आनंदे भोगेन प्रारब्धाचे भोग!ध्रु.
देहाशी संबद्ध
राहते प्रारब्ध
साहवे न रामा तुझ्याशी वियोग!१
कर्माचेच फळ
प्रारब्ध निखळ
मनाने जमू दे रामा सहयोग!२
सरे भवभय
झालो निरामय
नामे घालवीला देहभाव रोग!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक २६० (१६ सप्टेंबर) वर आधारित काव्य.
खरोखर प्रारब्धाचे भोग कोणालाही टळत नाहीत. प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ. आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर ते कुठून मिळणार? म्हणूनच आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्यावाईट गोष्टी देहाने भोगाव्या व मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे. खरा भक्त हा प्रारब्ध टाळू शकतो पण तो देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे व न भोगणे या दोन्हीची त्यांना फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळत नाही. आपल्या देहाला होणारे भोग आपल्या कर्माचेच फळ असते. प्रारब्धाची व ग्रहांची गती देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही. जे प्रारब्धाने आले ते आपल्याला तोडता येते, पण जे सवयीने बनलेले आहे ते आपण तोडू शकत नाही. याकरताच भगवंताच्या अनुसंधानाची सवय लावून घ्यावी, म्हणजे आपण प्रारब्धावर विजय मिळवल्यासारखेच आहे.
No comments:
Post a Comment