Wednesday, October 15, 2008

श्री गीतासार




ॐ श्री गीतासार 

जीवन ही रणभूमी आहे इथे लढावे लागे
नको मला संघर्ष म्हणुनी कसे कुणाचे भागे ?। १
स्वजन गुरुंना रणी बघुनी अर्जुनही गडबडला
यांना मारुनी कशास जगणे ? प्रश्न तयाला पडला । २
देह विनाशी धारण केले अविनाशी आत्म्याने
आत्मतत्त्व ओळखे असा नर गात नसे रडगाणे । ३
दृढनिश्चय जर नसला तर मग पुरता गोंधळ उडतो
निजकर्तव्या विसरून मानव शोकसागरी बुडतो । ४
कृष्णार्जुन हे जरी शेजारी अंतर फारच पडले
स्थितप्रज्ञ हरी, शांत पार्थ परी, पुष्प सुकुनी गेले ।५
यश येवो  वा लाभो अपयश कशास त्याची चिंता ?
कर्तव्याने घडतो मानव हेच सांगते गीता । ६
कर्तृत्वाचा भार शिरावर मनुष्य आपण घेतो
फलाशेत गुंतला असा तो दु:खी कष्टी बनतो । ७
ज्ञान आतले जगास दिसूदे  कर्माचरणातून
हरीकृपेची छाया भक्ता लागू न देते ऊन । ८
कर्मफलाचा त्याग देतसे मानवास विश्रांती
मी नच कर्ता जाण आतली समई मधली ज्योती । ९
इथॆ तिथे हरी, सदा सर्व हरी, अनुभूती श्रीमंती
हृदयमंदिरी भगवंताची सदैव असते वस्ती । १०
योगाभ्यासे आवरते मन हाव हावरी सरते
डोळे मिटुनी नेमे बसता शांती साधका वरते । ११
एकच आता ध्येय घ्या मने त्यासी समरस व्हावे
ध्याता ध्याता अमन मनाचे श्रीहरीने घडवावे । १२
उपभोगे नच शमे वासना जगात छी थु होई
विषयी विरक्ती मोठी प्राप्ती जवळी जर पुण्याई । १३
मन चंचल ते द्यावे बांधून अलगद त्या पवनाला
नामाचा मधु नाद जाणवे ध्यानी ज्याला त्याला । १४
आत्म्याचे नित भान जयाला मोह न शिवतो त्याला
सूत्री एका मणी गुंफले विश्वात्मक तो झाला । १५
नव्हे देह मी, मन बुद्धी न मी, भय कोणाचे आता
नित्य नव्याने होते प्रगती कृतीत स्वाभाविकता । १६
उत्पत्ती स्थिती प्रलयही यांचे स्थान एक भगवंत
हर्ष न जन्मे, शोक न मरणे, मी ही अनादी अनंत । १७
सागरात तो हिमालयी तो वटवृक्षही तो आहे
नद्यात गंगा, पशूत केसरी, पांडवी अर्जुन आहे । १८
विश्वरुप पाहण्या अर्जुना कृष्णे दिधली दृष्टी
हरवून बसला पार्थ स्वतःला सोसवे न त्या दीप्ती । १९
शरीर म्हणजे क्षेत्र तयातच परमात्मा हो प्रकट
शांत आर्जवी जना हवासा विषयी नसावे लिप्त । २०
नसे कुठे तो, नसे कधी तो, अखिल चराचर तोच
अंतर्बाह्यही व्यापून उरला श्रीनारायण तोच । २१
सूक्ष्मत्वाने अलिप्त आत्मा गुणातीत तो मुक्त
ज्ञान खेळते कृतीकृतीतून विभक्त नसतो भक्त । २२
सुख दुःखी सम होता येते शांतही होता येते
हरिपाठी जो स्थिरावला त्या अवघे हरिमय होते । २३
अश्वत्थासम जीवन रचना समजून उमजून घ्यावी
प्रसन्न भावातून सदोदित हरिलीला देखावी  । २४
गाता गाता गीता कळते गीता स्वभावही तो बदले
रजोतमाला वेसण बसता सात्त्विक वृत्ति उमले । २५
धुंद मोगरा कैसा फुलला गंध आगळा आला
प्रभातकाळी कसा अचानक माधव सदनी शिरला । २६
विवेक आणिक विचार बांधव त्याग सोबती तिसरा
साधकास तर सत्संगाने नित्य दिवाळी दसरा । २७
कुरुक्षेत्र जे धर्मक्षेत्र ते  जरी वाटते व्हावे
कर्तव्याचे पालन देवा या हातून घडवावे । २८
हरी वाजवतो गीता मुरली उंचावरती  नेतो
उदात्त उन्नत होता मानस अर्जुन माधव होतो । २९
स्वरुपानाथांनी या सदना क्षणात पावस केले
मांडीवरती घेऊन वदनी घासही प्रेमे दिधले । ३०
पडता पडता उचलून घेते बालकास गीताई
मधुर स्वरांनी गाऊन गाणी अंजन घाली आई । ३१
हरिदिनी अवचित ये आकारा श्रीकृष्णाची मूर्ती
उठता बसता गीता गाता सहवासाने तृप्ती । ३२
ईशबुद्धीने घडता कर्मे दिव्यपदा नर जाई
श्रीरामाची सरे खिन्नता प्रसन्नमुख तो होई । ३३

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।









No comments:

Post a Comment