

तू कृपेची माउली
तूच तप्ता साउली 
प्रेमळा, कोमला, कामधेनू वत्सला!२

भक्तिची दे आवडी 
धाव घेई तातडी
भेटशी जर ना त्वरे बोल तुजला लावला!३ 

अमृताहुनि गोड तू 
चंद्रम्याहुनि शीत तू
सांग रे माझ्याविना असशि का तू वेगळा?४

कोण माझे तुजविणा 
हे दयाळा सांग ना
हासलो, रागेजलो म्हण तरी मज आपुला!५

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
(संत तुकाराम यांच्या चरित्रावर आधारित काव्यामधील एक कविता)
गोरख कल्याण, दादरा

Sunday, July 13, 2025

केवढे ऋण हे संतांचे!

ऋण शिरि संतांचे! केवढे ऋण हे संतांचे!ध्रु.

जे अनुभविले ते आचरिले
संतपदासी म्हणुनि पोचले
दुःख मिरविते सुख वेषातुन बोल प्रत्ययाचे!१

सुखाकडे मग पाठ फिरविली
रामभेटिची ओढ लागली
अनुभव घेउनी थोर पवाडे म्हटले नामाचे!२

नामच राम रामच नाम
जागृत ठेवा आत्माराम
सिद्ध करोनी हाती दिधले नाम ईश्वराचे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९५ (१३ जुलै) वर आधारित काव्य.

पुष्कळ गोष्टी वाईट आहेत हे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे, थोर पुरुषांचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवाने आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले. जगातील सुख हे खरे सुख नव्हे दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे आणि त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. नामाकरिता आपण नाम घेतो का? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ति मनात उठून न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ति बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण.

Tuesday, July 8, 2025

संते सिद्ध करुनी दिले, नाम भगवंताचे!

संते सिद्ध करुनी दिले, नाम भगवंताचे!ध्रु.

नाम घ्यावे उठाउठी
थोर लाभ नामापोटी
ज्ञान होण्या देत दृष्टी - नाम भगवंताचे!१

नाम घ्यावे येताजाता
नुरे कसलीच चिंता
करी वेदनांसी वेद - नाम भगवंताचे!२

नाम घ्यावे श्वासोच्छ्वासी
नाम घ्यावे आनंदासी
कलीयुगी चिंतामणी - नाम भगवंताचे!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १९० (८ जुलै) वर आधारित काव्य.

खरा सत्पुरुष तोच की जो भगवंताच्या नावाने देहधारी जीवांना आणि वासनेमध्ये गुरफटून गेलेल्या पिशाच्चांना चांगल्या अवस्थेला घेऊन जातो. मनुष्याने चिकित्सा करावी पण चिकित्सेचा हेतु शुद्ध असावा. सत्य काय आहे हे शोधण्यासाठी जर चिकित्सा केली तर त्याचे मार्ग निराळे असतात. दुसऱ्याला ताप देणे ही चिकित्सा नव्हे.

Thursday, July 3, 2025

पोवाडा श्रीगुरुदेवांचा


गुरुदेव रानडे आले निंबाळ घराला केले
चल पोवाडा गा म्हटले। गुरुचरित असे उलगडले!ध्रु.

कट्टाने घेता नाम। या जिवा मिळे आराम 
सदगुरु घेववी नाम। भूमिका राहु दे ठाम
काळजी नको, भवभीति नको, जग आत्मानंदे भरले!१

आनंद आत बाहेर, सदगुरुकृपाही थोर
ओसरे सर्व काहूर, भक्तीचा आला पूर
वैराग्य भले, सवयच बनले, या मनास उन्मन केले!२

ना नेम न निष्ठा काही, तरी भाव गुरुपदी राही 
नित घेरी मजला येई, मस्तकही हलके होई
अभ्यास घेत गुरु हात धरत, चालवी नेम जग बोले!३

ना घेती जेथे नाम, तेथे न जरा आराम 
ते स्मशान कसले धाम, माणसे जिथे बेफाम 
घे रामनाम अवतरे राम, मन भाऊ त्याला बोले!४

भक्ती जर उदया आली, तो दसरा तीच दिवाळी 
जी ज्योत घराला उजळी, ती गुरुकृपा शुभ काळी 
ते बळ येते तुज हित सुचते, विश्वासे मम मन बोले!५

ज्ञानेश्वर मजशी बोले, तो नामदेवही बोले
पैठणात नाथे नेले, सज्जनगड मानस झाले 
ना अंत सुखा ऐकता तुका, हे संत आपले झाले!६ 

ध्यानाचा जडला छंद, नामाचा श्रवणी नाद
मग भोजन हेच प्रसाद, तो साद तसा प्रतिसाद 
जो जसा बघे, त्या तसा दिसे, तो तृप्त शेष जणु डोले!७

आजार तनाचा ज्यास, त्या सहण्याचा अभ्यास 
सोहं हे औषध खास, मी देह नव्हे रुजण्यास
उड उंच जरा, बघ वसुंधरा, मनमयूरनर्तन चाले!८ 

बोलणे न तत्त्वज्ञान, वागणेच तत्त्वज्ञान 
पुरुषास चिंतणे ध्यान, प्रकृती उपाधी जाण
सारून देह निपटून मोह, निजशिष्या मुक्तच केले!९

प्रार्थना करावी देवा। करवुनि घे काही सेवा 
स्वर्ग ही करी मग हेवा। नाम हा अमोलिक ठेवा 
नामास योग आनंद भोग, आईने लाडच केले!१०

अनुभव हा ज्याचा त्याला, जो साधन करतो त्याला 
येतसे न सांगायाला, तो शब्दहि मूकच झाला
थबकला काळ, तो जपत माळ संजीवन त्यातहि भरले!११

कालचे काल राहू दे व्हायचे काय होऊ दे
मज चालू क्षण साधू नामात दंग होऊ दे 
हा पुनर्जन्म सद्‌‌भाग्य परम शिष्याच्या वाट्या आले!१२

जन्म ना मरण संताला तो कालातीतच झाला
सच्छिष्य सद्‌‌गुरु झाला, वेगळा कुणी ना उरला
ती गुरुकृपा करविते जपा, मग आनंदाश्रू झरले!१३

देशाची सेवा हीच, ती समाजसेवा हीच
ना विकार करती जाच, बेभान होउनी नाच
पाहिले न जे, ऐकिले न जे, रामाचे भाग्य उजळले!१४

पोवाडा ऐसा गाता मन हादरताहे आता
मी निमित्त केवळ होता शब्दांचे वाहन बनता 
हरि गिरिधारी शिरि छत्र धरी मज निवांत निर्भय केले!१५

आनंद स्वरूपी आहे तू आत वळूनी पाहे
सुखदुःखे सोसत राहे सामर्थ्य गुरु देताहे
ना नडे कुठे रानडे वदे श्रीराम पदांवर लोळे!१६

निंबाळ घराला केले! 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३/४.०९.१९९८